संयमित हिंदू समाजाचे दर्शन!

06 Jul 2020 20:42:03


puri jaggannath_1 &n


पंढरपूरची आषाढी यात्रा असो वा पुरीची जगन्नाथ रथयात्रा, या दोन्ही यात्रा विनाखंड याही वर्षी पार पडल्या. या यात्रांमध्ये सहभागी होता न आल्याचे दु:ख लाखो हिंदू भाविकांना झाले. पण, काही निर्बंध पाळून या यात्रा खंड न पडता पार पडल्या याचे समाधान या भाविकांच्या काहीशा हिरमुसल्या चेहर्‍यावर नक्कीच दिसून आले.



अलीकडेच देशाच्या दोन राज्यांमध्ये, कित्येक वर्षांच्या परंपरांचे पालन होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोना महामारीमुळे या परंपरा खंडित होणार की काय, अशी शंका वाटत होती. पण, या परंपरांचे पालन करण्यात आले. या परंपरांचे पालन करणारा लाखोंचा जनसमुदाय यामध्ये शरीराने सामील नसला, तरी मनाने नक्कीच सहभागी झाला होता. यातील एक घटना आषाढीनिमित्त पंढरपूरमध्ये भरणार्‍या यात्रेची आणि आषाढीनिमित्त विविध ठिकाणांहून संतांच्या ज्या पालख्या निघतात त्याच्याशी संबंधित, तर दुसरी घटना देशाच्या पूर्व किनार्‍यावर असलेल्या जगन्नाथपुरी येथे दरवर्षी निघणार्‍या जगन्नाथाच्या रथयात्रेची.
 

कोरोना महामारीचे आषाढी यात्रेवर सावट होते. महाराष्ट्र सरकारने पालखी सोहळ्यावर निर्बंध घातले आणि आषाढी यात्रा भरविण्यावर बंदी घातली. पण, शासनाने काही संतांच्या पालख्या पंढरपुरी नेण्यास अनुमती दिल्याने कित्येक शतकांची ही परंपरा खंडित झाली नाही. समस्त वारकरी वर्गास त्यामुळे हायसे वाटले. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार नाही म्हणून लक्षावधी भाविकांचा हिरमोड झाला होता, पण परिस्थितीचे भान ठेऊन वारकरी समाजाने या निर्बंधांचा जड अंत:कारणाने स्वीकार केला. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह ज्या संतांच्या पालख्या दरवर्षी आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे जातात, त्या पालखी सोहळ्यात लाखो लोक सहभागी होत असतात. पण, कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून वारकरी समाजाने शासनास संपूर्ण सहकार्य केले. प्रथमच संतांच्या पालख्या एसटीच्या रथामधून जात असल्याचे पाहून अनेकांचे डोळे पाणावले! पालखीचे दर्शन घेता येणार नाही, रिंगण सोहळा अनुभवता येणार नाही, या कल्पनेने अनेक अस्वस्थ झाले. आषाढीसाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये एकत्र येत असतात. विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन घेण्यासाठी दर्शन बारीमध्ये कित्येक तास उभे राहिल्यानंतर पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवल्यानंतर त्यांना जो परमानंद होतो तो अवर्णनीय अनुभव यावेळी वारकरी घेऊ शकले नाहीत. यावेळी पंढरपूरमध्ये येण्यावरच बंदी घालण्यात आली होती. हे सर्व पाहून पांडुरंगही नक्कीच अस्वस्थ झाला असेल! समस्त वारकरी संप्रदायाने सरकारी आदेशांचे पालन करून वर्षानुवर्षे चालत आलेल्या वारीच्या परंपरेला मुरड घातली. कोरोना महामारीचे भयानक रूप लक्षात घेऊन हिंदू समाजाने जराही खळखळ न करता शासनास सर्व ते सहकार्य केले. महाराष्ट्रातील आषाढी यात्रा कोरोनामुळे नेहमीसारखी होऊ शकली नाही. पण, काही निर्बंध पाळून वारीची परंपरा खंडित होऊ दिली नाही. आषाढीच्या दरम्यानच ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी येथे दरवर्षी महाप्रभू जगन्नाथाची भव्य रथयात्रा निघते. या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होत असतात. पण, जगन्नाथाची ही रथयात्रा लक्षात घेऊन या यात्रेवरच बंदी आणावी यासाठी ‘ओडिशा विकास परिषद’ नावाच्या, संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यात्रेसाठी लाखो लोक आले, तर कोरोनाचा प्रचंड फैलाव होईल, हे लक्षात घेऊन रथयात्रा काढण्यावरच बंदी घालावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास करण्यात आली होती. न्यायालयाने प्रथम या रथयात्रेवर बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा या विषयाची संपूर्ण बाजू विचारात न घेता दिला असल्याचे लक्षात घेऊन त्या विरुद्ध दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 

puri jaggannath 1_1  
 
जगन्नाथ रथयात्रेमध्ये मुळीच खंड पडता नये, अशी लाखो भाविकांची इच्छा होती. पुरीचे राजे गजपती महाराज दिव्यसिंह देव यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पत्र लिहिले आणि या यात्रेची परंपरा किती प्राचीन आहे, याचे दाखले पुराणातील हवाले देऊन दिले. जगन्नाथ रथयात्रा ही केवळ परंपराच नाही, तर तो धार्मिक विधी असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. महामारी असो वा अन्य कोणतीही आपत्ती असो, ही यात्रा मुळीच खंडित होता नये, असे गजपती महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना बजावले. सर्व बाजूंनी येत असलेल्या दबावापुढे ओडिशा सरकार झुकले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या १८ जूनच्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी विनंती न्यायालयास करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी पुरीचे शंकराचार्य, तसेच महाराज गजपती दिव्यसिंह देव यांच्याशी चर्चा केली. तसेच महाधिवक्त्यांशीही चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीसाठी आले असताना, भाविकांच्या सहभागाशिवाय ही रथयात्रा काढली जाईल, असे प्रतिज्ञापत्र ओडिशा सरकारच्यावतीने न्यायालयास सादर करण्यात आले. ही यात्रा निघाली पाहिजे, अशी केंद्र सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका होती. त्यामुळे यात्रा काढली जावी, यात्रेचे थेट प्रक्षेपण केले जावे, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने महाप्रभू जगन्नाथ मंदिरातून बाहेर न आल्यास परंपरेनुसार पुढील १२ वर्षे ते मंदिरातून बाहेर येऊ शकणार नाहीत, असेही न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात आले.
 
सर्व बाजू लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक निर्बंध लादून रथयात्रेस अनुमती दिली. महाप्रभू जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्यासाठीचे रथ ‘लॉकडाऊन’चा कालावधी असताना तयार करण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळे रथ तयार होते. प्रत्येक रथ ओढण्यासाठी ५०० सेवेकरी असतील. तसेच रथावर सारथ्यासह १० सेवेकरी असतील, सर्व सेवेकर्‍यांची ‘कोविड-१९’ चाचणी घेण्यात यावी, या अटी न्यायालयाने घातल्या होत्या. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी लक्षात घेऊन रथयात्रेची तयारी करण्यात आली. रथयात्रेसाठी नेहमीप्रमाणे लाखो भाविकांची उपस्थिती नव्हती, पण अखेर रथयात्रा निघाली. यात्रेमध्ये मोडता घालू पाहणार्‍यांचे प्रयत्न उधळले गेले! जगन्नाथ मंदिरालगत उभ्या असणार्‍या तीन स्वतंत्र रथांवर महाप्रभू जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान करण्यात आल्या. पुरीचे राजे गजपती महाराज दिव्यसिंह देव यांनी नेहमीचे सर्व परंपरागत विधी पार पाडले. रथ सज्ज करण्यात आले आणि ‘बडा दांडा’ नावाने ओळखल्या जाणार्‍या मार्गावरून ही रथयात्रा गुंदिचा मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी झाले नव्हते, पण लाखो हिंदूंनी घरांमध्ये बसून दूरचित्रवाणीवरून हा सोहळा अनुभवला. रथयात्रेतील प्रत्येक रथ हा आठ टनाहून जास्त वजनाचा होता. प्रत्येक रथ ओढण्यासाठी ५०० सेवेकर्‍यांची मर्यादा न्यायालयाने घातली होती. सर्व मर्यादांचे पालन करून जगन्नाथ रथयात्रा संपन्न झाली. पंढरपूरची आषाढी यात्रा असो वा पुरीची जगन्नाथ रथयात्रा, या दोन्ही यात्रा विनाखंड याही वर्षी पार पडल्या. या यात्रांमध्ये सहभागी होता न आल्याचे दु:ख लाखो हिंदू भाविकांना झाले. पण, काही निर्बंध पाळून या यात्रा खंड न पडता पार पडल्या याचे समाधान या भाविकांच्या काहीशा हिरमुसल्या चेहर्‍यावर नक्कीच दिसून आले. या दोन्ही यात्रांच्या निमित्ताने संयमित हिंदू समाजाचे दर्शन सर्वांना झाले ते वेगळेच!
 
 

Powered By Sangraha 9.0