दि. ५ मेपासून भारतीय आणि चिनी सैन्य मोठ्या संख्येने एकमेकांसमोर लडाख सीमेनजीक उभे ठाकले आहे. लडाखमधील हा ‘मिलिटरी स्टॅण्ड ऑफ’ कधी संपेल हे सांगता येत नाही. पण, या भागात पारंपरिक युद्ध होऊ शकते, असे काहींना वाटते पण, युद्ध झालेच तर काय...
चीनला युद्धाचा अनुभव नाही
युद्धामध्ये महत्त्वाचे दोन घटक असतात, एक म्हणजे सैनिक आणि दुसरे म्हणजे त्यांच्याकडची शस्त्रास्त्रे. शस्त्रास्त्रांचा विचार केला तर चिनी शस्त्रास्त्रे आधुनिक आहेत. भारतीय लष्कराकडे असलेल्या शस्त्रांपेक्षा जास्त आधुनिक शस्त्रे चिनी सैनिकांकडे आहेत. परंतु, सैनिक आणि सैन्याचे नेतृत्व करणारे अधिकारी यांचा विचार करता, त्यात भारताची नक्कीच सरशी होणार आहे. यामागे अनेक कारणे आहेत. भारतीय सैन्याला लढण्याचा चांगलाच अनुभव आहे. सद्यःपरिस्थितीही दरवर्षी भारतीय लष्करातील ३५० ते ४०० सैनिक हे दहशतवादी विरोधी अभियान आणि एलओसीवर आपले बलिदान देत असतात. अर्थात, आपल्यापेक्षा तिप्पट-चौपट पाकिस्तानचे आपले सैन्य नुकसानही करते. १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ ही पाच युद्धे पारंपरिक होती. शिवाय चार वर्षे भारतीय सैन्य श्रीलंकेतही लढले. याशिवाय अनेक युद्धजन्य परिस्थिती भारताने अनुभवल्या आहेत. ‘ऑपरेशन पराक्रम’साठीही आपण युद्धाला तयार झालो. ‘संयुक्त राष्ट्रा’साठीही भारतीय सैनिक वेगवेगळ्या युद्धभूमींवर लढतात. कारगील युद्धाशिवाय आपण सियाचीन ग्लेशिअरवरही अत्यंत उंचावर लढाई केली आणि ती साहसाने जिंकलीही. त्यामुळे भारतीय सैन्याला जितका युद्धाचा अनुभव आहे, जो चिनी सैन्याला नक्कीच नाही. चीनने एकच युद्ध १९७८ साली व्हिएतनामशी लढले आणि त्यातही त्यांचा पराभवच झाला.१९६७ साली सिक्कीमच्या डोंगराळ सीमेवर भारत आणि चीन दरम्यान जी लढाई झाली, त्यात ४००हून अधिक चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी यमसदनी धाडले होते, तर या लढाईत ७० भारतीय सैनिकांनी रक्त सांडले. १९९९ साली कारगील युद्धामध्ये अतिउंचावर युद्धात आपण पाकिस्तानला पराभूत केले. कारगील युद्धात लढलेले काही अधिकारी आजही लष्करी सेवेत आहेत. उदा. नॉर्थन कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल जोशी यांना कारगील युद्धामध्ये ‘वीरचक्र’ देऊन गौरवण्यात आले होते. अशा प्रकारचा अनुभव चिनी अधिकार्यांकडे अजिबात नाही.
युद्धभूमीवर कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती महत्त्वाची
सध्या चीनबरोबरचा संघर्ष हा पूर्व लडाखमध्ये होत आहे. समुद्रसपाटीपासून १४ हजार ते १७ हजार फूट अशी या युद्धक्षेत्राची उंची आहे. तिथे हवामान अत्यंत थंड असते. ऋण -१७ अंश ते ऋण -३० सेल्सिअस तापमानातही आपले सैनिक धैर्याने टिकून असतात. या युद्धभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा फारसा उपयोग होत नाही. इथल्या सैनिकांमध्ये ताकद, सहनशीलता, स्टॅमिना, वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता या गुणांची गरज आहे आणि हे गुण भारतीय सैन्यात आढळतात. आपले बहुतांश सैनिक खेडेगावातून सैन्यातस दाखल होतात. त्यामुळे ताकद, चपळाई, सहनशीलता या गुणांची खाण त्यांच्यात आहेच.त्याव्यतिरिक्त भारतीय सैनिकांचे प्रशिक्षण अत्यंत कठीण असते. तुलनेत चिनी सैनिक एक वर्षाचे प्रशिक्षण घेतात, त्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण हे साम्यवादी पक्षाचे उत्तम कार्यकर्ते कसे व्हावे, यासंबंधी असते. भारतीय सैनिक १५ वर्षे सेवा करतात. १८व्या वर्षी सैन्यात भरती होतात आणि ३५व्या वर्षी निवृत्त होतात. त्यानंतर आयुष्यभर त्यांना पुरेसे निवृत्तीवेतन मिळते, जे चिनी सैनिकांना मिळत नाही. त्यामुळे ते कोणतेही काम करण्यासाठी, देशासाठी प्राणांची आहुती देण्यासाठीही तयार असतात. तुलनेने चिनी सैनिक हे प्रशिक्षण घेऊन फक्त दोन वर्षेच सैन्यात असतात. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्याने रोजीरोटीसाठी काय कमवायचे याची काळजी त्यांना असते. परिणामी, युद्धात त्या सैनिकांना लढण्यात फारसा रस नाही. मानसिक युद्ध, व्हिडिओ युद्ध, नुसती शोबाजी करणे, हे त्यांना अधिक रूचते. भारतीय सैन्याला डोंगराळ भागामध्ये लढण्याचा प्रचंड अनुभव आहेच. परंतु, चीनकडे तो अजिबात नाही.
चिनी सैन्याचे दुर्गुण
चीनचे सैनिक तिबेटमधे बराकीत राहातात, जसे आपले सैन्य शांतताकाळात पुणे, मुंबई आपल्या बराकीत राहातात. सीमेवरील भारतीय सैनिक मात्र बंकर्स, खंदक, पिकेट्स, चौक्यांमध्ये वास्तव्यास असते. हा अनुभव चिनी सैनिकांना अजिबात नाही. तसेच चिनी सैन्यात अनेक दुर्गुण आहेत. सैन्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक आहे. सैनिक आणि अधिकारी यांच्यात दुरावा आहे. त्यामुळे अनेक चिनी बटालियनमध्ये खटके उडतात. सैनिक आणि अधिकारी यांच्यात सुसंवाद होत नाही. परंतु, भारतीय सैन्याधिकारी आणि सैनिक यांच्यातील संबंध अत्यंत उत्तम आहेत. निवृत्त झाल्यानंतरही अधिकारी, सैनिक एकमेकांशी संबंध ठेवून असतात. एखाद्या बटालियन किंवा रेजिमेंटमध्ये काही काळ एकत्र असतात. ते आपल्या बटालियन किंवा रेजिमेंटला स्वतःचे दुसरे घरच समजतात. पूर्ण आयुष्यभर त्यांची रेजिमेंट, बटालियन हीच त्यांची ओळख असते. ही मैत्री शेवटपर्यंत कायम असते. भारतीय सैनिक हे दुर्गम भागातून येतात. आपल्याकडे डोंगराळ भागात राहाणार्या अनेक जमाती जसे गढवाली, डोगरा, गोरखा यांनी आपले आयुष्य डोंगराळ भागातच काढलेले असते. भारतीय लष्करातील रेजिमेंट या लढाऊ जाती-जमातींवर आधारित आहेत. या जमातींनी शेकडो वर्षे युद्ध लढली आहेत. मराठा, शीख, जाट, राजपूत अशा विविध रेजिमेंट्स आहेत. पण, अशा रेजिमेंट्स चिनी सैन्यात नाही.चिनी सैनिकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे ती ७० टक्के चिनी सैनिक हे एकल कुटुंबातील आहेत. चीनच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा परिपाक म्हणून एका कुटुंबात एकच मूल असल्याने त्यांना युवराजासारखे मोठे करण्यात आले होते. परिणामी, सैन्यात आलेल्या सैनिकांमध्ये शिस्तीचा अभाव दिसून येतो. आरामाची जीवनशैली, संगणकावरील गेम खेळणे, मोबाईलचे वेड, त्याशिवाय अनेक वाईट सवयी चिनी सैनिकांमध्ये प्रकर्षाने दिसून येतात. आणि ही सर्व माहिती चिनी सैन्याने केलेल्या संशोधनातूनच समोर आली आहे.
२०१६ नंतर चीनने दोन मुले जन्माला घालण्याची योजना राबवायला सुरुवात केली आहे. परंतु, ही मुले सैन्यात भरती होण्यासाठी अजून १५ वर्षांचा कालावधी लागणार आहे.चिनी नेतृत्त्वाला आपले सैन्य फारसे लढवय्ये नाही, हे चांगलेच माहिती आहे. म्हणून लढण्याची गरज पडू नये, असा विचार करून त्यानंतर चीनने भारताला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कायद्यात अडकवून भारतीय सैन्याच्या वापरावर बंधने घातली. आता ती बंधने दूर करण्यात आली आहेत. चिनी सैन्याचा दर्जा वाढवण्यासाठी सैनिकांना चिनी अधिकार्यांनी विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्यात फारसे यश मिळालेले नाही. गलवानमध्ये आपले कमांडिंग अधिकारी बाबू यांच्यावर चिनी सैनिकांनी हल्ला केला, तेव्हा कुठल्याही परिणामांचा विचार न करता संख्येने कमी असलेल्या भारतीय सैनिकांनी चिन्यांवर हल्ला करून त्यांना कसे रक्तबंबाळ केले, हे आपण पाहिलेच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा २९-३०ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांना धोबीपछाड देण्यात भारतीय सैन्याला यश आले. युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांचे नेतृत्त्व सर्वात पुढे राहून भारतीय सैन्याची सर्वात मोठी ताकद आहे, ती त्यांचे अधिकारी किंवा ऑफिसर्स.
अधिकार्यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत आपल्या सैनिकांचे नेतृत्त्व सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच दरवर्षी अनेक सैन्याधिकारी देशासाठी प्राणाचे बलिदान देतात. त्यांचे बलिदान व्यर्थ जात नाही. कारण, त्यांच्या पराक्रमामुळे देशाला विजय मिळतो. अधिकार्याचे नेतृत्व नसेल तर सैनिक आपल्या पूर्णक्षमतेने लढू शकत नाहीत. सैनिकांना लढण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन, आक्रमकता ही अधिकार्यांमुळे येते, याचा चिनी सैन्यामध्ये अभाव आहे. चिनी सैनिक हे मोठ्या शहरातील हानवंशीय आहेत. तिबेटमधील तिबेटी किंवा शिनजियांग प्रांतातील मुसलमान, मंगोलियामधील मंगोलियन चिनी सैन्यात सामील होत नाहीत. कारण, मुळात चीनचाच त्यांच्यावर विश्वास नाही. या सैन्याला जेव्हा लडाख सीमेवर लढायचे असते, तेव्हा तिबेटमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून तिथे पोहोचतात. ‘स्पेशल फ्रंटरिअर फोर्स’च्या मदतीने आपण त्यांच्या ‘लाईन ऑफ कम्युनिकेशन’वर कमांडो हल्ले केले, तर त्यांना ते खूपच महागात पडू शकते. जर चीनसोबत आपले युद्ध झाले, तर चीनला धडा शिकवायची पुन्हा संधी मिळेल, यात कोणतीही शंका नाही. कारण, भारतीय सैनिक, अधिकारी यांची देशासाठी हौतात्म्य पत्करण्याच्या ऊर्मीमध्ये आपण चिनी सैनिकांच्या अनेक पावले पुढे आहोत.