पाकिस्तानच्या खर्वाधीश जनरलची 'लष्करी माया'

03 Sep 2020 21:10:45
s verma_1  H x




पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार अहमद नुरानी यांनी आपल्या अहवालामध्ये तथ्यांनिशी खुलासा केला की, माजी जनरल असीम सलीम बाजवा यांनी लष्करात असतानाच अमाप संपत्ती अर्जित केली. त्यांचे कुटुंबीय १३३ रेस्टॉरंट्स आणि ९९ अन्य व्यवसायांचे मालक आहेत.



पाकिस्तानच्या जन्माचेच एक प्रमुख कारण होते घृणा आणि वैमनस्य. सांप्रदायिक ओळख आणि फुटीरतेच्या आधारावर एका स्वतंत्र राष्ट्राची संकल्पना मांडण्यात आली आणि उन्माद तथा हिंसेच्या बळावर त्यांनी स्वतंत्र पाकिस्तान मिळवले. भारताबाबत कायमच शत्रुत्वाची भावना पाकिस्तानच्या अस्तित्वाला वैधता देणारा महत्त्वाचा घटक होता आणि आजही आहे. परिणामी, एका नवोदित इस्लामी राष्ट्रासाठी शेजारी देशाला त्रास देणार्‍या उत्पीडक आणि ‘दारुल इस्लाम’च्या रक्षकाच्या रुपात लष्कराची भूमिका कितीतरी पटींनी वाढली. लष्कराच्या या वाढत्या भूमिकेचे प्रदर्शन जनरल अयुब खान यांच्या पाकिस्तान सरकारमधील वाढता प्रभाव आणि नंतर १९५८ साली तत्कालीन राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत करुन लष्करी हुकूमशाहीच्या स्थापनेतून स्पष्टपणे दिसून येते.


फाळणी आणि स्वातंत्र्यानंतर आजतागायत पाकिस्तान कधीही लष्कराच्या प्रभावातून मुक्त झालेला नाही. लष्करी शासक, जसे की, जनरल अयुब खान, जनरल याह्या खान, जनरल झिया उल हक आणि नंतर परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सत्ता थेट लष्करी हुकूमशाहांच्या हातात आली. परंतु, लष्करशहांच्या सत्तेदरम्यान पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकारातील लष्कराचा हस्तक्षेप आणि वादग्रस्त मुद्द्यांवरील निर्णायक भूमिका सर्वश्रुत आहे. लष्करावरील पाकिस्तानच्या या कृत्रिम निर्भरतेने तिला निरंकुश केले. देशाच्या संरक्षणाच्या नावाखाली तमाशा असाच चालू राहिला आणि त्याआडून जनरलांनी आपल्या प्रभावाचा विस्तार करत आपल्या राजकीय व आर्थिक प्रभावात सातत्याने वाढ केली.


आज याच कारणामुळे पाकिस्तानमध्ये लष्कराने सर्वात सशक्त आर्थिक साम्राज्याची उभारणी केली असून हा अन्य कोणत्याही व्यापारी घराण्यासाठी ईर्ष्येचा विषय होऊ शकतो. सोबतच लष्करी कमांडरांना जमिनी देण्याची मध्ययुगीन सामंती परंपरा पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे. परिणामी, आज लष्कर पाकिस्तानमधील सर्वात मोठे भूस्वामी झाले आहेत. आता तर जनरल असीम सलीम बाजवा यांचे नाव भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणांत समोर आले असताना, पाकिस्तानसाठी हा आश्चर्याचा वा धक्कादायक विषय नक्कीच नाही.



कोण आहेत असीम सलीम बाजवा?

परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या सत्तापालटानंतर लष्करात लेफ्टनंट कर्नलपदावर असलेल्या बाजवांनी मुशर्रफ यांच्याशी जवळीक वाढवली व त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. २०१९ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी बलांच्या जनसंपर्काशी संबंधित महत्त्वाचे कार्य करणार्‍या ‘इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन’मध्ये ते कार्यरत होते.



काय आहे नेमके प्रकरण?
पाकिस्तानमधील ‘फॅक्ट फोकस’ या चर्चित वेबसाईटने खुलासा केली की, बाजवांच्या परिवाराचा व्यवसाय अमेरिका, कॅनडा, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांमध्ये पसरला असून गेल्या काही वर्षांत या प्रतिभाशाली जनरलने अब्जावधी नव्हे, तर कित्येक खर्व संपत्ती हस्तगत गेली आहे. बाजवा यांना चीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या जवळचे मानले जाते. हेच कारण आहे की, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका अर्थात ‘सीपेक’च्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली. याव्यतिरिक्त ते पंतप्रधानांचे विशेष साहाय्यक म्हणूनही कार्यरत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, चीन ‘सीपेक’च्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे आणि पाकिस्तानमधील अस्थिर स्थिती पाहता, चीन पाकिस्तान सरकारऐवजी पाकिस्तानी लष्करावर अधिक विश्वास ठेवतो आणि हेच कारण आहे की, ‘सीपेक’मध्ये या महत्त्वाच्या भूमिकेच्या निवर्हनासाठी एका सेवानिवृत्त जनरलला अधिक उपयुक्त समजले गेले.


आपल्या या उपयुक्ततेचा बाजवांनी मोठा फायदाही घेतला. पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार अहमद नुरानी यांनी आपल्या अहवालामध्ये तथ्यांनिशी खुलासा केला की, माजी जनरल असीम सलीम बाजवा यांनी लष्करात असतानाच अमाप संपत्ती अर्जित केली. त्यांचे कुटुंबीय १३३ रेस्टॉरंट्स आणि ९९ अन्य व्यवसायांचे मालक आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, बाजवांच्या तरुण भावंडांनी २००२ साली आपले पहिले रेस्टॉरंट सुरु केले आणि त्याच वर्षी बाजवांनी लेफ्टनंट कर्नल म्हणून जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यासाठी काम सुरु केले. एकेकाळी, त्यांचे बंधू नदीम बाजवा रेस्टॉरंटमध्ये ‘डिलिव्हरी मॅन’ होते. आज नदीम यांची पत्नी आणि असीम बाजवांच्या व्यवसायांचे बाजारमूल्य कोट्यवधी डॉलर्सच्या घरात आहे. या ९९ कंपन्यांपैकी ६६ मुख्य कंपन्या असून ३३ उपकंपन्या आहेत.


नुरानी यांनी केलेल्या खुलाशानुसार, बाजवा कुटुंबाने आपला व्यवसाय विकसित करण्यासाठी गेल्या काही काळात ५२.२ दशलक्ष डॉलर्स खर्च केले. सोबतच अमेरिकेत १४.५ दशलक्ष डॉलर्स मूल्याची संपत्ती खरेदी केली. महत्त्वाचे म्हणजे, जसजसे लष्करात बाजवांचे स्थान वाढत गेले, तसतसा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय वाढत गेला. ‘पापा जॉन रेस्टॉरंट’नेे सुरु झालेला हा प्रवास ‘बाज्को ग्रुप ऑफ कंपनीज’सारख्या मोठ्या व्यावसायिक साम्राज्याच्या रुपात परिवर्तित झाला. उल्लेखनीय म्हणजे, बाजवांचा मुलगा सन २०१५ मध्ये या कंपनीत रुजू झाला आणि पिता पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता असताना देश व अमेरिकेत नवनव्या कंपन्यांची त्याने सुरुवात केली. या विस्तारामध्ये बाजवांच्या पाकिस्तान सरकारशी जवळीकतेबरोबरच अन्य देशांतील त्यांच्या प्रभावाचेही योगदान राहिले.


आपल्या वृत्तअहवालात पत्रकार अहमद नुरानी यांनी तथ्यानिशी पाकिस्तानी लष्कराचे माजी जनरल असीम सलीम बाजवा यांच्या भ्रष्टाचाराची निंदा केली. मात्र, या खुलाशामुळे त्यांना आता जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. नुरानी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. पत्रकार नुरानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “मला गेल्या काही तासांमध्ये १०० पेक्षा अधिक संदेश मिळाले, ज्यात मला आणि माझ्या परिवाराला जीवानिशी मारण्याची धमकी दिली गेली.” या खुलाशानंतर लष्कराच्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली, तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार आणि लष्करादरम्याचे संबंध तणावपूर्ण झालेत.


मात्र, या सगळ्यात चकित करणारे तथ्य म्हणजे, भ्रष्टाचाराच्या या मुद्द्याने पाकिस्तानच्या जनमानसाला उद्विग्न केले, तो विषय पाकिस्तानी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत पूर्णतः अनुपस्थित आहे, जसे काही झालेच नाही. इथेच पाकिस्तानमधील माध्यमस्वातंत्र्याचा दर्जा दिसून येतो. तसेच, यावरुन पाकिस्तानच्या ‘डीप स्टेट’ची अथांग शक्तीही समजते. सध्याच्या घडीला तरी केवळ सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू झाला असून, समांतर सत्ताकेंद्र सोशल मीडिया हॅण्डल आणि वेबसाईट ब्लॉक करण्याचा शक्य तो प्रयत्न पाकिस्तानी लष्कर करत आहे.


इमरान खान भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन छेडून सत्तेत आले आणि आता त्यांचेच सरकार अशा मुद्द्यांवर सारवासारव करताना किंवा तो मुद्दा दडपून टाकताना दिसत आहे. त्यामुळे खरं तर हा खान यांच्या सातत्याने खालावत चाललेल्या विश्वसनीयतेवरील आणखी एक आघात आहे. सरकारची ‘निवडक उत्तरदायित्वा’ची धारणा विरोधकांविरोधात एका राजकीय हत्यारासारखी वापरली जात आहे. त्याचा वास्तवात भ्रष्टाचार निर्मूलनाशी कोणताही संबंध नाही. उलट ते इमरान खान यांच्यासाठी आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे आणि राजकीय प्रतिस्पर्ध्याचा सफाया करण्याचे एक साधन झाले आहे, जेणेकरुन ते निर्वेध सत्ता गाजवू शकतील.



(अनुवाद : महेश पुराणिक)




Powered By Sangraha 9.0