चीनचा डोळा ताजिकिस्तानवर

14 Sep 2020 19:58:49
China wants to use its in


अमेरिका किंवा रशियाला पछाडून आपल्याला जागतिक महासत्तेचे स्थान मिळावे म्हणून चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो. तसेच चीन आपल्या सर्वच शेजार्‍यांच्या जमिनीवर कब्जा करून व जगातील छोट्या-छोट्या देशांना कर्जाच्या जाळ्यात अडकवून एक अभेद्य साम्राज्य स्थापित करू इच्छितो. यामुळेच ‘वसाहतवादी’ आणि ‘विस्तारवादी’ मानसिकतेचे प्रतीक चीन आता ताजिकिस्तानला आपल्या कर्जजाळ्यात अडकवून त्याचा एकतृतीयांश भूप्रदेश बळवकावण्यासाठी टपून बसल्याचे दिसते.

 
मात्र, तसे झाले तर ते भारत आणि रशिया दोन्ही देशांसाठी धोकादायक ठरू शकते. कारण, ताजिकिस्तानचे मध्य आशियातील महत्त्वाचे स्थान. चीन गेल्या महिन्या-दोन महिन्यांपासून ताजिकिस्तानच्या पामीर भूप्रदेशावर स्वतःचा हक्क सांगत आहे. तत्पूर्वी चीनने २०११ साली ताजिकिस्तानला आपल्या कर्जजाळ्यात अडकवून पामीर भूप्रदेशाच्या एक हजार वर्ग किमी जमिनीवर कब्जा केलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे, ताजिकिस्तानला निम्म्यापेक्षा अधिक कर्ज चीनने दिलेले असून याआधी ताजिकिस्तानने चीनला ‘खनन अधिकार’ देऊन कर्जाची परतफेड केली होती. पण, आता त्याचा डोळा संपूर्ण पामीर प्रदेशावरच आहे.
 
 
आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी चीनने पामीरशी निगडित लेख प्रकाशित करायला सुरुवात केली असून ऑगस्ट महिन्यात कित्येक चिनी माध्यमांनी आपापल्या संकेतस्थळावर चिनी इतिहासकार चो याओ लूने लिहिलेला एक लेख प्रसिद्ध केला. ताजिकिस्तानने आता चीनने गमावलेली भूमी परत दिली पाहिजे, अशा शीर्षकाचा तो लेख होता. लेखातील दाव्यानुसार पामीर भूप्रदेश आधी चीनचा भाग होता. परंतु, युनायटेड किंग्डम आणि रशियाच्या दबावामुळे चीनला १९व्या शतकात त्यावरील हक्क सोडावा लागला.
 
 
दरम्यान, अमेरिका आणि युरोपीय संघाने मध्य आशियात कधीही रस दाखवला नाही. परिणामी, मध्य आशियायी देशांना चीनवरच अवलंबून राहावे लागले. स्वतः ताजिकिस्तानदेखील चिनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असून त्याच्यावरील एकूण चिनी कर्ज १.२ दशलक्ष डॉलर्स इतके आहे. आता चीन याचाच फायदा घेऊन ताजिकिस्तानचा वापर रशिया आणि भारताविरोधात करू इच्छितो. कारण, ताजिकिस्तान मध्य आशियात अतिशय मोक्याच्या स्थानी आहे. अफगाणिस्तान, पाकव्याप्त काश्मीर आणि चीनव्याप्त अक्साई चीन हे प्रदेश ताजिकिस्तानच्या अगदी निकट आहेत. हे लक्षात घेऊनच चीन इथे एक लष्करी तळदेखील उभारत आहे आणि त्याचा निशाणा भारतच आहे. रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वाखन कॉरिडोरपासून किमान अंतरावर हा लष्करी तळ आहे.
 
 
वाखन कॉरिडोरमधील ‘फारखोर एअरबेस’मधून तालिबानविरोधी कारवाया प्रत्यक्षात आणणे सोपे होते, यासाठी हा कॉरिडोर महत्त्वाचा असून भारतदेखील या कॉरिडोरचा वापर करून पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांना असफल करत आल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत भारत आणि रशियाने ताजिकिस्तानच्या मुद्द्यावर चीनच्या योजनेला तोडीसतोड प्रत्युत्तर देणे गरजेचे ठरते. चीनने पामीरवर दावा केल्याने रशिया चिडलेला असून ताजिकिस्तान मुद्द्यावरूनही रशिया चीनविरोधात आक्रमक झाला आहे. रशियाच्या दृष्टीने मध्य आशिया अजूनही बालेकिल्ला आहे, कारण इथले बहुतांश देश एकेकाळी सोव्हिएत संघाचे सदस्य होते. आता रशियाला चीनच्या वाढत्या प्रभावाचा अधिकच धोका वाटत आहे, म्हणूनच रशियाने चीनला इशारा देत म्हटले की, तुमच्या प्रशासनाची दादागिरी थांबली नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.
 
 
दुसर्‍या बाजूला मध्य आशियायी देशांतही चीनविरोधी मत आहे. कारण उघूर मुस्लीम. चीनच्या शिनजियांग प्रांतात मोठ्या संख्येने उघूर मुस्लीम राहतात. मात्र, चिनी कम्युनिस्ट सरकार त्यांच्यावर भयंकर अत्याचार करत आहे. ताजिकिस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तानसारखे देश मुस्लीमबहुल असून, उघुरांवरील चिनी जुलमाच्या मुद्द्याकडे ते गांभीर्याने पाहतात. विशेष म्हणजे, कझाकस्तान आणि उझबेकिस्तानबरोबर भारताचे मधुर संबंध असून हे दोन्ही देश चीनचे विरोधक आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि रशिया मध्य आशियाला केंद्र मानून चीनविरोधात आघाडी उघडतील, अशी शक्यता आहे. रशियाच्या ब्लादिवोस्तोकवर चीनने दावा केला होता, तर भारताच्या लडाखमध्येही त्याने कुरापती केल्या. पण, यावेळी रशिया आणि भारत एकमेकांना सहकार्य करत आले. अशा परिस्थितीत ताजिकिस्तानच्या मुद्द्यावर दोन्ही देश आपल्या समान प्रतिस्पर्ध्याविरोधात एकत्र आल्यास चीनसाठी ते एखाद्या दुःस्वप्नाहून कमी नसेल.



Powered By Sangraha 9.0