सगतसिंग राठोड आणि दहा हजार डॉलर्स

15 Jan 2021 22:12:36

vicharvimarsh_1 &nbs


दि. १५ जानेवारी १९४९ साली जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडून भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली. हा दिवस ‘भारतीय सेना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अशाच एका पराक्रमी सैन्यवीराची ओळख करुन देणारा हा लेख...

१९६२ सालचा जुलै किंवा ऑगस्ट महिना होता. भारतीय सेनेच्या ५०व्या पॅराट्रूपर ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर सगतसिंग राठोड हे आग्रा कँटोन्मेंटमधल्या ‘हॉटेल क्लार्क शिराझ’मध्ये बसले होते. ते आणि त्यांचे काही सहकारी, सर्वसाधारण नागरी वेशामध्ये, कुणा विशेष माणसाला भेटण्यासाठी, तिथे आले होते. भारतीय सेनेच्या पहिल्या कमांडो पथकाचे ते सगळे वरिष्ठ अधिकारी, साध्या कपड्यांमध्ये असले तरी अतिशय सावध होते.एवढ्यात चार अमेरिकन प्रवासी त्यांच्या टेबलापाशी आले आणि इतरांना सोडून त्यांनी थेट ब्रिगेडियर सगत यांनाच प्रश्न केला, “तुम्ही ब्रिगेडियर सिंग का? गोव्याचे मुक्तिदाता ते तुम्हीच. बरोबर आहे ना?” ब्रिगेडियर सगत आणि त्यांचे सहकारी आश्चर्यचकित झाले. कारण, डिसेंबर १९६१ मध्ये गोवा पोर्तुगीज सत्तेच्या पंजातून मुक्त केल्यावर, जून 1962 पर्यंत त्यांची ब्रिगेड गोव्यातच होती. नुकतेच ते पुन्हा ब्रिगेड मुख्यालयात म्हणजे आग्य्राला येऊन जरा स्थिरस्थावर होत होते आणि हे चार अनोळखी अमेरिकन प्रवासी थेट ब्रिगेडियर सगतसिंगना नावनिशी ओळखत होते. काय भानगड असावी?ब्रिगेडियर सगतसिंगनी शांतपणे त्या अनोळख्यांना म्हणलं, “होय, मीच ब्रिगेडियर सिंग. तुम्ही मला ओळखता ही चांगली गोष्ट आहे. बोला, काय काम आहे?”“तुम्हाला माहीत नसेलच की, तुमच्यावर दहा हजार डॉलर्सचं बक्षीस लावलेलं आहे.” अनोळखी अमेरिकनांपैकी एक जण स्मित करीत म्हणाला.पुन्हा सगळ्यांचे चेहरे प्रश्नार्थक झाले आणि शरीरं कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी ताठ झाली. कमांडो प्रशिक्षणातून आलेली ती प्रतिक्षिप्त क्रिया होती.

“त्याचं असं आहे, ब्रिगेडियर सिंग,” तो अमेरिकन पुढे बोलू लागला. “आम्ही प्रवासी आहोत. आम्ही पोर्तुगालमधून आग्य्राला ताजमहाल बघायला आलो आहोत. राजधानी लिस्बनमध्ये जवळ-जवळ प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कोपर्‍यावर, तुमच्या मोठ्या चित्रासकट पोस्टर लागलंय. त्यात म्हटलंय की, या माणसामुळे गोवा आपल्या हातातून गेला. तेव्हा त्याला पकडून पोर्तुगाल सरकारच्या सुपूर्द करणार्‍याला दहा हजार अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळेल, त्यामुळे आम्ही तुम्हाला सहज ओळखलं.” “मग? आता काय विचार आहे तुमचा? पकडा मला आणि कमवा दहा हजार डॉलर्स,” ब्रिगेडियर सगतसिंग किंचित हसत त्यांना म्हणाले. त्याबरोबर ते अमेरिकन्स प्रथम चकित झाले आणि मग एकाएकी खो-खो हसत सुटले. ते खरोखरच पर्यटक होते. हेरबीर नव्हते. ज्या माणसावर एका अधिकृत सरकारने तब्बल दहा हजार डॉलर्सचं बक्षीस लावलंय, तो माणूस बिनधास्तपणे एका सार्वजनिक हॉटेलात गप्पा मारत बसलाय आणि आपण त्याला ओळखल्यावर तो तितक्याच बिनधास्तपणे, ‘पकडा मला,’ असं म्हणतोय, हे सगळंच त्यांच्या दृष्टीने इतकं थरारक होतं की, त्यांना हसू आवरता आवरेना.


आता ब्रिगेडियर सगतसिंगांच्या सहकार्‍यांनाही हसू येऊ लागलं. पण, त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याचीही जाणीव झाली आणि त्यांनी ब्रिगेडियर साहेबांना जवळ जवळ जबरदस्तीनेच तिथून बाहेर काढून मुख्यालयात आणलं. मग हा किस्सा प्रथम ‘आग्रा लष्करी छावणी’ नि तिथून देशभरातल्या सगळ्या लष्करी छावण्यांमध्ये पसरला. सगळ्यांना खूप गंमत वाटली, आनंद वाटला, अभिमान वाटला आणि काळजीही वाटली. स्वत: ब्रिगेडियर सगतसिंग मात्र नेहमीप्रमाणे मजेत होते. कमांडो कधी कळजी करत नसतो, तो काळजी घेतो. उत्तर भारतातले लोक आपल्या नावात वडिलांचं नाव लावत नाहीत. आडनावसुद्धा कधी लावतात, तर कधी लावत नाहीत. उदा. आपला लोकप्रिय क्रिकेटपटू कपिलदेव घ्या. कपिलने जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तो स्वतःचं नाव ‘कपिलदेव’ असं अख्खं न लावता, ‘कपिल- देव’ असं तोडून लावत असे. पुढे काही वर्षांनी तो ‘कपिल देव निखंज,’ असं नाव लावू लागला. महान क्रांतिकारक सरदार भगतसिंग यांचं आडनाव सिंधू. पण, ते आडनाव लावत नसत. स्वतःचच नाव तोडून ‘भगत-सिंग’ असं लावत असत.तर तसंच सगतसिंगांचं आडनाव राठोड.राजस्थानातल्या शेखावाटी या नावाने ओळखल्या जाणार्‍या परिसरात ब्रिजलाल राठोड या शिपाईगड्याच्या घरात सगतसिंग १९१९साली जन्मले. ब्रिजलाल बिकानेर संस्थानच्या ‘गंगा रिसाला’ या घोडदळ पथकात होता. १९१४ ते १९१८च्या पहिल्या महायुद्धात बिकानेर संस्थानचं सैन्य, ब्रिटिश सेनादलाचा एक भाग म्हणून मेसोपोटेमिया, पॅलेस्टाईन आणि फ्रान्समध्ये लढून मोलाचा युद्धानुभव मिळवून परत आलं होतं.

ब्रिजलालचा मुलगा सगतसिंगही बापाच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या १९व्या वर्षी १९३८ साली बिकानेर संस्थानच्या सैन्यात दाखल झाला. पुढच्याच वर्षी म्हणजे १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. संस्थानी सैन्यात जमादार असलेला सगतसिंग अधिकारी म्हणून ब्रिटिश सैन्यात दाखल झाला आणि १९४१ साली थेट बसरा या ठिकाणी गेला. १९४५ साली महायुद्ध संपलं, तेव्हा असंख्य भारतीय अधिकारी मोठा युद्धानुभव घेऊन भारतात परतले. लवकरच स्वातंत्र्य मिळालं. संस्थानं विलीन झाली. भारतीय सेनादलांचं पुनर्गठन, पुनर्संघटन, पुनर्बांधणी करणार्‍या जनरल करिअप्पांनी संस्थांनी सेनांमधल्या अनेक गुणी हिर्‍यांना अचूक उचललं आणि व्यवस्थित कोंदणात बसवलं.१९४९ ते १९६१ पर्यंत सगतसिंग ‘गुरखा रायफल्स पथका’मध्ये नानाविध जबाबदार्‍या उत्तमपणे पार पाडत होते. ते आपलं आडनाव ‘राठोड’ न लावता ‘सगत-सिंग’ असं नाव लावू लागले.१९६१साली कर्नल सगतसिंग यांना ब्रिगेडियर म्हणून बढती मिळाली आणि त्यांची बदली ‘गुरखा रायफल्स’मधून ‘५० पॅराशूट ब्रिगेड’ या भारताच्या पहिल्या कमांडो पथकात करण्यात आली. सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटलं. कारण, शिपाई आणि सेनापती म्हणून सगतसिंगांनी चांगलीच कीर्ती मिळवली असली, तरी त्यांना ‘पॅराशूट जम्पिंग’चा एका वेळेचा सुद्धा अनुभव नव्हता.आणि इथेच सगतसिंगांच्या क्षात्रतेजाचा नमुना सर्वांना बघायला मिळाला. ‘पॅरा जम्पिंग’चा अवघड अभ्यासक्रम विक्रमी वेळात पूर्ण करून, प्रशिक्षकांनाही चकित करत ब्रिगेडियर सगतसिंगांनी ब्रिगेडची मानाची ताबंडी टोपी (मरून बॅरेट) मिळवली.

ही सप्टेंबर १९६१ मधली गोष्ट आणि लगेचच नोव्हेंबर १९६१मध्ये गोवामुक्तीची मोहीम सुरू झाली. गोव्याच्या पोर्तुगीज प्रदेशात घुसून थेट राजधानी पणजी गाठण्याचं मुख्य काम मेजर जनरल कँडेथ यांच्या नेतृत्वाखाली १७वी इन्फट्री डिव्हिजन करणार होती. बिग्रेडियर सगतसिंग यांच्या ‘50 पॅराशूट ब्रिगेड’ने या १७ इन्फट्री डिव्हिजनला पूरक भूमिका करायची होती.ब्रिगेडियर सगतसिंग यांची ब्रिगेड ६ डिसेंबर, १९६१ला बेळगाव छावणीत पोहोचली आणि १८ डिसेंबर, १९६१च्या सकाळी तीन दिशांनी ते गोव्यात घुसले. एक तुकडी उसगांवमार्गे फोंड्याकडे निघाली. दुसरी तुकडी बनासतारी मार्गे पणजीकडे निघाली आणि तिसरी थिवीकडे निघाली. हे सगळे कमांडो इतके कसलेले होेते की, पोर्तुगीज सैन्याने वाटेत उभारलेले अडथळे, भूसुरुंग आणि नद्यानाले लीलया पार करत, १९डिसेंबरला ते पणजीत पोहोचलेसुद्धा. प्रतिकार करणारे पोर्तुगीज सैनिक किती टुकार आहेत, हे लोकांना आणि पत्रकारांना कळावं म्हणून ब्रिगेडियर सगतसिंगांनी एक गंमत केली. त्यांनी आपल्या ब्रिगेडला आज्ञा दिली की, तुमची पोलादी हेल्मेटं उतरवा आणि नेहमीच्या साध्या तांबड्या टोप्या (मरून बॅरेट्स) चढवा. हा होता एका राठोड राजपूत सेेनापतीचा रगेल विनोद! गोवा मुक्ती मोहिमेचे प्रमुख सेनापती लेफ्टनंट जनरल जयंतनाथ चौधरी यांना जेव्हा हा किस्सा कळला, तेव्हा ते बेहद खूश झाले आणि म्हणाले, “दॅट इज सगतसिंग! और कोई नही हो सकता!!”

१९७१च्या बांगलादेश युद्धात लेफ्टनंट जनरल पदावर पोहोचलेल्या सगतसिंगांकडे सेनेच्या चौथ्या कोअरचं प्रमुख पद होतं. त्यांच्या कोअरने आगरताळ्याहून निघून सिल्हेट आणि कोमिल्ला ही ठाणी साफ करून राजधानी ढाक्याच्या अलीकडे मेघना नदीच्या पश्चिम तीरावर थांबायचं होतं. ढाक्यात घुसणं ही त्यांची जबाबदारी नव्हती. पण, सगतसिंग कसले तेवढ्यावर थांबतायत. त्यांनी भारतीय वायुसेनेशी उत्तम समन्वय साधून ‘एम-आय ७४’ या हॅलिकॉप्टर्समधून भराभर सैनिक पुढे पुढे उतरवत नेले. एका हॅलिकॉप्टरमधून १४ माणसं नेण्याची क्षमता असताना ग्रुप कॅप्टन चंदन सिंग यांनी २३ माणसं नेली. व्यावहारिकदृष्ट्या हा शुद्ध मूर्खपणा होता. असेच मेघना नदीच्या पात्रात त्यांनी बेधडक ‘पीटी-७६’ हे रणगाडे घुसवले आणि परतीर गाठलं. कनिष्ठ अधिकारी त्यांना सांगत होते की, “साहेब, हे रणगाडे युरोपातल्या छोट्या नद्या ओलांडू शकतील. पण, ही मेघना नदी नव्हे, नद आहे.” यावर सगतसिंग मिस्किलपणे म्हणाले, “अर्धे रणगाडे वाहून गेले तरी चालेल. पण, घुसा” हादेखील शुद्ध मूर्खपणा होता. पण, असे वेडे आणि मूर्ख लोकच इतिहास घडवतात. मेघना नदीच्या पलीकडून भारतीय सैन्य इतक्या अल्पावधीत ढाक्याच्या जवळ पोहोचेल, अशी पाकिस्तानी सेनापतींना कल्पनाच नव्हती. लेफ्टनंट जनरल सगतसिंगांच्या पॅराशूटर्स आणि रणगाड्यांनी तो चमत्कार घडवून आणला. आता संपूर्ण शरणागती पत्करली नाही, तर लेफ्टनंट जनरल सगतसिंगांच्या चौथ्या कोअरच्या माऊंटन डिव्हिजनचे सैनिक ढाका शहरात घुसणार, अशी वेळ येऊन ठेपली.अखेर पाकिस्तानी सैन्याच्या पूर्व विभागाचा प्रमुख लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी (ए. ए. के. नियाझी) याने सुमारे ९० हजार सैनिक आणि अन्य भुरटे सशस्त्र गुंड यांच्यासह १६ डिसेंबर, १९७१ या दिवशी सायंकाळी ४.३१ वाजता शरणागती करारावर सही केली. त्या अतिप्रसिद्ध छायाचित्रात नियाझीच्या बरोबर मागेच उभे आहेत तेच लेफ्टनंट जनरल सगतसिंग- बिकानेर का बाँका जवान!
Powered By Sangraha 9.0