’लक्ष्या’त राहणारा विनोदाचा बादशहा...

16 Aug 2020 15:26:03
Laxmikant Berde _5 &





विनोदाचे अत्यंत अचूक टायमिंग, खेळकर स्वभाव व भन्नाट बोलण्याची पद्धत यामुळे ज्यांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य केले असे विनोदाचे बादशहा म्हणजेच विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे...
 
 
 
 
मला लहानपणी सह्याद्री वाहिनीची प्रचंड क्रेझ होती. त्यावेळी सह्याद्रीवर दर रविवारी दुपारी ४ वाजता मराठी सिनेमा लागायचा. या चित्रपटांनी मला लहानपणापासून अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यावेळी मी अनेक सिनेमे बघितले. त्या चित्रपटांमधील एका अभिनेत्याने अक्षरशः मला भंडावून सोडले होते. मी त्या अभिनेत्याचा प्रचंड फॅन झालो होतो आणि आजही आहे. तो आला, त्यांनी पाहिलं आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांना जिंकलं आणि तो निघूनही गेला. आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे. या अभिनेत्याचा एक प्रसिद्ध असा किस्सा आहे.
 
 
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांनी बबन प्रभुंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाची नव्याने निर्मिती करायचं ठरवलं. या नव्या संचात बबन प्रभुंची भूमिका हा दिग्गज अभिनेता करणार होता. त्यावेळेस प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांचे आई-वडीलसुद्धा या नाटकात काम करत होते. खूपदा नाटकाच्या तालमी बघायला महेश कोठारे जात असत. त्यावेळी हुबेहुब बबन प्रभुंची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्याचा अभिनय पाहुन महेश कोठारे प्रभावित झाले आणि त्यांनी तिथेच या अभिनेत्याच्या हातावर एक रुपया ठेवून त्यांना स्वतःच्या सिनेमासाठी साईन करुन घेतले. त्यावेळी महेश कोठारे यांच्या मनात एक सिनेमा दिग्दर्शित करण्याचा विचार सुरु होता. हा सिनेमा म्हणजे ’धुमधडाका.’ या सिनेमाचं दिग्दर्शन करुन महेश कोठारेंनी आपल्या पहिल्या सिनेमात या दिग्गज कलावंताला महत्त्वपूर्ण भुमिका दिली. पुढे मग या अभिनेत्याने अनेक सिनेमात अभिनय करुन स्वतःचं अढळ स्थान भारतीय सिनेसृष्टीत निर्माण केलं. असा तो एकमेव दिग्गज अभिनेता म्हणजे ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ अर्थातच आपल्या सगळ्यांचा लाडका ‘लक्ष्या.’
 
 
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर, १९५४ साली झाला. मुंबईतील गिरगावमधील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा झालेल्या लक्ष्याने युनियन हायस्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं, तर भवन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतलं. याच दरम्यान कॉलेजमध्ये असताना ते एकांकिकांमध्ये सहभाग घेत होते. अनेक वेळा साहित्य संघ मंदिरात त्यांनी बॅक स्टेजवरही काम केलं. या काळामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा प्रवास सुरु असतानाच त्यांच्या ‘टूरटूर’ या नाटकाने यशाचं शिखर गाठलं. त्यानंतर त्यांना महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’ (१९८५) या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. ‘टूरटूर’ आणि ‘धुमधडाका’ या दोन्ही माध्यमातून त्यांनी आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली. नाटकाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते म्हणून त्याने ‘कार्टी उडाली भुर्र’ हे नाटक स्वीकारले.
 
 
मराठी नाटक, चित्रपटांचा हा प्रवास सुरु असतानाच ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामधून त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यानंतर ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ इत्यादींत त्यांनी काम केले. मराठीत ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंगत संगत’, ‘पटली रे पटली’, ‘एक होता विदूषक’ असे अनेक चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील हा खूपच महत्त्वाचा टप्पा होता. जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशा तगड्या कलाकार मंडळींची साथही त्यांना मिळाली होती.
 
 
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचूक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणार्‍या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांतला खरा ‘ब्रेक थ्रू’ मिळाला तो ‘टुरटुर’ या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे द्वार’, ‘कार्टी चालू आहे’ ही नाटकेही यशस्वी ठरली. मग लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले.
 
 
’लक्ष्या’ या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन् लक्ष्या नाही, असे सहसा घडलेच नाही. कारण, कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. ’धुमधडाका’, ’धडाकेबाज’, ’थरथराट’, ’झपाटलेला’, ’पछाडलेला’, ’खबरदार’पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही त्यांनी ’बनवाबनवी’सह अनेक चित्रपट केले.
 
 
लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला ’कॅश’ करण्यासाठी ‘चल रे लक्ष्या मुंबईला’सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयुष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फुलविले. मराठीत प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार असतानाच त्यांना हिंदीत चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या.
 
 
राजश्री प्रॉडक्शनचा ’मैने प्यार किया’ हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण, अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांना हिंदीत क्वचितच मिळाली. मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ’एक होता विदूषक’ या गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण, तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत. विनोदी अभिनेता अशी जरी त्यांची ओळख असली ते त्यांनी कित्येक गंभीर भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले.
 
 
’हम आपके है कौन’ मधील लक्ष्याने निभावलेली भूमिका काबिलेतारिफ होती. नोकराच्या भूमिकेत असणारा संयम व भावनाशीलता त्यांनी उत्तमरीत्या साकारली होती. ‘झपाटलेला’मधील त्यांची भूमिका विलक्षण गाजली. ‘तात्या विंचू आणि लक्ष्या’ यावर आजही मोठे विनोद होतात. लक्ष्मीकांत बेर्डे कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय होते. रात्री कितीही उशिरा झोपले, तरी सकाळी वेळेत ते सेटवर हजर असायचे. लक्ष्मीकांत यांचा शॉट आहे म्हटल्यावर त्यांच्या हिरोईन्ससुद्धा वेळेत सेटवर हजर असायच्या. ‘एक होता विदूषक’च्या अपयशामुळे लक्ष्मीकांत बेर्डे नंतर खचून गेले होते. त्या चित्रपटाच्या अपयशाच्या दुःखातून ते शेवटपर्यंत बाहेर पडू शकले नाहीत. लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट गिटारवादक होते, हेदेखील फार कमी जणांना ठावूक आहे. विनोदी स्वभाव, वेगळीच बोलण्याची पद्धत, शरीराची विचित्र हालचाल यामुळे त्यांच्या प्रत्येक भूमिकेला एक वेगळाच रंग यायचा. ते प्रत्येक भूमिका अक्षरशः जगायचे. अभिनय हा त्यांच्यात इतका ठासून भरला होता की, त्यांच्याविना त्यावेळी मराठी सिनेमा अपूर्ण वाटायचा. ज्या सिनेमात लक्ष्या असेल, तो सिनेमा सुपरहिट होणार ही खात्री असायची. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटात लक्ष्याने साकारलेली बाई प्रचंड गाजली.
 
 
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं रुही या चित्रपट अभिनेत्री सोबत लग्न झालं होतं. रुही बेर्डे यांनी ‘मामला पोरीचा’, ‘आराम हराम आहे’ या चित्रपटात भूमिका केली, तसेच अनेक मराठी चित्रपट आणि नाटकेदेखील केली. रुही यांचे निधन झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया अरुण या दिग्गज मराठी अभिनेत्रींसोबत दुसरा विवाह १९९६ साली केला. त्या काळचे प्रसिद्ध छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांची नात व मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक अरुण कर्नाटकी यांच्या त्या कन्या होत. पहिल्यापासूनच अभिनयाची आवड म्हणून मराठी सिनेमात त्यांनी प्रवेश केला. विनोदी चित्रपटांच्या त्या जमान्यात लोकप्रिय विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत त्यांची अशी जोडी जमली की, प्रत्यक्ष जीवनात देखील ते एकमेकांचे जोडीदार झाले. दोघांचे एकत्र असे अनेक विनोदी सिनेमे गाजले. त्यांना अभिनय व स्वानंदी अशी दोन मुले आहेत, नुकतेच अभिनय याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे.
 
 
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकारांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या सार्‍या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक नाव कायम अग्रस्थानी आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. सगळ्यांना खळखळून हसविणार्‍या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते सार्‍यांच्या स्मरणात आहेत. ‘अशी ही बनवा बनवी’ पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे, आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्‍या या विनोदाच्या बादशाहाची एक्झिट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती. या कलाकाराला जाऊन एवढी वर्षे झाली तरी मात्र लक्ष्याच्या पडद्यावर येण्यामुळे होणारा हास्यस्फोट आजही कायम आहे. प्रेक्षकांशी अतूट नातं जोडणार्‍या या विनोदातल्या अवलिया हरहुन्नरी कलावंताला मानाचा मुजरा...
 
 

- आशिष निनगुरकर
 
 
Powered By Sangraha 9.0