राम मंदिर ही एका समुदायाने दुसर्या समुदायावर केलेली कुरघोडी, असा याचा अर्थ काही जण करतात. त्यांच्या जातिवादी आणि धर्मवादी राजकारणासाठी असे करणे त्यांना आवश्यक झालेले आहे. परंतु, आपण हिंदूंना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आता ‘राम’ जगण्याचा कालखंड सुरू होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत भूमिपूजन करण्याचे ठरल्यानंतर सेक्युलॅरिझमच्या ‘शिळ्या कढिला ऊत’ आणण्याचा प्रयत्न अनेकांनी सुरू केला. शरद पवार म्हणाले, ‘‘भूमिपूजनाचे मला निमंत्रण आले तरी मी जाणार नाही.” शरद पवार शिंकले तरी त्यावर टीव्हीवर ‘डिबेट’ घडवून आणणार्या काही वाहिन्या आहेत. त्या लगेच ठरलेल्या लोकांना बोलावून ‘डिबेट’ प्रारंभ करतात. शरद पवार आताच का शिंकले, कोणत्या वाक्यानंतर शिंकले, त्यांना काय सुचवायचे आहे, ते कसे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, अशी चर्चा ‘रंगतदार’ होते.
अखिल भारतीय राजकारणात असदुद्दीन ओवेसी हे असे थोर पुरुष आहेत. बोकड दाढी आणि इस्लामी टोपी घातलेला त्यांचा चेहरा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. तेही स्वतःला महान ‘सेक्युलॅरिस्ट’ समजतात. जिनांच्या वंशावळीतील नेता भारतात सेक्युलर असतो, नव्हे तसे मानले पाहिजे. महाराष्ट्रातील एक बुद्धिवादी जिनांचे परमभक्त आहेत. ते अधूनमधून जिना आणि सेक्युलॅरिझम यावर भरपूर लिहित असतात. इंग्रजी दैनिकांमध्ये त्यांचे लेख येतात. असदुद्दीन ओवेसी म्हणतात की, “पंतप्रधानांनी राम मंदिराचे भूमिपूजन करणे हे, घटनेच्या सेक्युलॅरिझमच्या विरुद्ध आहे. घटना रक्षणाची त्यांनी शपथ घेतली आहे. ते घटनेच्या शपथेच्या विरुद्ध आहेत. जेथे बाबरी मशीद उभी होती तेथे बाबरी मशीदच असेल. सेक्युलॅरिझम हा घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च असेल; पण ते चुका करू शकत नाही, असे नाही.” ओवेसींना म्हणायचे आहे की, आम्हाला सोयीचा निर्णय आला असता तर, सेक्युलॅरिझमचे रक्षण झाले असते. गैरसोयीचा निर्णय आला तेव्हा ओवेसी म्हणू लागले की, सर्वोच्च न्यायालय चूक करूच शकत नाही, असे नाही.
हा सेक्युलॅरिझम नेमका काय आहे? १. तो पुस्तकी आहे. २. तो ‘सेमेटिक फॅनॅटिझम’ आहे आणि ३. पूर्णतः अभारतीय आहे. पुस्तकी पंडितांनी तो पाश्चात्त्य जगातून घेतलेला आहे. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन इत्यादी देशांत राजसत्ता आणि धर्मसत्ता सत्तेच्या रथाची दोन चाके होती. धर्मसत्ता, राजसत्तेच्या माध्यमातून जे ख्रिश्चन नाहीत त्यांना ठार करीत असे, भयंकर छळ करीत असे. पुढे ख्रिश्चन धर्मात ‘कॅथॉलिक’, ‘प्रोटेस्टंट’ आणि ‘कालविनिस्ट’ असे भेद झाले. ज्या पंथाचे लोक सत्तेवर येत, ते अन्य ख्रिश्चनांच्या कत्तली करीत. अनेक शतकांच्या महाभयानक रक्तपातानंतर राज्याला धर्मापासून वेगळे करण्यात आले. हा हिंदूंचा इतिहास नाही, हे आपल्या पुस्तकी पंडितांना कधीही समजलेले नाही.
हा ‘सेमेटिक सेक्युलॅरिझम’ आहे. ख्रिस्तनीती, इस्लाम आणि जुडाईसम हे सेमेटिक धर्म आहेत. ते अत्यंत कडवे असतात, ते अत्यंत असहिष्णू असतात. आपला धर्म न मानणार्यांना ते जगू देत नाहीत. भारतातील सेक्युलॅरिझमची ही मानसिकता आहे. त्यांचा विचार न मानणार्यांना ते सुखाने जगू देत नाहीत. हिंदू विचारधारेची त्यांनी कशी ससेहोलपट केली, याचा इतिहास आपल्याला माहीत आहे.
रामजन्मस्थानावर जे तीन घुमट होते, त्यातील एक घुमट पुस्तकी, दुसरा सेमेटिक आणि तिसरा अभारतीय होते. हे तिन्ही घुमट ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी जमीनदोस्त करून टाकले आणि प्रभू रामचंद्रांच्या, सर्व उपासना मार्ग सत्य आहेत, कुणावर काही लादायचे नाही. कोणाचे काही लुटायचे नाही आणि सर्वांना सन्मानाने जगू द्यायचे, या विचारांची स्थापना केली. प्रभू रामचंद्रांनी समाजातील सर्व घटकांना जवळ केले. सोन्याच्या लंकेचा मोह ठेवला नाही. विभीषणाला लंका देऊन टाकली आणि ‘जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान आहे,’ असे म्हणत अयोध्येला प्रयाण केले. म्हणून ६ डिसेंबर हा दिवस राम अस्मितेचा दिवस आहे. आपली आपल्याला ओळख करून घेण्याचा दिवस आहे.
ही ओळख सर्व क्षेत्रात प्रकट होऊ लागली. न्यायालयेही आपल्या ओळखीकडे जाऊ लागली. प्रथम त्यांनी हिंदुत्व म्हणजे धर्म नव्हे; ती एक जीवनपद्धती आहे, असा निर्णय दिला. गुजरात उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्याला राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहिले. राजेश सोलंकी नावाच्या एका सेक्युलॅरिस्टाने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सन्माननीय न्यायमूर्तींनी ती नुसतीच फेटाळून लावली नाही, तर सोलंकीला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. नेहरूयुगात असे शक्य नव्हते. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी हिंदूंना देऊन टाकण्याचा निर्णय केला. घटना तीच, न्यायालये तीच, न्यायमूर्तींच्या परंपराही त्याच, मग एवढा बदल कसा झाला? याला ‘राम अस्मिता’ म्हणतात. सेक्युलॅरिझमच्या तीन भंपक कल्पना जमीनदोस्त झाल्याचा हा परिणाम आहे.
या भंपक कल्पनांना राजसत्तेचे पाठबळ देण्याचे काम पंडित नेहरू यांनी केले. त्यांचा कार्यकाळ हा कमालीचा हिंदू विरोधाचा कालखंड आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना संपविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संघाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माचार्य, हिंदू मंदिरे या सर्वांकडे त्यांनी पाठ फिरविली. कोट्यवधी हिंदूंना पवित्र असणार्या कुठल्याही मंदिरात गेल्याचा त्यांचा इतिहास नाही. त्यांचा पणतू मंदिरात जाऊन हे पाप धुऊन काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, हिंदूंचा त्याच्यावर विश्वास नाही. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा विषय सुरू झाला. पंडित नेहरूंनी त्याला विरोध केला. महात्मा गांधींनी त्याला पाठिंबा दिला होता. मंदिर बांधून झाले, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद त्या समारंभात गेले, नेहरूंनी पत्रामागून पत्र लिहून राष्ट्रपतींनी समारंभात जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. शेवटी मंदिर तर झाले, नेहरूंचा अतिशय दुःखदायक वारसा देशाला मिळाला. आता ते नेहरूही नाहीत आणि त्यांचा वारसाही धुळीला मिळालेला आहे.
हा वारसा पुन्हा जागे करण्याचा प्रयत्न देशातील कम्युनिस्ट मंडळी करीत असतात. त्यांनीही पंतप्रधानांनी भूमिपूजनात जाऊ नये, असे तुणतुणे वाजविले आहे. राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत हे बसत नाही, अशी डफली वाजवायला ते विसरत नाहीत. या सर्व लोकांनी राज्यघटनेचा नव्याने अभ्यास करायला पाहिजे. आपल्या घटना समितीत 80 टक्क्यांहून हिंदू सभासद होते, या हिंदू सभासदांनी हिंदू विचार, परंपरा यांचा खूप खोलवरचा विचार करून राज्यघटनेच्या कलमांना स्वीकृती दिलेली आहे. कलमांतील शब्दांचे अर्थ डिक्शनरीतील शब्दांच्या अर्थाप्रमाणे करता येत नाहीत. एखादा मिल, लॉक, मॉन्टेस्क्यू, रुसो काय म्हणाले, यावरून करता येत नाही. आपली परंपरा काय आहे, आपले सनातन चिंतन काय आहे, आमचा वैश्विक विचार काय आहे, या आधारे कलमांवर भाष्य झाले पाहिजे. आपले सन्माननीय न्यायमूर्ती अनेक वेळा तसे करतात, त्याचा अभ्यास केला पाहिजे. जे आपल्याला सोईचे ते ‘सेक्युलर’ आणि गैरसोयीचे ते ‘सांप्रदायिक’ हा ‘सेमेटिक’ विचार झाला. हा विचार आता या देशात टिकणार नाही.
ते न टिकण्याचे प्रतीक म्हणजे भूमिपूजन आणि भूमिपूजनांनंतर त्या जागेवर उभे राहणारे भव्य राम मंदिर आहे. ते जसे परमेश्वराचे पवित्र स्थान असेल, तसे ते राम अस्मितेचे प्रतीक असेल. राम अस्मिता ही हिंदू अस्मिता आहे. हिंदू अस्मितेचे हे तीन घटक आहेत. १. सत्याचे अधिष्ठान, जे करू ते सत्याच्या प्रस्थापनेसाठी. २. सत्य म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे न्याय. धर्म म्हणजे केवळ कर्मकांडे नव्हे किंवा धर्माच्या नावाने काही जण जो व्यापार करतात तो नव्हे. ३. सत्य, धर्म, न्याय म्हणजे विश्वकल्याण. ही सृष्टी केवळ माणसासाठी निर्माण झालेली नसून जीवजंतू वनस्पती या सर्वांची मिळून सृष्टी तयार होते, या प्रत्येकाची काळजी म्हणजे न्याय.
ही आपली जीवनपद्धती आहे. तिला ‘हिंदू जीवनपद्धती’ म्हणा, मानवतावादी म्हणा की वैश्विक म्हणा, सर्वांचा अर्थ एकच! राम मंदिर ही एका समुदायाने दुसर्या समुदायावर केलेली कुरघोडी, असा याचा अर्थ काही जण करतात. त्यांच्या जातिवादी आणि धर्मवादी राजकारणासाठी असे करणे त्यांना आवश्यक झालेले आहे. परंतु, आपण हिंदूंना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आता ‘राम’ जगण्याचा कालखंड सुरू होत आहे. रामाचे वर्णन ‘मर्यादा पुरुषोत्तम’ असे केले जाते. रामाने सर्व नाती जपताना आदर्शाचा मापदंड निर्माण केला आहे. शेवटी समाज म्हणजे तरी काय असतो? समाज म्हणजे नातेसंबंधांचा समूह. या नाते समूहात कर्तव्याला सगळ्यात मोठे स्थान असते. कर्तव्याचे पालन करणे हाच सामाजिक आचारधर्म असतो. आपण हिंदू त्याचे कमी अधिक प्रमाणात पालन करतो. येथून पुढे ते अधिक डोळसपणे आणि जागृतपणे करावे लागेल. मंदिर उभारणी म्हणजे राष्ट्रउभारणी हा संकल्प त्यातूनच पूर्ण होईल.