राम मंदिर भूमिपूजनाचा संकल्प गेल्या वर्षी सोडण्यात आला व त्याचे भूमिपूजनही संपन्न झाले. भविष्यात राष्ट्रीय प्रतीक म्हणून या भव्य मंदिराकडे यापुढे पाहिले जाईल. असंख्य हिंदूंची आस्था म्हणून या मंदिराचे भूमिपूजन देशाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण होता. आता भारतीयांच्या आस्थेचा विचार जगभरातील देशांनीही करायला सुरुवात केली आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या दुबईत आता मंदिराची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या मंदिराकडे पाहताना आता दोन्ही देशांच्या सांस्कृतिक संबंधांचाही विचार केला जाणार आहे.
दुबईतील प्रस्तावित मंदिर पुढील वर्षी दिवाळीनिमित्त भाविकांसाठी खुले केले जाईल. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण केले होते. २०१५ साली मोदींच्या दौर्यानिमित्त अबुधाबी येथे सदर मंदिरासाठी जमीन देण्याचे वचन तेथील सरकारने दिले होते. मंदिराची निर्मिती शहराच्या जेबेल अली भागातील गुरुनानक सिंह दरबारच्या नजीक होणार आहे. सिंधी गुरू दरबार मंदिर हे इथले सर्वात जुने मंदिर. याची निर्मिती १९५०च्या दशकात झाली होती. या मंदिरांच्या ट्रस्टींनी ‘युएई’ सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
मंदिराच्या संपूर्ण परिसरात एकूण ११ देवी-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. भारतीय संस्कृती ही विविधतेतून एकतेचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक भारतीयांच्या परंपरा, हिंदू धर्माशी संबंधित मान्यतांना आदर्श मानून या मंदिराची उभारणी केली जाणार आहे. भारतीय पुरातन मंदिरांच्या वास्तुकलेशी साधर्म्य राखून या मंदिराची निर्मिती केली जाणार आहे, त्यामुळे या मंदिराच्या वास्तुकलेलाही एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे.
हे मंदिर एकूण २५ हजार चौरस फूट परिसरात उभारले जाईल, तर एकूण परिसर हा ७५ हजार एकर इतका पसरलेला आहे. मंदिराच्या निर्मितीत स्टिल किंवा स्टिलपासून तयार करण्यात आलेल्या इतर कोणत्याही वस्तू वापरल्या जाणार नाहीत. पाया मजबूत उभारण्यासाठी ‘फ्लाय अॅश’चा वापर केला जाणार आहे. याचा वापर काँक्रीटच्या बांधकामात मजबुती आणण्यासाठी केला जातो. त्यामुळे मंदिराची निर्मितीही जितकी भव्यदिव्य असेल तितकेच भक्कमही असणार आहे. बांधकामाचा एकूण खर्च हा १५० कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईतील ऑपेरा हाऊस येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे ‘बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम संस्था’ (बीएपीएस) मंदिराचे भूमिपूजन केले होते. विशेष म्हणजे, भारतातील तीन हजार कामगार दिवसरात्र राबून पाच हजार टन इटालियन मार्बलवर नक्षीदार कोरीवकाम करत असून, यात धार्मिक चिन्हे आणि मूर्तींचे कोरीवकाम केले जात आहे. मंदिराच्या बाहेरचा हिस्सा १२ हजार २५० टन गुलाबी रंगाच्या दगडाने साकारला जाणार आहे. दोन तळमजले, एकमजला असलेल्या या मंदिराची उंची ही २४ मीटर इतकी असेल. ७७५ भाविक एकत्र जमू शकतील, इतके मोठे सभागृह बांधले जाईल.
मंदिराची निर्मिती ‘स्वामी नारायण संस्थान’च्या अखत्यारित करण्यात येणार आहे. शिल्पकारांनाही त्यादृष्टीने मार्गदर्शन केले जात आहे. ५० अंश सेल्सिअसमध्येही न तापणार्या दगडांनी या मंदिराची उभारणी केली जाणार आहे. केवळ राजस्थानमध्ये मिळणार्या या दगडांचे हे खास वैशिष्ट्य आहे. युएईमध्ये एकूण शेकडो मशिदी आहेत. तसेच ४० चर्च आणि दोन गुरुद्वारा व दोन मंदिरे आहेत. दुबईतील महामार्गावर तयार केले जाणारे हे अबुधाबीतील पहिले दगडांमध्ये कोरीवकाम करून उभारण्यात येणारे मंदिर ठरेल.
जेबेल अली भागातील गुरुनानक दरबार हा याच परिसरात आहे. अबुधाबीहून केवळ ३० मिनिटे अंतरावर हे हिंदूंच्या आस्थेचे श्रद्धास्थान वसवले जाणार आहे. पश्चिम आशियातील दगडांपासून तयार झालेले हे पहिले मंदिर. असेच एक मंदिर आता अबुधाबीमध्येही आकार घेत आहे. हे या शहरातील सर्वात पहिले मंदिर असेल. या मंदिराचा विस्तार १६.७ एकरमध्ये झाला आहे. यासाठीही तब्बल ९०० कोटींचा निधी खर्च होईल. २०२३ मध्ये अबुधाबीतील हे भव्य मंदिरही बांधून पूर्ण केले जाणार आहे.