पिवळा चीन, लाल ड्रॅगन आणि डॉ. फू माँचू

21 Aug 2020 22:09:17

vicharvimarsh_1 &nbs



फू माँचू हा महाखलनायक इतका लोकप्रिय झाला की, तो आकाशवाणी, दूरदर्शन, कॉमिक्स, व्यंगचित्रमाला असा सर्वत्र पसरला. आता ख्रिस्टोफर फ्रायलिंग या लेखकाने ‘द यलो पेरील’ नावाचं पुस्तकच लिहून ़फू माँचू या व्यक्तिरेखेचा संपूर्ण मागोवाच घेतलाय.



पाश्चिमात्य लोक अलेक्झांडरला जगज्जेता म्हणून एवढं का डोक्यावर घेतात? जगाचा नकाशा पाहिलात तर ध्यानात येईल की, ग्रीस हा युरोप खंडाच्या दक्षिणेकडचा एक छोटासा देश आहे. अलेक्झांडरचा बाप फिलिप हा मॅसिडोनियाचा राजा होता. आधुनिक काळात ‘मॅसिडोनिया’ किंवा योग्य उच्चार ‘मॅकॅडोनिया’, हा देश ग्रीसपासून वेगळा झालेला आहे. पण, फिलिपच्या मृत्यूनंतर अलेक्झांडरने मोठ्या भावाला सारुन मॅसिडोनियाची गादी बळकावली. मग प्रचंड फौजेनिशी तो म्हणे, जग जिंकायला बाहेर पडला. आता खरं पाहता त्याने वायव्य, उत्तर किंवा ईशान्य दिशा धरायला हरकत नव्हती. कारण, युरोप खंडाची मुख्य भूमी आणि तेथील देश ग्रीसपासून याच तीन दिशांना येतात. पण, गंमत म्हणजे, तो एवढ्या सलग पसरलेल्या युरोप खंडाकडे वळलाच नाही. त्याने मोहरा धरला पूर्वेचा. भूमध्य समुद्राचा एजिसन समुद्र नावाचा उपविभाग ओलांडून तो अनातोलिया म्हणजे आताच्या तुर्कस्तानात घुसला. मग पॅलेस्टाईन म्हणजे मुख्यत: जेरुसलेम, त्यानंतर मेसोपोटेमिया म्हणजे युफ्रेटिस आणि तैग्रिस नद्यांच्या दुआबातला समृद्ध प्रदेश म्हणजेच आताचा इराक जिंकून तो अत्यंत विशाल आणि बलाढ्य अशा पर्शियन साम्राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. पर्शिया म्हणजेच आधुनिक इराण, पर्शियाच्या शक्तीचा चक्काचूर करुन, तसेच पूर्वेकडे घुसत त्याने गांधार म्हणजे आधुनिक अफगणिस्तानही जिंकला आणि तो भारताच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला.


सिंधू नदीच्या तीरावर राजा पुरु किंवा पोरसाबरोबरची त्याची लढाई प्रसिद्धच आहे. ही लढाई त्याने जिंकली, असं एवढ्याचसाठी म्हणायचं की, राजा पुरु हा ग्रीक सेनेचा कैदी झाला. पण, या लढाईनंतर अलेक्झांडर पुढे न घुसता माघारी फिरला आणि वाटेतच मेसोपोटेमियात मेला. या सगळ्या इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकातल्या घटना आहेत. म्हणजे तेव्हा साम्यवाद, {ख्रश्चॅ{नटी, इस्लाम किंवा अत्यंत बलवान असं रोमन साम्राज्य यापैकी कुणाचाही जन्मसुद्धा झालेला नव्हता. अलेक्झांडरच्या मोहिमेचे वृत्तांत लिहिणार्‍या तत्कालीन ग्रीक लेखकांना युरोप, आशिया आणि आफ्रिका एवढे तीनच खंड माहिती होते. आता या तीन खंडांमधला {कतीसा भाग अलेक्झांडरने जिंकला? तर, ग्रीसपासून सिंधू नदीपर्यंत आणि आफ्रिकेच्या उत्तर किनार्‍यावरचा थोडा भाग एवढाच म्हणजे तत्कालीन ज्ञात जगाच्या भूमीपैकी एकदशांश भागसुद्धा त्याने जिंकलेला नव्हता आणि तरी म्हणे तो जगज्जेता ! याचं कारण पाश्चिमात्यांच्या मानसिकतेत कुठेतरी खोल लपलेलं आहे. इतिहासात ते नीटसं नोंदलं गेलेलं नाही, पण पाश्चिमात्यांना स्वत:बद्दल एक प्रचंड न्यूनगंड आहे किंवा होता असं म्हणूया. हे पौर्वात्य लोक आपल्यापेक्षा खूप पुढारलेले आहेत. यांची भूमी आपल्यापेक्षा सकस, समृद्ध आहे. यांची राहणी, भाषा, शास्त्र, तंत्र सगळंच आपल्यापेक्षा समृद्ध आहे. यांची मोठमोठी राज्यं आणि सम्राज्य ज्ञान आणि शक्ती यांनी ओतप्रोत भरलेली आहेत. आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यांच्यापेक्षा मागास आहोत. तेव्हा, जाऊन कोसळूया त्यांच्यावर आणि विद्ध्वंस करुया. त्यांच्या या मानसिकतेतून अलेक्झांडर पूर्वेकडे वळला होता. म्हणजेच पश्चिमेला पूर्वेबद्दल वाटणारा हा मत्सर, द्वेेष इतका जुना आहे. स्वामी विवेकानंद एका भाषणात पाश्चिमात्यांना उद्देशून म्हणाले होते की, “तुम्ही कशाला आम्हाला सुधारणा, प्रगती आणि श्रेष्ठ संस्कृतीच्या गप्पा सांगता? तुमचे पूर्वज रानावनात उघडे-वाघडे हिडत होते नि कच्चं मांस खात होते, त्या काळात आमच्या पूर्वजांनी मानवजातीचं सर्वोच्च ज्ञान सांगणार्‍या वेदांची रचना केली आहे.” हे खरं आहे. हे पाश्चिमात्यांना मनोमन ठाऊक आहे. म्हणूनच पूर्वेकडचा बर्‍यापैकी भूप्रदेश जिंकणार्‍या अलेक्झांडरला ते जगज्जेता म्हणतात.


भरती आणि ओहोटी, उत्कर्ष आणि अपकर्ष, उत्थान आणि पतन हा सृष्टीचा नियम आहे. त्यानुसार इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापासून पश्चिमेत प्रथम ग्रीक आणि मग रोमन साम्राज्यं उदयाला आली. रोमनांनी जवळपास संपूर्ण युरोप, बरीचशी आफ्रिका आणि बराचसा आशिया खंड नुसता जिंकलाच नव्हे, तर काही शतकं तिथे राज्य केलं. रोमनांचा हा वारसा ख्रिश्चनांनी उचलला. आणि आता न्यूनगंडाचं परिवर्तन अहंगडात होऊ लागलं. आम्ही गौरवर्णीय ख्रिश्चन लोक जगाचा उद्धार करण्यासाठी, जगावर राज्य करण्यासाठी अवरलो आहोत, असा त्यांचा समज नव्हे. त्यांची खात्रीच पटली. त्याला जोड मिळाली विज्ञान आणि तंत्रज्ञानाची. इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून पुढे, पाश्चिमात्यांच्या म्हणजे गोर्‍या ख्रिश्चनांच्या हातात लांब पल्ल्यांच्या तोफा आणि बंदुका आल्या. चपळ, गतिमान जहाजं, गलबतं आली आणि त्या बळावर त्यांनी प्रथम जगभरचे समुद्र जिंकले नि मग भूमीही जिंकली. एका युरोप खंडाने आशिया, आफ्रिका ही मोठमोठे खंड तर जिंकलेच, पण अज्ञात अशी अमेरिका नि ऑस्ट्रेलिया हे खंडही शोधले नि स्वत:च्या अंकित करुन ठेवले. हे सगळं करत असताना त्यांना दोन जनसमूहांना तोंड द्यावं लागलं. पहिले म्हणजे ज्यू. गोर्‍या ख्रिश्चनांनी या ज्यूंचा मन:पूर्वक द्वेष केला. पण, ज्यू जमात इतकी छोटी विखुरलेली आणि असंघटित होती की, गोर्‍या ख्रिश्चनांना तिचं राजकीय, सामाजिक, लष्करी आव्हान वाटावं, अशी स्थिती कधीच नव्हती आणि तरीही गोर्‍या युरोपीय कॅथलिक ख्रिश्चन हिटलरने किमान ६०लाख ज्यूंना ठार मारलं. पण, तो नंतरचा भाग झाला. गोर्‍या ख्रिश्चनांना खरा सामना करावा लागला तो पूर्वेकडच्या भूमीत उगम पावलेल्या महाभयंकर, विद्ध्वंसक अशा इस्लामचा. परंतु, अठराव्या-एकोणिसाव्या शतकात इस्लामलाही काबूत आणून युरोपीय गोर्‍या ख्रिश्चनांनी जवळपास संपूर्ण जगावर वर्चस्व मिळवलं. तुर्कांचं ऑटोमन एम्पायर-उस्मानी साम्राज्य अस्तित्वात होतं, पण गोर्‍या ख्रिश्चनांना त्याचं कोणतंही आव्हान नव्हतं.


अशाप्रकारे ‘चहूं ओर से सुरक्षित’ असं वाटत असताना नि जगभरच्या सगळ्या ‘हीदन’ आणि ‘पेगन’ म्हणजेच मागासलेल्या बिगर ख्रिश्चन (व्हाईट मॅन्स बर्डन) गोर्‍या लोकांना एकदम धक्का बसला. 1897 साली एम. पी. शील नावाच्या गोर्‍या, ख्रिश्चन संस्कृतीला पूर्वेकडच्या पिवळ्या म्हणजे मुख्यत: चिनी आणि जपानी लोकांना कसा धोका आहे, हे दाखवून दिलं. यावेळी जपान जागतिक राजकारणात इरेसरीने पुढे सरसावत होता; पण चीन हा त्यावेळी अगदीच गरीब बापडा देश होता. आत्यंतिक दारिद्य्राने गांजलेले चिनी लोक पोटापाण्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेत जात होते. तिथे ते कोणते व्यवसाय करत होते? तर छोटी उपाहारगृह चालवणं, लॉण्ड्री चालवणं किंवा कोणतीही मजुरीची कामं करणं. अमेरिकेच्या सान फ्रान्सिस्को शहरातला गोल्डन गेट पूल हे आज जगातलं एक अभियांत्रिकी आश्चर्य, ‘इंजिनिअरिंग वंडर’ मानलं जातं. त्यांच्या उभारणीत चिनी मजुरांचा मोठा सहभाग आहे. अमेरिकन रेल्वेच्या उभारणीतही चिनी मजुरांचा मोठा सहभाग आहे. अमेरिकेत काय किंवा इंग्लंडमध्ये काय, पडेल त्या कामात मजुरी करणे नि पोट जाळणे एवढीच त्या दरिद्री चिनी मजुरांची अपेक्षा होती. पण, एम. पी. शीलने हे पुस्तक लिहिलं नि पाठोपाठ सन १९००मध्ये चीनमध्ये पाश्चिमात्य गोर्‍यांच्या दादागिरी विरुद्ध प्रचंड उठाव झाला. त्याला ‘बॉक्सर बंड’ असं म्हणतात. चीनचं आर्थिक शोषण करणार्‍या चीनमध्ये अफू पिकवून चिनी समाजाला व्यसनी बनवणार्‍या बौद्ध चिनी समाजाला बाटवून ख्रिश्चन बनवणार्‍या गोर्‍या पाश्चिमात्यांवर पिवळ्या चिन्यांनी हल्ला चढवला नि सापडतील तितके गोरे ठार केले.



पुढे १९०५ साली जपान आणि रशिया यांच्यात युद्ध झालं आणि त्यात चिमुकल्या जपानने अवाढव्य रशियाचा चक्क पराभव केला. खरं म्हणजे हा विज्ञान-तंत्रज्ञानात पुढारलेल्या जपानने मागास रशियाचा केेलेला पराभव होता. पण, पश्चिमेने त्याचा अन्वयार्थ, पिवळ्या पूर्वेने केलेला गोर्‍या पश्चिमेचा पराभव असा घेतला. यातून पाश्चिमात्य समाजात, जनमानसात ‘यलो डेंजर’ किंवा ‘यलो पेरील’ ही संकल्पना आणखीनच बळवली. यातून अवतरली डॉ. फू माँचू नावची एक अफलातून व्यक्तिरेखा. फू माँचू हा अत्यंत बुद्धिमान, पण तितकाच कावेबाज, कपटी, खुनशी असा वैज्ञानिक आहे. त्याला संपूर्ण जगावर राज्य करायचं आहे. सर डेनिस नेलँड स्मिथ हा ब्रिटिश डिटेक्टिव्ह नायक आणि डॉ. पेट्री हा त्याचा साहाय्यक, वारंवार त्यांची कारस्थानं उथळून लावतात. पण, फू माँचू कधीच हार मानत नाही, कधीच मरत नाही. सॅक्स रोहमर या ब्रिटिश लेखकाने १९१३साली ‘द मिस्टरी ऑफ डॉ. फूमाँचू’ ही पहिली कादंबरी लिहिली. तेव्हापासून फू माँचू हा महाखलनायक इतका लोकप्रिय झाला की, तो आकाशवाणी, दूरदर्शन, कॉमिक्स, व्यंगचित्रमाला असा सर्वत्र पसरला. आता ख्रिस्टोफर फ्रायलिंग या लेखकाने ‘द यलो पेरील’ नावाचं पुस्तकच लिहून ़फू माँचू या व्यक्तिरेखेचा संपूर्ण मागोवाच घेतलाय. गंमत म्हणजे एकोणिसाव्या शतकात गरीब बापडा असणारा पिवळा चीन आज ‘लाल डॅ्रगन’ बनून खरंच जगावर वर्चस्व मिळवू पाहतोय.

Powered By Sangraha 9.0