कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर दिलासादायक आणि चिंताजनक, अशा दोनच प्रकारच्या बातम्या जगभरातून कानावर येत आहेत. कोरोना विषाणू असो, आर्थिक संकट असो वा अन्य कुठलीही घडामोड असो, याच दरम्यान प्रत्येकाने सरसकट चांगली आणि वाईट अशीच बातम्यांची परिभाषा केली. या आठवड्यात अशाच काहीशा घडामोडी जागतिक पटलावर घडल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संक्रमित फुप्फुसांचे बरे होण्याचे प्रमाण आणि जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा...
आजवर जागतिक आरोग्य संघटना संभाव्य आरोग्याच्या धोक्यांपासून जगाला सावध करण्याचे काम करत आली आहे. पण, यंदा जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती पूर्वीच दिली नाही, योग्य काळजी घेण्यासाठी काय करायला हवे, याबद्दल ठोस आणि नेमकी माहिती न दिल्याने जगावर कोरोनाचे संकट आले, असे आरोपही झाले. परंतु, गेल्या काही काळात जागतिक आरोग्य संघटनेकडून प्राप्त होणार्या नवनव्या माहितीमुळे आपण सावध होत गेलो हेही तितकेच खरे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम यांनी आणखी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे.
जगाने आता आरोग्य सुविधांवर गुंतवणूक करायला हवी. जनतेने आरोग्य विमा आणि तत्सम सुविधांवर खर्च न केल्यास कोरोना महामारीसारख्या समस्यांमुळे सर्वकाही ठप्प होऊ शकते, असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरोना संक्रमणाची जगाची आकडेवारी पाहिली असता, एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ७१ लाख इतकी झाली आहे. जगात एकूण आठ लाख ८८ हजारांहून जास्त रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. उपचार करत असताना त्याहून जास्त लोकांच्या आयुष्याची जमापुंजी खर्च झाली आहे.
आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीपासूनच बेफिकीर राहण्याची सवय जगाला संकटाच्या दरीत ढकलणारी ठरली, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. भारताचा विचार केल्यास कोरोनाच्या आकडेवारीत तिसर्या स्थानावरून दुसर्या स्थानावर आपण पोहोचलो आहोत. आजवरचा इतिहास आहे, कुठलीही महामारी ही शेवटची महामारी अद्याप ठरलेली नाही. जोपर्यंत जग आहे तोपर्यंत आजार, पीडा, त्रास कायम सोबत असतीलच. त्यामुळे यापुढे आरोग्याच्या बाबतीत किमान कुठलीही तडजोड कुठल्याच देशाने करू नये, असे जागतिक आरोग्य संघटनेला सूचवायचे आहे. तेव्हा ‘सावध ऐका पुढल्या हाका’ म्हणत कोरोनापासूनच धडा हा प्रत्येक देशाने घेतलाच पाहिजे.
कोरोना विषाणूच्या लसीबद्दलच्या बातम्याही आपण ऐकत आलो. त्या कधी दिलासादायक वाटू लागल्या होत्या. परंतु, सातत्याने नवनवीन मुदत आणि देशादेशांतील स्पर्धा यातून मूळ हेतू बाजूलाच राहिलेला दिसून आला. याबद्दलही जागतिक आरोग्य संघटनेने एक विधान केले आहे. प्रवक्त्या डॉ. मारग्रेट हॅरीस यांनी जगभरात कोरोना लसीकरण हे पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंतही शक्य नसल्याचे वास्तव समोर आणले. कारण, अजूनही बर्याच लसींची चाचणी सुरूच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पुढे धाव घेऊन मानवाने कोरोना रोखण्यासाठी ५० टक्के परिणामकारक लसही विकसित केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
यातून एक समाधानकारक आणि चांगली म्हणावी, अशी बातमीही आहे. कोरोना रुग्णांची फुप्फुसे आणि हृदय आता तीन महिन्यांनंतर पूर्ववत होत असल्याचे नवे संशोधन आहे. ऑस्ट्रियामध्ये संशोधन करणार्या संशोधकांच्या मते, हृदय आणि फुप्फुस नैसर्गिकरीत्या पूर्ववत होत आहेत. २९ एप्रिल ते ९ जून दरम्यान ८६ रुग्णांवर केलेल्या संशोधनातून ही माहिती उघड झाली आहे. ‘युरोपियन रेस्पिरेट्री सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेस जर्नल’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. ८६ रुग्णांपैकी सुरुवातीला ८८ टक्के रुग्णांच्या फुप्फुसांचे काम असमाधानकारक असल्याचे समजले.
एक ते १२व्या आठवड्यापर्यंत ५६ टक्के जणांची प्रकृती ठीक झाली. परंतु, ६५ टक्के जणांना श्वास घेण्याची समस्या, अन्य तक्रारी कायम होत्या. हृदयाचा एक भागही या संक्रमणाच्या विळख्यात अडकतो. मात्र, सहाव्या आठवड्यानंतर त्यात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचेही आकडेवारी सांगते. दोन्ही घडामोडींनंतर जीवन अनमोल आहे, ही बाब प्रत्येकाने बिंबवली पाहिजे आणि पुढे अशा आरोग्य युद्धांसाठी तयार राहायला हवे हे मात्र नक्की...