नियोजन शुन्य कारभार मुंबईला, मुंबईकरांना कायमचा बुडवेल !
तुम्ही मुंबईकर आहात ना ! काय तुमचं दैनंदिन आयुष्य ? लॉकडाऊन हळूहळू शिथिल होतंयं, तुम्ही घराबाहेर पडताय... पण पावसाने तुम्हाला पुन्हा लॉकडाऊनमध्ये अडकवून ठेवलं आहे, घराखाली पाणी साचलंय, बाहेरच्या रस्त्यांवर झाड उन्मळून पडलंयं, सुदैवाने तुमच्या नातलगांपैकी कुणीतरी त्याच्या खाली दबतादबता वाचला आहे, घराबाहेर पडलेली तुमच्या घरातील मंडळी मुसळधार पावसात पुन्हा परततील का ? रस्त्यात उघडे असलेले मॅनहोलचे झाकण चालताना दिसेल का ? काही अपघात तर होणार नाही ना ! इतक्यात दाराची बेल वाजते तुम्ही ज्यांची वाट पाहता ते दारासमोर उभे असतात. दिवस संपला की पुन्हा हाच क्रम सुरू. असेच काहीसे मुंबईकरांचे आयुष्य. या घाबरगुंडीला आम्ही 'मुंबईकरांचे स्पीरीट', असे गोड नाव देतो.
मुंबई शहराने अनेकांना खूप काही दिलं, स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणून तिनेही आपलं नाव कमावलं, पण वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाच्या नावाखाली मुंबई बकाल होत गेली. नियोजनशुन्यता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि गैरसोयी मुंबईकरांचा हा वनवास कधीही न संपणारा ठरला. नगरसेवक आपला आहे, आमदार आपला आहे, खासदारही आपलाच आहे, परंतू आपल्यासाठी आपल्या मुंबईसाठी भांडून एखादा महत्वकांशी प्रकल्प योजना खेचून आणणारा आहे का ? मुंबईला शेकडो वर्षांचा इतिहास, वारसा, प्रेक्षणीय स्थळ पण गर्दीत गुदमरलेला पर्यटक पुन्हा लोकलचा प्रवास का करेल ? स्पीरीट म्हणून ?
एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठे असणारे मुंबई महापालिकेचे बजेट, सुविधेच्या नावाखाली मुंबईकरांना मिळाले काय ? खड्डे, वाहतूक व्यवस्थेचा फज्जा, बकाल वाढत चाललेल्या झोपडपट्ट्या आणि पावसाळ्यात पाण्याखाली गेलेली मुंबई. झोपडपट्ट्या कुठे नाहीत, जगाच्या कुठल्याही शहरांमध्ये छोटी घरे, चिंचोळ्या गल्ल्या आणि दाटीवाटीची लोकवस्ती आढळेल. म्हणून तिथल्या लोकांना कायमच जीव मुठीत घेऊन राहावे लागत असेल का ? पूराखाली जाण्याची भीती अहोरात्र सतावत असेल का ?
डॉ. दीपक अमरापूरकरांचे उदाहरण आठवते का ?
मॅनहोलमध्ये पडलेल्या या माणसाचा शव दुसऱ्या दिवशी आढळला. गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसाने अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले आहे. अनेक महिला देवाकडे धावा करत असल्याचा, घरभर साचलेले पाणी, मालमत्तेची नासधूस, त्यात साथीच्या आजाराचीही भीती हे दडपण घेऊन जगणारा मुंबईकर स्वतःला या संकटातून जीवंत राहिल्याबद्दल देवाकडे आभार मानतो आणि दुसऱ्या दिवशी कामाला निघून जातो. या व्यथेबद्दल वृत्तपत्रांमध्ये, टिव्ही चॅनल्सवर बातम्या दिल्या जातात, दुसऱ्या दिवशी एखादी त्याहून मोठी बातमी मुंबईकरांचा आवाजच दाबून टाकते.
पाणी दरवर्षी कुठे साचते याची माहिती प्रत्येकाला असते, तिथे राहणाऱ्या नागरिकाला, प्रशासनाला, नगरसेवकाला परंतू त्यावर ठोस निर्णय घेण्याची कुठलीही तसदी घेतली जात नाही. पाणी साचेल, निघून जाईल, अनेक संसार वाहून जातील, पुन्हा तोकडी मदत मिळेल पुन्हा सगळे जैसे थे! मी राहत असलेले शहर कधी सुंदर होईल, कधी मी मोकळा श्वास घेईन, असा साधा विचारही मुंबईकरांच्या मनात येत नसेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याची योजना काही वर्षांपूर्वी राबवण्यात आली. १९९५ पूर्वीच्या रहिवाशांना मोफत घर, अशी योजना त्यावेळच्या सरकराने लागू केली. पुढे झाले काय ! मुंबईत फूकट घर मिळते म्हणून त्याचा फायदा इतर राज्यांतून आलेल्यांनाच झाला. मुंबईतील मूळ रहिवाशी जो वर्षांनुवर्षे चाळीत राहिला, त्याच्या माथी मात्र उपेक्षाच. बीडीडी चाळ असो वा मुंबईतील पगडी चाळींचा पूर्नविकास हा तसाच वर्षानुवर्षे कृमगतीने सुरू आहे.
नालेसफाई हा तर दरवर्षी चघळला जाणारा मुद्दा, आकडेवारी सांगून प्रशासनकर्ते मुंबईतील नाल्यांतील गाळ काढण्याचे वेगळे कंत्राट, पंपिंग्स स्टेशनचे वेगळे कंत्राट आणि इतर साफसफाई, उपयोग शुन्य मुंबईकर त्याच चिखलातून वाट काढत चालतात, त्याच ठिकाणी दरवर्षी पाण्यात अडकतात, पुन्हा त्याच स्पीरीटने कामाला निघून जातात. मुंबईची भौगोलिक रचना पाहता, किनारपट्टी भागातून असलेल्या उधाणाचा धोका, त्यात मुसळधार पावसाने तुंबणारे नाले, नद्यांचे बदलणारे प्रवाह ही परिस्थिती जगबुडी सारखा प्रलय आणू शकते हे २६ जुलैच्या पावसाने दाखवून दिले. यातून धडा घेण्यापेक्षा आरोप प्रत्यारोपांचे राजकारण करत राजकीय, प्रशासकीय मंडळी धन्यता मानतात. या पूराने मुंबईला दिलेला इशारा १५ वर्षानेही गांभीर्याने घेतलेला नाही. आजही नाल्यांच्या बाजूला वाढती झोपडपट्टी, तिथे होणारा कचरा, मग तुंबणारे नाले या गोष्टी एक मृत्यूचा सापळा ठरतात. तो सापळा मुंबई बुडवेल आणि मुंबईकरांनाही !