लोकमान्य टिळकांचा ग्रंथपरिचय

31 Jul 2020 13:01:42
Lokmany 16_1  H






लोकमान्य टिळकांनी बर्‍याच विषयांवर संशोधन करुन त्यावर प्रबंध व नंतर ग्रंथनिर्मितीचे काम केले. यावर थोडे अक्षरधैर्य करण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. यात प्रामुख्याने टिळकांच्या ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम इन वेदाज’, ‘गीतारहस्य’, ‘वेदांग ज्योतिष’, ‘पंचांग संशोधन’, ‘ब्रह्मसूत्रवृत्ती’, ‘सांख्यकारिका’ इ. विषयांवर त्यांनी संशोधन केलेल्या क्षेत्रात त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचे व पांडित्याचे भव्य दर्शन जगास घडविले. या सगळ्या ग्रंथांचा हा थोडक्यात परिचय.


द ओरायन (वेदकाल निर्णय)
एकीकडे स्वातंत्र्यालढ्यात महत्त्वाची भूमिका निभावत असताना ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ या महत्त्वपूर्ण संशोधनावर त्यांचे काम चालू होते. ‘ओरायन’ या ग्रंथनिर्मितीची प्रेरणा श्रीमद्भगवद्गीतेच्या विभुती योगातील ‘मासानां मार्गषी मासं । ऋतुनाम कुसुमार’ या श्लोकात दडलेले आहे. यात काही तरी विशेष संदर्भ व अर्थ दडलेला आहे, असे त्यांना गीतेचे परिशीलन करताना जाणवले. मग त्या दिशेने त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. या ग्रंथाचा मुख्य विषय वेदकालाबाबतचा निर्णय व पंडितांनी त्याबाबत स्वीकारलेल्या पद्धतीची चर्चा तसेच यज्ञयागांचा काळ व वर्षारंभ हे विषय मांडले गेले आहे. या ग्रंथाची सारी भिस्त ही ‘मृगशीर्ष’ नक्षत्र काळावर होती. वेदकाळात मृगशीर्ष नक्षत्रावर वसंतऋतूत यज्ञयाग केले जास्त असे. याचा अर्थ वसंत ऋतू हा मार्गशीर्ष महिन्यात येत असावा, असा तर्क टिळकांनी ज्योतिषीशास्त्र गणितावरुन मांडला. वेदाकाळात वसंत ऋतू हा मार्गशीर्ष महिन्यात येत असे, म्हणजे वर्षारंभाचा महिना हा मार्गशीर्ष असावा, असे त्यांनी सूर्यगतीचे दाखले देऊन मांडले आहे. याशिवाय ऋग्वेद रचनेचा काल इ.स.पूर्व ५००० ठरवला आहे. लोकमान्य टिळकांनी या सिद्धांतास आणखीन ठोस आधार देण्यासाठी ऋग्वेदातील प्रजापती दृहितगम्, वृषकीयसुक्त वा श्वान कथेचा मोठ्या खुबीने उपयोग केला. या ग्रंथाच्या माध्यमातून पाश्चिमात्य विद्ववानांचा भारतीय संस्कृती बदल असलेला गैरसमज दूर होण्यास सुरुवात झाली व वैदिक साहित्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. या संशोधनामार्फत वेदांचे प्राचीनत्व खगोलीयशास्त्राचा आधार घेत सिद्ध करण्याचा प्रयास केला गेला. हा ग्रंथ इ. स. १८९३ मध्ये लिहिण्यात आला. या ग्रंथाचे मराठी भाषांतर ओगले यांनी केले. वेदकाळी भारतीय संस्कृती अत्यंत प्रगल्भ अवस्थेत होती व वेदांचे प्राचीनत्व अर्थात वैदिक साहित्य हे जगातील सर्वात प्राचीन साहित्य आहे, हे या ग्रंथाद्वारे सिद्धांत रूपाने मांडण्याचा प्रयत्न लोकमान्यांनी केला. आजच्या व तत्कालीन परिस्थिती या संशोधानास विरोध जरी झाला तरी लोकमान्यांच्या संशोधक बुद्धीची झलक या ग्रंथात दिसते.


‘आर्क्टिक होम इन वेदाज’
या महत्त्वपूर्ण संशोधन ग्रंथातील सिद्धांताचा बराच काळ व आजही आर्य- द्रविडियन थेअरीच्या वादासाठी मोठ्या धूर्ततेने उपयोग केला जातो. इ. स. १९०३ मध्ये इंग्रजी भाषेत हा ग्रंथ प्रकाशित झाला. इंग्रजी भाषेतील हा लोकमान्य यांचा दुसरा ग्रंथ. हा ग्रंथ लिहिण्याची त्यांनी घाई नाही केली. कच्चा आराखडा तयार केला होता, मात्र प्रत्यक्ष ग्रंथ १३ ते १४ वर्षांनी प्रकाशित झाला. याला एकच कारण होते. या ग्रंथात त्यांना कोणतीही उणीव ठेवायची नव्हती. यासाठी त्यांनी खगोल, भूगोल, पदार्थविज्ञान, भूगर्भ, पुरातत्त्व, गणित इ. शास्त्रांचे परिशीलन केले. विविध पुरावे आणि संदर्भ गोळा केले. प्राचीन व अर्वाचीन संशोधकांच्या सिद्धांताहून व अनुमानाहून अत्यंत वेगळी अनुमाने तर्काधारितपणे मांडली. तत्कालीन नवीन अनुमान मांडताना आर्यांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुव आहे, या अनुमानाचा आधार त्यांनी ऋग्वेदातील सातव्या मंडलातील ७६व्या ऋचेचा संदर्भ दिला आहे. यात त्यांनी उत्तर ध्रुवावर वस्ती होती, मात्र हिमप्रलयामुळे या प्रदेशात अवकळा आली. वेदात दीर्घ दिवस रात्रीचा संदर्भ मिळतो. कारण, उत्तर ध्रुवावरील वातावरण हे ऋग्वेदात वर्णिल्यासारखेच आहे. याशिवाय ऋग्वेदातील ऊषासूक्तात याचे वर्णन आले आहे, असा युक्तिवाद टिळकांनी मांडला. आठ ते दहा महिने दिवस व दोन ते चार महिने रात्र ही उत्तर ध्रुववावरील परिस्थिती आहे. या संदर्भातील ऋचा वैदिक साहित्यात मिळतात. याचा टिळकांना भक्कम पुरावाचा मिळाला त्यांचा सिद्धांत मांडण्यासाठी. असे अनेक सिद्धांत लोकमान्यांनी आर्यांचे मूळस्थानामध्ये मांडले. लेख विस्तारभयाने गणितीय मांडणी अशक्य आहे. असो. हा ग्रंथ एकूण १३ विभागांत विभागला गेला आहे. तर्कशुद्ध मांडणी व ती शास्त्रीय पद्धतीची असल्यामुळे एक विशेष महत्त्व या ग्रंथास प्राप्त झाले. या ग्रंथातील भाषेचे गोडवे ‘पायोनिअर’सारख्या विख्यात वर्तमानपत्राने गायले आहेत. खरंच यातील भाषा सरळ, सुरस आणि शुद्ध असल्यामुळे तो अधिकच आकर्षक बनला आहे. मात्र, यातील मांडलेल्या अनुमास भारतीय विद्वानांनी असहमती दर्शिवली. विरोधकांचा संशोधन पद्धतीबद्दल मतभेद आहे. ऋचांच्या अर्थाबद्दल मतभेद नाही, मात्र वस्तिस्थानाबद्दल मतभेद होता. विद्वानांच्यात असे मतभेद असायचेच!

‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ हे दोन ग्रंथ लोकमान्य टिळकांनी इंग्रजीत लिहिले. कारण म्हणजे, आर्य संस्कृतीचे व वेदांचे प्राचीनत्व पाश्चिमात्य संशोधकास कळून येईल व याविषयी जगात चर्चेस आरंभ तरी व्हावा म्हणून! या दोन ग्रंथामुळे वैदिक वाड्.मय हे जगातील ज्ञात असे सर्वात प्राचीन वाड्.मय आहे. मानवांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर वेदांएवढे प्राचीन व महत्त्वाचे दुसरे साधन नाही, हे जगास हळूहळू कळू लागले.


पंचांग संशोधन
‘गणित’ हा लोकमान्य यांचा आवडता विषय. मुळात ते जात्याचे गणितज्ज्ञच! याचे दर्शन त्यांच्या ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ या ग्रंथातील अनुमान, तर्क व खगोलीय गणिताच्या आधारे मांडले आहे. पंचांग चळवळीचे प्रणेते केरुनाना छत्रे होत. त्याकाळी ‘सायन’ व ‘निरयन’ हा वाद खूप गाजला. टिळकांनी पंचांगात कमीकमी उणिवा असाव्यात, पाश्चिमात्य अत्याधुनिक ज्ञानाचा व साधनांचा फायदा घेत ग्रहांचा अचूक वेध घ्यावा, ‘सायन’ आणि ‘निरयन’ या विद्वानांमधील मतभेद गणितीय शास्त्राच्या आधारे व तडजोडीतून मिटावे व नवीन पंचांग तयार व्हावे, असे त्यांचे मत होते. जुन्या व नवीन मताचा समन्वय साधत त्यावर तिसरा तोडगा काढायचा, हा नेहमीचा बाणा त्यांच्या पंचांग संशोधन चळवळीतून दिसून येतो. चंद्र व सूर्य गणिताप्रमाणे आकाशात दिसतील, तर गणित खरे नाही तर खोटे, असा विचार ‘केसरी’तून मांडून दोन्ही मतात समन्वय साधला. त्यांना परंपरागत ज्योतिषज्ञानाचा अभिमान होताच. मात्र, त्यांना असे वाटत होते की, ग्रहगोलांचे अनुमान नवीन ज्योतिषशास्त्रासमोर टिकाव धरणार नाही. म्हणून त्यांनी दृकप्रत्ययाला जुळणारे पंचांग तयार करण्याचे ठरवले. त्याला परंपरागत ज्योर्तिगणिताचा आधार, दृकप्रत्ययनिष्ठा, परंपरा अभिमान व संशोधक वृत्तीने हे पंचांग तयार केले. तेच पुढे ‘टिळक पंचांग’ म्हणून ओळखले जाऊ लागले.


खाल्डीयन वेद
एकोणिसाव्या शतकातील आजचे इराक (पूर्वीचे मेसापोटोमिया) या देशात विभिन्न अक्षर कोरलेल्या विटांचे ढिगारे सापडले. या विटांमधील धार्मिक साहित्याचे संकलन करून (खाल्डीयन वेद) या नावाने प्रसिद्ध आहेत. या वरुन तत्कालीन विद्वावांनाकडून असा तर्क मांडण्याता आला की, युफ्रेटिस नदीच्या मुखाकडील प्रदेशात जी वस्ती आहे, ती तुराणींची आहे. ते समुद्र मार्गी उत्तर आशियातून इ. स. पूर्व ५००० मध्ये आलेले आहेत. टिळकांनी त्यांच्या ‘ओरायन’ या ग्रंथात वैदिक काळसुद्धा तेवढाच जुना आहे म्हणून तर्काधारीत अनुमान मांडला होता. यामुळे लोकमान्य टिळकांची संशोधक नजर दोन संस्कृतीच्या साम्यस्थळांवर पडली. यासाठी त्यांनी अथर्ववेदातील पाचव्या कांडातील सर्प विषनाशन सूक्तातील दुर्बोध व अर्थहीन समजले गेलेले शब्द हे ‘खाल्डीयन’ भाषेत आहेत, हे सप्रमाण दाखवले. ते शब्द म्हणजे ‘तैमत’, ‘अलिगी’, ‘विलिगी’, ‘उरूलाची’ आणि ‘ताबुव’ (नामक सर्प) हे शब्द खाल्डीयन असावेत, असा लोकमान्यांनी तर्क मांडला. खाल्डीयन वेद व भारतीय वेद यांच्यातील ‘वेदांत’ संकल्पना सारखी आहे. जसे की, विश्वाचे जलमय रूप, सप्तस्वर्ग व पातळ, विश्वरचना इत्यादी हे सर्व त्यांनी खाल्डीयन ग्रंथात नमूद केले. या अनुमानामुळे त्यांना पोथीनिष्ठ सनातनी लोकांचा रोष सहन करावा लागला.


सांख्यकारीका व वेदांग ज्योतिषी
सांख्य तत्वज्ञानवरील सर्वात जुना भाष्य ग्रंथ म्हणजे ईश्वरकृष्णांची सांख्यकारीका. याता ७० कारीका आहेत, असे लेखकाने नमूद केले. मात्र, या कारिकेच्या पाश्चिमात्त्य भाषेतील भाषांतरामध्ये ६९ कारीका आहेत, हे लोकमान्य यांच्या लक्षात आले. ती गहाळ झालेली कारीका कोणती, याचे संशोधन सूक्ष्मपणे सुरू झाले व शेवटी अभ्यासांती ती कारीका ही बासष्टावी कारीका होय, हे त्यांनी सिद्ध केले. तसेच मागचा व पुढचा संदर्भ देत, एका नवीन कारीकेची रचनासुद्धा केली. यावरुन लोकामान्य टिळकांचा या तत्वज्ञानबद्दलचा व्यासंग किती जबरदस्त होता, हे लक्षात येते.


‘वेदांग ज्योतिष’ हा शंभर पानी प्रबंध प्रारंभी सादर करण्यात आला. ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ या ग्रंथात ज्योतिषीशास्त्रातील गणिताची उत्पत्ती मांडण्यात आली, मात्र मांडणी करत असताना या ग्रंथलेखकाला १२ श्लोकांचा अर्थ लावता आला नाही. हे लोकमान्यांच्या लक्षात आले व त्यांनी तो अर्थ लावून दिला. तोच ‘वेदांग ज्योतिष’ ग्रंथ होय.


ब्रह्मसुत्रवृत्ती
मंडाले येथे असताना ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या पूर्वतयारीकरिता वेदांत वा प्रस्थानत्रयी अभ्यासताना प्रसंगवशात व अभ्यास म्हणून ब्रह्मसुत्रावर संस्कृतमधून काही टिपण तयार केली, तीच समोर ‘ब्रह्मसुत्रवृत्ती’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आली.



गीतारहस्य
ज्यांना कोणाला नवीन काही सांगायचे असल्यास त्यांनी गीताभाष्याद्वारे सांगावे, असा प्रघात दीर्घकालापासून आजपर्यंत भारतातील तत्वज्ञान क्षेत्रात रुढ आहे. अगदी आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर व वामन पंडित इत्यादी नावे डोळ्यासमोर येतात. ‘गीता’ ही भारतीय विद्ववतेचा मानदंड आहेच, तसेच मानवी वा हिंदूंच्या जीवनाविषयक तत्वाज्ञानची मांडणी करणारा एक अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथाचे महत्त्व तसेच सामान्य हिंदूंच्या मनातील त्याचे स्थान ओळखून या सर्वमान्य ग्रंथाचा चालू काळास अनुरूप असा अर्थ लावू शकलो, तर हे एक महत्त्वाचे संशोधन होईल, असे लोकमान्य यांना नक्कीच वाटले असेल. मंडालेत असताना या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ झाला. याच काळात त्यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचे ज्ञान मिळवून त्यातील ग्रंथांचा अभ्यास केला. तत्पूर्वी टिळकांनी कोणत्या विषयावर ग्रंथ लिहावा, यात २२ विषयांची यादी तयार केली होती. ते विषय थोडक्यात सांगून विषयाकडे वळवतो. रामायण व महाभारतापूर्वीचा हिंदुस्तान, शांकर दर्शन, हिंदू धर्मशास्त्र, छत्रपती शिवाजी राजे यांचे चरित्र, बुद्ध युग, इंग्रजी राज्यघटना इत्यादी विषयांची यादी त्यांच्या चरित्रात वाचावयास मिळते.


गीतेवरील सर्वात जुने भाष्य म्हणजे आद्य शंकाराचार्य यांचे होय. पण, ते निवृत्तीपर सांगणारे भाष्य होय. गीतेत निवृत्तीपर मोक्षमार्गाचे विवेचन नाही, असं लोकमान्य यांचे मत नाही. मात्र, ‘निवृत्तीपर मोक्ष’ हा गीतेचा मुख्यत: प्रतिपादित विषय नाही, असे त्यांचे मत होते, हे गीतारहस्यावरुन वाटते, तर गीतेचा मुख्य प्रतिपादित विषय हा ज्ञानयुक्त भक्तिप्रधान कर्म केल्यास मोक्ष मिळतो, हे त्यांनी साधार ठाणकावून व ठामपणाने तर्काच्या टोकावर मुद्द्यांच्या प्रमाणबद्ध मांडणीद्वारे गीतारहस्यात मांडले. ‘गीता’ या ग्रंथाकडे सांप्रदायिक वा पंथनिष्ठ नजरेतून न पाहता, ज्या परिस्थितीत या ग्रंथाची निर्मिती झाली, ती परीस्थिती लक्षात घेऊन या ग्रंथाचे तात्पर्य हे निवृत्तीपर नसून निष्कामकर्मपर आहे, हे लोकमान्य टिळकांनी रहस्यात सांगितले. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. धर्म व व्यवहार यांचा अपूर्व असा समन्वय रहस्यात मांडला आहे. नितिशास्त्राचे तुलनात्मक विवरण गीतेच्या आधारे केले आहे. वेदातील तत्वज्ञान व्यवहारपयोगी करण्याचा प्रयत्न रहस्याच्या माध्यामातून झाला आहे. टिळकांचा हा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ होय. या ग्रंथात एकूण १५ प्रकरणांचा समावेश असून ‘बहिरंग’ या नावाने परिशिष्ट जोडले आहे. या १५ प्रकरणांची नावे लेखविस्तार भयाने देणे शक्य नाही. जिज्ञासू अभ्यासकांनी हा ग्रंथ अवश्य वाचावा. लोकामान्य टिळकांनी अनेक वादांच्या व तर्काधिष्ठ प्रमाणांद्वारे गीतेत निष्काम कर्मयोगाचेच प्रतिपादन केले आहे व तोच मुख्य उद्देश आहे, हे सिद्ध केले.


आचार्य अत्रे या ग्रंथाबद्दल आपले अनुकूल मत प्रतिपादित करताना त्यांच्या ‘आषढस्य प्रथम दिवसे’ या ग्रंथात म्हणतात, “आधुनिक काळात गीतारहस्यासारखा ग्रंथ भारतवर्षात दुसरा झालेला आम्हाला माहिती नाही. मानवी बुद्धीचा विक्रम, तसेच विद्वता व पांडित्य यांनी लोटांगण घालावे, अशा प्रतिभेचा चत्मकार आहे. ‘ज्ञानेश्वरी’ व ‘गीतारहस्य’ हे मराठी साहित्याचे ‘शिवगंगा’ व ‘गौरीशंकर’ अशी अत्युच्च शिखरे होत.


उपसंहार
या लेखानिमित्त लोकमान्य टिळकांच्या ग्रंथांचे धावते अवलोकन करता असताना मला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन काय म्हणाले ते आठवले. ते म्हणतात, ”He was by nature a scholar and only by necessity a politician.'' हे त्यांनी केलेले वर्णन शतशः खरे आहे.


राष्ट्रीय रजकारणाचे व एवढ्या मोठ्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे राष्ट्रीय पातळीवर त्यांनी नेतृत्व करत असताना, संशोधन क्षेत्रात त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. टिळकांचे राजकारण जसे बिनतोड होते, तशीच त्यांची संशोधक वृत्ती होती. तर्कनिष्ठ स्वभाव होता. याला जेथे जेथे आव्हाने मिळाले, तेथे तेथे त्यांनी आनंदाने ते स्वीकारले, मग ते ‘ओरायन’ असो आर्यांचे मुळवस्ती स्थान वा इतिहास संशोधन असो व तत्वज्ञान क्षेत्र असो. यात त्यांची प्रकांड बुद्धिमत्ता, सखोल तुलानत्मक अभ्यास, शास्त्रानुकूल तर्क, स्वधर्म तसेच स्वसंस्कृती व जाज्वल्य राष्ट्राभिमान हे सर्व त्यांच्या संशोधनातून जाणवते. एक प्रसंग सांगून लेखास विराम देतो.


लो. टिळकांचे मित्र दादासाहेब खापर्डे एकदा म्हणाले, “इतक्या कामानंतर आपल्याला शीण न येता एवढ्या गहन विषयांकडे आपण कसे वळता?” यावर लोकमान्य म्हणाले, “राजकीय कामांचा शीण जावा म्हणून तर मी माझ्या आवडीच्या विषयांवर चर्चा करायला जातो.”



- योगेश काटे


संदर्भ:
१) न. चिं. केळकर लो. टिळक चरित्र खंड - भाग १,२,३
२) केसरीची त्रिमुर्ती :- पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचा लेख
३) अर्धशतकसंवात्सरीक पुण्यतिथी विशेषांक
४) लोकमान्य व्यक्ती व कार्य - ग. प्र. प्रधान
५) लो. टिळकांची भाषा शैली - ग. वि. केतकर
६) गीतारहस्य : लोकमान्य टिळक
७) लोकमान्य टिळक व्याख्यानमाला : न. र. फाटक
८) भगवद्गगीतेचे तीन टीकाकार - वि. रा. करंदीकर
९) आषाढस्य प्रथम दिवसे प्र. के. अत्रे. संकलक - व. ब. आगाशे
१०) वैदिक संस्कृतीचा विकास - तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी
११) टिळकांचे धार्मिक विचार - न. चिं. केळकर





Powered By Sangraha 9.0