बलुची व सिंधी जनतेला एकत्र येण्यासाठी कारण ठरले ते चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपेक) प्रकल्पाचे. चीन व पाकिस्तानमधील प्रगाढ मैत्रीचे प्रतीक म्हणून ‘सीपेक’कडे पाहिले जाते, मात्र, ६० अब्ज डॉलर्स खर्चाच्या या प्रकल्पामुळे बलुचिस्तानमधील जनता त्रासलेली आहे. ‘सीपेक’च्या उभारणीमुळे त्रस्त झालेल्या याच बलुची जनतेने आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी सिंध प्रांतातील राष्ट्रवाद्यांशी हातमिळवणी केली आहे.
कोणी हट्टाला पेटले तर हवे ते नक्कीच करु शकते, पण ती कृती अनैसर्गिक असेल, तर कालांतराने संबंधित कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात. पाकिस्तानचा जन्म ही अशीच अनैसर्गिक घटना होती, जी मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाच्या हट्टातून झाली. मात्र, मुस्लिमांसाठी मुस्लिमांनी स्थापन केलेल्या पाकिस्तानच्या जन्मानंतर २५ वर्षांनंतरच त्या देशापासून बांगलादेश वेगळा झाला. तत्पूर्वी पाकिस्तान सरकार आणि लष्कराने सातत्याने बंगाली भाषिक मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार, मुली-महिलांवर बलात्कार करत तिथल्या जनतेचे जिणे नरकासम केले. बांगलादेश मुक्ती संग्रामात तब्बल ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. मात्र, इतकी हानी होऊनही स्वातंत्र्यलढा सुरूच राहिला आणि भारताच्या साहाय्याने बांगलादेशची स्थापना झाली. काहीशी अशीच अवस्था पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातही आहे. इथे राहणार्या बलुची आणि सिंधी जनतेवर पाकिस्तान सरकार व लष्कर सुरुवातीपासूनच अन्याय, अत्याचार करत आले. पाकिस्तानच्या सर्वप्रकारच्या व्यवस्थाप्रणालीत पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व असून बलुची व सिंधी मुस्लिमांकडे ते हीनत्वानेच पाहतात. सरकार व लष्कराच्या दडपशाही आणि जुलमाला विरोध म्हणून बलुची व सिंधी जनतेने स्वतंत्र होण्याची ज्योत प्रथमपासूनच तेवत ठेवली आहे. तथापि, बलुची आणि सिंधी-दोन्हीकडील स्वातंत्र्यकांक्षी नेते, संघटना आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आले. आता मात्र या दोन्हींनी एकत्र येण्याचे जाहीर केले असून त्याचा परिणाम पाकिस्तानची फाळणी हाच असेल.
बलुची व सिंधी जनतेला एकत्र येण्यासाठी कारण ठरले ते चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपेक) प्रकल्पाचे. चीन व पाकिस्तानमधील प्रगाढ मैत्रीचे प्रतीक म्हणून ‘सीपेक’कडे पाहिले जाते, मात्र, ६० अब्ज डॉलर्स खर्चाच्या या प्रकल्पामुळे बलुचिस्तानमधील जनता त्रासलेली आहे. ‘सीपेक’च्या उभारणीमुळे त्रस्त झालेल्या याच बलुची जनतेने आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी सिंध प्रांतातील राष्ट्रवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. पाकिस्तान सरकारमधील पंजाबी मुस्लिमांच्या वर्चस्वामुळे बलूच आणि सिंधी जनतेची अगदी सुरुवातीपासूनच उपेक्षा झाली आणि आता या दोन्ही प्रांतातील राष्ट्रवाद्यांनी एकत्र येऊन पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या जन्मापासूनच बलूच जनतेने त्या देशात राहण्याला विरोध केला. नंतर बलुची जनतेच्या शांततामय आंदोलनाला निर्दयीपणे चिरडल्याने त्यांच्यातील पाकविरोधी संताप वाढतच गेला. ‘बलूच लिबरेशन आर्मी’, ‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट’, ‘बलूच रिपब्लिकन आर्मी’ आणि ‘बलूच रिपब्लिकन गार्ड्स’ यांसारख्या संघटना त्यातूनच उभ्या राहिल्या आणि त्यांनी पाकिस्तानी अत्याचाराविरोधात संघर्ष सुरु केला. आता या संघटनांनी ‘सिंधुदेश रिव्हॉल्युशनरी आर्मी’बरोबर एकत्र येत ‘बलूच रजी अजोय संगर’ ही संघटना तयार करण्याची घोषणा केली आहे. या नव्या संघटनेचा उद्देश एकत्रितरित्या ‘सीपेक’चा विरोध करणे, हा असेल. या संघटनेचे कार्यकर्ते जिथे जिथे ‘सीपेक’ प्रकल्पाशी संबंधित काम सुरू आहे, तिथे तिथे जातील व ते काम रोखतील.
संघटनेच्या स्थापनेनंतर, “नवीन संघटना ‘सीपेक’ला विरोध करण्याबरोबरच बलुचिस्तान आणि सिंधच्या स्वातंत्र्यासाठीही काम करेल. दोन्ही प्रांतातील लोक हजारो वर्षांपासून येथे राहत असून त्यांच्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत आणि यामुळेच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सीपेक प्रकल्प बलुचिस्तान, सिंध आणि गिलगिट-बाल्टिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपयोगाने केवळ पंजाब प्रांताच्या समृद्धी आणि चीनच्या फायद्यासाठीचे षड्यंत्र आहे आणि आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही,” अशी प्रतिक्रिया बलोच खान यांनी दिली आहे. दरम्यान, ‘मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’चे (एमक्यूएम) संस्थापक अल्ताफ हुसैन याबाबत म्हणाले की, “पाकिस्तानी लष्कराचा संपूर्ण सिंधवर कब्जा करुन लष्करी वसाहत उभारण्याचा मनसुबा आहे.” तत्पूर्वी सिंधचे डिजी रेंजर्स उमर अहमद बोखर यांनी राष्ट्रविरोधी ताकदी लपून-छपून हल्ले करत असल्याचे वक्तव्य केले होते. अल्ताफ हुसैन यांनी बोखर यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देत पाकिस्तानी लष्कराने सिंधी नागरिक आणि एमक्यूएमच्या नेत्यांवर केलेल्या जुलूम-जबरदस्ती आणि अत्याचाराची आठवण करुन देणारे पत्र लिहिले आहे. एकूणच बलुची व सिंधीजनांच्या एकत्रीकरणाने पाकिस्तानसमोर आव्हान उभे राहिले असून त्याची परिणती त्या देशाच्या फाळणीत होऊ शकते.