चिनी गुप्तहेरांचा सापळा (भाग-२)

15 Aug 2020 23:25:28


sf_1  H x W: 0



चीनने काही सॉफ्टवेअर्समध्ये ‘ट्रोझन हॉर्स’ घालून भारताच्या क्षेपणास्रांविषयीची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. हे लक्षात घेता भारताने सरकारी स्तरावरील आपली एकंदर संगणकप्रणाली सुरक्षेच्या दृष्टीने अभेद्य बनवणे गरजेचे आहे. तसेच भारतातील प्रत्येक चिनी नागरिकाकडे गुप्तहेर म्हणून पाहण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक आहे.



चीनचे जगात हेरगिरी करणारे नेटवर्क पुन्हा एकदा उघड झाले आहे. इंग्लंडच्या गुप्तहेर संस्था ‘एमआय सिक्स’च्या माजी हेराने चीनच्या या घातक कटाविषयी जगाला माहिती दिली. मोठ्या कंपन्यांमध्ये चिनी कम्युनिस्ट पार्टीचे अंतर्गत सेल प्रस्थापित केलेले आहे. हुवावेच्या समर्थकांमध्ये इंग्लंडमधील अनेक नेत्यांसह प्रसिद्ध लोकांना आपल्या बाजूने बोलावलेले होते.
चीन माहिती मिळवण्यासाठी ‘सायबर स्पाय’ म्हणजे इंटरनेटच्या मदतीने माहिती मिळवणे, ‘सिग्नल इंटेलिजन्सम्हणजे त्या देशातील टेलिफोन वा मोबाईलद्वारे होणार्‍या संभाषणांवर लक्ष ठेवणे आणि ‘ह्युमन इंटेलिजन्स’ म्हणजे व्यावसायिक गुप्तहेरांचा वापर करुन एखाद्या संस्थेमध्ये शिरकाव करणे अशा प्रकारचे उद्योगही करत असतो. चीनची हेरगिरी किंवा गुप्तचर माहिती मिळवण्याची पद्धती हळूहळू जगासमोर येत आहे.

चीनचे गुप्तहेर वेगवेगळ्या देशांत जाऊन तिथल्या राज्यकर्त्यांना, राजकीय पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, नोकरशाहांना किंवा महत्त्वाच्या मुत्सद्देगिरी करणार्‍या अधिकार्‍यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मदतीने गोपनीय स्वरुपाची धोरणात्मक माहिती चोरणे आणि त्याचा वापर चीनची आर्थिक घुसखोरी व आक्रमणाला मदत करण्यासाठी करणे हा याचा हेतू असतो.
महत्त्वाच्या व्यक्तींना चीनच्या बाजूने वळवण्यासाठी ‘फिमेल स्पाईज’ किंवा महिलांचा वापर केला जातो. राज्यकर्ते, नोकरशाही, सरकारी अधिकारी यांना फसवण्यासाठी ‘हनी ट्रॅपिंग’ मोठ्या प्रमाणावर होते.
चिनी कंपन्यांमध्ये एक कम्युनिस्ट पार्टीचा सेल


जगभरातील सगळ्या चिनी कंपन्यांमध्ये एक अंतर्गत सेल असतो जो कम्युनिस्ट पार्टीचा उत्तरदायी असतो. राजकीय अजेंडा चालवणे, कंपनी चिनी दिशानिर्देशाचे पालन कसे करेल हे निश्चित करणे या सेलचे काम असते. उद्योगाच्या नावाखाली चिनी कंपनी जगभरामध्ये सक्रिय आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टीचे नऊ कोटी सदस्य आहेत आणि त्यातील अनेकांना परदेशात चिनी कंपन्यांमध्ये तैनात केले आहे किंवा गुप्तपणे तिथे ठेवले आहे.

वेगवेगळी आमिषे दाखवून परदेशी उद्योजकांची फसवणूक केली जाते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने फसवले जाते. यामध्ये बिझनेस मीटिंगच्या नावाने चीनमध्ये येण्याचे निमंत्रण देणे, एखादी कंपनी संकटात असेल तर तिला आर्थिक मदत करणे किंवा एखाद्या आपल्या कंपनीमध्ये काम देणे अशा अनेक बाबी समाविष्ट होतात. गेल्या १५ वर्षांमध्ये चीनने अत्यंत झपाट्याने सकारात्मक आमिषे दाखवून हजारो परदेशी नागरिकांना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचे काम केलेले आहे.सुंदर महिलांच्या मदतीने अनेकांना फसवले जाते, यामध्ये त्या कुटुंबावर दबाव टाकणे ब्लॅकमेल करणे, असे प्रकार केले जातात.
शस्त्रास्त्रे देण्याचा मुख्य उद्देश


चीन शेजारच्या राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर शस्रास्रांचा पुरवठा करत असतो. मुख्य उद्देश असतो की, प्रशिक्षणाच्या नावाखाली चिनी सैनिक या देशांमध्ये घेऊन सीमावर्ती भागात गुप्तहेर माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. चीनने बांगलादेशला दोन पाणबुड्या दिलेल्या आहेत. अशाच प्रकारची मदत चीनने मालदीव, म्यानमार, श्रीलंका आणि नेपाळलाही केलेली आहे. बांगलादेशला दिलेल्या पाणबुड्या हा देश कोणाविरुद्ध वापरणार? त्यांना या पाणबुड्या चालवण्याचा अनुभव आहे? नसेल तर मग त्या चालणार कशा? यासाठी चिनी नौदलाचे सैनिक तेथे तैनात केले आहेत. यामुळे चीनला नेमका काय फायदा होतो? तर पाणबुड्यांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली गस्ती घालण्याच्या माध्यमातून आजूबाजूंच्या किनारपट्ट्यांची टेहळणी करता येते. कारण, पाणबुडी किंवा नौदलाच्या युद्धामध्ये समुद्र किती खोल आहे, किती उथळ आहे, कोणत्या भागात पाणबुड्या जाऊ शकतात, खोलवर पाणी असल्यास तिथे कुठली जहाजे जाऊ शकतात किंवा जर आपल्याला एखाद्या बेटावर आक्रमण करायचे असेल, तर त्यासाठी कोणत्या जागा सोयीस्कर आहेत, अशा प्रकारची नौदलाची माहिती मिळणे गरजेचे असते. हेच काम चिनी पाणबुड्या आज करत आहे.
लढाईमध्ये नौदलाची जहाजे कुठे कशा प्रकारे वापरता येतील? भूदलाचा वापर नेमका कसा कुठे आणि केव्हा करता येईल? वायुदलाला या भागांमध्ये लढाई नेमकी कशी करावी लागेल?
पारंपरिक युद्धाकरिता ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे.

याशिवाय अपारंपरिक युद्ध करता इतर घटकांचा मग ते बंडखोर असो की असंतुष्ट नागरिक, त्यांचा वापर कसा करायचा यावर विचार केला जातो. सध्या चीन म्यानमारमध्ये म्यानमारमधील बंडखोर गट आराकान आर्मीचा वापर भारतीय प्रकल्पांवरती हल्ला करण्याकरिता करत आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करुन माहिती गोळा करणे


चीन तंत्रज्ञानाचा वापर करुन माहिती गोळा करतो. चिनी अ‍ॅप्सवरचा वापर भारतीयांची माहिती गोळा करण्यासाठी केला जात होता. याशिवाय चीनचे मोबाईल, लॅपटॉप्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसही हे काम करत असतात. त्यामुळे अशा चिनी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस आपल्याकडे असतील तर चिनी हेर आपल्या घरात आहे असे समजावे. केवळ भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांमध्ये चीनने अशा प्रकारची हेरगिरी केलेली आहे.

अमेरिकेचे तंत्रज्ञान सर्वाधिक उच्च दर्जाचे समजले जाते. पण, तेथेही कॉम्प्युटरच्या माध्यमातून चीनने हेरगिरी केलेली आहे. यासाठी शॅडो नेटवर्कस्, खोट्या ‘आयडेन्टिटीं’चा वापर करुन गुप्तहेर माहिती चोरली जाते. बहुतेकदा त्यांचे लक्ष चीनविरुद्ध काम करण्यावर असते. एखादा देश मोठ्या तंत्रज्ञानावर संशोधन करत असेल तर त्यावरही चीनचे लक्ष असते.
चिनी हॅकर्सकडून माहिती चोरण्याचा प्रयत्न


चीनचे एक महत्त्वाचे शस्त्र म्हणजे त्यांचे हॅकर्स. इतर देशांतील संगणकांमध्ये शिरुन त्यातील माहिती चोरण्याचा प्रयत्न चिनी हॅकर्स करत असतात. जवळपास १०३ देशांच्या संगणकांमधील बिग डेटा चिनी हॅकर्सनी चोरल्याचे समोर आले आहे. हे हॅकर्स स्वतःसाठी काम करतात असे दाखवले जाते; पण प्रत्यक्षात त्यामागे चिनी सरकार किंवा चीनची गुप्तहेर संस्था असतात. दोन आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियावर जगातील सर्वांत मोठा सायबर हल्ला झाला आणि तेथील अनेक सिस्टिम्स बंद पाडून माहिती चोरण्याचा प्रयत्न झाला.

चीनने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संगणक हॅक करुन भारताचे दक्षिण आफ्रिकन देशांशी असणारे संबंध कसे आहेत यासंंबंधीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. २०११ मध्ये भारताच्या क्षेपणास्त्राविषयीची माहिती चोरताना एका चिनी सायबर हॅकरला पकडण्यात आले होते. भारताचे आफ्रिका, नाटो, मध्य आशियातील देशांशी संबंधांविषयीची माहितीही त्याने चोरली होती.
जगाला ५-जी नेटवर्क पुरवणारी हुवावे कंपनी हा चीनचा सर्वात मोठा गुप्तहेर आहे, असे मानले जाते. या कंपनीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अनेक देशांत वापरले जातात. तिथून मोठ्या प्रमाणावर माहिती चोरली जात आहे. हे लक्षात आल्याने अनेक प्रगत देशांनी या कंपनीवर बंदी घातली आहे.
काय करायला हवे?


भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये (जसे की नेपाळ) असणारे शेकडो ‘चायनीज स्टडी सेंटर्स’ हे भारताची माहिती काढण्याचे चीनचे मोठे स्थान आहे. त्यांवर लक्ष ठेवून राहिले पाहिजे.
भारताने चिनी गुप्तचर यंत्रणेपासून सुरक्षित राहण्यासाठी काही पावले उचलली आहेत, पण अद्यापही अनेक उपाय करणे नितांत गरजेचे आहे. भारताने टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना चिनी बनावटीचे हार्डवेअर वापरु नये असे बजावले आहे.

चीनने काही सॉफ्टवेअर्समध्ये ‘ट्रोझन हॉर्स’ घालून भारताच्या क्षेपणास्रांविषयीची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. हे लक्षात घेता भारताने सरकारी स्तरावरील आपली एकंदर संगणकप्रणाली सुरक्षेच्या दृष्टीने अभेद्य बनवणे गरजेचे आहे. तसेच भारतातील प्रत्येक चिनी नागरिकाकडे गुप्तहेर म्हणून पाहण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक आहे.
चीनमधून गेल्या पाच दिवसांत भारतात ४०,३०० सायबर हल्ल्यांचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. चीनच्या हॅकर्सनी २० लाख भारतीयांना ई-मेलद्वारे लक्ष्य केले होते. ‘कोविड टेस्ट’च्या नावाखाली सायबर हल्ले होऊ शकतात, असा इशाराच सुरक्षा यंत्रणांनी जारी केला आहे. तसेच बँका, उद्योगधंदे, सरकारी संकेतस्थळांनाही सतर्क राहण्याच्या सूचना सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी अनोळखी, संशयास्पद ई-मेल्स न उघडता, ती त्वरित डिलिट करावेत.
वेळोवेळी आपले पासवर्ड बदलणे, इंटरनेट-फायरवॉल सिक्युरिटीचा आढावा घेणे गरजेचे आहे. चीनचे चेंगडू शहर हे या सायबर हल्ल्यांचे प्रमुख केंद्र आहे. आपले युद्ध रोजच सुरुच आहे. तेव्हा सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!

Powered By Sangraha 9.0