‘मनश्री आर्टस’ या संस्थेचे संस्थापक व कलादिग्दर्शक संतोष दत्तात्रय जढाळ यांच्या प्रवासाविषयी...
नाटक एक अद्भुत कला. रंगमंचावर उभारलेलं एक अद्भुत जग. त्यावर वावरणारे पात्र, तो ध्वनी, ती कलाकृती जीवंत करणारा तो नेपथ्यकार. एखादा लहान मुलगा खूप सहज म्हणतो, मला त्या अभिनेत्यासारखं बनायचं पण कोणी लहानपणापासून मला नेपथ्यकार बनायचं असं म्हणाल्याचं आपल्या ऐकण्यात नाही येत. कुठून येतात ते भलेमोठे बाहुबली चित्रपटातील भव्यदिव्य सेट ? मग कुठून येतात हे नेपथ्यकार व कलादिग्दर्शक? ‘मनश्री आर्ट्स’ या संस्थेचे संस्थापक व कलादिग्दर्शक संतोष दत्तात्रय जढाळ यांच्या प्रवासाविषयी...
खरंतर अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगून मुंबईत दाखल झालेले संतोष हे आपल्यातील नेपथ्य कलेबाबत अनभिज्ञच होते. ते म्हणतात, “आपण कायम भ्रमात असतो. आपल्याला केवळ वाहवा हवी असते. आपण आपल्यातील त्या एका गुणाकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, आपल्यातील मूळ कलागुणाला वाव देत ते हे शिक्षण आणि आपल्यातील तो कलागुण ओळखतो तो आपला शिक्षक.” संतोष यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण अकोला जिल्ह्यातील वाडेगावात झालं. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच संतोष यांनी पुढील शिक्षणासाठी अकोल्याला जाण्याचा निर्णय घेतला. इथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी वेगवेगळ्या नाट्यसंस्थांसोबत काम करत या क्षेत्रातील बारकावे जाणून घेतले. यादरम्यान संतोष यांचा परिचय मुंबई विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक असणार्या अमोल देशमुख यांच्याशी झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष यांनी मुंबई विद्यापीठातून ’नाट्यशास्त्र’ विषयातील ’पदव्युत्तर पदवी’ घेण्याचा निर्णय घेतला. २०११साली मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत झालेल्या मुलाखतीत एका शब्दामुळे संतोष यांना अपयश आले. परंतु, तीच जिद्द कायम ठेवत पूर्ण तयारीनिशी २०१२मध्ये पुन्हा मुंबई गाठली. यावेळेस मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश मिळविला. इथे आल्यावर संतोष यांना कल्पना आली की, अकोल्यातील नाट्यसंस्था व नाटकांचे संघ संतोष यांना नाटकात भूमिका देत ते केवळ त्यांच्या नाटकातील नेपथ्याची बाजू मजबूत करण्यासाठी. इथेच संतोष यांनी ठरवलं की, यापुढे नाटकात भूमिका मिळावी म्हणून धडपडायचं नाही, वेध घ्यायचा तो केवळ नेपथ्य कलेचा. मग अनेक कार्यशाळा जिथे कारपेंटर स्वतः काम करत, आंतरराष्ट्रीय नाटकाविषयी माहिती घेणं तसेच नेपथ्यकलेवरील पुस्तकांचे वाचन, नाटकांचे सेट डिझायनींग यांसारख्या अधिकाधिक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करायला संतोष यांनी सुरुवात केली. त्यांच्या कष्टांना व प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम विभागातील शिक्षकांनीही केले.
द्वितीय वर्षात ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकाचे नेपथ्य करत असतानाच संतोष यांना नामांकित नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. २०१४-१५ हे एक वर्ष मुळ्ये यांच्यासोबत सात ते आठ व्यावसायिक नाटकांसाठी ‘साहाय्यक’ तथा ‘इंटर्न’ म्हणून काम केले. नामांकित कला दिग्दर्शक ‘नरेंद्र आवरीकर’ यांच्यासोबत काम करण्याची संधी संतोष यांना मिळाली. येथील अनुभव सांगताना ते म्हणतात, “ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या संस्थेत रुजू होतात, तेव्हा जुनी लोकं तुम्हाला त्रास देतात, कमी लेखतात पण इथे तुमचा निश्चय आणि प्रामाणिकपणा दिसून येतो.” इथे संतोष छोट्या मालिका, जाहिराती, चित्रपट यांच्यासाठी काम करत होते. कांदिवली ते मालाड रोजचा सात किमींचा सायकलवरून प्रवास, मोजकेच पैसे व काम करण्याची जिद्द असे सर्व सुरु असतानाच संतोष यांच्यासमोर ’नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट’ यांच्याकडून ’सेट डिझायनर’ पदासाठी रुजू होण्यासाठीची संधी चालून आली. रुजू होण्याबाबत चर्चा सुरु असतानाच ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधूनदेखील चित्रपट विभागातून कलादिग्दर्शक या पदासाठी संतोष यांना बोलवणे आले. इथे पुन्हा निर्णय घ्यायचा होता, तोही केवळ दोन दिवसांच्या आत. यावेळी संतोष यांनी ‘एफटीआयआय’ला जाणे पसंत केले. दीड ते दोन वर्ष ‘एफटीआयआय’सोबत त्यांनी काम केले.
२०१८मध्ये संतोष यांनी गावी परत येत ‘मनश्री-आर्टस’ या स्वतःच्या निर्मिती संस्थेवर भर देण्याचे ठरविले. यादरम्यान महाराष्ट्रातील विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेण्यासाठी त्यांना बोलविले जात. ‘मनश्री’ची पायाभरणीदेखील सुरु होती. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर भागातील तरुण कलाकारांना कला दिग्दर्शन व नेपथ्य याचे मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले जात होते. अनेक चित्रपट व नाटकांसाठी काम सुरु होते. यातून एक मोठा तरुण वर्ग संतोष यांच्याशी जोडला जात होता. ते सांगतात, “त्यांना आवडेल अशा आधुनिक पद्धतीने काळानुरूप बदलत जाणार्या स्वरूपात त्यांना मी मार्गदर्शन करत गेलो.” यामुळे ‘मनश्री’लादेखील निर्मिती क्षेत्रात उतरविणे संतोष यांना शक्य झाले. मनश्रीच्या माध्यमातून गुगली फाय हे प्रायोगिक नाटक रंगमंचावर आले. त्याचवेळी नाटक व चित्रपटांसाठी नेपथ्यासाठी लागणारी वस्तुसामग्री ऑनलाईन खरेदीसाठी ‘प्रॉप्स अड्डा’ हे पोर्टल सुरु केले.
कोविड काळाचे रूपांतर संधीत करत ‘स्टुडिओ महाराष्ट्र’ ही लोकेशन बँक सुरु केली. यात महाराष्ट्रातील वेगवेळ्या लोकेशनची माहिती आहे. कोरोना काळात प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी ठप्प झाली. त्याचा फटका नक्कीच कलाकार, ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ यांना बसला. मात्र, संपूर्ण जगालाच याचा फटका बसला आहे. म्हणून रडत बसण्यापेक्षा हे आव्हान स्वीकारणे संतोष यांना जास्त महत्त्वाचे वाटले. या काळात त्यांनी निर्माते म्हणून समोर येत असताना दोन नाटकांची घोषणा केली. नाशिकमधील ‘कॉफी आणि गोडवा’ व पुण्यातून ‘सावळबाधा’ आणि ‘गुगली फाय’ हे तीनही प्रॉडक्शन पुन्हा त्याच उमेदीने उभी राहतील, हा विश्वासही संतोष जढाळ यांनी व्यक्त केला. असा अष्टपैलू पडद्यामागील कलाकाराला दै. ‘मुंबई तरुण भारतकडून पुढील कार्यासाठी शुभेच्छा !