मुंबई : सुशांत सिंह प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई पोलीसांची भूमीका कायम संशयास्पद राहीली असून याची जबाबदारी घेत आयुक्त परमबीर सिंह यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. घटनेच्या ३११ कलमाच्या अंतर्गत आयुक्तांसह डीसीपी यांचीही हकालपट्टी करावी, असे पत्र भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहून कारवाईची मागणी केली आहे. याबद्दल तीन पानी पत्र त्यांनी मोदींना लिहीले आहे.
सुशांत सिंह प्रकरणाला आता दररोज नवे वळण मिळत आहे. रिया चक्रवर्तीने आपल्या कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याचे म्हणत मला पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हीडिओ पोस्ट करून रियाने घरासमोर सुरू असलेल्या गोंधळाचा व्हीडिओ पोस्ट करत ही मागणी केली आहे. मुंबई पोलीसांनी आम्हाला संरक्षण पुरवावे, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी घरातूनच व्हावी, अशी मागणी तिने तपास यंत्रणांना केली आहे. याबद्दल मला तपास यंत्रणांकडूनही कुठल्याच प्रकारे सहकार्य मिळत नसल्याचे म्हटले आहे.
आमदार राम कदम यांनीही या प्रकरणावरून एक गंभीर आरोप केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर इम्तियाज खत्री हा सुशांतचा मित्र काहीच का बोलला नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर एवढा शांत का आहे. त्याचे ड्रग्ज माफियांशी संबंध आहेत का ? याबद्दल मुंबई पोलीसांनी कुठला तपास केला होता का ?. याचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.