भारतीय ज्ञान परंपरा

25 Aug 2020 23:18:57

 


Dr Gauri Mahulikar_1 
 

 

 


डॉ. गौरी माहुलीकर (gauri.mahulikarcvv.ac.in) या मुंबई विद्यापीठातील माजी संस्कृत विभाग प्रमुख होत्या. सध्या डॉ. माहुलीकर या चिन्मय विश्वविद्यापीठ, केरळ येथे अधिष्ठाता आहेत. त्यांनी ‘पुराण मंत्र आणि विधींमध्ये वैदिक घटक’ या विषयात ‘डॉक्टरेट’ मिळविली आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेमध्ये सात पुस्तके आणि ९० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. डॉ. माहुलीकर अनेक पुरस्कारांनी विभूषित आहेत. त्यांना ‘प्राचीन ग्रीक नाटक आणि भरताचे नाट्यशास्त्र’ या प्रबंधासाठी मॅनकेजी लिम्जी सुवर्णपदक; संस्कृतच्या प्रसारासाठी कॅनेडियन एज्युकेशन फाऊंडेशनचा ‘रामकृष्ण पुरस्कार’; कलासदन, मुंबईचा ‘गुरु गौरव पुरस्कार’; महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’; कांची कामकोटी पीठाचा ‘आद्य शंकराचार्य पुरस्कार’; मुंबई विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणेचा ‘इंदिरा बेहेरे पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘भारतीय ज्ञान संस्था’ या विषयावर डॉ. माहुलीकर यांची एक अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला चिन्मय विश्वविद्यापीठाच्या अंतर्गत चालू आहे. त्या मालेतील ‘भारतीय ज्ञान संस्था’ ची ओळख करून देणार्‍या त्यांच्या व्याख्यानाचा हा मराठी अनुवाद.
 
 

कैक रूढी, चालीरीती परंपरागत चालत आलेल्या असतात. त्या कुठेही लिहून ठेवलेल्या नसतात. ग्रंथित केलेल्या नसतात. पारंपरिक ज्ञान काही भाग सूत्र रूपाने, सिद्धांत रूपाने ग्रंथित केला गेला आहे. त्या ग्रंथांमधून विविध शास्त्र, विज्ञान किंवा तत्त्वज्ञान सांगितले आहे. या ग्रंथबद्ध ज्ञानाला ‘भारतीय ज्ञान संस्था’ असे म्हटले जाते. ही ज्ञानपरंपरा अतिशय प्राचीन आहे. आणि तिचा ओघ अखंड वाहत आहे. अशा ज्ञान परंपरा इतरही प्राचीन संस्कृतींमध्ये होत्या. जसे इजिप्त, सुमेरियन, ग्रीक, बेबिलोनियन, पर्शियन इत्यादी. मात्र, त्या परंपरा काळाच्या ओघात व आक्रमणांच्या मार्‍यात नष्ट झाल्या. भारतीय ज्ञान परंपरा मात्र अनेक आघात सहन करूनसुद्धा आजही टिकून आहे. त्या अर्थी त्यामध्ये निश्चितपणे काही शाश्वत असे तत्त्व असणार. तसे नसते तर ते ज्ञान हजारो वर्षं टिकले नसते. ते ज्ञान टिकले तर आहेच, पण विशेष असे की, ते आजही वाचावेसे वाटते. त्या अर्थी ते नित्यनूतन आहे. प्रत्येक वाचनात त्यामधील काही नवीन अर्थ कळतो.
 
धार्मिक साहित्य

 

 


भारतीय ज्ञानाचा आवाका पाहताना आपण सुरुवात करतो ती वैदिक वाङ्मयापासून. याला ‘श्रुती वाङ्मय’ असे म्हटले जाते. त्याचे कारण असे की, हे वाङ्मय लेखन व वाचनासाठी नाही, तर पठण व श्रवणासाठी आहे. हा मौखिक ज्ञानाचा ठेवा गुरु-शिष्य परंपरेने वेगवेगळ्या पद्धतीने गायन करून, पठण करून जपून ठेवला. जटा, रेखा, दंड, शिखा, घन आदी विविध प्रकारे वैदिक मंत्रांच्या पाठांतराच्या पद्धती विकसित केल्या होत्या. हे मंत्र व ऋचा कवीने ‘रचलेल्या’ नाहीत, तर ते मंत्र ऋषींना ‘दिसले’ व तसे त्याने गायले. ऋषी या मंत्रांचे कर्तृत्व स्वत:कडे घेत नाहीत. या कारणास्तव वेदांना ‘अपौरुषेय’ पण म्हणतात. वेदांचे अजून एक विशेष असे आहे, की ते जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे.

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे चार वेद असून प्रत्येकात चार प्रकारचे वाङ्मय आहे - संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. प्रत्येक वेदाच्या अनेक संहिता आहेत. प्रत्येक संहितेत अनेक मंडळे, अनुवाक किंवा कांड आहेत. त्यात प्रत्येकात अनेक सूक्त आहेत. प्रत्येक सूक्तात अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचे वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावले आहेत! अनेक ब्राह्मण ग्रंथातून वैदिक संहितेचा विस्तार आला आहे. कथा आल्या आहेत. त्याशिवाय सर्व वेदांमध्ये मिळून शेकडो उपनिषदे आहेत. उपनिषदांना ‘वेदांत’ अशीही संज्ञा आहे. वेदांचा ‘अंतिम’ भाग म्हणून ‘वेदांत’ किंवा वेदांचा ‘परम’, ‘उच्च’ किंवा ‘शीर्ष’ भाग म्हणूनही त्यांना ‘वेदांत’ असे म्हटले आहे. वेद कळण्यासाठी लिहिलेल्या साहित्याला ‘वेदांग’ म्हटले आहे. ही सहा अंगे आहेत - शिक्षा, निरुक्त, व्याकरण, छंद, कल्प व ज्योतिष. या मधून उच्चारण शास्त्र (Phonology, Phonetics), शब्दांची उत्पत्ती (Etymology), वाक्यांची रचना (Grammar), काव्याची रचना (Prosody) यांचे शास्त्र सांगितले आहे. तसेच कल्प सूत्रांमधून यज्ञाचे Instruction Manual व ज्योतिषमधून दिशा व काल या संबंधीची माहिती दिली आहे. वेदशब्द प्रमाण मानणारी सहा दर्शने आहेत - सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा. या दर्शनांचा पण वैदिक साहित्यात समावेश होतो.

 

 


वेदांग व दर्शने सूत्ररुपात संक्षिप्तपणे लिहिली आहेत. सूत्रे ही कमीत कमी शब्दांत रचलेली असल्याने कळायला अवघड असतात. त्यामुळे त्यांचे विवरण करून त्यावर भाष्य लिहिणे पुढील काळात आवश्यक झाले. उदाहरण घ्यायचे झाले तर - दहा उपनिषदांवर आद्य शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे किंवा ब्रह्मसूत्रावर कैक तत्त्वचिंतकांनी भाष्य लिहिले आहे. जसे आद्य शंकरांचे शारीरकभाष्य, रामानुजंचे श्रीभाष्य, वल्लभाचार्यांचे अणुभाष्य. आपापल्या द्वैत, अद्वैत आदी मतानुसार लिहिलेलीही भाष्ये आहेत. अशा प्रकारचे भाष्य साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. स्मृती साहित्यात - इतिहास, पुराण, धर्मशास्त्र आदी विषय येतात. ऋषींनी सांगितलेले ज्ञान लक्षात ठेवून, आठवून लिहिले म्हणून त्यांना ‘स्मृती ग्रंथ’ म्हटले जाते. इतिहास, अर्थात ‘हे असे घडले’ सांगणारे ग्रंथ आहेत - रामायण व महाभारत. तसेच पुराणांमधून प्राचीन काळी घडलेल्या गोष्टींची माहिती येते. कालानुरूप पुराणांमध्ये नवी नवी माहिती लिहिली गेली. कैक पुराणात अगदी १९ व्या शतकातदेखील माहिती लिहिली आहे. महाभारतात व्यास म्हणतात - वेद कळण्यासाठी इतिहास व पुराणे वाचावीत. कारण, त्यामधून वेदांनी जे प्रतिपादित केले आहे, तेच अधिक सोपे करून कथा रूपाने सांगितले आहे. वेद फार प्राचीन काळी लिहिले असल्यामुळे त्यामधील संस्कृत जुन्या वळणाचे आहे. जसे तेराव्या शतकातील मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी आज वाचायला अवघड वाटते, तसेच वेदांची भाषा संस्कृत असली तरी ती जुनी असल्याने कळायला अवघड जाते. याकरिता सामान्य माणसाला वेद समजावेत म्हणून इतिहास-पुराणे यांची रचना केली गेली. स्मृती काळात इतरही अनेक शास्त्रीय ग्रंथ लिहिले गेले. त्यामध्ये - अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, कामशास्त्र, नाट्यशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, पाकशास्त्र, खगोलशास्त्र, मयमत, समरांगणसूत्रधार, बृहतसंहिता आदी अनेक ग्रंथ लिहिले गेले. यामधून बॉटनीपासून अ‍ॅरिथमॅटिकपर्यंत; पॉलिटिकल सायन्सपासून टॅक्सेशनपर्यंत आणि क्युसिनपासून ड्रामॅटिक्सपर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण शास्त्रीय ग्रंथ आहेत.
 
लौकिक साहित्य

 

 


श्रुती व स्मृती नंतर आपण पाहतो अभिजात संस्कृतमधील ग्रंथनिर्मिती. यामध्ये काव्य व नाटकांचा समावेश होतो. आदि कवी वाल्मिकी यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक कवींनी नवीन काव्य निर्माण केले. त्यामध्ये इ. स. पूर्व तिसर्‍या शतकातील भासाची नाटके, जी काळाच्या पडद्याआड हरवलेली होती, ती विसाव्या शतकात अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने पुन्हा प्रकाशात आली. त्यामध्ये - प्रतिमानाटक, कर्णभार, उरुभंग, स्वप्नवासवदत्त आदी १३ नाटके आहेत. भासाच्या नंतरचा महाकवी म्हणजे कालिदास! कालिदासाने लिहिलेली मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश आदी सात मधुर काव्य. विशाखदत्त, श्रीहर्ष, बाणभट्ट, माघ, राजशेखर, दंडी अशी कवींची एक मोठी साखळी आहे. यांनी विविध प्रकारचे दृश्य व श्राव्य काव्य निर्माण केले. नाटक, प्रकरण आदी अनेक प्रकारची नाटके. गद्य, पद्य व चम्पू प्रकारातील महाकाव्य व खंडकाव्य. ही काव्यनिर्मितीची मालिका भर्तृहरीचे शतकत्रय, जयदेवाचे गीतगोविंद, सोळाव्या शतकातील जगन्नाथ पंडिताचे गंगालहरीपर्यंत चालू राहते. ही परंपरा आजही अखंड चालू आहे. आजही नवनवीन संस्कृत नाटक लिहिले जाते व रंगमंचावर सदर केले जाते. या ज्ञान परंपरेत आणखी एक कप्पा आहे - सुभाषित व स्तोत्रांचा. सुभाषित, कूट प्रश्न, प्रहेलिका हा संस्कृत साहित्यातील मोठा गंमत आणणारा प्रकार आहे. सुभाषितांमध्ये अगदी दोन-चार वाक्यात एक वैश्विक सत्य एखादे दृष्टांत देऊन शिकवले असते. कूट प्रश्नात - एक पद देऊन संपूर्ण श्लोक निर्माण करायचे ‘चॅलेंज’दिले असते, तर प्रहेलिकांमध्ये कोडे घातले असते. अशा प्रकारची कोडी सोडवणे, सुभाषिते पाठ करणे हे विद्यार्थ्यांचे रिकाम्या वेळातील खेळ होते.

 

 


भारतीय ज्ञानाच्या या मोठ्या खजान्याचा पेटारा कुलूपात बंद आहे. त्याची किल्ली आहे संस्कृत भाषा! ती भाषा शिकली की हा मोठा खजाना सहज हाताला लागणार आहे! हे साहित्य संस्कृत भाषेत असून ते वेगवेगळ्या लिपींमध्ये बद्ध केले आहे. काश्मीरचे संस्कृत साहित्य शारदा लिपीमध्ये लिहिले गेले. केरळमध्ये संस्कृत साहित्य मल्याळम लिपीत लिहिले गेले, तर मध्य भारतातील संस्कृत साहित्य देवनागरी लिपीत लिहिले गेले. तस्मात जुने साहित्य वाचायला जशी संस्कृत भाषा येणे गरजेचे आहे, तसेच विविध लिपीसुद्धा वाचता येणे पण आवश्यक आहे. या दोन गोष्टी आत्मसात केल्या की भारतीय ज्ञानाचा खजाना प्रत्येकासाठी खुला आहे!
 

 

 

- डॉ. गौरी माहुलीकर
(अनुवाद : दीपाली पाटवदकर - ९८२२४५५६५०)

 

 
Powered By Sangraha 9.0