‘इसिस’ची पाळेमुळे रुजू खोलवर रुजविण्याचा प्रयत्न केवळ जिहादी संघटनाच करीत नाहीत, तर तुर्कस्तानसारखे देश उघडपणे अशा संघटनांना पाठिंबा देत आहेत. इस्लामी दहशतवादास उघडपणे तुर्कस्तान खतपाणी घालत आहे. म्हणूनच भारताने हे लक्षात घेऊन तुर्कस्तानचे हे षड्यंत्र हाणून पाडायला हवे.
इस्लामी दहशतवादाने जगाच्या विविध भागांमध्ये एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे आपले हातपाय पसरले असून भारतही त्यास अपवाद राहिलेला नाही. भारतातही ‘इसिस’ संघटनेशी संबंधित जिहादी तत्त्वांनी आपल्या कुटिल कारवाया सुरु ठेवल्या असून त्याद्वारे अस्थिरता माजविण्याचा प्रयत्न त्या संघटनेकडून सुरू आहे. भारतात अस्थिरता माजविण्यासाठी ‘इसिस’ला तुर्कस्तान या देशातील राजवटीने तर उघड पाठिंबा देऊ केला आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी जिहादी संघटनांना तुर्कस्तान आर्थिक मदतीसह इतर मदत करीत आहे. भारतातील जिहादी संघटनांना तुर्कस्तानकडून मदत केली जात असल्याची माहिती लक्षात घेता, भारतातील सुरक्षा यंत्रणेने वेळीच या जिहादी संघटनांचा बंदोबस्त करायला हवा. त्या संघटनेची पाळेमुळे खणून काढायला हवीत. भारतात काश्मीरपासून थेट तामिळनाडू, केरळमध्ये या दिसून येत आहे.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान हे तर भारतात ‘इसिस’च्या कारवाया कशा वाढतील, याकडे जातीने लक्ष देत आहेत असे वाटते. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा वापर करून भारतातील दहशतवादास खतपाणी घालायचे आणि तसे करून दक्षिण आशियाई मुस्लीम जगतामध्ये आपली लोकप्रियता वाढवायची, हा हेतू पुढे ठेवून त्यांचे एकूण वर्तन असल्याचे दिसून येत आहे. भारतातून जे जिहादी दहशतवादी सीरियामध्ये संघर्ष करण्यासाठी जातात, त्यांना तुर्की सरकारकडून सर्व ती मदत केली माहिती उघड झाली आहे. भारतात अलीकडे ज्या इस्लामी दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांनी आपण तुर्कस्तानमार्गे सीरियामध्ये ये-जा करीत असल्याची दिलेली कबुली लक्षात घेता तुर्कस्तान किती मोठ्या प्रमाणात या दहशतवाद्यांच्या पाठीशी उभा आहे, हे लक्षात येते. भारतातील इस्लामी संघटना, राजकीय आणि अन्य प्रकारचे गट यांना तुर्कस्तानकडून केली जाणारी आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत ही भारतासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. तुर्कस्तानवर पूर्ण ताबा प्रस्थापित केलेल्या एर्दोगान यांचा मुलगा बिलाल हाही दहशतवाद्यांना पाठबळ देण्यामध्ये आघाडीवर आहे. तुर्कस्तानमध्ये अन्य धर्मीयांच्या खाणाखुणा पुसून टाकण्याचा कार्यक्रम तेथील राजवटीने हाती घेतला असून त्या अंतर्गत तेथील ऐतिहासिक चर्चेस वा अन्य वास्तू यांचे इस्लामीकरण करण्यात येत आहे. या प्रकाराबद्दल ग्रीस या देशाने निषेध व्यक्त केला असता, अन्य कोणी आमच्या देशात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. आमच्या देशातील मालमत्तेसंदर्भात आम्ही काहीही करण्यास स्वतंत्र आहोत. त्यास कोणी आक्षेप घ्यायचे कारण नाही, असे उत्तर तुर्कस्तानने ग्रीसला दिले. एकूणच इस्लामी जगतात आपली प्रतिमा चांगली करण्याच्या दृष्टीने तुर्कस्तानच्या या हालचाली सुरु असल्याचे दिसते. इस्लामी दहशतवादास उघडपणे तुर्कस्तान खतपाणी घालत आहे. भारताने हे लक्षात घेऊन तुर्कस्तानचे हे षड्यंत्र हाणून पाडायला हवे.
भारतात ‘इसिस’ची पाळेमुळे रुजू खोलवर रुजविण्याचा प्रयत्न केवळ जिहादी संघटनाच करीत नाहीत, तर तुर्कस्तानसारखे देश उघडपणे अशा संघटनांना पाठिंबा देताहेत, हे यावरून लक्षात येते. केरळमधील अनेक जिहादी ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी देश सोडून पळून गेले होते, हे तर सर्वविदित आहेच. तामिळनाडू या राज्यातही ‘इसिस’ची पाळेमुळे खोलवर रुजत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच ‘नाम मणिधर काटची’ नावाच्या राजकीय पक्षाचा संस्थापक तौफिक यास अटक करण्यात आल्यानंतर तामिळनाडूमध्ये अनेक ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण करण्याचे त्या संघटनेचे कारस्थान उघड झाले. शेजारच्या केरळ राज्याप्रमाणे तामिळनाडूमध्येही एसडीपीआय, पीएफआय या जहाल संघटना सक्रिय आहेत. ज्या तौफिक यास तामिळनाडू पोलिसांनी अटक केली, त्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसा पुरविल्याची माहिती आहे. अलीकडेच रामनाथपुरम येथे हिंदू मुन्ननीच्या अनंतकुमार नावाच्या कार्यकर्त्यास मुस्लीम गुंडांच्या टोळक्याने ठार केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची सुटका करण्यात यावी, यासाठी पेरियापट्टीनम पोलीस स्थानकाबाहेर तीन हजारांचा मुस्लीम जमाव जमला होता. अनंतकुमार याच्या हत्येस जबाबदार असलेल्या संघटनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष, इंदू मक्कल काटची, हिंदू मुन्ननी यांनी केली आहे. तामिळनाडू सरकार मुस्लीम मारेकर्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जेव्हा मुस्लीम एखाद्या हिंदूंची हत्या करतात त्यावेळी वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते, असा आरोप तामिळनाडूमधील हिंदू संघटनांकडून केला जात आहे.
तामिळनाडूमधील काही भागांत जेथे मुस्लीम समाज बहुसंख्य आहे, अशा ठिकाणी देशाचा कायदा चालत नाही तर शरिया कायद्याचा अंमल चालतो. जणू काही एखाद्या इस्लामी देशासारखा त्या भागात अंमल असल्याचे पाहण्यास मिळते. वेल्लूर, कोईम्बतूर, तिरुनेरवेली आदी जिल्ह्यांमधील मुस्लीमबहुल भागात शरिया कायद्याचा अंमल चालत असल्याचे दिसून येते. चेन्नई-तिरुनेवेली महामार्गावर दर ६० ते ८० किलोमीटर अंतरावर मशिदीसाठी जागा हवी, असल्यासंदर्भातील जाहिराती उघडपणे झळकल्या होत्या. हे सर्व लक्षात घेता तामिळनाडू राज्यात जहाल तत्वे किती मोठ्या प्रमाणात हातपाय पसरत चालले आहेत याची कल्पना यावी!
‘शार्ली हेब्दो’चा निर्धार कायम!
जागतिक पातळीवर इस्लामी दहशतवाद विस्तारत चालला असला तरी त्यास न घाबरता आपले कार्य सुरु ठेवण्याचा निर्धार फ्रान्समधील ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने व्यक्त केला आहे. प्रेषित महंमदांची आक्षेपार्ह व्यंगचित्रे प्रसिद्ध केल्याबद्दल फ्रान्समध्ये आणि अन्यत्र तीव्र हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. ७ जानेवारी २०१५ या दिवशी दोन बंदूकधारी इसमांनी या नियतकालिकाच्या कार्यालयात घुसून केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये नियतकालिकामध्ये काम करणार्या बारा जणांची हत्या झाली होती. या लक्षात घेऊन सदर नियतकालिकाच्या संपादकांनी ‘आम्ही हात वर केले नाहीत’ असे स्पष्टपणे जाहीर करून वादग्रस्त व्यंगचित्रे पुन्हा प्रसिद्ध केली आहेत. ३० सप्टेंबर २००५ रोजी एका ‘डॅनिश’ दैनिकांमध्ये ही बारा आक्षेपार्ह व्यंगचित्रे प्रकाशित झाली होती. त्यानंतर ‘शार्ली हेब्दो’ ने २००६ मध्ये ती प्रकाशित केली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०१५रोजी त्या नियतकालिकातील बारा जणांची हत्या करण्यात होती. या संदर्भातील खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होतेवेळी, ही व्यंगचित्रे प्रसिद्ध करणे आम्हास अत्यावश्यक वाटल्याने आम्ही प्रकाशित केली आहेत, असे सदर नियतकालिकाच्या संपादकीय मंडळाने म्हटले आहे. इस्लामी दहशतवादास न घाबरता सदर व्यंगचित्रे पुन्हा प्रेषित करण्याची त्या नियतकालिकांची कृती नक्कीच धाडसी मानायला हवी.