कोरोना महामारीच्या काळात भारतीय रेल्वेलाही प्रवासी उत्पन्न बुडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलाच. परंतु, तरीही रेल्वेची विविध स्तरावर विकासकामे सुरुच आहेत. तेव्हा, मुंबई महानगर क्षेत्रातील टाळेबंदीच्या काळात पार पडलेल्या आणि भविष्यातील काही रेल्वे प्रकल्पांचा घेतलेला हा आढावा...
मुंबईची ‘जीवनवाहिनी’ उपनगरीय रेल्वेसेवा कोरोना ‘टाळेबंदी’च्या काळात महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बंदच आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी रेल्वेसेवा सुरू असून खासगी कार्यालयांमध्ये काम करणार्या लाखो प्रवाशांना ‘बेस्ट’, ‘एसटी’, अॅपवर चालणार्या टॅक्सी इत्यादीच्या माध्यमातून प्रवासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या खर्चिक व वेळखाऊ मार्गाने लाखो प्रवासी दररोज ‘घर-कार्यालय-घर’ असा प्रवास करीत आहेत. एरवी तब्बल ८० लाख प्रवासी दररोज उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. पण, सध्या अत्यावश्यक सेवेतील फक्त दोन ते अडीच लाख प्रवासी रेल्वेसेवेचा जुलै महिन्यापासून लाभ घेत आहेत.
सध्या दररोज १२ लाखांहून अधिक प्रवासी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कर्जत, पनवेल येथून मुंबईच्या दिशेने ‘एसटी’ व ‘बेस्ट’ने कसाबसा जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतात. ‘बेस्ट’च्या ताफ्यातील ३,५०० पैकी ३,२२४ बसेस रस्त्यावर धावत असल्या तरी एका आसनावर एकच व्यक्ती या नियमामुळे प्रवासीक्षमताही अर्ध्यावर आली आहे. या सर्वांमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते आणि नोकरदारांना वेळेवर कार्यालयात पोहोचणे कठीण होऊन बसले आहे. त्यात कामावर हजर न राहिल्यास वेतनकपातीची टांगती तलवार कायम असतेच. ही अडचण लोकल सेवा सुरु झाल्यानंतरही कायमस्वरुपी दूर करण्यासाठी, बस व रेल्वेने विविध कार्यालयीन वेळा बदलण्याच्या सूचना सरकारला केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवासासाठी सध्या १२० रेल्वे जोड्या विरार व डहाणूपासून सकाळी ५.३० पासून रात्री ११.३० पर्यंत सुरू आहेत. प्रत्येक गाडीची आसनक्षमता १,२०० असली तरी सध्या फक्त ७०० माणसे बसणार. तसेच मध्य रेल्वेवर २०० गाड्यांची सीएसएमटीपासून ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा, वाशी व पनवेल अशी सेवा सुरू आहे. केंद्रीय कार्यालये, आयटी, न्यायालयीन, राष्ट्रीय बँका, जीएसट’, पोस्ट, मुंबई-पोर्ट ट्रस्ट आणि राजभवनचे कर्मचारी या रेल्वेसेवेचा लाभ घेत आहेत.
‘टाळेबंदी’त लाखो कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरल्याने मुंबई विकास महामंडळाच्या कामांना फटकाही बसला आहे. मनुष्य बळाअभावी रेल्वेची कामेही रेंगाळली आहेत. ठाणे ते दिवा पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गाचे काम, विविध स्थानकांची सुधारणा कामे व पुलाची कामे, अशा कामांची गती संथ होत आहे. नालेसफाई, कामगारांची केवळ ५० टक्केच उपलब्धी असल्यामुळे ‘कलव्हर्ट’ स्वच्छता, रुळालगतच्या झाडांची छाटणी, घाटातील दरड तपासणी, डोंगराभोवती कुंपण घालणे आदी कामांनाही फटका बसला आहे.
लांब अंतरावर जाणार्या प्रवाशांच्या सोयीकरिता (नाशिक, मनमाड, पुणे आदी ठिकाणी) रेल्वे १२ मेपासून ३० विशेष राजधानी गाड्या, १ जूनपासून २०० विशेष मेल व एक्स्प्रेस गाड्या व १२ सप्टेंबरपासून ८६ अतिरिक्त गाड्या सुरुही केल्या आहेत.
वाहन उद्योगाला रेल्वेकडून वाहतुकीसाठी पर्याय
‘टाळेबंदी’च्या कालावधीत मालवाहतुकीसाठी रेल्वेने आता नवा पर्याय शोधला. पुण्यातून रेल्वेने केरळमध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली. शिवाय, आता पुण्याजवळील चिंचवड मालधक्क्यावरून ७५ पिकअप मोटारींची पहिली खेप नुकतीच बांगलादेशला २,१३९ किमीवर बेनापोल येथे रवाना करण्यात आली आहे. शिवाय ‘फ्रेट कोशंट’ वाढविण्याकरिता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने (बीडीयू) भिवंडी रेल्वे स्थानकावरून पहिली पार्सल गाडी १० सप्टेंबरपासून दुसर्या राज्यात पाठविण्यासाठी सेवा सुरू केली आहे.
‘एमएमआर’ क्षेत्रात रेल्वेची ‘एमयूटीपी-३’ अंतर्गत कामे-
‘एमएमआर’ प्रदेशात रेल्वेचे मार्ग टाकणे व कनेक्टिव्हिटीकरिता जोडणी करणे आदी कामांकरिता रेल्वेच्या ‘एमआरव्हीसी’नी ‘एमयूटीपी-३’ अंतर्गत प्रकल्प कामे करावयास घेतली आहेत. या प्रकल्पांकरिता एकूण रु. १०,९४७ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या अंतर्गत खालील कामांचा समावेश आहे.
१. पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग टाकणे व कल्याण-खोपोली मार्गाला जोडणे. अंदाजे खर्च रु. २,७८३ कोटी.
२. ऐरोली ते कळवा उन्नत रेल्वेमार्ग टाकणे व ठाणे-कल्याण मार्गाला जोडणे. अंदाजे खर्च रु. ४७६ कोटी.
३. विरार ते डहाणू चौपदरी रेल्वेमार्ग टाकणे. अंदाजे खर्च रु. ३,५७८ कोटी.
४. २७ एसी लोकल (१२ डब्यांच्या) व नॉनएसी लोकल खरदी करणे. अंदाजे खर्च रु. ४,११० कोटी.
असे एकूण रु. १०,९४७ कोटी.
हार्बर रेल्वेवर बसविण्यात येणार्या अत्याधुनिक ‘डिजिटलाईज्ड कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टीम’ (सीबीसीटीसी) सिग्नल यंत्रणेकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी अहवाल डिसेंबर २०२० पर्यंत उपलब्ध होणार आहे. यातून लोकल फेर्यांची क्षमता ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
कल्याण-कसारा मार्गावरील वालधुनी नदीवरील पुलाची कामे, मुंबईसह, पुणे, सोलापूर, भुसावळ, आणि नागपूर येथील पुलाची कामे प्राथमिकतेने पूर्ण करण्यात येणार आहेत.
रेल्वे प्रशासनाची मान्सूनपूर्व व नंतरची कामे
३३ धोकादायक ठिकाणी हिलगँगची टेहळणी. कुर्ला, चुनाभट्टी, माटुंगा, माहिम, दादरमधील ३५ किमी लांबीच्या रुळांची उंची वाढविली.
मध्य रेल्वेने ट्रॅकची आणि संकुलांची (premises) तपासणी करण्याकरिता दोन ड्रोनची मदत घेतली. रेल्वे प्रशासन परिसरात पाणी भरल्यास प्रवाशांच्या बचावासाठी प्रशिक्षितांचा ताफा, पूरनियंत्रण पथक स्थापणे व बोटही घेणार आहेत.
मध्य रेल्वेचे शून्य अपघात नियोजन
लोकलमधून पडून अपघात कमी करण्यासाठी ‘कोविड’ काळानंतर वातानुकूलित गाड्यांचा पर्याय निवडण्यात आला आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्याकरिता रुळांशेजारी संरक्षक भिंत, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधणे, जाण्याचा व येण्याचा पुलावरील भिन्न मार्ग करणे, रुळाशेजारी ‘सीसीटीव्ही’ बसविणे, रुळावरील अपघात टाळण्यासाठी पिवळ्या रंगाचे पट्टे लावले जाणार आहेत, इत्यादी कामे केली. स्थानकांच्या परिसरात ‘सीसीटीव्ही’, ‘डोअर मेटल डिटेक्टर’, ‘आरपीएफची-ई-पेट्रोलसेवा’ अशी आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविली जाणार आहे.
रेल्वेच्या इतर सुविधा
रेल्वेतील डब्यांच्या शौचालयांमध्ये सुरक्षित व आरोग्यदृष्ट्या योग्य अशा योग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. नावीन्यपूर्ण ‘एअर प्युरिफायर’, ‘फूट ऑपरेटेड वॉशबेसीन’ बसविणार आहेत. ७५ स्थानकांवर ‘रूफटॉप सोलर पॅनेल’ बसविला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या स्थानकाबाहेर ‘ई-बाईक’, ‘ई-ऑटो’ची सोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने २०१८ ते २०३० काळाकरिता सर्व देशातील रेल्वेंकरिता सुविधा आणि नूतनीकरणाचा रु. ५० लाख कोटी खर्चाचा मोठा आराखडा बनविला आहे.
‘आदर्श स्थानक’ योजनेखाली १,२५० स्थानके निवडली आहेत. त्यातील मुंबई विभागातील काहींची माहिती खाली दिली आहे.
‘अक्षय ऊर्जे’ची (सौर व पवन) व्यवस्था स्थानकात वापरली जाणार आहे, तसेच सर्व रेल्वे स्थानकांवर ‘एलईडी’ दिवे वापरले जाणार आहेत. सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या ६४ हजार डब्यात २ लाख ३० हजार ‘बायो-टॉयलेट’ बसविण्यात येणार आहेत.
२३ स्थानके पुनर्विकसित करणार, त्यातील महाराष्ट्रातील पुणे, लोकमान्य टिळक, ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आदी स्थाकांचा समावेश आहे.
रेल्वेचा वेग वाढविण्यासंबंधी कामे
रेल्वेचा सध्याचा वेग सरासरी ताशी ९९ किमी आहे तो काही गाड्यांकरिता (दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-चेन्नई) १६० किमी होणार, दिल्ली-वाराणसीच्या ‘वंदे भारत’करिता १०४ किमी झाला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेटकरिता ३२० किमीचा प्रस्ताव आहे.
रेल्वेचे १, ५०,७४६ पूल आहेत ते मान्सूनपूर्व व नंतर असे दोनदा तपासले जाणार आहेत. त्यांची दुरुस्ती वा पुनर्बांधणी करायची ते तपासणीनंतर ठरविले जाणार आहे. ईशान्येकडील सर्व राज्यांच्या राजधान्या रेल्वेमार्गांनी जोडल्या जाणार आहेत, त्याकरिता प्रकल्पाची कामे रेल्वे प्रशासन करणार आहे. पूर्व व पश्चिम रेल्वे विभागाकरिता ‘डेडिकेटेड फ्रेट सर्व्हिस कॉरिडोर’ स्थापले जाणार आहेत.देशातील ११० रेल्वे स्थानकांना इतरत्रल हलविणे किंवा त्यांची पुनर्बांधणी करणेही प्रस्तावित आहे. त्याचबरोबर विमानतळातील सुविधांसारखी आधुनिक बनविली जाणार आहेत.
मुंबई विभागातील काही रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण
सीएसएमटी स्थानक - हार्बरसाठी स्वतंत्र हेरिटेज यार्ड, फलाट उन्नत मार्गावर असणार आहे; मुख्य स्थानकात येण्याकरिता १५ मिनिटांची पायपीट करावी लागणार आहे. हे स्थानक विमानतळासारखे आधुनिक करायचा रेल्वेचा मानस आहे.
शिवाय, मुंबई विभागातील इतर सात स्थानकेही तशीच विमानतळासारखी ‘पीपीपी’ तत्त्वावर विकसित केली जाणार आहेत. ही स्थानक विकासकाच्या हातात ६० वर्षांकरिता दिली जातील. पाच वर्षांत स्थानक व परिसराच्या पुनर्विकासाला गती आणून त्याचा कायापालट करण्यात येईल. तसेच वांद्रे, लोकमान्य टिळक, जोगेश्वरी स्थानक यांचे नूतनीकरण करण्यात येईल.
उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या विकासाला गती
मध्य रेल्वे - भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा, कुर्ला, घाटकोपर
हार्बर मार्ग - जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द
पश्चिम मार्ग - मुंबई सेंट्रल, खार रोड, जोगेश्वरी, कांदिवली, मीरारोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा, अंधेरी.
रेल्वे स्थानकांवरील प्लास्टिक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन’ बसवून पर्यावरणपूरक करण्यात येणार आहेत. यासाठी चर्चगेट, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, माटुंगा, माहिम, वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली, वसई रोड, नालासोपारा, विरार अशा स्थानकांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.अशा तर्हेने ‘टाळेबंदी’मुळे रेल्वेचे रोजचे कितीतरी कोटींचे नुकसान होत आहे. परंतु, असे असले तरी रेल्वेची कामे अखंडपणे सुरु आहेत.