कोरोना विषाणूचा आजार एक दिवस साध्या सर्दी-तापासारखाच होऊन जाईल. सर्दी, पडसे ज्याप्रमाणे दोन-तीन दिवस राहते, विनाउपचार किंवा किरकोळ उपचार घेतल्यानंतर प्रकृती ठणठणीत होते, त्याचप्रमाणे कोरोना हा आजारही मानवी शरीर परतवून लावू शकेल, असा सकारात्मक विचार किंवा आशावाद नाही, तर ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे.
कोरोनाची लस येऊन पूर्ण जीवन पूर्ववत व्हावं, अशी कुठल्याही माणसाची सरळ साधी इच्छा. अशा या कोरोना आजाराविषयी जगभरात विविध संशोधने सुरू आहेत. त्यापैकीच एका संशोधनातून कोरोना हा आजार सर्दी-पडसाप्रमाणेच बरा होईल, असा दावा करण्यात आला आहे. पण, या गोष्टीला आणखी खूप अवकाश आहे, हेदेखील तितकेच सत्य.
दुबईतील संशोधनात काहीसा दिलासा देणारी बाब उघडकीस आली आहे. कोरोना विषाणूसोबत जगताना कधीतरी असा एक दिवस उजाडेल, ज्यावेळी लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होईल. ताप, सर्दी, पडसे यांसारख्याच आजारानुसार कोरोनादेखील याच प्रकारचा आजार म्हणून संबोधला जाईल. मात्र, तूर्त काळजी घ्यायलाच हवी. स्वतःचे संरक्षण करायलाच हवे, हेदेखील याच संशोधनात अधोरेखित करण्यात आले आहे.
जगभरात कुठल्याही देशातून कोरोना आजाराचा धोका अद्याप टळलेला नाही. खुद्द चीनमध्येही तीन हजार कोरोना रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे कोरोना आपल्याला होणारच नाही किंवा कोरोनाचा धोका हा आपल्या गावी, आपल्या वस्तीत अजिबात नाही, हा गैरसमज आधी प्रत्येकाने दूर करायला हवा.
कोरोनासंबंधी दररोज नवनवी कारणे आणि संशोधने उघड होत असतात. त्यामुळे काळजी घेणे हाच एक पर्याय प्रत्येकासमोर सध्या तरी आहे. ‘फ्रंटिअर्स इन पब्लिक हेल्थ’ या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, सम-शीतोष्ण जलवायू असलेल्या क्षेत्रात ज्यावेळी ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होईल, त्या दिवसापासून कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होईल. समशीतोष्ण प्रदेश कुठले तर भारत, अमेरिका, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका या भागातील लोकसंख्येत ‘हर्ड इम्युनिटी’ तयार व्हायला हवी.
या संशोधनात समावेश असणार्या अमेरिकेतील विद्यापीठ ‘युनिव्हर्सिटी ऑफ बेरूत’चे डॉ. हसन जराकेट यांनी या प्रकरणी व्यक्त केलेले मत महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, “आपण कोरोनाच्या विळख्यात अडकलो आहोत. वर्षभर कोरोना संक्रमणाची लाट कधीही येऊ शकते. ती रोखण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ महत्त्वाची आहे.” तोपर्यंत मार्चपासून घेत असलेली काळजी कायम घ्यावी लागणार आहे. एकमेकांपासून अंतर ठेवून राहणे, मास्क परिधान करणे, वैयक्तिक स्वच्छता, घोळक्यात एकत्र न येणे ही या प्रकरणाची उदाहरणे आहेत.
संशोधनकर्त्यांमध्ये असलेल्या दोहास्थित कतार विद्यापीठाच्या डॉ. हादी यासीन यांनीही आपले मत नोंदवले आहे. श्वसनाचे आजार पसरवणारे कित्येक विषाणू हे हवामानानुसार बदलत असतात. समशीतोष्ण प्रदेशात त्यांची संख्या जास्त असते. त्यामुळेच हवामान बदल झाल्यावर आपल्याला सर्दी किंवा खोकला, असे त्रास होतात. मात्र, उष्णकटीबंधीय प्रदेशात हे विषाणू वर्षभर सक्रिय राहतात. विषाणूच्या प्रसारासाठी तापमान आर्द्रता हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो.
तापमान आणि हवामान या दोन गोष्टींवर श्वसनाशी संदर्भातील विषाणूंचा प्रसार अवलंबून असतो. मात्र, भारतात आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहत आलो आहोत की, कोरोना विषाणू उन्हाळा, पावसाळा आणि वादळी परिस्थिती अशा कुठल्याही परिस्थितीत सर्वदूर पसरण्यास कारणीभूत ठरला आहे. इतक्या वेगाने पसरणार्या या विषाणूला रोखणे त्यामुळेच आव्हान आहे. या संशोधनातून दोन मूलभूत बाबी उघडकीस आल्या, त्या भारतात येण्यास अजून बराच अवकाश लागेल, ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होणे आणि विषाणूचा प्रसार थांबणे या दोन्ही गोष्टींपासून आपण आजही कोसो दूर आहोत.
‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होण्यासाठी लोकसंख्येच्या एकूण ६० ते ७० टक्के लोकसंख्येत ‘अॅण्टिबॉडीज’ विकसित व्हायला हव्या. भारतात ही संख्या केवळ २४ टक्के मर्यादित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ‘अॅण्टिबॉडीज’ विकसित झाल्यानंतरच हे भारतात शक्य आहे. तूर्त मास्क, सॅनिटायझर, ‘सोशल डिस्टन्सिंग’ व स्वच्छताच आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतील.