भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक

11 Sep 2020 23:10:27


Dr Govind Swarup_1 &
 

भारतातील ‘रेडिओ खगोलशास्त्राचे जनक’ आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...


स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने अनेक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली. तसेच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामध्येही भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान हे उल्लेखनीय आहे. अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय विज्ञान क्षेत्रामध्ये क्रांतीची बिजे रोवली. आजही असे हजारो भारतीय शास्त्रज्ञ आहेत, ज्यांचा अभ्यास, संशोधन निश्चितच देशासाठी, पुढच्या पिढीसाठी लाभदायक ठरेल. असेच एक भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणजे डॉ. गोविंद स्वरूप. ‘भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते’ म्हणूनही ते सुपरिचित होते. त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासकांचा गट तयार करून या क्षेत्रातील संशोधनाला सर्वार्थाने चालना दिली. पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद-नारायणगाव येथे जगातील दुसर्‍या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले. जाणून घेऊया त्यांच्या या योगदानाबद्दल...
 

गोविंद स्वरूप यांचा जन्म दि. २३ मार्च, १९२९ रोजी उत्तराखंडमधील ठाकूरद्वार येथे झाला. एका सामान्य घरामध्ये जन्मलेल्या गोविंद स्वरूप यांचे ध्येय शालेय जीवनामध्ये निश्चित झाले होते. डॉक्टर स्वरूप यांचे वडील आणि आजोबा दोघेही उच्चशिक्षित होते. तसेच त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांनी १९४८ साली अलाहाबाद विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी शिक्षण घेतले, तर पुढे १९५० मध्ये भौतिकशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत काही काळ कामही केले. याचवेळी त्यांचा परिचय हा रेडिओ खगोलशास्त्राशी झाला. त्यांना या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. दरम्यान, त्यांनी १९६१ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ‘पीएचडी’ प्राप्त केली. या कालावधीमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला दोन वर्षे अभ्यास केला. यावेळी सिडनी जवळच्या पॉट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ‘पॅराबोलिक अँटेना’ उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा महत्त्वाचा वाटा होता, तर पुढे त्यांनी १९५६-५७ दरम्यान प्रख्यात हार्वर्ड विद्यापीठामध्ये आणि नंतर १९५७ ते १९६० दरम्यान स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांनी साहाय्यक संशोधकपदी काम केले. पुढे याच विद्यापीठात १९६१ ते १९६३ दरम्यान साहाय्यक प्राध्यापक म्हणूनदेखील काम पाहिले. त्यानंतर त्यांनी आपला रोख भारताकडे वळवला आणि इथून त्यांच्या योगदानाचा खरा प्रवास सुरू झाला. डॉ. स्वरूप यांनी भारतात रेडिओ खगोलशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली. ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’मध्ये त्यांनी या ज्ञानशाखेचा स्वतंत्र विभाग सुरू केला. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काळात त्यांना डॉक्टर के. एस. कृष्णन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी. व्ही. रमण यांच्यासोबत काम करण्याचादेखील अनुभव मिळाला. डॉक्टर होमी भाभा यांनी ‘टाटा मूलभूत संशोधन केंद्रा’चा ‘रेडिओ खगोल भौतिकी’ हा स्वतंत्र विभाग सुरू केला होता. त्यासाठी डॉ. स्वरूप यांना त्याचे निमंत्रण आले होते.
 
 
१९६५ मध्ये ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’(टीआयएफआर)मध्ये समावेश झाल्यानंतर डॉ. स्वरूप यांनी मुंबईजवळ कल्याण येथे प्रायोगिक पद्धतीच्या रेडिओ दुर्बिणीची उभारणी केली. पुढे त्यांनी १९७० मध्ये तामिळनाडूतील उटी येथे भारताची स्वतंत्र रेडिओ दुर्बीण उभारली. यामुळे भारताची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण झाली. १९९० मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील खोडद या गावामध्ये मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारली. ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र स्थापन केले. यामुळे ‘जायंट मेट्रेवेव्ह रेडिओ टेलीस्कोप’(जीएमआरटी) म्हणून या रेडिओ दुर्बिणीला जगभर नावलौकिक मिळाला. सलग सहा दशके त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे भारताला रेडिओ खगोलशास्त्रामध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करता आले.
 
 
रेडिओ खगोलशास्त्राचा विकास करणार्‍या जगातील मोजक्या प्रमुख शास्त्रज्ञांमध्ये डॉ. गोविंद स्वरूप यांची गणना होते. त्यांच्या या कामगिरीसाठी देशाबाहेरही अनेक पुरस्कार, ऐतिहासिक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. भारताबाहेर ते अनेक प्रतिष्ठित संस्थांचे सदस्यही होते. विशेष म्हणजे, ते लंडनमधील रॉयल सोसायटीचे मानद सदस्यदेखील होते. याचसोबत ते २० हून अधिक विज्ञानसंबंधित सोसायटींचे सदस्य होते. देश-विदेशातून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना १९७२ रोजी ‘शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार’ देण्यात आला. त्यांची रेडिओ खगोलशास्त्रातील कामगिरी पाहता, १९७३ रोजी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर १९८४ रोजी ‘पी.सी. महालनोबीस पदक’ आणि १९८७ रोजी ‘मेघनाद साहा पदक’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पुढे २००९ मध्ये त्यांना ‘होमी भाभा जीवनगौरव’ पुरस्कार देऊन त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील कामगिरीचा सत्कार केला. याचसोबत ‘ग्रोट रेबर’ पुरस्कार, ‘एच. के. फिरोदिया’ पुरस्कार आदी देश-विदेशातील प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने रेडिओ खगोलशास्त्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही न भरून येण्यासारखी आहे. तरीही त्यांच्या संशोधनकार्यातून निश्चितच नव्या पिढीचे मार्गदर्शन होत राहील आणि भारतीय इतिहासामध्ये ‘रेडिओ खगोलशास्त्राचे जनक’ म्हणून त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी असेल.
 
 
 

Powered By Sangraha 9.0