जगन मोहन रेड्डी यांचे सरकार हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याची चर्चा होत होतीच. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अंतरवेदी येथे रथ जाळण्याची जी घटना घडली, त्यामुळे या घटनेस पुष्टी मिळत असल्याचेच दिसून येत आहे.
गेल्या ५ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अंतरवेदी भागातील लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिराचा सागवानी लाकडाचा भव्य रथ काही समाजकंटकांनी जाळून टाकल्याने त्याची अत्यंत तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजामध्ये उमटली. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये या रथामधून लक्ष्मी- नरसिंहाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यासाठी या रथाचा वापर केला जात असे. कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या देवस्थानाचे महात्म्य आणि हिंदू समाजास त्याप्रति असलेली श्रद्धा लक्षात घेऊन, हिंदू समाजाला डिवचण्यासाठी काही समाजकंटकांनी हे नीच कृत्य केले, हे उघडच आहे. अंतरवेदी येथील लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिराचा जाळून टाकण्यात आलेला रथ सागवानी लाकडाचा आणि ५० फूट उंचीचा होता. मंदिराच्या आवारात असलेला हा रथ समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी पेटवून दिला. त्या आगीत रथ जाळून खाक झाला. रथ जाळल्याची घटना सर्वत्र वार्यासारखी पसरली. या घटनेचे तीव्र पडसाद तत्काळ उमटले. विविध हिंदू संघटनांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने या घटनेनंतर ‘चलो अमलापूरम’चा नारा दिला. आंध्र प्रदेश पोलिसांनी भाजपचा हा नारा लक्षात घेऊन अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही भाजप नेत्यांना घरामध्येच नजरकैदेत ठेवले. हा प्रकार म्हणजे ही घटना ज्यांनी घडविली ते मोकाट आणि या घटनेची शहानिशा करण्यासाठी निघालेल्यांवर पोलिसी बडगा, असाच हा प्रकार म्हणवा लागेल.
पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये रथ जाळून टाकण्याची जी घटना घडली, त्या घटनेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. केवळ भाजप, भाजपचे मित्र पक्ष वा अन्य हिंदू संघटनांनीच या घटनेची दखल घेतली नसून चंद्राबाबू नायडू यांनीही त्या घटनेची दाखल घेतली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आंध्र प्रदेशामध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. ते सरकार सत्तेवर आल्यापासून हिंदू समाजाच्या धार्मिक स्थानांवर तसेच धर्मगुरूंवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले असल्याकडेही तेलुगू देसम पक्षाने लक्ष वेधले आहे. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अशाप्रकारच्या किमान २० घटना घडल्याकडे चंद्राबाबू यांच्या पक्षाने लक्ष वेधले आहे. मात्र, जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारला हे आरोप मान्य नाहीत. ‘आमच्या सरकारची बदनामी करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत,’ असे उत्तर त्या सरकारकडून देण्यात आले आहे.
जगन मोहन रेड्डी सरकार जरी, ‘आम्ही सर्वांशी सारखाच व्यवहार करतो, सर्व धर्मांबद्दल आपणास तितकाच आदर आहे,’ असे म्हणत असले तरी रथ जाळण्याच्या घटनेनंतर आंध्र पोलिसांनी जी कृती केली, ती अगदी विरुद्ध असल्याचेच दिसून आले. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी निघालेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. हिंदू संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सर्वांना समानतेची वागणूक देत असल्याचे हे द्योतक म्हणायचे काय? “आमच्या लोकांना निषेध करू दिला जात नाही. त्यांना घरातच डांबून ठेवण्यात आले आहे. सत्तारूढ सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो,” असे भाजप नेते सोमू वीराराजू यांनी म्हटले आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनसेना पक्षानेही या घटनेचा निषेध केला आहे. जगन मोहन रेड्डी यांचे सरकार हिंदू समाजाशी सापत्नभावाने वागत असल्याने या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे, अशी मागणी भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव आणि सीएम रमेश यांनी केली आहे. विजयवाडा येथील कनकदुर्गा मंदिराच्या रथावरील तीन चांदीचे सिंह चोरीला जाण्याच्या घटनेकडे आणि अन्य अशाच प्रकारच्या 1८ घटनांकडे या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांचे लक्ष वेधले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये या घटनेचे होणारे धार्मिक आणि राजकीय परिणाम लक्षात घेऊन, एक कोटी रुपये खर्चून रथ निर्माण करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. आगामी फेब्रुवारीपूर्वी रथ तयार करण्याची हमी सरकारने दिली आहे. सरकारने असे आश्वासन दिले असले तरी ही घटना सरकारने घडूच कशी दिली? तसेच हिंदू समाजावर अन्याय करणार्या अन्य घटना जगन मोहन रेड्डी सरकारच्या कारकिर्दीत घडतातच कशा? या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या स्थितीत ते सरकार नाही. जगन मोहन रेड्डी यांचे सरकार हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याची चर्चा होत होतीच. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अंतरवेदी येथे रथ जाळण्याची जी घटना घडली, त्यामुळे या घटनेस पुष्टी मिळत असल्याचेच दिसून येत आहे. पण, ‘चोर सोडून संन्याशाला अपराधी ठरविण्याचा प्रकार’ हिंदू समाज खपवून घेणार नाही, हे आंध्र प्रदेशातील हिंदू समाजाने या निमित्ताने दाखवून दिले आहे.
आक्षेपार्ह पोस्ट केरळ पोलिसांनी काढून टाकली!
केरळमधील डाव्या सरकारचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि संघाच्या कार्यकर्त्यांवर असलेला राग जगजाहीर आहे. काही तरी निमित्त शोधून संघ कार्यकर्त्यांना कसे अडकविता येईल, असा प्रयत्न त्या सरकारकडून सुरू असतो. एका संघ स्वयंसेवकास केरळ पोलिसांनी असेच अडकविण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो निष्फळ ठरल्याचे दिसून आले. श्रीजीत रवींद्रन नावाच्या संघ स्वयंसेवकांविरुद्ध डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. तसेच पोलिसांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर रवींद्रन हा समाजमाध्यमांचा वापर करून जातीय द्वेष पसरवीत असल्याची माहिती पोस्ट केली होती. पण, त्याविरुद्ध श्रीजीत रवींद्रन याने केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली. पोलिसांनी रवींद्रन याची पोस्ट टाकताना त्याच्या जोडीने त्यांच्या अटकेचे व्हिडिओ टाकले. केरळमधील डाव्या विचारसरणीच्या काही वृत्तपत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या पोस्टचा फायदा उठवून जेवढी बदनामी करता येईल, तेवढी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, रवींद्रन यांनी आपले वकील अर्जुन वेणुगोपाल यांच्या वतीने केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली. तसेच या प्रकाराबद्दल दहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी केली. हे सर्व प्रकरण आपल्यावर शेकणार हे लक्षात घेऊन आणि न्यायालयाकडून आपणास काही चपराक बसणार हे लक्षात घेऊन खटला दाखल होण्यापूर्वीच रवींद्रन यांच्यासंदर्भातील पोस्ट केरळ पोलिसांनी स्वतःहूनच काढून टाकली. संघ स्वयंसेवकांना काही तरी निमित्ताने बदनाम करण्याचा केरळ पोलिसांचा डाव असा पूर्णपणे फसल्याचे या घटनेवरून दिसून आले!