भारतीय ज्ञानाचा प्रचंड ठेवा ज्या विविध ग्रंथात बद्ध केला आहे, त्यांची अगदी जुजबी पण मौल्यवान माहिती सहस्रावधी ग्रंथांपैकी एखाद-दुसर्या ग्रंथातील दोन-चार श्लोकांमधूनही मिळते. या वाड्.मय समुद्रातून जरी विविध शास्त्रांची माहिती मिळत असली, तरी ती एकमेकांपासून अलिप्त नाही. हे सर्व ग्रंथ एकाच वृक्षाच्या शाखा आहेत. हा ज्ञानाचा वटवृक्ष ज्ञानेश्वरांना गणेशाच्या रुपात दिसला आणि ज्ञानेश्वरीची सुरुवात त्यांनी वांग्मयमूर्ती अशा ज्ञानमय, विज्ञानमय गणेशाला वंदन करून केली आहे. तेव्हा आज अनंत चतुर्दर्शीनिमित्त ज्ञानेश्वरांनी केलेले गणेशाचे वर्णन पाहू.
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १.१ ॥
देवा तूची गणेशु । सकलमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्ती दासु । अवधारिजोजी ॥ १.२ ॥
वेद ज्याचे प्रतिपादन करतात, त्या ओंकाराला माझा नमस्कार असो! स्वरूप जाणणार्या आत्मरुपा, तुझा जयजयकार असो! हे ओंकाररूपी गणेशा, तू सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा आहेस! मी, निवृत्तीचा दास तुम्हा श्रोत्यांना विनवणी करतो की, माझे बोल लक्ष देऊन ऐका!
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥
स्मृति तेचि अवयव । देखा अंगिकभाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥
गणेशा, तुझी मूर्ती म्हणजे साक्षात शब्दब्रह्म आहे. वेदमूर्ती गणेशा, तुझ्यातील वर्ण निर्दोष आहेत, शुद्ध आहेत, शुभ्र आणि तेजस्वी आहेत! ती अक्षरे आपली कांती मिरवतात! श्रुतीरुपी मूर्तीचे अवयव म्हणजे स्मृती साहित्य आहे. त्या साहित्यातील अर्थाने तुझ्या मूर्तीला लावण्य प्राप्त झाले आहे.
अष्टादश पुराणे । तीचि मणिभूषणे ।
पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ॥५॥
पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्यवाणे । सपूर उजाळाचे ॥६॥
कित्येक शैव, वैष्णव व शाक्त पुराणे आहेत. पण, त्यापैकी अठरा महापुराणे तुझे रत्नजडीत अलंकार आहेत. पुराणात सांगितलेली तत्त्वे त्या अलंकारातील रत्ने आहेत. त्या रत्नांना विविध छंदांचे व वृत्तांचे तितकेच सुंदर असे कोंदण लाभले आहे. हे गणेशा, पुराणातील सुंदर काव्यरचना हे तुझे रंगीत, तलम वस्त्र आहे. या वस्त्राला साहित्यातील काव्यालंकारांनी झळाळी आलेली आहे.
देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥ ७॥
नाना प्रमेयांचि परी । निपुणपणे पाहता कुसरी ।
दिसती उचित पदे माझारी । रत्नें भली ॥ ८॥
कौतुकाने पाहू गेल्यास, काव्य आणि नाटक हे तुझ्या पैंजणातील लहान लहान घुंगरू आहेत हे कळते. तू जेव्हा तल्लीन होऊन आनंदाने नृत्य करतोस, तेव्हा तुझ्या पदलालित्याने त्या घंटिकातून मंजुळ ध्वनी निर्माण होतो. तुझ्या पायातील रुणझुणती नुपुरे साहित्याला अर्थ देतात! नाटक व काव्यातील प्रमेय, सुभाषिते, तत्त्व आदि त्या पैंजणांतील रत्ने आहेत! ती रत्ने कौशल्यपूर्ण कलाकुसरीने तुझ्या पैंजणात जडवली आहेत.
तेथ व्यासादिकांच्या मति । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणे झळकती । पल्लवसडका ॥ ९॥
आपल्याला माहीतच आहे की, व्यासांनी महाभारत लिहिले, वेदांचे संकलन केले, ब्रह्मसूत्रे लिहिली, तसेच भागवत पुराण लिहिले, अशी पारंपारिक मान्यता आहे. त्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणात वैविध्यपूर्ण साहित्य लिहिले आहे की, त्याहून वेगळं जगात काही होऊ शकत नाही! म्हणून हे जग व्यासांचे उच्छिष्ठ आहे, असे म्हटले जाते. ज्ञानेश्वर म्हणतात, अशा प्रतिभावान बुद्धिवंतांची मती ही तुझ्या कमरेला बांधलेली मेखला आहे! त्या मेखलेचे मखमली गोंडे त्यांच्या तेजस्वी बुद्धीने निर्दोषपणे झळकत आहेत.
देखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ॥
म्हणऊनि विसंवादे धरिती । आयुधे हाती ॥ १०॥
तरी तर्क तोचि परशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकाचा ॥ ११ ॥
हे षड्भूजधारी गणेशा, सहा दर्शने म्हणजे तुझे सहा हात आहेत. त्यातील भिन्न भिन्न अभिप्राय हे तुझ्या हातातील शस्त्र आहेत. तुझ्या हातात तर्करुपी परशु आहे. या धारदार परशूने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करता येते. दुसर्या हातात न्यायशास्त्ररुपी अंकुश आहे आणि दुसर्या हातातील रसाळ मोदक हा ब्रह्मानंद देणारा वेदांताचा महारस आहे.
एके हाति दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥
मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥
एका हातातील खंडित दात हा बौद्धमतचा संकेत आहे, तर सत्कारवादाच्या हातात तू सांख्य मताचे पद्म धरले आहेस. धर्माची प्रतिष्ठापना करणारा तुझा अभय देणारा हात आहे.
देखा विवेकमंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥
सार आणि असार ओळखणारा विवेक, तुझी सरळ सोंड आहे. त्या ठिकाणी महासुखाचा केवळ परमानंद आहे!
तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥
तुझा अखंड दात हा उत्कृष्ट संवाद आहे. आपले सर्व ग्रंथ संवादरुपात लिहिले आहेत, त्याचे प्रतीक म्हणजे गणपतीचा दुसरा दंत. उपनिषदे असोत, गीता असो, महाभारत असो, पुराणे असोत किंवा ‘अपराजितपृच्छा’सारखा शिल्पशास्त्राचा ग्रंथ असो. हे सर्व प्रश्नोत्तरांच्या रूपाने रचले आहेत. शिष्याने प्रश्न विचारलाय आणि गुरूंनी त्याला उत्तर दिले आहे. हे गुरु-शिष्य संवादरूपी ज्ञान म्हणजे गणपतीचा शुभ्र दंत आहे. हा संवाद शुद्ध आहे, ज्ञान मिळवण्याच्या हेतूने शिष्याने अनन्य भावाने विचारलेले प्रश्न आहेत आणि हाताचे काही राखून न ठेवता गुरूंनी सांगितलेली उत्तरे आहेत, तर असा जो साहित्यातील unbiased संवाद आहे, तो तुझा शुभ्र दंत आहे!
मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी ।
बोधमदामृत मुनी । अलि सेविती ॥ १६ ॥
मला तर असे भासते की, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही दोन दर्शने म्हणजे तुझे विशाल कान आहेत व त्यामधून बोधामृताचा मध स्रवत आहे. ते अमृत सेवन करण्यासाठी मुनी भ्रमारच्या रूपाने आले आहेत, पाहा!
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसे एकवटत । इभ मस्तकावरी ॥ १७ ॥
श्रुती आणि स्मृतींमध्ये सांगितलेली प्रमेय ही तुझ्या अलंकारातील तेज:पुंज पोवळे आहेत. गजानना, मला तर असे दिसते की द्वैत आणि अद्वैत ही मते तुझी गंडस्थळे आहेत. ते दोन्ही तुल्यबळ असून तुझ्या मस्तकावर एकत्र शोभत आहेत!
उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे ।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे । शोभती भली ॥ १८ ॥
दोनशेहून अधिक उपनिषदातील दहा उपनिषदे महत्त्वाची मानली आहेत. त्या दहा उपनिषदांवर आदि शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, ही दहा उपनिषदे तुझ्या मस्तकावर वाहिलेली फुले आहेत. त्या फुलांमध्ये ज्ञानाचा मध असून त्यांचा सुवास दरवळत आहे.
अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारे ॥ १९ ॥
हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले ।
ते मियां गुरूकृपा नमिले । आदिबीज ॥ २० ॥
ओंकारातील पहिली मात्र म्हणजे ‘आकार’ हे तुझे दोन पाय आहेत. दुसरी मात्र ‘उकार’ हे तुझ विशाल उदर आहे, तर तिसरी मात्रा ‘मकार’ हे तुझे मस्तक आहे. या तिन्ही मात्र एकत्र आल्या की त्यामध्ये संपूर्ण वेद कवटाळला जातो. अकार-उकार-मकार रूप धारण करणार्या गणेशा, गुरुकृपेने मी तुला जाणल्याने तुला प्रणाम करीत आहे!
ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या या गणेशाच्या रुपात - श्रुती, स्मृती, पुराण, शास्त्र, तत्त्वज्ञानापासून ते लौकिक साहित्यातील काव्य, नाटकापर्यंत सर्व वाड्.मय समाविष्ट आहे. म्हणून तो ६४ कलांच्या व १४ विद्यांचा देव आहे! Fact पासून Fiction पर्यंत, Philosophy पासून Plays पर्यंत, History पासून Prophecy पर्यंत, आणि Science पासून Poetry पर्यंत जे जे मानवाने लिहिलंय, ते ते सर्व गणेशाच्या मूर्तीत सामावलेले आहे. आणखीही जे काही लिहिले जाईल, गायले जाईल, नृत्यातून अथवा नाटकातून सादर केले जाईल ते सर्व गणेशाचे नवनवीन अविष्कार असतील! अशा ज्ञानरूपी, साहित्यरूपी, ग्रंथरूपी देवाला मनोभावे नमस्कार!