‘फायटर’ ऋतुराज...

18 Sep 2020 20:57:16
Ruturaj-Gaikwad_1 &n



स्वतःच्या क्रीडाकौशल्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला भुरळ पाडणार्‍या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची प्रेरणादायी कहाणी...
 
 
आजपासून ‘इंडियन प्रीमियर लीग २०२०’चे बिगुल वाजणार आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी चालू केलेली ही स्पर्धा, कोरोनाच्या काळामध्ये त्याला दिले जाणारे महत्त्व यावरून अनेक जणांचे वेगवेगळे विचार पाहायला मिळतात. पण, एक मात्र खरे की, या स्पर्धेमुळे अनेक तरुण आणि खेड्यापाड्यातील नवोदित खेळाडूंना संधी मिळते. येत्या ‘आयपीएल २०२०’मध्ये अनेक महाराष्ट्राचे नवीन खेळाडूही आपल्याला मैदान गाजवताना दिसतील. अशामध्ये महेंद्रसिंह धोनीला स्वतःच्या बुद्धी कौशल्याने प्रभावित करणार्‍या पुण्याच्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. स्थानिक ते राष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांची लयलूट करणार्‍या नव्या ‘रन मशीन’ ऋतुराजच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया...
 
 
ऋतुराज गायकवाडचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुण्यामध्ये झाला. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या ऋतुराजला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड होते. वयाच्या पाचव्या वर्षी लेदर बॉलने क्रिकेट खेळण्यास त्याने सुरुवात केली. २००३ मध्ये पुण्यातील नेहरू स्टेडियममध्ये आयोजित न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा सामना पाहण्यासाठी तो गेला होता. तिथे न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमची फलंदाजी पाहून ऋतुराज प्रभावित झाला आणि या खेळामधील त्याची रुची आणखी वाढू लागली. परंतु, स्वतःचे कौशल्य पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून, वयाच्या अकराव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला पुण्यातील वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला.
 
 
इथे त्याला फलंदाजीचे तंत्रशुद्ध शिक्षणही मिळालेच. शिवाय, अनेक खेळाडूंकडून उत्तम मार्गदर्शनही मिळाले. ऋतुराजने पुढे चांगली फलंदाजी करत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघामध्ये प्रवेश मिळवला आणि सर्व स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत पुढे महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघामध्येही आपले स्थान निश्चित केले. पुढे महाराष्ट्राकडून १९ वर्षांखालील क्रिकेट खेळताना त्याने २०१४-२०१५ रोजी झालेल्या ‘कूच बिहार करंडक’मध्ये सर्वाधिक धावा करणार्‍यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये तीन शतक आणि एक अर्धशतकासहित ८२६ धावा केल्या होत्या. पुढे २०१५ मध्ये झालेल्या ‘महाराष्ट्र इनव्हिटेशन स्पर्धे’मध्ये ५२२ धावांची बलाढ्य भागीदारी रचत स्वतःचे त्रिशतक पूर्ण केले. त्याच्या या कामगिरीमुळे निवड समितीचे लक्ष त्याच्या कामगिरीकडे गेले. यामुळे त्याचा समावेश २०१६च्या १९ वर्षांखालील भारतीय संभाव्य संघात करण्यात आला होता.
 
 
मात्र, पुढे संघामध्ये त्याची निवड होऊ शकली नाही. असे असूनही त्याच्या या अपयशाचा परिणाम खेळावर होऊ दिला नाही. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले. यावर्षीच्या ‘कूच बिहार स्पर्धे’मध्ये त्याने सात सामन्यांमध्ये चार शतक आणि तीन अर्धशतकांसह ८७५ धावा केल्या. पुढे त्याला वयाच्या १९व्या वर्षी २०१६-२०१७ मध्ये ‘रणजी’ स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र, झारखंडविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये वरुण अरॉनची गोलंदाजी खेळताना त्याला एक फटका बसला. त्यानंतर ऋतुराजला एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
 
 
 
 
शिवाय, ‘रणजी’ पदार्पणातच ही स्पर्धा त्यावेळी अर्धवट सोडावी लागली.एवढ्या मोठ्या अडथळ्याला पार करत ऋतुराजने आठ आठवड्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पदार्पण केले. ‘विजय हजारे करंडक’मध्ये एकाच सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. पुढे या हंगामात त्याला ‘सलामी फलंदाज’ म्हणून बढती देण्यात आली. ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये त्याने हिमाचल प्रदेशच्या संघाविरुद्ध ११० चेंडूंमध्ये १३२ धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वतःची कुवत सिद्ध केली. या स्पर्धेमध्ये त्याने ६३च्या सरासरीने सात सामन्यांमध्ये ४४४ धावा करत महाराष्ट्र संघाचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून नाव सिद्ध केले. त्यानंतर ऋतुराज हा महाराष्ट्र संघाकडून पुन्हा एकदा ‘रणजी’मध्ये नियमितपणे खेळू लागला आणि दहा सामन्यांमध्ये ३४२ धावा केल्या.
 
 
२०१८-२०१९ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. या वर्षातील त्याची ‘विजय हजारे स्पर्धा’ आणि ‘रणजी’मधील कामगिरी बघून १९ वर्षांखालील भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. त्याच्यातील आत्मविश्वास आणि त्याचे खेळातील कौशल्य यामुळे सर्वांच्या पसंतीस उतरत होता. पुढे ‘देवधर चषक’ आणि भारत ‘अ’ संघाकडून खेळताना अनेक दौर्‍यावर त्याने धावांची लयलूट केली. २०१९ मध्ये झालेल्या ‘आयपीएल लिलावा’मध्ये ऋतुराजचा समावेश महेंद्रसिंह धोनीच्या ‘चेन्नई सुपर किंग्स संघा’त झाला आणि इथून त्याचा ‘आयपीएल’ प्रवास सुरू झाला. याचसोबत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी चांगली होती.
 
 
महेंद्रसिंह धोनी त्याच्या खेळातील बुद्धिमत्ता आणि रणनीतीबद्दल जागरूकता पाहून प्रभावित झाला होता. दुर्दैवाने ‘आयपीएल २०२०’ स्पर्धा सुरू होण्याआधी त्याला कोरोनाने ग्रासले आणि सुरुवातीचे काही सामने तो खेळू शकणार नाही, असे सांगितले. मात्र, तरीही तो या रोगाशी ‘फायटर’सारखा लढेल आणि चेन्नई संघाकडून खेळताना चांगली कामगिरी करत भारतीय संघाकडूनदेखील खेळताना दिसेल, अशीच अपेक्षा करूया. त्याच्या पुढील वाटचालीसाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...
 
 
Powered By Sangraha 9.0