उद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांची सेना म्हणजे शिवसेना नव्हे, हे डोक्यात घट्ट बसविले पाहिजे. शिवसैनिक आणि भाजपसैनिक एकाच वैचारिक जहाजात बसलेले आहेत. लढा द्यायचा आहे तो राजकीय लढा उद्धव, आदित्य आणि संजय यांच्या सेनेशी करायचा आहे. सामान्य शिवसैनिकांशी वैचारिक भांडणाला काही आधार नाही, राजकीय ध्येयवादातील भिन्नतेलाही काही आधार नाही, आदर्शांची भिन्नता यालादेखील काही आधार नाही. सगळेच एका दिशेचे प्रवासी आहेत
महाराष्ट्रात २५ वर्षे शिवसेना-भाजप युती होती, आज ती नाही. ती नसल्याचे दुःख शिवसेनेतील नेत्यांपेक्षा भाजपतील काही नेत्यांना होत असते. शिवसेनेचे नेते तुम्हाला काही किंमत द्यायला तयार नाहीत, तरीही ‘आमची दारे शिवसेनेसाठी उघडी आहेत,’ अशी विधाने अधूनमधून केली जातात. भाजपविषयी ज्यांना आस्था आहे, त्यांना अशी वाक्ये अजिबात सहन होत नाहीत. ती त्यांच्या मनात संताप निर्माण करतात. शिवसेना नेते सोडून गेल्यामुळे सत्ता गेली हे खरे, सत्ता गेल्याचे दुःख होणे हेदेखील स्वाभाविक आहे. परंतु, सत्ता हे काही अंतिम साध्य होऊ शकत नाही आणि लक्ष्मीप्रमाणे सत्तादेखील चंचल असते. ती केव्हा सोडून जाईल याचा काही नेम नसतो. आजची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत एवढ्यापुरती सीमित झालेली आहे. ज्या शिवसेनेशी भाजपची युती होती, ती शिवसेना उद्धव, आदित्य आणि राऊत यांची सेना नव्हे. ती बाळासाहेब ठाकरेंची सेना होती. धगधगीत निखार्यासारखी, मराठी बाणा जपणारी, हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेणारी, देशहितासाठी रोखठोक भूमिका घेणारी. काँग्रेसला ‘काँग्रेस’ म्हणणारी आणि राष्ट्रवादीला ‘राष्ट्रवादी’ म्हणणारी! ‘काँग्रेस’ म्हणजे घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आगार आणि ‘राष्ट्रवादी’ म्हणजे जातवाद, प्रादेशिकवाद, मुस्लीम तुष्टीकरण यांचे डबके. उद्धव, आदित्य आणि संजय यांची सेना आगारात आणि डबक्यात लोळून घेत आहे. त्याच्याशी आपल्याला काही घेणे-देणे नाही. कुणाशी संगत करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
प्रश्न आहे शिवसैनिकांचा. हा शिवसैनिक बाळासाहेबांनी घडविलेला आहे. तो तीन विषयांना समर्पित आहे - १. भगवा, २. छत्रपती शिवाजी महाराज आणि ३. हिंदुत्व. हे तीन विषय त्याच्या भावविश्वाचे विषय आहेत. शब्द वेगळे असले, तरी ‘भगवा’ म्हणजे ‘शिवाजी महाराज’ आणि ‘शिवाजी महाराज’ म्हणजे ‘हिंदुत्व.’ एकमेकांना पर्यायी अर्थ देणारे हे सगळे शब्द आहेत. प्रत्येकाचे अर्थदेखील खोलवरचे आहेत. भगवा ही भारताची संस्कृती आहे. भगवा हे त्यागाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. जीवनातून विरक्ती घेऊन संपूर्ण आयुष्य समाजाला समर्पित करताना भगवी वस्त्रे घालावी लागतात. चित्तवृत्तीवर आणि सर्व इंद्रियांवर ताबा मिळवावा लागतो. म्हणून भगवी वस्त्रे घातलेला संन्यासी आला की, राजाही सिंहासनावरून उठून भगवे वस्त्रधारी साधूला नमस्कार करतो. एखादाच नीच राजकारणी ‘भगवा दहशतवाद’ असले शब्द उच्चारू शकतो. ज्याने भारताला राष्ट्रवाद दिला, ते स्वामी विवेकानंद भगवी वस्त्रे घालणारे संन्यासी होते आणि ज्यांनी भारतीय लोकशाहीचे रक्षण केले, असे कायदेपंडित म्हणतात, ते केशवानंद भारती भगवी वस्त्रे घालणारेच होते आणि ‘संविधान रक्षक’ झाले.
हा भगवा ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शौर्य गाजविले. दुष्ट, जुलमी आणि परकीय लोकांना महाराजांनी ‘सळो की पळो’ केले. महाराजांचे स्वराज्य म्हणजे स्वदेशीचे राज्य होते. सामाजिक न्यायाचे राज्य होते. सर्व उपासना पंथांचा आदर करणारे राज्य होते. स्त्रियांचा सन्मान करणारे राज्य होते. मंदिरे, साधू-संत यांचे संरक्षण करणारे राज्य होते. म्हणून त्यांना ‘जाणता राजा’ अशी उपाधी देण्यात येते. भगवा हातात घेऊन त्यांनी दुष्टांचे आणि दुर्जनांचे निर्दालन केले. त्यांना ‘भगवा दहशतवादी’ म्हणण्याची कुणाची हिंमत नाही. हा भगवा आणि शिवाजी महाराज मिळून हिंदुत्वाचा विचार तयार होतो. हा देश हिंदूंचा आहे. त्याचे कारण असे की, ‘वेद’काळापासून जो मानवसमूह या देशात राहतो, त्याला ‘हिंदू’ म्हणतात. त्याचे उपासना पंथ वेगवेगळे असतील, ‘वैदिक’, ‘अवैदिक’, ‘एकेश्वरवादी’, ‘निरीश्वरवादी’, ‘भौतिकवादी ’ सगळेच हिंदू. हिंदूच्या व्यापक व्याख्येत मशिदीत जाणारा हिंदू ‘मुसलमान’ असतो आणि चर्चमध्ये जाणारा हिंदू ‘ख्रिश्चन’ असतो. मुसलमानांना ‘मी प्रथम हिंदू आहे’ हे आजही समजत नाही आणि ख्रिश्चनांतीलही बहुतेक लोकांनाही हे समजत नाही. याचे कारण ज्या हिंदूंनी हे समजावून सांगायचे आहे, तो हिंदू दुर्बळ आहे, असंघटित आहे, जातीपातीत विभागलेला आहे.
अशा हिंदूंना बाळासाहेब ठाकरे यांनी एक ध्येयवाद दिला, राजकीय आवाज दिला, एक शक्ती दिली. जातीपातीचे राजकारण न करता भगव्याचे राजकारण करून यशस्वी राजकारणी होता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. शिवसैनिक हा शिवसैनिक असतो, त्याची जात कुणी विचारत नाही. इतर पुरोगामी पक्षात ‘तू मराठा आहेस का, दलित आहेस का, ओबीसी आहेस का,’ याला महत्त्व असते. बाळासाहेबांनी ‘तू हिंदू आहेस’ याला महत्त्व दिले. म्हणून साबीर शेखदेखील शिवसेनेचे नेते झाले आणि एकेकाळी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे अशी भिन्न जातींची माणसे हिंदुत्वाच्या भावनेने एकत्र आली होती. हा भाव जगणारा हा खरा शिवसैनिक आहे, त्याला जवळ केले पाहिजे. राजकीयदृष्ट्या त्याला जवळ केले पाहिजे. हिंदुत्वासाठी ज्या संघटनेचा जन्म झाला, त्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या दृष्टीने समग्र हिंदू समाजच आपला आहे. त्याची राजकीय पतवारी अशा विचारात बसत नाही. परंतु, राजकारण करताना आणि पक्षीय राजकारण करताना पक्षभेद होतात. पक्षभेद म्हणजे मनभेद किंवा विचारभेद नव्हेत आणि शिवसैनिकांच्या बाबतीत मुळीच नव्हे!
विचारधारेने ते सर्व आपलेच आहेत. राजकीयदृष्ट्या त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे लिहायला सोपे आहे, हे आम्हाला समजते. राजकीयदृष्ट्या स्वपक्षात अनेकांना सामावून घ्यायचे म्हटले, तर वेगवेगळ्या पातळीवरील सत्तेत सहभाग द्यावा लागतो, पक्षसंघटनेत त्यांना बसवावे लागते. नगर परिषद ते विधानसभा सत्तास्थानात त्यांना सामावून घ्यावे लागते. राजकीय कार्यकर्ते हे कुणी धार्मिक कार्यकर्ते नव्हेत. धर्माचे काम झाले सर्व पावले, अशी राजकीय कार्यकर्त्यांची भावना राहू शकत नाही. त्याला सत्तेमध्ये कुठे ना कुठे स्थान हवे असते. या दृष्टीनेदेखील भाजपने विचार करायला पाहिजे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांची सेना म्हणजे शिवसेना नव्हे, हे डोक्यात घट्ट बसविले पाहिजे. शिवसैनिक आणि भाजपसैनिक एकाच वैचारिक जहाजात बसलेले आहेत. लढा द्यायचा आहे तो राजकीय लढा उद्धव, आदित्य आणि संजय यांच्या सेनेशी करायचा आहे. सामान्य शिवसैनिकांशी वैचारिक भांडणाला काही आधार नाही, राजकीय ध्येयवादातील भिन्नतेलाही काही आधार नाही, आदर्शांची भिन्नता यालादेखील काही आधार नाही. सगळेच एका दिशेचे प्रवासी आहेत.
जनतेचा कौल घेण्यासाठी २०२४साली जावे लागेल आणि कदाचित त्याच्या अगोदरही केव्हाही जावे लागेल. दोन्ही बाजूंची शक्यता घेऊन रणनीतीची आखणी करायला पाहिजे. उद्धव, आदित्य, आणि संजय राऊत यांचे सरकार किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्राची स्थिती दिवसेंदिवस वाईटाकडून भयानकतेकडे जात चालली आहे. जनता ही स्थिती एका मर्यादेपर्यंत सहन करील. पुढे त्याचा उद्रेक कशा प्रकारे होईल, याचे अचूक भाकित करणे कठीण आहे. परंतु, ठिकठिकाणी लोक मोठ्या संख्येने आपला राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरणार, हे न सांगताच समजण्यासारखे आहे. पुढची सत्ता एकाच पक्षाची आणि ती पूर्ण बहुमताने येणे यात महाराष्ट्राचे कल्याण आहे. तशा प्रकारचा आशावाद धरून किंवा स्वप्ने बघून हे प्रत्यक्षात येणार नाही, प्रत्यक्षात येण्याचा मार्ग वेगळा आहे. विवेकानंद सांगून गेले की, “कोणतीही एक कल्पना घ्या आणि तिने स्वतःला झपाटून घ्या. अहोरात्र तिचाच विचार करा. यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.” महाराष्ट्रात भगव्याचे राज्य आणायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आणायचे आहे, या कल्पनेने झपाटून गेले पाहिजे. हा हजारो जणांच्या श्वासोच्छ्वास झाला पाहिजे. नेत्यांनी त्याचा आदर्श घालून दिला पाहिजे. परिवर्तन सर्वांनाच हवे आहे, वारेही अनुकूल आहेत, गलबतांचे शिडे मात्र वार्यांच्या दिशेने वळवावी लागतात. नको त्या लोकांची मनधरणी करण्यात शक्ती वाया घालविण्यापेक्षा या विषयाकडे लक्ष दिल्यास ते अधिक चांगले होईल.