हरहुन्नरी तारका ‘आशालता’

27 Sep 2020 20:53:10

ashalata wabgaonkar_1&nbs


ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर...

आशालता एक चतुरस्र अभिनेत्री... त्यांचे अचानक काळाच्या पडद्याआड जाणे चित्रपटसृष्टीसह रसिकांच्याही मनाला चटका लावून गेले. त्या कायम म्हणत, “पुढे काय होणार याचा विचार मी कधीही केला नाही आणि करतही नाही. जे व्हायचे असेल ते त्याच वेळेत होते आणि होणार नसेल तर कितीही व काहीही केले तरी होत नाही. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आपण स्वत: आनंद घ्यायचा आणि इतरांनाही तो वाटायचा. जे समोर येते, मिळते ते स्वीकारायचे आणि पुढे जायचे,” हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र त्यांनी अनेक मुलाखतीतून सांगितले.

आशालता वाबगावकर यांचा जन्म दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील पाळोले येथील. मात्र, मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’ ही त्यांची शाळा. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी’ महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एम.ए.’ केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोकणी गाणीही गायली. आशालता यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. मात्र, आधी शिक्षण नंतरच नाटक वगैरे जे काही करायचं ते कर, अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. त्यानुसार, शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असतानाच त्यांना नाटकात काम करायची संधी मिळाली. ‘द गोवा हिंदू असोसिएशन’च्या माध्यमातून आशालता यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली.


‘द गोवा हिंदू असोसिएशन’ने राज्य नाट्यस्पर्धेसाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. ज्यात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. आशालता वाबगावकर यांच्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीतील त्यांचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक मैलाचा दगड ठरले. या नाटकात त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाट्यपदे खूप गाजली. ‘मत्स्यगंधा’ नंतर त्यांनी नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून नोकरी सोडली. ‘संगीत शारदा’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘छिन्न’, ‘महानंदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘स्वामी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘देखणी बायको दुसर्‍याची’ अशा कितीतरी गाजलेल्या नाटकांतील त्यांच्या भूमिका नाट्यरसिकांना भावल्या. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वार्‍यावरची वरात’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य अशा अनेक मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले.

मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली अभिनय कारकिर्द गाजवली. हिंदीमध्ये त्यांनी अनेक चरित्रपट केले. बासू चॅटर्जी यांचा ‘अपने पराये’ हा त्यांचा पहिला चित्रपट. आशालता यांचे मुंबई दूरदर्शनवरील एका कोकणी नाटकातील काम व ‘गुंतता हृदय हे’ नाटकही बासू चॅटर्जींच्या पाहण्यात आले होते. या कामाची दखल घेत त्यांनी ‘अपने पराये’साठी आशालता यांची निवड केली. ‘अपने पराये’नंतर आशालता यांची हिंदीतील यशस्वी कारकिर्द सुरू झाली. त्यामधील आशालतांनी साकारलेली भूमिका ‘फिल्मफेअर’ पारितोषिकासाठी निवडली गेली. ‘अंकुश’, ‘अग्निसाक्षी’, ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘कुली’, ‘निकाह’, ‘सदमा’, ‘चलते चलते’, ‘जंजीर’, ‘आज की आवाज’, ‘वो सात दिन’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘मंगल पांडे’, ‘ये तो कमाल हो गया’, ‘तेरी माँग सितारों से भर दू’, ‘मरते दम तक’, ‘घायल’ ‘शौकिन’ आदी सुमारे २००हून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. ‘अंकुश’ चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले आणि पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांनी गायलेले ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता’ हे गाणेही लोकप्रिय आहे. तीन कोकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील ‘महाश्वेता’, ‘पाषाणपती’ तसेच ‘जावई विकत घेणे’, ‘कुलवधू’ या मालिकाही प्रेक्षक पसंतीस उतरल्या. त्यांच्यातील अभिनेत्री, लेखक, वाचक व गायक या चतुरस्र गुणांमुळे त्या वयाच्या ७९व्या वर्षीही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. निधनाच्या काही दिवस आधीच त्यांची मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत प्रमुख भूमिका होती. मात्र, चित्रीकरणादरम्यानच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. अशा हरहुन्नरी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भावपूर्ण श्रद्धांजली.

Powered By Sangraha 9.0