मालवणी रंगभूमीचा राजा

05 Jul 2020 18:38:37


liladhar kambli_1 &n



मालवणी रंगभूमी गाजविणारे अभिनेते लीलाधर कांबळी यांच्या निधनाने रंगभूमीच्या या विशाल कालखंडाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...


खरंतर आजच्या काळातदेखील नाटक ते चित्रपटसृष्टी हा तसा खडतर प्रवास. कोणीतरी रंगमंचाला ‘जादूचा पेटारा’ म्हटलंय. या रंगभूमीने अनेक प्रतिभावान कलाकार घडविले. रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून लहान-मोठ्या भूमिका अनेक कलाकार करत असतात. परंतु, मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ वावरणारे आणि अभिनयाला भाषा तसेच माध्यमांच्या पलीकडे नेणारे काही कलाकार असतात जे आपल्या भूमिका अजरामर करतात. असेच मराठी रंगभूमीत मालवणी रंग भरणारे अभिनेते लीलाधर कांबळी.

९ मे, १९३७रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात रेवंडी येथे लीलाधर कांबळी यांचा जन्म झाला. १९५५ साली कांबळी दहावीची परीक्षा देऊन मुंबई पोर्ट ट्रस्टमधील स्टोअर डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागले. १९९२ साली ते सेवानिवृत्त झाले. मात्र, याच दरम्यान त्यांच्या नाट्यप्रवासाचा श्रीगणेशा झाला. ‘हसवा फसवी’ हे दिलीप प्रभावळकरांचे सहा भूमिका असणारे रंगभूमीवरील गाजलेले नाटक. याच नाटकातील ‘वाघमारे’ ही व्यक्तिरेखा लीलाधर कांबळींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर खुलविली आणि ‘रिप्लेसमेंट’ म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं केलं. व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांचा जन्म या ‘रिप्लेसमेंट’मधूनच झाला आणि मिळालेली प्रत्येकच भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. पुढे अशीच एक संधी कांबळी यांच्यासमोर चालून आली ती कलावैभव संस्थेच्या ‘नयन तुझे जादूगार’या नाटकाच्या दौर्‍यादरम्यान. या संस्थेत कांबळी व्यवस्थापक म्हणून काम पाहत. या नाटकात काम करणारे कलाकार जयंत सावरकर यांना चिपळूण येथील प्रयोगात सहभागी होता येणार नव्हते. अशावेळी त्यांच्या जागी ‘कलावैभव’ नाट्यसंस्थेचे निर्माते मोहन तोंडवळकर यांनी नाटकात कांबळी यांना उभे केले आणि ही भूमिकादेखील कांबळी यांनी समर्थपणे वठविली. ‘काचेचा चंद्र’ या नाटकातही काही काळ ‘रिप्लेसमेंट’ म्हणून भूमिका केली. लीलाधर कांबळी यांनी तीसहून अधिक नाटकांत भूमिका केल्या. मात्र, रंगभूमीवर अजरामर झाल्या त्या ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ या व्यक्तिरेखा... या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या नाटकांचे विदेशातदेखील प्रयोग झाले.




या अस्सल मालवणी अवलिया अभिनेत्याने केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनादेखील आपल्या अभिनयाने भुरळ घातली. यास कारण ठरले ते ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ या इंग्रजी भाषेतील नाटकात कांबळी यांनी साकारलेले ‘डिकास्टा’ हे पात्र. या नाटकाने तब्बल २०० प्रयोगांचा टप्पा पार केला. एका मुलाखतीत ते म्हणतात, ज्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या त्यात मी जीव ओतून काम केले. प्रत्येक भूमिका समरसून केली. विनोदी भूमिका करतानाही ती कुठेही अश्लीलतेकडे झुकणार नाही याची काळजी घेतली. वेडेवाकडे चाळे किंवा अंगविक्षेप न करताही अभिनयाच्या सामर्थ्यावर ती भूमिका जीवंत करता येते. आजही अनेक ओळखीचे आणि अनोळखीही प्रेक्षक जेव्हा भेटतात आणि तुमचे काम आम्ही पाहायचो, आम्हाला आवडायचे, तुमच्या देहबोलीतून किंवा फक्त बोलण्यातून तुम्ही सहज विनोद निर्मिती करायचात, असे जेव्हा सांगतात तेव्हा आनंद तर होतोच, पण प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे मन भरून येते.


पुढे कांबळी यांनी रंगभूमीसोबतच ‘भाकरी आणि फूल’, ‘गोट्या’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’, ‘पाऊस मृगाचा पडतो’, ‘पोलिसातला माणूस’, ‘गिनीपिग’, ‘हसवणूक’, ‘मेवालाल’, ‘नव्हे जासूस’, तसेच ‘कॉमेडी डॉट कॉम’ या हिंदी व मराठी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही काम केले. ‘बे दुणे तीन’ ही मालिका खूप लोकप्रिय ठरली आणि या मालिकेमुळे कांबळी यांना ओळख मिळाली. छोट्या पडद्यावरील त्यांच्या भूमिकांबरोबरच मोठ्या पडद्यावरील भूमिकांवरदेखील रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. त्यांच्या भूमिका असणारे ‘सिंहासन’, ‘हल्लागुल्ला’, ‘रंगत संगत’, ‘आई पाहिजे’, ‘सारेच सज्जन’, ‘जिगर’, ‘वन रूम किचन’, ‘बरखा सातारकर’, ‘प्राण जाये पर शान न जाये’, ‘श्वास’, ‘बीज’ (हिंदी), ‘सविता बानो’, ‘हंगामा’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.




मनोरंजनाच्या नाट्य, दूरचित्रवाणी व चित्रपट या तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार्‍या या बहुरंगी कलाकाराला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यसंपदा’ पुरस्कृत ‘शंकर घाणेकर स्मृती पारितोषिक’, लीला मेहता पुरस्कृत ‘रंगदेवता’, चिंतामणराव कोल्हटकर यांच्या नावाचे पारितोषिक, प्रभाकर पणशीकर स्मृती राज्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘पडदा उघडण्यापूर्वी’ हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र (शब्दांकन-महेंद्र कुरघोडे) ‘रूपरंग’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. यात त्यांनी आपल्या संपूर्ण नाट्य कारकिर्दीचा पट उलगडला आहे. कांबळी यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्यासह सतीश दुभाषी, दिलीप प्रभावळकर या दिग्गज अभिनेत्यांच्या सोबतीने मराठी रंगभूमीचा इतिहास अगदी जवळून अनुभवला होता. अशा या अस्सल मालवणी अभिनेत्याचा वयाच्या ८९वर्षी कर्करोगाशी झुंज देत प्रवास थांबला. मालवणी रंगभूमीचे नाट्येपासक अभिनेते लीलाधर कांबळी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भावपूर्ण श्रद्धांजली...!
 
 
Powered By Sangraha 9.0