बँक तुमच्या दारी...

25 Sep 2020 00:23:38


Eco_1  H x W: 0


संकेतस्थळ आणि जवळपास सर्वच बँकांच्या अ‍ॅप्समुळे बँकिंग सेवा आज एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण, आता याहीपलीकडे जाऊन सर्व सरकारी बँकांनी आता एकत्र येऊन आगामी काळात त्यांचे ग्राहक टिकवण्यासाठी व नवे ग्राहक वाढविण्यासाठी बँकेलाच ग्राहकांच्या दारात घेऊन जाण्याची योजना आखली आहे. त्याविषयी...


 
बँकिंग ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातही बँका उघड्या होत्या/कार्यरत होत्या. भीतीमुळे अजूनही ग्राहक बँकेत जाण्यास घाबरत असून डिजिटल पद्धतीने व्यवहार करीत आहेत. बँक ग्राहकांनी मोबाईल बँकिंग अ‍ॅप वापरुन जे निधी ‘ट्रान्सफर’ तसेच, बिले भरण्याचे व्यवहार केले, त्यात ‘लॉकडाऊन’च्या काळात ४० टक्के वाढ झाली. ग्राहकांबरोबर बँकाही या नव्या बदलांसाठी सज्ज आहेत. पूर्वी कोणत्याही ग्राहकाला बँकेत नवे खाते उघडण्यासाठी स्वत: बँकेत जावे लागत असे. पण, आता काही बँकांनी डिजिटल खाते उघडण्याचा पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने ३१ ऑगस्टपासून ‘फूल पॉवर डिजिटल सेव्हिंग्ज अकाऊंट’ या नावाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.


 
एप्रिल २०२० ते जून २०२० या तिमाहीत बँकांमध्ये २ लाख, १२ हजार बचत खाती ‘डिजिटली’ उघडली गेली. अशाप्रकारे खाते उघडण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला ‘ई-केवायसी’ व दुसरा ‘व्हिडिओ केव्हायसी.’ असे खाते उघडल्यानंतर ग्राहकाला आभासी (व्हर्च्युअल) डेबिट कार्ड मिळते, याद्वारे तो ग्राहक व्यवहार करु शकतो. बँक खाते उघडायला मग ते डिजिटल असो अथवा बँकेत जाऊन उघडलेले असो, त्यासाठी खाते उघडणार्‍याला ‘केवायसी डॉक्युमेंट्स’ सादर करावेच लागतात. ‘केव्हायसी’मुळे ग्राहकाचे नाव, वय, फोटो, घरचा पत्ता, सहीचा नमुना, पॅन क्रमांक, आधार क्रमांक असा सर्व तपशील बँकेकडे रेकॉर्ड होतो. पूर्वी प्राप्तिकर वाचविण्यासाठी किंवा गैरमार्गे कमविलेला पैसा लपविण्यासठी बेनामी खाती उघडली जात. पण, ‘केव्हायसी डॉक्युमेंट्स’ घेणे बंधनकारक ठरविण्यात आल्यापासून बेनामी खाती उघडणे बंद झाले.


 
ई-केव्हायसी


 
तुम्हाला लगेच बँकेत जाणे शक्य नसेल, तर तुम्ही ‘ई-केव्हायसी’ खाते उघडू शकता. आधारकार्डने ‘ई-केव्हायसी’ खाते उघडता येते किंवा ‘केव्हायसी’ची प्रक्रिया पूर्ण करुन खाते उघडता येते. यात तुमच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ क्रमांक येतो. त्या क्रमांकाने बचत किंवा कर्ज खाते उघडले जाऊ शकते. ‘ई-केव्हायसी’ने खाते उघडल्यास, एक वर्षाच्या आत ‘केव्हायसी’ची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जर एका वर्षात ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर खाते गोठविण्यात येते. या एक वर्षात एकावेळी एक लाख रुपयांहून अधिक रक्कम खात्यात जमा करता येत नाही व एका वित्तीय वर्षात खात्यात दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करता येत नाही. ‘केव्हायसी’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे रुपांतर नेहमीच्या बचत खात्यात होते.
 


व्हिडिओ केव्हायसी
 


‘केव्हायसी’ प्रक्रिया पूर्ण करायला तुम्हाला बँकेत जावे लागते. पण, हे टाळण्यासाठी ‘व्हिडिओ केव्हायसी’ हा मार्ग आहे. जानेवारी २०२० मध्ये ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने कर्ज देणार्‍या संस्थांना ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी व्हिडिओआधारित प्रणालीचा वापर करण्यास परवानगी दिली. परिणामी, बँकांनीही ही प्रणाली स्वीकारली. डिजिटली बचत खाते उघडण्यासठी ग्राहक हा भारताचा नागरिक हवा. वैध पॅन व आधारकार्ड क्रमांक हवा व वय १८ वर्षे पूर्ण हवे. ‘व्हिडिओ केव्हायसी’ प्रक्रियेसाठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल हे डिव्हायसेस कॅमेरा आणि मायक्रोफोन सुविधांसह हवेत. कोटक महिंद्रा बँक ‘आधार’च्या ऐवजी वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट ही डॉक्युमेंट्स ग्राह्य धरते. कोटक महिंद्रा बँकेची पूर्ण डिजिटल खाते सेवा ‘कोटक ८११’ या नावाने कार्यरत आहे. तरी या बँकेने मे २०२० पासून ‘व्हिडिओ केव्हायसी’ सुविधा सुरु केली. आयसीआयसीआय बँक आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड् बँक व येस बँक यांच्याही ‘व्हिडिओ केव्हायसी’ सेवा उपलब्ध आहेत. ‘व्हिडिओ केव्हायसी’मध्ये खातेदारांची डॉक्युमेंट्स बँकेला डिजिटली प्राप्त होतात. या डॉक्युमेंट्सचे डिजिटली योग्य स्टोअरिंग होण्यासाठी बँकेचे आयटी खाते अद्ययावत हवे. ‘व्हिडिओ केव्हायसी’ प्रक्रिया सुरु असताना खाते उघडणारा भारतातच आहे की नाही, याची बँकेने खातरजमा करुन घेणे आवश्यक असते.
 


अन्य बदल
 


सर्व सरकारी बँकांनी एकत्र येऊन आगामी काळात त्यांचे ग्राहक टिकवण्यासाठी व नवे ग्राहक वाढविण्यासाठी बँकेलाच ग्राहकांच्या दारात घेऊन जाण्याची योजना केंद्रीय अर्थमंत्री यांनी ९ सप्टेंबर रोजी घोषित केली. या योजनेचा कृती आराखडाही अर्थमंत्र्यांनी बँकांच्या प्रमुखांसमोर सादर केला. ‘पीएसबी अलायन्स’ असे या योजनेला नाव देण्यात आले असून त्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आभासी (व्हर्च्युअल) परिषदेत झाले. ‘पीएसबी अलायन्स’विषयीची माहिती इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष व भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली. या उपक्रमाद्वारे बँका नियमित तत्त्वावर असलेल्या सर्व सुविधा थेट तुमच्या दारात येऊन ग्राहकांना देणार आहेत. यासाठी सुयोग्य तंत्रज्ञानाचा स्वीकार या बँका करणार आहेत. यामुळे ‘के्रडिट क्लिक’, ‘डायल-अ-लोन’, ‘बँकिंग ऑन-द-गो’ या योजना राबविल्या जाणार आहेत. हा सर्व उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील बँक सुधारणा २०२०-२१ अर्थात ‘ईझ ३.०’ अंतर्गत राबविला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या सेवा सशुल्क आहेत. ही योजना समजावी म्हणून मी ‘प्रोग्राम’ मध्ये गेलो व ‘चेक घेऊन जायला घरी या’ अशा आज्ञा दिल्यावर, मला यासाठी ‘८८ रुपये’ असा संदेश मोबादलच्या स्क्रीनवर दिसला. उदाहरण द्यायचे तर एखाद्याकडे समजा १०० रुपयांचा चेक आहे, तर त्यासाठी ८८ रुपये खर्च करण्यासाठी तो स्वत: बँकेत जाऊन भरेल. या सेवांसाठी जास्तीत जास्त १० रुपये सेवाशुल्क ठेवावे व जीएसटी आकाराला जाऊ नये. तसेच अर्थमंत्रालयाला जर ही योजना खेडोपाडी लोकप्रिय करावयाची असेल, तर सेवाशुल्क कमी हवे.


 
या योजनेमुळे बँक आणि तिचे ग्राहक यांच्यात प्रत्यक्ष संवाद साधला जावा. ग्राहकांशी थेट संबंध प्रस्तावित व्हावेत, सर्व सरकारी बँकांना तळागाळापर्यंत बँकिंग सेवा देता यावी, ग्राहकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करता यावेत, यासाठी ग्राहकांशी स्थानिक भाषेतून संवाद साधला जाणार आहे. कोरोना कधी जाईल, याचे उत्तर कोणाकडेच नाही. या उपक्रमामुळे बँकेच्या शाखेत गर्दी कमी झाली तर सुरक्षित अंतर पाळले जाईल. अजूनही भारतात काही ठिकाणे अशी आहेत की, तिथे बँका पोहोचलेल्या नाहीत. इथे राहणार्‍या लोकांना बँकेत पोहोचण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. अशांना ही सेवा वरदानच ठरणार आहे. घरी येणार्‍या बँकेच्या प्रतिनिधीला ‘बँकमित्र’ म्हणून संबोधिण्यात येणार आहे. या ‘बँकमित्रां’नी अतिदुर्गम भागात, डोंगराळ प्रदेशात वगैरे राहणार्‍या जनतेला बँकिंग सेवा उपलब्ध करुन द्यावी, हेही सेवा सुरु करण्यामागचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीस ही सेवा १०० ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे.
बँका छोट्या ठेवी गोळा करण्यासाठी ‘एजंट’ नेमतात, ही प्रथा पूर्वीपासून चालू आहे. हे ‘एजंट’ लोकांच्या घरी जाऊन किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन ठेवी जमा करतात. फेरीवाले, छोटे व्यापारी, दुकानदार यांना ही सुविधा योग्य ठरते. केंद्र सरकारची ही ‘तुमच्या दारी बँकिंग’ ही योजना नक्कीच यशाची होईल व ग्राहकांसही फायद्याची ठरेल हे निश्चित! सध्या फक्त चेक भरण्यासाठी व कर्जाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच बँकेत जावे लागते. बाकी सर्व व्यवहार एटीएम किंवा मोबाईल बँकिंगद्वारे करता येतात.

 
Powered By Sangraha 9.0