९/११ नंतरची १९ वर्षे

10 Sep 2020 23:38:18


america attack_1 &nb
 


द रिलक्टंलट फंडामेन्टॅलिस्टहे पुस्तक मोहसीन हमीद याने ९/११ नंतरच्या अनुभवांवर आधारित लिहिले आहे. भारतात ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट त्या पुस्तकातील कहाणीला धरूनच काढण्यात आला. तसेच, अनेक गाणी, नाट्य, साहित्यनिर्मिती ९/११ नंतर करण्यात आली. सर्वांचा रोख मुस्लिमांना कशा भेदभावाला सामोरे जावे लागले, हाच होता. आपण इस्लाम म्हणून कसे पीडित आहोत, हेच ठसविण्याचा प्रयत्न या साहित्यकृतींनी केला.


आधुनिक जगाला ज्या महत्त्वपूर्ण घटनांनी कलाटणी दिली, त्यापैकीच एक म्हणजे ९/११. अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्रावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज १९ वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर, २००१ रोजी अल-कायदा या इस्लामिक दहशतवादी संघटनेने केलेल्या चार हल्ल्यांनी केवळ अमेरिकाच नाही, तर पूर्ण जग हादरून गेले होते. साधारणतः तीन हजार मृत्यू, २५ हजारांपेक्षा जास्त गंभीर दुखापती आणि दहा अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे नुकसान. इतका भीषण परिणाम या हल्ल्याचा झाला होता. परंतु, या अतिरेकी हल्ल्याने सुरक्षेविषयीच्या जगाच्या कल्पनांना एक धक्का दिला होता. तसेच, इस्लामिक दहशतवादाविषयी जगाच्या समजुती कायमच्या बदलून टाकल्या. ९/११ची दुर्घटना म्हणूनच जगाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरते. त्यानंतर जगाने कोणते व कसे अनुभव घेतले, त्याचे विश्लेषण व्हायला हवे.
 

अमेरिकेसारख्या देशाचा सुरक्षेविषयी असलेला दावा या हल्ल्याने मोडीत निघाला. तसेच, आधुनिक जगाचा बहुतांशी विचार महासत्ताकेंद्रित असल्याने या हल्ल्यानंतर ‘इस्लामिक दहशतवाद’ ही समस्या गंभीर असल्याची जाणीव जगाला झाली. त्यापूर्वी दहशतवाद, अतिरेकी कारवाया म्हणजे त्या-त्या देशाचे अंतर्गत प्रश्न आहेत. देशांनी त्यांच्या अंतर्गत पातळीवर हे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने जागतिक स्तरावर कोणत्या प्रयत्नांची गरज नाही, अशी मानसिकता होती. ९/११ ने या मानसिकतेला जबर हादरा दिला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने ठराव केला. अमेरिकेवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक देशांनी दहशतवादविरोधी कायदे तयार केले. अल कायदा संबंधित बँक खाती गोठवण्यात आली. जगभरातील अनेक देशांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला. सौदी अरेबियासारख्या देशानेदेखील या हल्ल्याचा निषेध केला होता. अनेक लोकांनी अफगाणिस्तान सोडण्याची सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या भूमीत अल-कायदा पोसला गेल्या असल्यामुळे अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ला करेल, अशी भीती पसरली होती. अमेरिकेत अनेक शिखांना मुस्लीम समजून द्वेषाला सामोरे जावे लागले होते. मुस्लीमविरोधात अमेरिकेत क्रोधाची भावना होती. त्याचाच परिणाम इतर देशातील गैर-मुस्लीम-मुस्लीम संबंधांवरही झाला होता. अमेरिकेने या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला जगभरातून पुतीनसह अनेकांनी हजेरी लावली होती. अमेरिकेने त्यानंतर विदेशातून येणार्‍या मुस्लिमांची मात्र कसून चौकशी करायला सुरुवात केली. भारतातील शाहरुख खान नावाच्या सिनेअभिनेत्याने त्याविषयी कांगावा केला होता. अमेरिकेने चालवलेली चौकशी आणि तपास इतका अतिरेकी होता की, त्यात एकदा भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनाही तासन्तास थांबवून ठेवण्यात आले होते. त्याचा भारताच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अमेरिकन सुरक्षायंत्रणा धर्माच्या निकषांवरच कोणाची चौकशी कशी होणार, हे ठरवत होत्या, असा आरोप केला गेला. दुसरीकडे अमेरिकन सरकारच्या वतीने मुस्लिमांना सुरक्षेची हमी देण्याविषयी वगैरे कार्यक्रम घेण्यात आले होते. परंतु, ९/११ ने दहशतवादाला धर्म असतो की नसतो, या प्रश्नाचे वास्तववादी उत्तर शोधायला भाग पाडले. अमेरिकेत त्यानंतर झालेल्या मानसिकता बदलाने ते दाखवून दिले.
 
‘द रिलक्टंलट फंडामेन्टॅलिस्ट’ हे पुस्तक मोहसीन हमीद याने ९/११ नंतरच्या अनुभवांवर आधारित लिहिले आहे. भारतात ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट त्या पुस्तकातील कहाणीला धरूनच काढण्यात आला. तसेच, अनेक गाणी, नाट्य, साहित्यनिर्मिती ९/११ नंतर करण्यात आली. सर्वांचा रोख मुस्लिमांना कशा भेदभावाला सामोरे जावे लागले, हाच होता. आपण इस्लाम म्हणून कसे पीडित आहोत, हेच ठसविण्याचा प्रयत्न या साहित्यकृतींनी केला. मात्र, त्याचा परिणाम इस्लामिक मनावर काय झाला याचे मूल्यमापन झाले का? इस्लामिक मूलतत्त्ववादाची भावना अधिक प्रबळ झाली. अशा मूलतत्त्ववादी मानसिकतेतून माथी भडकेलेले तरुणच अल-कायदा सारख्या संघटनांना हवे असतात. मुस्लीम म्हणून आपण पीडित असून, जग आपल्यावर अन्याय करीत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न होतो. मात्र, निरपराधांना मारणे, अतिरेकी संघटनांचे समर्थन करणे चूक आहे, याविषयी प्रबोधन करण्याचे काम होत नाही.

 
Powered By Sangraha 9.0