ससून डाॅकमधील 'व्हेल शार्क' प्रकरणी दोघांना सहा दिवसांची कोठडी; मच्छीमाराचा शोध सुरूच

13 Aug 2020 21:12:12

whale shark _1  

मत्स्यव्यवसाय विभागाची जबाबदारी 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील ससून डाॅकवर बुधवारी घडलेल्या व्हेल शार्क व्यापार प्रकरणातील आरोपींना १८ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनाविण्यात आली आहे. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'च्या (मॅंग्रोव्ह सेलच्या) अधिकाऱ्यांनी गुरुवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले होते. दरम्यान या प्रकरणात व्हेल शार्क मासा बंदरावर आणणाऱ्या मच्छीमाराचा शोध अजूनही लागेलला नाही. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने मच्छीमाराचा शोध घेऊन त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. 
 
महाराष्ट्रातील प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या ससून डाॅकवर बुधवारी सकाळी याठिकाणी मृत व्हेल शार्क मासा आढळून आला होता. हा मासा बंदरावर आणल्यानंतर त्याच्या विक्रीचा व्यवहार पडला. त्यानंतर व्यापाराकडून या माशाला कापण्यात आले. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'मध्ये व्हेल शार्क मासा संरक्षित आहे. त्यामुळे त्याची मासेमारी किंवा व्यापार करण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत हा मासा डाॅकवर आणून त्याचा व्यापार झाल्याने या प्रकरणी 'कांदळवन कक्षा'च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दोघा जणांना अटक केली होती. यामध्ये व्यापारी जंगबहादुर फौजदारी यादव आणि कापलेले मांस वाहून नेणारा टेम्पो चालक शाम रामराज धर यांचा समावेश होता. या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १८ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. 
 
 
व्हेल शार्क मासा बंदरावर वाहून आणलेल्या मच्छीमाराचा पत्ता अजूनही लागलेला नाही. यासंबंधी सखोल चौकशी केल्यानंतर आम्हाला आरोपी यादवने एक मोबाईल क्रमांक दिला असून त्याआधारे आम्ही मच्छीमाराचा शोध घेणार असल्याचे 'कांदळवन कक्षा'चे मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी सांगितले. मात्र, मच्छीमाराचा शोध घेण्याची जबाबदारी असलेल्या 'मत्यव्यवसाय विभागा'ला अजूनही त्याचा शोध लावता आलेला नाही. विभागाला मच्छीमारांचा शोध घेऊन 'महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१'अंतर्गत त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. ससून डाॅकची यंत्रणा म्हणजेच 'मुंबई पोर्ट ट्रस्ट'च्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी बंदरात आलेल्या बोटींविषयी विचारणा करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता असलेले काही संशयित बोटमालक आमच्या निरीक्षणात असल्याची माहिती 'मत्स्यव्यवसाय विभागा'तील एका अधिकाऱ्याने दिली. मच्छीमाराचा पकडल्यानंतर त्याचा बोटीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. 
 
 

Powered By Sangraha 9.0