तुमच्याकडे पदवी नसेल तर कुठलीही कंपनी नोकरी देणार नाही, असा एक नियमच सर्व क्षेत्रात लागू होता. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी मानल्या जाणार्या ’गुगल’नेच पदवी शिक्षणाची गरज नसल्याचे म्हटल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मध्ये शाळा-महाविद्यालये बंद आहेत. अनेक बड्या विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहेत. भारताबाहेर शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थीही परतण्यासाठी सरकारकडे मदत मागत आहेत. कोरोनामुळे जगातील विविध देशांमध्ये शिक्षणासाठी जाणार्यांचीही कमी नाही, हा एक वेगळा मुद्दा कोरोनामुळे समजला. लाखो विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी, तेथील पदव्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि पैसा यासाठी व्यथित केला जातो. परंतु, बर्याचदा पदवी मिळाली म्हणजे नोकरी मिळेलही याची शाश्वती नसते.
शिक्षण एका पदवीचे आणि नोकरी दुसर्याच क्षेत्रातील अशीही बरीच उदाहरणे जगभरात पाहायला मिळतात. शाळेपासूनच पदवी नाही तर नोकरी नाही, नोकरी नाही तर चांगल्या सोयीसुविधा नाहीत, चांगल्या घरांमध्ये स्थळही जुळणार नाही, असे मुलांच्या मनावर पूर्वीपासून बिंबवण्याची सवय पालक, शिक्षक आणि किंबहुना समाजाला असते. मग काय तरुण-तरुणी या गोष्टी निमूटपणे मान्य करुन याच व्यवस्थेतून पुढे पुढे सरकरत जातात. चांगले गुण आणि यश मिळवूनही पुढे नोकरी मिळू शकत नाही. त्यावेळी मात्र, सारी बोंब उठते आणि याचे खापरही संबंधित विद्यार्थ्यावरच फुटते.
‘गुगल’ने गेल्या आठवड्यात एका कोर्सची घोषणा केली आहे. अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांच्या असलेल्या या कोर्सची किंमत महिना ४९ डॉलर (३५०० रुपये) इतकी असेल. तसेच यासाठी एक लाख विद्यार्थ्यांना गरजेनुसार शिष्यवृत्ती देण्याचीही घोषणा याच वेळी करण्यात आली. सहा महिन्यांमध्ये हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी पदवीची आवश्यकता भासणार नाही, असा दावा ‘गुगल’ने केला आहे.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेटा सायन्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात लागणार्या या सर्व बाबी अंतर्भूत असणार्या या कोर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर पदवीची आवश्यकता भासणार नाही. तसेच ‘गुगल’ स्वतः उमेदवारांना नोकरीसाठी हेच प्रमाणपत्र ग्राह्य धरेल, अशी घोषणा त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी ‘मायक्रोसॉफ्ट’नेही अशाच संदर्भात कौशल्य विकास उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती.
हावर्ड, ऑक्सफर्ड आणि अशा कित्येक मोठ्या विद्यापीठांच्या पदव्यांनाच ‘गुगल’ने आव्हान दिले आहे. खरंच महाविद्यालयीन पदवी आवश्यक आहे का, असा एक प्रश्न उपस्थित केला जाईल. विशेषतः कोरोनानंतरचे जग जिथे प्रत्येक गोष्ट विशिष्ट आणि स्पष्ट असेल. ‘गुगल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपन्यांच्या या भूमिकेमुळे हा विषय पुन्हा चर्चीला जाईल. भारतातही नुकताच शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. भारताच्या दृष्टीनेही हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
जगभरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६.७ टक्के जणांकडेच पदवीचे शिक्षण आहे. पदवीधारक उमेदवारांकडे चांगली नोकरी असणार्यांची संख्याही त्याहून कमी आहे. उर्वरित ९३.३ टक्के लोकांचे काय, असाही प्रश्न आहे. शिक्षणापेक्षा कौशल्य विकास हा एक महत्त्वाचा पैलू एक अलिखित नियम म्हणून कार्यरत आहे. नोकरीसाठी गेलेला उमेदवार पदवीच नाही, तर त्याच्याकडील कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर निवडला जातो. केवळ पदवी हा निकष कधीही लागू केला नसतो.
‘क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण’ या उक्तीप्रमाणे सतत काहीतरी नवीन गोष्ट शिकण्याची धडपड, त्यादृष्टीने कौशल्य विकासाचा अभाव, संभाषण कौशल्यातील विसंवाद आणि औद्योगिकदृष्ट्या पूरक शिक्षणाची कमतरता आदी गोष्टी शिक्षण पद्धतीमध्ये दिसून येतात. त्याबद्दल आवाज उठवला जातो. मात्र, बदल हा तितक्या आमूलाग्र पद्धतीने होईल, असे दिसून येत नाही. विद्यापीठांनी ज्ञानार्जन करत असताना मार्गदर्शकही व्हावे, नोकरी किंवा व्यावासायभिमुख शिक्षणाची अंमलबजावणी जागतिक पटलावर व्हावी, अशीच या बदलांतून अपेक्षा!