जी व्यक्ती सतत देत असते, तिच्याकडे भरभरुन परत येत असते, हा निसर्गनियमच आहे. उद्योगव्यवसायात तर हा नियम पदोपदी जाणवतो. उद्योगात ज्याचा जनसंपर्क तगडा त्याचा व्यवसायसुद्धा चांगला, हा आणखी एक नियम. या दोन्ही नियमांची प्रचिती घ्यायची असल्यास एका उद्योजकास तुम्हाला आवर्जून भेटावंच लागेल. निष्णात कलाकार, पण तेवढाच दिलदार मनाचा माणूस. याच गुणांमुळे ते जिथे जातात तिथे त्यांचा मोठा मित्रपरिवार असतो. आपण उद्योगविश्वातील एखाद्या व्यक्तीचा संदर्भ मागितला तर काहीच वेळात तो संदर्भ आपल्याला मिळालेला असतो. उद्योगातून त्यांनी उभारलेले माणसांचे ‘नेटवर्क’ प्रचंड मोठे आहे. या ‘नेटवर्कचा राजा’म्हणजेच राम कोळवणकर. ‘राम फ्युजन’ या प्रिंटिंग क्षेत्रातील संस्थेचे संचालक.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पडवे गाव. अर्ध गाव समुद्राच्या पाण्याशी खेळणारं. निसर्गाच्या कुशीत सगळी घरं दडलेली. बोटीतून पाहिली तरी न दिसणारी अशी ही घरं. सपाट रस्ता गावाला ठाऊकच नाही. पायर्या-पायर्या आणि चढउतार यामुळे गावातल्या माणसांना गुढघ्याचे, संधीवाताचे आजारच ठाऊक नाही. ७०-८० वर्षांची माणसंसुद्धा सहज इकडे बाजारात फिरुन येतात. त्यांच्या या निरोगीपणामुळेच त्यांचं आयुर्मान ९० वर्षांपर्यंतचं आहे. या अशा धट्ट्याकट्ट्या गावात शंकर गोविंद कोळवणकर आणि लक्ष्मी शंकर कोळवणकर हे दाम्पत्य गुण्यागोविंदाने राह्त होते. शंकररावांचं किराणा मालाचं दुकान होतं. चार मुलं आणि दोन मुली अशी सहा अपत्ये. या सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यात लहान होता राम. राम यांचं सातवीपर्यंतचं शालेय शिक्षण पडवे जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो खेडला आपल्या बहिणीकडे गेला. खेडच्या त्यावेळच्या सहजीवन हायस्कूलमध्ये तो दहावीपर्यंत शिकला.
रामची चित्रकला चांगली होती. त्यामुळे अकरावीला त्याने कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र, मोठा भाऊ जो बी.कॉम करत होता, त्याने बारावीला राम यांना कॉमर्स घ्यायला लावलं. आर्ट्स घेऊन नोकर्या मिळत नाही. कॉमर्समुळे नोकर्या सहज मिळतात हा एक समज होता त्यामागे. पुढचं शिक्षण राम यांना कोल्हापूरला करायचं होतं. मोठा भाऊ तिकडेच राहायचा. मात्र, मोठा भाऊ स्वत: वसतिगृहावर राहायचा. वर्षभरात काहीतरी सोय करु म्हणून राम यांना त्याने एक वर्ष संगमेश्वरला ठेवले. तिथे जेवणाची आणि राहण्याची अवस्था प्रचंड वाईट होती.
आमटीमध्ये अगदी झुरळं वगैरे मिळायची. मात्र, दिवस काढायचे होते म्हणून तक्रार करण्यात काहीच अर्थ नव्हता. पुढे वर्षभराने राम कोल्हापुरात हॉस्टेलवर राहायले आले. भाऊ दिवसभर बाहेर राहायचा आणि रात्री गुपचूप येऊन झोपायचा. कोल्हापूरचं कलानिकेतन महाविद्यालय कला शिक्षणासाठी खूप प्रसिद्ध होतं. मात्र, चित्रकलेचे साहित्य आणि शुल्क आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे राम यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेणं शक्य नव्हतं.
त्याच हॉस्टेलमधील काही विद्यार्थी कलानिकेतनमध्ये शिकत होते. त्यांना राम त्यांच्या चित्रकलेत मदत करायचे. राम यांची चित्रे पाहून त्यांनी ‘कलानिकेतनमध्ये तू प्रवेश घे,’ असं सुचविलं. मात्र, आर्थिक परिस्थिती तशी नसल्याचे राम यांनी सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यांनी रामसाठी प्रयत्न केले. योगायोगाने त्या महाविद्यालयाची पटसंख्या कमी होती. त्यामुळे रामला त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पहिलं आणि दुसरं वर्ष तिथे झाल्यानंतर आपल्या मित्राकडे राम यांना पाठविण्याचा निर्णय राम यांच्या भावाने घेतला.
त्यामुळे पुढची तीन वर्षे राम यांनी पुण्यात पूर्ण केली. दुर्दैव असं की, राम यांच्या भावाचा तो मित्र पुण्यातून मुंबईला जो आला तो परत काही आलाच नाही. परिणामी राम यांना पुण्यातच राहावं लागलं. दरम्यान, राम यांना स्वत:चा खर्च निघावा म्हणून दै. ‘केसरी’मध्ये हेडिंग हाताने लिहू लागला. त्यातून मिळणार्या तुटपुंज्या पगारात तो कसंबसं राहू लागला. सुरुवातीचे १५ दिवस पोटभर जेवून, पुढचे आठ दिवस एक वेळ जेवून आणि उरलेले आठ दिवस निव्वळ सांबर आणि भात खाऊन तो ढकलत होता. दरम्यान, ‘डेक्कन’मधल्या एका जाहिरात संस्थेत त्यास नोकरी मिळाली. १२५ रुपये पगाराची.
पुढे अंतिम परीक्षा देण्यासाठी राम यांना मुंबईला यावे लागले. त्याची मोठी बहीण नागपाड्यात राहायची. तिचं कुटुंब. सासू-सासरे, दोन भाऊ असे १२ जणांचे कुटुंब १० बाय १२च्या खोलीत राहत असे. खोलीच्या बाहेर एक कॉट होती. त्या कॉटवर बसून रात्री २ वाजेपर्यंत राम पेंटिंग्ज बनवायचे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी परीक्षा दिली. एका मोठ्या जाहिरात संस्थेत त्यास ‘व्हिज्युअलाईझर’ म्हणून नोकरी आहे, असे कळले. पण, राम यांना ती जागा रिकामी नाही हे सबब देऊन दुसर्या जागेवर नियुक्त केले गेले.
दोन दिवसांनी त्याच जागेवर दोन गुजराती मुलींची निवड झाली. राम यांच्यासाठी हे धक्कादायक होतं. त्या संस्थेत एक गृहस्थ होते त्यांनी राम यांना या राजकारणाची कल्पना दिली. ‘जर तुला या ठिकाणी सडायचं नसेल तर छोट्या का होईना, अशा जाहिरात कंपनीत जा.’ राम गिरगावातल्या एका छोट्या जाहिरात कंपनीत कामाले लागले. सकाळी ८ ते सायं. ४ अशी कामाची वेळ होती. पगार होता ६०० रुपये. संध्याकाळी ४ नंतर राम गिरगाव परिसरात फिरुन प्रिंटिंगची कामे मिळवू लागला. रामचे मालक हुशार होते. त्यांनी तांत्रिक बाबी राम यांना शिकवल्याच नाहीत. त्यांनी राम यांना सांगितले की, ‘मुंबईत जो स्वत: लग्न करुन दाखवतो आणि स्वत:चं घर घेऊन दाखवतो तो खरा यशस्वी माणूस.’
राम यांच्या मनावर ही गोष्ट कोरली गेली. एव्हाना अनेक ग्राहक राम यांना थेट ओळखू लागले होते. राम यांच्या कलेची त्यांना कदर होती. ते राम यांना थेट काम देऊ करत होते. पण मालकासोबत ही प्रतारणा होईल असे त्यांना वाटे. राम यांच्या मित्राने मात्र राम यांना समजावले आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहित केले. राम यांनी जेव्हा नोकरी सोडण्याचा प्रस्ताव मालकासमोर ठेवला तेव्हा त्यांनी अर्धवेळ तरी काम करावे, ही विनंती केली. या अर्धवेळ नोकरीसाठी त्याने ९०० रुपये पगाराची ऑफर दिली. पूर्णवेळ नोकरीसाठी ६०० रुपये आणि अर्धवेळ नोकरीसाठी ९०० रुपये यावरुन स्वत:ची किंमत राम यांना कळली.
दरम्यान, राम यांची ओळख पाध्ये नावाच्या गृहस्थांसोबत झाली. राम यांचा जीवनसंघर्ष त्यांना कळला. त्यांनी स्वत:सुद्धा असाच संघर्ष केल्याने त्यांना त्याची जाण होती. त्यांनी राम यांना स्वत:ची जागा, टेलिफोन आणि इतर स्टेशनरी साहित्य दिले. याच कालावधीत एका गुजराती कॅसेट बनवणार्याने रामला कॅसेट डिझाईन करण्याचे काम दिले. दिवसरात्रं राबून राम यांनी ते काम पार पाडले.
सोबत विविध कॉर्पोरेट कंपन्यांची डिझाईन आणि प्रिंटिंगची कामे मिळू लागली. १९८७ साली राम यांनी ‘राम फ्युजन’नावाने कंपनी सुरु केली. १९९० साली डॉ. मनिषा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. पुढे राम यांनी स्वत:चं घर घेतलं. या दोन्ही घटना झाल्यानंतर आवर्जून ते पूर्वीच्या आपल्या मालकाला भेटायला गेले. राम म्हणाले, “तुम्ही जर त्यावेळी मला उकसवले नसते, तर आज या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या नसत्या.”
‘राम फ्युजन’सोबत कॉम्प्युटर स्टेशनरी पुरवणारी ‘अमेय ग्राफिक्स’, दिवाळी अंक तयार करुन देणारी ‘ऑल सेट’ अशा संस्थासुद्धा चालवल्या. सोबतच स्विमिंग पूल. फिंगर अॅनालिसीस करणारे ‘डीएमआयटी’ असे व्यवसायसुद्धा केले. मराठी कमर्शिअल आर्टिस्टना नोकर्या न करता उद्योजक घडविणे हा रामचा हातखंडा, असे तीन कलाकार त्यांनी उद्योजक म्हणून घडविले.
गेल्या वर्षी ते हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. तिथे त्यांना १५ खोल्यांचं एक हॉटेल चालवण्याची संधी मिळाली. पुन्हा नेटवर्क कामास आले. एका बँकेने त्यांना १६ लाखांचे कर्ज मंजूर केले. आज दलाई लामांच्या पवित्र निवासस्थानापासून जवळ असलेले ‘निर्वाण’ हे दहा खोल्यांचे, तर ‘ग्रीन ग्लोरी’ हे पाच खोल्यांचे सुसज्ज हॉटेल ‘ट्रॅव्हल इज’ ही कोळवणकरांची कंपनी चालवते. अमेय हा कोळवणकरांचा चिरंजीव हे हॉटेलचं काम पाहतो. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या अमेयचे गोरेगाव येथे गाड्यांचे वर्कशॉप आहे.
मृदू स्वभाव, मृदू वाणी आणि मदतीसाठी तत्पर असणार्या कोळवणकरांचे निव्वळ कोकण, महाराष्ट्रातच नव्हे तर हिमाचल प्रदेशातसुद्धा उत्तम नेटवर्क आहे. ‘वेळेचे भान हीच आमची शान’ हे त्यांच्या कंपनीचं ब्रीदवाक्य ते स्वत: जगतात म्हणूनच ते उत्तम यशस्वी उद्योजक आहेत.