देशभरातील २१ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ३२ मुलांचा होणार सन्मान
मुंबई: दरवर्षी प्रजासत्ताकदिनाला राजधानी दिल्लीत होणारे पथसंचालन आणि सादर होणारे वेगवेगळे चित्ररथ हे प्रत्येक भारतवासीयासाठी अत्यंत अभिमानाची असते. आणि याचबरोबर दिले जाणारे बालशौर्य पुरस्कार हि देखील तेवढीच औत्सुक्याची गोष्ट असते. यंदा म्हणजे २०२१ साली तब्बल ३२ मुला- मुलींना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि त्यामध्ये ५ मुलं महाराष्ट्रातील आहेत.
पंतप्रधानांनी या सगळ्या 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' विजेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आणि यावेळी ही लहान मुले म्हणजे इतरांसाठी मोठा प्रेरणास्रोत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी या वेळी काढले. देशभरातील २१ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील या ३२ मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा, संस्कृती, कला, समाजसेवा या विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील या '५' बाल- शूर वीरांबाबत जाणून घेऊया:
१. महाराष्ट्रातील कमलेश वाघमारे या मुलानं प्रसंगावधान दाखवत बुडत असलेल्या दोन मुलांचे प्राण वाचवले. त्याच्या याच कामगिरीसाठी त्याला शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. भविष्यात कमलेशला राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू व्हायचे आहे.
२. महाराष्ट्रातील नागपूरमधील श्रीनाभ अगरवाल याला शेती आणि विज्ञानातील उल्लेखनीय संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सोप्यातल्या सोप्या पद्धतीने शेती करता यावी, यासाठी श्रीनाभ संशोधन करत आहे.
३. पुण्याच्या सोनित सिसोलेकर याला विज्ञानातील कामगिरीसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोनितने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी 'सर्वोत्तम वैज्ञानिक' म्हणून पुरस्कार जिंकला आहे व त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.४. महाराष्ट्रातील जळगावमधील अर्चित पाटील या मुलाने महिलांसाठी विशेष डिव्हाईस तयार केलं आहे. यामुळे बाळंतपणादरम्यान होणाऱ्या महिलांच्या मृत्यूमध्ये घट होऊ शकते , त्यामुळे हे डिव्हाईस अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अर्चितच्या याच संशोधनासाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
५. महाराष्ट्रातील काम्या कार्तिकेयन ही १३ वर्षीय मुलगी; सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे. तिने विविध शिखरे आणि पर्वत सर केली आहेत. सध्या तिने 'साहस' नावाचे मिशन सुरू केलं असून या प्रकारातील ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. काम्याच्या या कामगिरीसाठी क्रीडा क्षेत्रातील बाल पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात येत आहे.