एका दिवसात तब्बल २१ गाणी रेकॉर्ड करत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये आपले नाव कोरणारे गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या बहारदार कारकिर्दीचा लेखाद्वारे घेतलेला आढावा...
कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खानचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. तरुण असलेला सलमान आणि एस. पींचा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र, हा चित्रपट सुपरहिट झाला आणि एस. पी. बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली. यानंतर एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली.
४ जून, १९४६ रोजी आंध्र प्रदेशातल्या, नेल्लोर येथील मूलपेट मेहुआमध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरिकथा कलाकार होते. हरिकथा हा आंध्र प्रदेशातील एक पारंपरिक कला प्रकार असून, यात कथा, कविता, नृत्य, नाटक अशा सगळ्या कला यात अंतर्भूत असतात. धार्मिक कथा या कलाप्रकारातून सादर केल्या जातात. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे वडील याच नाटकांतून काम करायचे. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असून, त्यातील एक बहीण एस. पी. शैलजा यासुद्धा गायिका आहेत.
मोठे होऊन अभियंता व्हायचे ते एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे स्वप्न होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशच्या अनंतपूर येथील जवाहरलाल टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशदेखील घेतला होता. मात्र, याच कालावधीत ते प्रचंड आजारी पडले. आजार तसा गंभीर नव्हता. परंतु, त्यातून बरे होण्यासाठी त्यांना बराच कालावधी गेला. याचमुळे त्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडावे लागले. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वी आणि इतर अभ्यासक्रम शिकत असताना त्यांचे संगीत शिक्षण मात्र नित्यनियमाने सुरु ठेवले होते. १९६४ मध्ये ‘हौशी’ गायक म्हणून त्यांना एका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. यानंतर गायन क्षेत्रात करिअर करायचे असे ठरवून ते पुढे जात राहिले. सुरुवातीला त्यांनी अनेक मोठ्या दाक्षिणात्य संगीतकार आणि गायकांसोबत साहाय्यक काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी आपल्या गायकीला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणजे त्यांना पुढच्या दोन वर्षांत, १९६९ साली म्हणजेच वयाच्या २०व्या वर्षी स्वतंत्रपणे गाण्याची संधी मिळाली. त्यांचे पहिले गाणे हे त्यांच्या मातृभाषेत अर्थात तेलुगूत होते. या गाण्याच्या अगदी आठ दिवसांनी त्यांनी कन्नड भाषेतील एक गाणे रेकॉर्ड केले. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना ‘दक्षिणेतील रफी’ म्हणून ओळखले जाते. देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने एस. पी. बालासुब्रमण्यम यांना गौरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सहा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांना प्रसिद्धी मिळाली. याच दरम्यान तामिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक बालचंदर एका हिंदी चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी एस. पी. बालासुब्रमण्यम यांची निवड केली. चित्रपट होता ‘एक दुजे के लिये.’ विशेष म्हणजे, हा चित्रपट कमल हसन, रति अग्निहोत्री, एस. पी. बालासुब्रमण्यम या तीनही कलाकारांचा पहिला हिंदी चित्रपट होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी चित्रपटाचे संगीत तयार केले होते. मात्र, दाक्षिणात्य आवाज या चित्रपटासाठी वापरावा यावर त्यांचे दुमत होते. परंतु, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आवाजाने ते इतके भारावून गेले की त्यांनी गायक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. प्रदर्शनानंतर चित्रपट आणि गाणी दोन्हींना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘एक दुजे के लिये’ या पहिल्याच हिंदी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
८ फेब्रुवारी, १९८१ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ अशा बारा तासांत तब्बल २१ कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. या आधी त्यांनी एका दिवसांत १९ तामिळ गाणी, तर १६ हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. ते इतके व्यस्त होते की, दिवसाला १५-१६ गाणी ते रेकॉर्ड करतच! याशिवाय ते मोठ्या कलाकारांसाठी डबिंगही करत.
एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एखादे गाणे कठीण वाटल्यास ते आठ-दहा दिवसांचा वेळ मागून सराव करत. मात्र, घाईचे काम असल्यास ते सहजपणे नकार देत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून ‘विश्राम’ घेतला होता. २०१३ मध्ये आलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी त्यांनी मुख्य गाणे गायले होते.
‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख असणारे, आपल्या भारदस्त आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे एस. पी. बालासुब्रमण्यम सध्या कोरोना संकटाशी दोन हात करत आहेत. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडूनही त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. तेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन, त्यांचा आवाज पुन्हा एकदा कानी पडो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!