पाक-तुर्की-अझरबैजानच्या इस्लामिक त्रिकुटाचा जागतिक धोका

20 Jan 2021 21:01:43

Pak_1  H x W: 0
 
 
पाकिस्तान आणि तुर्कीमधील घातक आघाडी केवळ मध्य आशियाच्या स्थैर्यासाठी धोकादायक नाही, तर जगाच्या दृष्टीनेही खतरनाक सिद्ध होऊ शकते.
 
 
सद्यःस्थितीत इस्लामी जगतात एक नवीनच प्रकारचे ध्रुवीकरण पाहायला मिळते. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कीच्या खिलाफतीचा अंत झाला आणि इस्लामी मिल्लतचा म्होरक्या म्हणून तोपर्यंत ओळखल्या जाणाऱ्या खलिफाचे अस्तित्वदेखील जागतिक परिप्रेक्ष्यातून शून्यवत झाले. परंतु, आता पुन्हा एकदा तुर्कीचे अध्यक्ष रसीप तय्यप एर्दोगान इस्लामी कट्टरपंथाचे नेते होत इस्लामी मिल्लतला आपल्या झेंड्याखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले दिसतात. गेल्यावर्षी अझरबैजान आणि आर्मेनियादरम्यान सशस्त्र संघर्ष उद्भवला व त्यावेळी तुर्कीने संरक्षकाची भूमिका घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यातूनच पुढे इस्लामी जगतातील सर्वात मोठी लष्करी शक्ती म्हणजेच पाकिस्तान, सौदी अरेबियाचे पारडे सोडून त्याचा शत्रुदेश तुर्कीच्या कळपात येऊन उभा ठाकला आणि अझरबैजानचे समर्थन करू लागला.
 
 
 
नुकतेच पाकिस्तानचे हवाई दलप्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी अझरबैजानची राजधानी बाकू येथे हवाई दलप्रमुख लेफ्टनंट जनरल रमिज ताहिरोव यांची भेट घेतली व त्यात त्यांनी पाकिस्तानी पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. सोबतच संरक्षणमंत्री कर्नल जनरल झाकीर हसनोव यांच्याशी केलेल्या चर्चेत पाकिस्तान, अझरबैजानला ‘जेएफ-१७’ लढाऊ विमाने उपलब्ध करून देईल, याची खात्री दिली. उल्लेखनीय म्हणजे, याच दौऱ्याच्या पुढील टप्प्यात मुजाहिद अन्वर खान तुर्कीमध्ये गेल्यानंतर म्हणाले की, “पाकिस्तान आणि तुर्कीची संस्कृती जशी समान आहे, तसाच परस्परांवरील विश्वासही समान आहे.” इतकेच नव्हे, तर दोन्ही देशांचे समान हित व समान आव्हाने असल्याचेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तान सायप्रस आणि अन्य प्रादेशिक मुद्द्यांवर तुर्कीला पाठिंबा देत असल्याचे सांगत, त्यांनी ३० वर्षांपासून बळकावलेला प्रदेश मुक्त करण्यासाठी आर्मेनियाविरोधातील संघर्षात तुर्कीने अझरबैजानला दिलेल्या समर्थनाचीही पाकिस्तानने प्रशंसा केली.
 
 
उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानच्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंधांचा आधार इस्लामी एकता हाच आहे. १९५५ साली ‘सेन्टो’ अथवा ‘बगदाद करार’ करण्यात आला होता व यात तुर्कीसह पाकिस्तानचाही समावेश होता. त्यावेळी त्याला ‘कम्युनिझमविरोधातील ढाल’ म्हटले गेले. पण, प्रत्यक्षात तत्कालीन तुर्कीचे पंतप्रधान अदनान मेंडेरेज आणि त्यांचे इराकी समकक्ष नुरी सईद यांच्याबरोबर पाकिस्तानने जाणे, इस्लामी जुगलबंदीच्या रूपातच होते. तेव्हापासूनच पाकिस्तान अशा अनेक संघटनांत अर्थात इस्लामी एकतेच्या आधारावर सक्रिय भूमिका निभावताना दिसतो.
 
 
नागोर्नो-काराबाख: वादाचे केंद्रस्थान!
 
 
दरम्यान, अझरबैजानबरोबरील आर्मेनियाचा वाद तसा जुनाच आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष नागोर्नो-काराबाखच्या ताब्यावरून निर्माण झाला होता. १९८८ साली काराबाखच्या स्थानिक परिषदेमधील प्रतिनिधींनी प्रदेशाला आर्मेनियात विलीन करण्याच्या बाजूने मतदान केले होते. नंतर १९९१ सालच्या जनमत चाचणीने या निर्णयाला अनुमोदन दिले व पुढे आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये लष्करी संघर्षाला सुरुवात झाली. दोन्ही देशांतील संघर्ष नंतर तीन वर्षे म्हणजे १९९४ सालापर्यंत सुरुच राहिला. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनंतर २७ सप्टेंबर, २०२० रोजी नागोर्नो-काराबाख आणि आसपासच्या प्रदेशावरून अझरबैजान आणि आर्मेनियाच्या सशस्त्र बलांत पुन्हा संघर्ष उद्भवला. अझरबैजानने यावेळी नागोर्नो-काराबाखचा मोठा भाग आणि त्याच्या जवळपासच्या भागांना पुन्हा ताब्यात घेतले. त्यानंतर १० नोव्हेंबर, २०२० रोजी अझरबैजान, आर्मेनिया आणि रशियात एका त्रिपक्षीय शस्त्रसंधी करारावर हस्ताक्षर करण्यात आले. त्यात आर्मेनियाने नागोर्नो-काराबाखच्या परिसरातील उर्वरित कब्जाप्रदेश अझरबैजानला द्यावा, यासाठी त्या देशाला अगतिक केले गेले.
 
 
अझरबैजान भू-राजनैतिकदृष्ट्या अस्थिर प्रदेशात स्थित आहे. चारही बाजूंनी शक्तिशाली आणि प्रभावशाली शेजाऱ्यांनी अझरबैजानला वेढलेले असून विभिन्न हितांनी प्रेरीत हे देश अझरबैजानला आपल्या प्रभावक्षेत्रात आणू इच्छितात. अझरबैजानच्या उत्तरेला रशिया असून, तो त्या देशाच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे व अझरबैजानला आपल्या परसदारासारखे मानतो. अझरबैजानचे पाश्चिमात्य देशांशी बळकट आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैचारिक संबंध आहेत. आर्थिक सहकार्याच्या संदर्भात पाश्चिमात्त्य कंपन्यांनी अझरबैजानच्या ऊर्जाविषयक साधनसंपत्तीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे, इटलीनंतर इस्रायल हा देश अझरबैजानकडून तेलाची आयात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. अझरबैजान बाकू-त्बिलिसी-सेहान पाईपलाईनच्या माध्यमातून इस्रायलच्या 40 टक्के तेलाचा पुरवठा करतो.
 
 
तुर्की, अझरबैजान, पाकिस्तान आणि भारत!
 
 
दरम्यान, मध्य आशियातील अझरबैजानसारखा लहानसा देश भारतावर कोणता प्रभाव पाडतो, हा खरोखरच एक रंजक प्रश्न आहे. १९९०च्या सुरुवातीला अझरबैजानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात पाकिस्तान तुर्कीनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. तसेच आर्मेनियाला मान्यता न देणारा पाकिस्तान हा एकमेव देश आहे. आपण अझरबैजानच्या पाठीशी असून परस्परांतली एकता दाखवण्यासाठी पाकिस्तानने आर्मेनियाला मान्यता न देण्याचे पाऊल उचलले. सोबतच पाकिस्तान तुर्कीसह अझरबैजानशीदेखील लष्करी संबंध मजबूत करत आहे. अझरबैजान, पाकिस्तान आणि तुर्कीने काश्मीर, सायप्रस आणि नागोर्नो-काराबाखसारख्या राष्ट्रीय हितांच्या प्रकरणांत एकमेकांचे सातत्याने समर्थन केलेले आहे. इतकेच नव्हे, तर अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव काश्मीरमध्ये भारताकडून केल्या जाणाऱ्या कथित मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची बाजू घेतानाही दिसले.
 
 
परंतु, आणखीही एक तथ्य आहे जे आतापर्यंत प्रकाशात आलेले नाही. ते म्हणजे, अझरबैजान आता इस्लामी कट्टरपंथ आणि दहशतवादाचा गड होत चालला आहे आणि त्यात पाकिस्तानची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या मदरशांमधून कट्टरपंथी इस्लामचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या नवनव्या दहशतवादी स्नातकांच्या ‘प्लेसमेंट’साठी अझरबैजान एक उपयुक्त ठिकाण झाले आहे.
 
 
आर्मेनियाचे उपपरराष्ट्रमंत्री एवेट एडोन्स यांनी नुकतीच एका भारतीय वृत्तवाहिनीला चालू घडामोडींवर प्रतिक्रिया दिली, जी महत्त्वाची म्हटली पाहिजे. ते म्हणाले की, “अझरबैजानच्या लष्करात पाकिस्तानने आपल्या इस्लामी जिहाद्यांची भरती केल्याची शक्यता आहे. अर्थात, पाकिस्तानी मुळाचे दहशतवादी नागोर्नो-काराबाखमध्ये मोठी भूमिका निभावत आहेत, जशी त्यांनी ९०च्या दशकाच्या प्रारंभी निभावली होती. इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावार पाकिस्तानी लढवय्ये तुर्कीच्या मार्गाने अझरबैजानमध्ये पोहोचल्याची माहितीदेखील वेगवेगळ्या स्रोतांनी दिलेली आहे. आर्मेनियाचे राजकीय आणि संरक्षण विश्लेषक तसेच ‘द आर्मेनाईट’चे संपादक विल्यम बॅरामियन यांनी ‘आयएएनएस’ या भारतीय वृत्तसंस्थेला सांगितले की, “अझरबैजान जिहादी भाड्याच्या सैनिकांचा वापर करत असल्याचे अनेकानेक पुरावे आहेत. भ्रष्टाचार आणि विरोधकांसह प्रसारमाध्यमांवर केले जाणारे हल्ले, दिवाळखोरीत जाणारी अर्थव्यवस्था, कोरोना महामारीचे कुव्यवस्थापनसारख्या प्रकरणांत हुकूमशहाच्या रूपातील अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव जनतेच्या नाराजीचा सामना करत आहेत,” असेही बॅरामियन म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या लष्कराचे आणखी नुकसान होण्यापासून बचाव करण्यासाठी, तसेच आपल्या स्थितीला सुदृढ करण्यासाठी अझरबैजानकडे पाकिस्तानने निर्यात केलेले दहशतवादी सर्वात सुलभ साधन आहे. अर्थात, पाकिस्तान आणि तुर्कीकडे अशा संघर्षमय प्रदेशांत जिहादी दहशतवाद्यांची एक मोठी संख्या उपस्थित आहे.
 
 
 
दरम्यान, पाकिस्तान आणि तुर्कीमधील घातक आघाडी केवळ मध्य आशियाच्या स्थैर्यासाठी धोकादायक नाही, तर जगाच्या दृष्टीनेही खतरनाक सिद्ध होऊ शकते. कारण, एर्दोगान यांचे ‘इसिस’शी असलेले नाते जगजाहीर आहे. त्यांचा मुलगा ‘इसिस’च्या नियंत्रणातील मोसुल तेलक्षेत्रातून आणलेल्या तेलाची विक्री करून आपले खिसे भरत आला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि तुर्कीची हातमिळवणी केवळ मध्य आशियाच नव्हे, तर जगाच्या चिंतेचे कारण होत आहे.
 
 
(अनुवाद : महेश पुराणिक)
 
 
Powered By Sangraha 9.0