एका अंदाजानुसार, भारतात २०१९ साली १,७३१ लोकांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. सरासरी काढली तर दर दिवशी पाच लोकं या प्रकारे मरतात. हे फार भयानक आहे. कारण, जे रक्षक आहेत, तेच भक्षक झालेले दिसून येतात. म्हणूनच या घटनेची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त आहे.
अलीकडेच तामिळनाडूत एक भयानक घटना घडली, ज्यात पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत पी. जयराज (वय - ५८ वर्ष) आणि जे. बेनिक्स (वय-३१ वर्ष) या पितापुत्रांचा जीव गेला. त्यांचा अपराध काय? तर ‘लॉकडाऊन’च्या काळात त्यांनी त्यांचं मोबाईल विक्रीचं दुकान बंद करायला थोडासा उशीर केला. उशीर म्हणजे किती, तर काही मिनिटं. या महाभयंकर अपराधाबद्दल त्यांना तामिळनाडूतल्या थूथुकुडी जिल्ह्यातील सत्ताकुलम गावातील पोलिसांनी अटक केली व तुरुंगात टाकून अमानुष मारहाण केली. शेवटी त्यांचा जवळच्या रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. ही घटना घडली २० जून रोजी रात्री ८ वाजता. पोलिसांनी ‘लॉकडाऊन’मध्ये दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवले म्हणून आधी वडिलांना व वडिलांपाठोपाठ पोलीस स्थानकात आलेल्या मुलाला म्हणजे बेनिक्सला अटक केली व रात्री त्यांना मारहाण करत राहिले. त्यांची चौकशी करायला आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी सांगितले की, पितापुत्रांना सकाळी सोडतील. २० जून रोजी सकाळी त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. तीन तासांनंतर दोघांना दंडाधिकार्यांसमोर नेण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावर असलेल्या दंडाधिकार्यांनी तेथूनच पितापुत्रांना रिमांड दिला व पोलीस पुन्हा त्यांना घेऊन गेले. त्यांच्या नातेवाईकांना २२ जून संध्याकाळपर्यंत पितापुत्रांबद्दल काहीही माहिती दिली नव्हती. बेनिक्सचा मृत्यू २२ जूनच्या रात्री झाला, तर वडिलांना २३ जूनच्या भल्या पहाटे मृत्यूने गाठले.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या घटनेची दखल घेतली व स्थानिक दंडाधिकार्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. नंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ही केस सीबीआयकडे दिल्याची घोषणा केली. राज्य सरकारने यात अडकलेल्या पोलीस अधिकार्यांना बडतर्फ केल्याचीही घोषणा केली आहे. एका पातळीवर पाहिले तर अशा घटना काही नवीन नाहीत. भारतातील सर्वच राज्यात अशा घटना कमी-अधिक प्रमाणात असे प्रकार घडत असतात. मात्र, तामिळनाडूतील ताजी घटना मात्र वेगळी ठरत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने नेमलेले चौकशी अधिकारी भारतीदसन यांनी सादर केलेल्या अहवालाने सर्वांची झोप उडाली आहे. अहवालात म्हटले आहे की, त्यांना चौकशी दरम्यान स्थानिक पोलिसांनी धमक्या दिल्या, सहकार्य केले नाही. एवढेच नव्हे, तर अशा केसेसमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेले सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहे. उच्च न्यायालयाने अभूतपूर्व निर्णय देत, त्या पोलीस स्थानकाचा ताबा महसूल खात्यातील अधिकारी वर्गाकडे सोपवला आणि त्या पोलीस अधिकार्यांवर न्यायालयाची बेअदबी केल्याचे आरोप ठेवले आहेत. सीबीआयकडे केस गेल्यावर ४८ तासांच्या आत त्यात अडकलेल्या अनेक पोलिसांना अटक झाली. अशा घटना फक्त तामिळनाडूत होतात असे नाही. एका अंदाजानुसार, भारतात २०१९ साली १,७३१ लोकांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. सरासरी काढली तर दर दिवशी पाच लोकं या प्रकारे मरतात. हे फार भयानक आहे. कारण, जे रक्षक आहेत, तेच भक्षक झालेले दिसून येतात. म्हणूनच या घटनेची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच न्यायमूर्ती डी. के. बासू यांनी दिलेले निर्णय व केलेल्या शिफारशींची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. हा निर्णय 1986 साली आला होता. डी. के. बासू हे कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती होते. त्यांनी 1986 साली कोलकाता उच्च न्यायालयाला एक पत्र लिहिले होते. उच्च न्यायालयाने याचे रूपांतर जनहित याचिकेत केले होते. नंतर ही बाब सर्वोच्च न्यायालयात गेली. यातून पोलीस स्थानकाच्या व्यवस्थापनाबद्दल ११ मार्गदर्शक तत्त्वे निघाली. ही ११ मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये नागरिकांना दिसतील, अशी ठेवणे बंधनकारक असून तसे होताना मात्र दिसत नाही.
या ११ तत्त्वांपैकी सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे, प्रत्येक पोलीस अधिकार्याने स्वतःच्या नावाचा व हुद्द्याचा बिल्ला छातीवर लावलाच पाहिजे. शिवाय जर कोणाला अटक केली असेल, तर ताबडतोब ‘अरेस्ट मेमो’ तयार केला पाहिजे. या मेमोत किती वाजता व कुठे अटक केली, याचे तपशील दिलेले असतील. या ‘अरेस्ट मेमो’वर कुटुंबातल्या व्यक्तीची किंवा एखाद्या आदरणीय व्यक्तीची स्वाक्षरी असली पाहिजे. मात्र, दुर्देवाने या तरतुदींचे पालन अभावानेच होते. डी. के. बासू केसमधील निकालाप्रमाणेच १९८५ साली विधी आयोगाने केलेली शिफारससुद्धा महत्त्वाची आहे. यानुसार भारतीय पुरावा कायद्यात ‘कलम ११४ ब’ आणावे, ज्याद्वारे जर एखाद्या व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला किंवा त्या व्यक्तीला मारहाण केल्याचे आढळले, तर त्या पोलीस स्थानकावर स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी टाकावी; अन्यथा त्यांना दोषी मानावे. यासाठी २०१७ साली विधेयक दाखल केले, पण अजूनही कायदा झालेला नाही. आजकाल हे प्रकार देशभर घडत आहेत. २०१३ साली महाराष्ट्रात या प्रकारे ३५ जण मृत्युमुखी पडले होते, तर त्याच्या आधी म्हणजे २०१२ साली २४ जणांचा याप्रकारे बळी गेला होता. जे आपले महाराष्ट्र राज्य पुरोगामी संस्कार सांगणारे आहे, असे आपण नेहमी म्हणतो त्याच महाराष्ट्रात पोलिसांच्या कोठडीत मृत्युमुखी पडणार्यांची संख्या लक्षणीय आहे. भारतात १९९९ ते २०१३ दरम्यान एकूण १,४१७ लोक पोलिसांच्या कोठडीत मेले. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात ३३३ बळी गेले होते.
हे प्रकार फक्त ग्रामीण भागात घडतात, असे समजण्याचे कारण नाही. ऑक्टोबर २०१२ मध्ये भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस चौकीत सागिर कुरेशी या २० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ऑक्टोबर २०१३ मध्ये मुंबईतील गोरेगाव येथे भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात चोरी करताना मनोज साळवे (वय २२) व प्रकाश चव्हाण (वय २३) या दोन तरुणांना पोलिसांनी पकडले होते. त्यांना अटक करून जवळच्या वनराई पोलीस चौकीत नेले होते. यात मनोज साळवेचा मृत्यू झाला. पोलिसांनी या मृत्यूची ‘पोलीस कोठडीत झालेला मृत्यू’ अशी नोंद केली. हे तपशील बघितले म्हणजे, हा प्रकार फक्त ग्रामीण महाराष्ट्रात घडतो असे नाही हे स्पष्ट होईल. म्हणूनच अशा प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हा प्रकार फक्त भारतातच घडतो असेही नाही. अमेरिका किंवा कॅनडासारख्या प्रगत देशांतही अनेक प्रसंगी पोलीस दल कायदा स्वतःच्या हातात घेतात व अटक केलेल्या कैद्याला बेदम मारतात. अलीकडेच अमेरिकेत जॉर्ज फ्लॉएड या निग्रो तरुणाला पोलिसांनी दिवसाढवळ्या भररस्त्यात जीवे मारले. मात्र, प्रगत पाश्चात्त्य देशांत असा प्रकार घडला तर त्याला जबरी शिक्षा असते. दुसरे म्हणजे, अशा गुन्ह्याचे खटले लवकर निकालात काढतात. आपल्या देशात मात्र या दोन्ही आयामांबाबतीत कमालीचे औदासिन्य आहे. म्हणूनच आपल्याकडेच पोेलीस दलांचे आयतेच फावते. आपल्या देशात एक तर मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहेे. याचा जोडीला कमालीचे दारिद्-य आहे.
अशा लोकांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था असतात. यातील काहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. या संस्थांच्या वार्षिक अहवालात कोणत्या देशात किती लोकांना पोलीस कोठडीत मृत्यू आला वगैरे तपशील नावानिशी असतात. त्यामुळे ‘पोलीस कोठडीत झालेला मृत्यू’ हा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय गंभीर घटना समजली जाते. १९८४ साली संयुक्त राष्ट्रसंघाने पोलीस कोठडीत कैद्यांच्या होत असलेल्या छळांबद्दल करार संमत केला होता. यावर्षी त्या कराराला ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताने हा करार तेव्हाच मान्य केला होता. असे असूनही आपल्या देशात पोलीस कोठडीत होणार्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. आपल्या देशात या प्रकाराबद्दल १९८०च्या दशकात ओरड सुरू झाली होती. बिहारमधील भागलपूर येथील तुरुंगात पोलिसांनी कैद्यांचे डोळे फोडले होते. या आधारे प्रकाश झा यांनी ‘गंगाजल’ हा चित्रपट काढला होता. हे प्रकरण तेव्हा फार गाजले. आता याला सुमारे ४० वर्षे झाली आहेत. तरी परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. भागलपुरबद्दल एक प्रकारचे समर्थन दिले जात असे. पोलिसांनी ज्यांचे डोळे फोडले, त्यातील अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होते. ते कायद्यातील त्रुटींचा फायदा उचलत, यासाठी त्यांच्या मदतीला निष्णात वकिलांची फौज उभी असते. याप्रकारे ते कुप्रसिद्ध गुन्हेगार सतत तुरूंगाच्या बाहेर राहत असत. जेव्हा पोलिसांनी त्यांचे डोळे फोडले, तेव्हा समाजात फारसे कोणाला वाईट वाटले नव्हते. पोलिसांनी केलेल्या छळाचे समर्थन करताच येत नाही. मात्र, आता तरी भारताने याबद्द़ल काही तरी ठोस उपाययोजना केलीच पाहिजे. जर अशी यंत्रणा लवकरात लवकर तयार केली नाही, तर तामिळनाडूसारख्या लांच्छनास्पद घटना घडतच राहतील.