उत्तम निवेदक, सूत्रसंचालक असा प्रवास करता करता, अवघ्या पंचविशीच्या आत तो एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीचा संचालक बनला. ‘तो’ चिमुरडा म्हणजेच ‘फन फिएस्टा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’चा संचालक सुशील मोहन अत्रे.
‘अलिबाबा’ या जगप्रसिद्ध कंपनीचा मालक जॅक मा याला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘नेमका कोणता उद्योग करावा?’ जॅक माने त्याचं सुंदर उत्तर दिलं होतं. तो म्हणाला, “ज्या विषयाची तुम्हाला आवड आहे, जी तुमची ‘पॅशन’ आहे, त्यालाच ‘व्यवसाय’ म्हणून निवडावे.” जॅक माचे हे उत्तर विक्रोळीतल्या ‘त्या’ चिमुरड्याला तंतोतंत लागू पडले. एका संस्थेने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त काही वर्षांपूर्वी लहान मुलांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. पाच वर्षाच्या ‘या’ मुलाने त्या स्पर्धेत भाग घेतला.
स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला एक प्रसंग साभिनय प्रेक्षकांसमोर सादर केला. प्रचंड टाळ्या वाजल्या. ‘त्या’ मुलाला पहिल्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं. ‘त्या’ चिमुरड्याच्या हाती आलेला तो माईक त्याचं पॅशन बनला. उत्तम निवेदक, सूत्रसंचालक असा प्रवास करता करता, अवघ्या पंचविशीच्या आत तो एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीचा संचालक बनला. ‘तो’ चिमुरडा म्हणजेच ‘फन फिएस्टा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’चा संचालक सुशील मोहन अत्रे.
सुशील यांच्यावर हे सारे संस्कार केले ते त्यांच्या आई-वडिलांनी. मोहन दिगंबर अत्रे हे सुशील यांचे वडील एका खासगी कार्यालयात कार्यरत होते. आई शीला ही गृहिणी. मोहन अत्रे यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार. १९८० ते ८२ दरम्यान ते संघाचे प्रचारक पण होते. सुशील यांनी स्वत:च्या ‘पॅशन’ची सुरुवात केली तीच मुळात रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाने. महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत असताना विक्रोळी येथे भाग प्रचारक वैभव जवळीकर यांच्या मार्गदर्शनाने विक्रोळीत एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या संपूर्ण संयोजनाची जबाबदारी सुशील यांच्यावर होती. कार्यक्रम अत्यंत चोख पार पडला. सुशील यांनी स्वत:च त्या कार्यक्रमाचे निवेदनदेखील केले. सगळ्याच वरिष्ठांनी आणि मित्रांनी त्यांचे कौतुक केले. इथेच सुशीलच्या आगामी ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’ची बीजे रोवली गेली.
सुशील यांचे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विक्रोळीच्या ‘विद्या विकास एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत पूर्ण झाले. मराठी माध्यमामध्ये शिक्षण झाल्याने त्यांचं इंग्रजी यथातथाच होतं. मात्र, आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्यांचा जणू कायापालट झाला. चौथीतून सुशील पाचवीत गेले होते. ऐन उन्हाळ्याची सुट्टी होती. नौदलाच्या केंद्रावर शाळकरी मुलांना नौदलाचे अधिकारी लष्करी शिस्तीचे धडे देतात. सुशील यांना नौदलाचे आकर्षण होते. वडिलांसोबत तेदेखील कुलाब्याच्या मुख्य केंद्रावर गेले. तिथे हजारो मुले नौदलाच्या गणवेशात आपापली कला सादर करत होती. ते पाहून त्यांना त्या मुलांमध्ये सामील होण्याची इच्छा झाली. मात्र, त्यासाठी नौदल अधिकारी मुलांची मुलाखत घेत असत. ती इंग्रजीतून घेतली जाई. सुशील इंग्रजीमुळे अडखळले. मात्र, मनाशी त्यांनी एक निश्चय केला, इंग्रजी पक्के करण्याचा. इंग्रजी भाषेवर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज सुशील अनेक कॉर्पोरेट कार्यक्रमांची सूत्रसंचालने इंग्रजी भाषेतून करतात.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोमय्या महाविद्यालयातून त्यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पण, उराशी स्वप्न होतं ते निवेदक बनण्याचं. कोणीतरी त्यांना ‘बीएमएम’च्या अभ्यासक्रमाचा पर्याय दिला. माध्यमाचं शिक्षण घेतल्याने निवेदन चांगलं करशील, असं त्यांना सांगितलं. खालसा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना विविध महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये ते सहभागी होऊ लागले. एकप्रकारे त्यांच्या स्वप्नाच्या तलवारीला धार येत होती. ‘जाहिरात’ हा विशेष विषय घेऊन त्यांनी मास मीडियाची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मिळवली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एक वर्षाचा ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन मेकिंग’चा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. हे सारे शिक्षण घेत असताना सुशील छोटे-मोठे इव्हेंट्स मित्रांसोबत करत असत. वाढदिवस समारंभ असो वा लग्नाचा वाढदिवस, ते या छोट्या-छोट्या कार्यक्रमांचे नियोजन करु लागले. गल्लीतल्या क्रिकेटचे धावते समालोचन करु लागले. या सगळ्यांतून त्यांना थोडे-फार पैसे मिळायचे. या पैशातून त्यांनी स्वत:च्या शैक्षणिक खर्चाचा काही भाग उचलला. ते काही अंशी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. एक नोकरी आणि दुसरा स्वत:चा व्यवसाय. त्यांचा स्वत:चा कल व्यवसाय करण्याकडे होता. मात्र, आई-वडिलांची इच्छासुद्धा त्यांनी जाणून घेतली. आई व्यवसायाच्या विरोधात होती. सुशील यांनी अगोदर या क्षेत्रातील काही कंपन्यामध्ये नोकरी करावी, पुरेसा अनुभव घ्यावा आणि मग स्वत:चा व्यवसाय करावा, असे त्यांच्या वडिलांचे मत होते. आई-वडिलांच्या मताचा आदर करत, त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. दूरदर्शन, राजश्री फिल्म प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, नाशिकची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी अशा अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी नोकर्या केल्या. दूरदर्शनच्या ‘सखी सह्याद्री’ या कार्यक्रमासाठी त्यांनी सहा महिने निवेदन केले. अशाप्रकारे दोन ते तीन वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. पुरेसा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वत:ची ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनी सुरु केली. ‘फन फिएस्टा इव्हेंट मॅनेजमेंट’ असे या कंपनीचे नामकरण केले.
आतापर्यंत सुशील यांनी अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडलेले आहेत. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस’, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’, ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’, ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’, ‘एस्सेल वर्ल्ड’ या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट ‘फन फिएस्टा’ने केले आहे. ठाणे पोलिसांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही संगीतसंध्याचे कार्यक्रम पण त्यांनी केले आहेत. निव्वळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अगदी गोवा आणि मध्य प्रदेशातसुद्धा सुशील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. कोरोना काळात सार्वजनिक व घरगुती कार्यक्रमांवर बंदी होती. मात्र, ऑनलाईन पद्धतीने काही कार्यक्रम होत होते. अशा जवळपास ६० कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुशील यांनी केले होते.
आपल्या या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार दिला. सुशील एक चांगले उद्योजकीय नेते आहेत. त्यांनी आपल्या सहकार्यांना निव्वळ कर्मचारी म्हणून वागविले नाही, तर त्यांच्यामध्येसुद्धा उद्योजकता बिंबवली. आज त्यांच्या काही सहकार्यांनी स्वत:ची कंपनी सुरु केली आहे. मात्र, वेळोवेळी ते सुशील यांचं मार्गदर्शन आवर्जून घेतात. तसेच या क्षेत्रात येऊ इच्छिणार्या अन्य तरुणांनादेखील ते आपापल्या परीने मार्गदर्शन करतो. स्वत:च्या मर्यादांना कुरवाळत न्यूनगंडात जगणारे अनेक तरुण आपण पाहतो. मात्र, आपल्या मर्यादांच्या सीमा ओलांडून जे अमर्याद यश मिळवतात, ते खरे यशस्वी ठरतात. सुशील अत्रे म्हणूनच खर्या अर्थाने यशस्वी उद्योजक आहे.