अपंगत्वावर यश मिळवणारा सुयश!

04 Sep 2020 22:42:42
Suyash Jadhav_1 &nbs






१२ वर्षांचा असताना त्याने हात गमावले. पण, तरीही वयाच्या २८व्या वर्षी ‘सर्वोत्तम जलतरणपटू’चा सन्मानही मिळवला. अशा या धाडसी, जिद्दी सुयश जाधवची प्रेरणादायी कहाणी...


सध्या भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील अनेक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. काही खेळाडूंनी भारतीय झेंडा अटकेपार फडकवला आहे. अशा खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी भारतीय सरकारकडून ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ तसेच ‘अर्जुन पुरस्कार’ बहाल केला जातो. कोणत्याही खेळाडूसाठी या पुरस्काराने पुरस्कृत होणे ही खूप मोठी कौतुकाची बाब असते. महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंना हा बहुमान मिळाला आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या खेळातील कौशल्य दाखवत भारतासाठी अनेक पदके, आंतरराष्ट्रीय बहुमानाची कमाई केली. सध्या फक्त क्रिकेट, फुटबॉल असे जागतिक खेळच नव्हे, तर कबड्डी, खो-खो अशा मैदानी आणि पारंपरिक खेळांची कीर्तीदेखील जगभरामध्ये पसरली आहे. अशामध्ये करमाळा तालुक्यातील एका छोट्या गावामध्ये जन्मलेला एक मुलगा संघर्ष करून महाराष्ट्रचेच नव्हे, तर देशाचे नाव जगातील पटलावर झळकावतो, तेव्हा प्रत्येक देशवासीयाची मान अभिमानाने उंचावते. बाराव्या वर्षी आपले दोन्ही हात गमवून, सर्व कठीण परिस्थितींवर मात करत देशासाठी सुवर्णपदके जिंकणार्‍या आपल्या मातीतला हा जलतरणपटू सुयश जाधव. त्याची आजवरची वाटचाल ही खरंच कौतुकास्पद आहे.


दि. २८ नोव्हेंबर, १९९३ रोजी सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील भाळवणी या छोट्या खेड्यामध्ये सुयशचा जन्म झाला. पुढे त्याचे कुटुंब हे वेळापूर या गावात स्थायिक झाले. त्याचे वडील नारायण जाधव हेदेखील खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षक होते. नारायण जाधव हेदेखील एक उत्तम जलतरणपटू होते. त्यांना ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच राज्यात आणि देशभरातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी अनेक पुरस्कारदेखील मिळवले होते. त्यामुळे सुयशने क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करून नाव करावे, हे त्यांचे स्वप्न होते. घरातूनच क्रीडा क्षेत्राचे बाळकडू मिळाल्यामुळे सुयशनेदेखील त्या दिशेने लहानपणापासूनच वाटचाल सुरु केली होती. परंतु, शालेय शिक्षण घेत असताना त्याच्यासोबत एक अपघात घडला आणि त्याचे जीवनच बदलून गेले. सुयश लहानपणी एका लग्न समारंभासाठी गेला असताना विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने सुयशला आपले दोन्ही हात गमवावे लागले. आपला मुलगा सुयश हादेखील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. परंतु, सुयशचा अपघात झाल्याने त्यांची ही इच्छा काहीशी धुसर झाली. सुयशने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द बाळगली आणि इथूनच त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्याने या अपघाताकडे त्याने एक संधी म्हणून पाहिले. दोन्ही हात गमावूनदेखील नदीमध्ये सफाईदारपणे पोहत असताना त्याच्या वडिलांनी सुयशला पाहिले. इथून त्याच्यातील प्रतिभेची जाणीव त्याच्या वडिलांना झाली आणि त्याच्यावर मेहनत घ्यायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी सुयशला एक उत्तम जागतिक दर्जाचा जलतरणपटू बनवावा, यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. पुढे योग्य प्रशिक्षणासाठी त्याने पुण्यातील जिमखान्यामध्ये सराव करण्यास सुरुवात केली. तपन पाणीग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अनेक जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली.


सुयशला पुढे जागतिक पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. स्वतःवर मेहनत घेत त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. २०१५ दरम्यान रशियामध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत जागतिक पातळीवर एक उत्तम जलतरणपटू म्हणून सुयशने ओळख मिळवली. २०१६ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सुयशचे पदक थोडक्यात चुकले. मात्र, अपयशाला न जुमानता त्याने आपली मेहनत सुरुच ठेवली. पुढे त्याने जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भाग घेतला. या पॅरा आशियाई स्पर्धेत त्याने तब्बल तीन पदके पटकावली. ५० मीटर ‘बटरफ्लाय’मध्ये ३२.७१ सेकंदांची वेळ नोंदवून भारताच्या खात्यात सुवर्णपदक मिळवून दिले. ५० मीटर फ्री आणि २०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली. आशियाई पॅरा गेम्स, जर्मन जलतरण स्पर्धा आणि विंटर ओपन पोलिश चॅम्पियनशिप अशा स्पर्धांमध्ये त्याने पदकांची लयलूट केली. सुयशने आतापर्यंत राज्यस्तरावर ५० सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर सात सुवर्णपदकांसह १२५ पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुयशला ‘शिवछत्रपती पुरस्कारा’सह जलतरण क्रीडा मार्गदर्शक अधिकारी वर्ग एक, बालेवाडी पुणे येथे संधी देऊन बहुमान केला आहे. आता मागील पॅरा ऑलिम्पिकमधील अपयश पुसून काढण्यासाठी पुढे येणार्‍या टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी तो कसून सराव करत आहे. या स्पर्धेमध्ये त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकावे, अशी त्याची इच्छा आहे. अपंगत्वातून संधी शोधात त्याने आणि त्याच्या वडिलांनी कमावलेला हा ‘अर्जुन पुरस्कार’ नक्कीच येणार्‍या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. याशिवाय तो सध्या पुण्यात जिल्हा क्रीडा अधिकारी या पदावर कार्यरत असून जलतरणाचा प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहे.




Powered By Sangraha 9.0