बालपणापासून विविध संकटांना संधी मानत, आपल्या कामातून एक वेगळा ठसा उमटविणार्या, आपल्या जिद्द आणि ध्येयाची प्रचिती देणार्या सुनीता धनगर यांच्याविषयी...
व्यक्तीचे आयुष्य हे कायमच विविध संघर्षांच्या गोतावळ्यात अडकलेले असते. जीवनातील सर्वात मोठे दु:ख कोणते, याची व्याख्या व्यक्तिपरत्वे ही भिन्न असते. व्यक्तीला त्याच्या जीवनात कोणती संकटे अधिक आली, यावर कदाचित ही व्याख्या अवलंबून असावी. मात्र, संकटांना कवटाळून न बसता, जी संकटांना संधी मानते, तीच व्यक्ती इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरत असते. असाच काहीसा जीवनप्रवास आहे नाशिक येथील सुनीता धनगर यांचा.
सध्या नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी पदावर विराजमान असलेल्या धनगर यांच्या जीवनातील कष्ट हे त्यांच्या जन्मापासूनच त्यांना वरदान म्हणून लाभले. दोन भाऊ, आई, वडील असा कौटुंबिक परिवेश त्यांना लाभला. मात्र, मुलगी म्हणजे दुसर्या घरचे देणे, अशी काहीशी मनोभूमिका धनगर यांच्या पालकांची असावी. त्यामुळे त्यांना कायमच दुय्यम वागणूक प्राप्त होत गेली. लहानपणी धनगर यांना देण्यात येणार्या भोजनातही होणारा दुजाभाव त्यांना सहन करावा लागला. परिणामस्वरूप कुपोषित संवर्गात समावेश होईल, अशी प्रकृती धनगर यांची झाली. अशाही स्थितीत त्यांनी आपले शिक्षण मात्र सुरूच ठेवले.
इयत्ता दहावीनंतर धनगर यांचे शिक्षण बंद करण्याचा प्रयत्न कुटुंबाकडून झाला. मात्र, शिक्षक आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून तो प्रयत्न बारगळला. त्यामुळे पुढे बारावीपर्यंतचा त्यांच्या शिक्षणाचा मार्ग थोडा सुकर झाला. बारावीत त्या नाशिक जिल्ह्यात प्रथम आल्या. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. परिणामस्वरूप पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा मार्गही खुला झाला. कला शाखेतील पदवी परीक्षेत त्या नाशिक जिल्ह्यात पहिल्या व तत्कालीन पुणे विद्यापीठात दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
या यशामुळे विद्यापीठाने त्यांना एम.ए.साठी सन्माननीय प्रवेश स्वतःहून देऊ केला. त्याच वेळी धनगर या एम.ए. इंग्लिश बरोबरच ‘युपीएससी’ व ‘एमपीएससी’ची तयारी करू लागल्या. मात्र, बालपणापासून शरीरात असलेली पोषणमूल्यांची कमतरता एव्हाना डोके वर काढू लागली. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आपले शिक्षण तेवढ्यावर थांबवावे लागले. आजवरच्या यशोगाथेमुळे पुढे ढकलला गेलेला विवाह आता होणे स्वाभाविक होते. तसा तो झालादेखील. त्यांच्या पतीने त्यांना बी.एड. करण्याचा सल्ला दिला. बी.एड. च्या परीक्षेला एक महिना अवधी शिल्लक असताना त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. त्यावेळी एक वर्षाचे मूल, हाती बी.ए.ची पदवी व एक महिन्यावर आलेली बी.एड.ची परीक्षा, अशी स्थिती धनगर यांची होती.
संकटे आणि दु:खे यांचा सामना करण्याची सवय लहानपणापासून असल्याने धनगर यांनी धीरोदात्तपणे बी.एड.ची परीक्षा दिली व उत्तीर्ण होत त्यांना ठाणे येथे गर्व्हमेंट गर्ल्स हायस्कूल येथे शिक्षिकेची नोकरी प्राप्त झाली. जिल्हा बदली करत त्यांची नाशिक येथील गर्व्हमेंट गर्ल्स हायस्कूल येथे बदली करण्यात आली. तेथे त्यांनी 18 वर्षे अध्यापन केले. मात्र, या शाळेतील सरकारी पद्धती त्यांना अस्वस्थ करीत होत्या. त्यामुळे राजीनामा देणे किंवा पुढे काही करणे हेच दोन पर्याय त्यांच्या समोर होते. अशा वेळी अंगभूत लढवय्या वृत्तीनुसार त्यांनी ‘एमपीएससी’चा पर्याय स्वीकारला. मात्र, मुलाखतीच्या पातळीवर त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. त्याच वेळी त्यांची जिल्हा निवड मंडळ विस्तार अधिकारी (शिक्षण) या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवड झाली.
२०१४ पासून त्या महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग (२) या पदावर कार्यरत आहेत. आपल्या जीवनात अनंत अडचणींचा सामना करूनदेखील त्या पदाधीन आणि सक्षम आहेत. त्यामुळे आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या इतर स्त्रियांनादेखील सक्षम करण्यावर भर देतात. प्रत्येक मुलीने नोकरीसाठी नव्हे, तर एक सुसंस्कृत स्त्री होण्याकामी जरूर शिकावे, हीच त्यांची मनोधारणा आहे. कोणाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न न करता, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाचे लक्ष्य ठरवत कितीही संकटे आली, तरी पुढे जात राहावे, हीच वैचारिक धारणा धनगर आजही बाळगून आहेत. तसेच स्वतःच्या जीवनात ज्या अनुभवांची अनुभूती धनगर यांना आली, त्यानुसार पालकांनी आपल्या पाल्यात कधीही दुजाभाव करू नये, अशी विनंती त्या समाजाला करतात.
शिक्षिकेची नोकरी करताना आणि प्रशासनात प्रत्यक्ष काम करतानादेखील, त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले आणि आजही येतात. काही अधिकारी आजही स्त्रियांना दुय्यम वागणूक देत असल्याचे त्या सांगतात. मात्र, सुनीता धनगर अगदी खंबीरपणे उभ्या आहेत. जीवनात अंधार होऊ नये, अडचणींचा सामना करताना कोणता विचार आपण करावा, असे त्यांना विचारले असता, त्या सांगतात की, “समोरची व्यक्ती त्याला योग्य वाटेल ते करत असते. मात्र, आपण मनात आकस ठेवू नये, आपला दृष्टिकोन कधीही कलुषित होऊ देऊ नये. त्यामुळे उभारी येते व आपण सकारात्मक राहतो.” त्यांचा हा संदेश अनेक अर्थाने नक्कीच बोलका आहे. अतिशय संघर्षमय बालपण जगलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने स्त्रियांसमोर लढण्याचे धीरोदात्त उदाहरण ठेवणार्या सुनीता धनगर यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!