धनुर्धारी सातारकर प्रवीण जाधव

03 Jul 2020 22:18:53


pravin jadhav_1 &nbs

खाशाबा जाधव आणि ललिता बाबर यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार्‍या तिसर्‍या सातारकर आणि तिरंदाजीमध्ये निपुण असलेल्या प्रवीण जाधवची प्रेरणादायी गोष्ट...



कोरोनामुळे टोकियोत होऊ घातलेली ऑलिम्पिक स्पर्धादेखील पुढे ढकलण्यात आली. तरीही या स्पर्धेत भारतीय झेंडा फडकवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न कायम आहे. असेच एक स्वप्न सातार्‍यामधील एका छोट्या खेड्यामधून आलेल्या प्रवीणनेही पाहिले. तिरंदाजीमध्ये प्रवीणने चांगली कामगिरी करत ऑलिम्पिकचे तिकीटही मिळवले. याचसोबत ऑलिम्पिकसाठी खेळणारा तो तिसरा सातारकर ठरला. यापूर्वी सातारा जिल्ह्यातून खाशाबा जाधव आणि धावपटू ललिता बाबर यांनीदेखील ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी कुस्तीमधील पहिले पदक जिंकले होते, तर धावपटू ललिता बाबर यांनीदेखील भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. तेव्हा आज जाणून घेऊया प्रवीण जाधवच्या जीवनसंघर्षाविषयी...
 

प्रवीण रमेश जाधव याचा जन्म ६ जुलै, १९९६ रोजी सातार्‍यामध्ये झाला. सातार्‍यामधील फलटण तालुक्यातील सरडे या छोट्या गावामध्ये त्याचे बालपण गेले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करायचे. राहायला चांगले घरही नव्हते. लहानपणी प्रवीणनेदेखील शेतामध्ये काम करून वडिलांना हातभार लावला. घरची परिस्थिती बिकट असूनही त्याने मात्र मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा निर्धार केला होता. गावामध्ये फक्त सातवीपर्यंतची शाळा. त्यात प्रवीणला लहानपणापासून खेळामध्ये रस. प्रवीणच्या या खेळातील प्रतिभेला प्राथमिक शाळेतील शिक्षक विकास भुजबळ यांनी अचूक हेरले आणि त्यांनी प्रवीणच्या प्रगतीची जबाबदारी उचलली. प्रवीणची खेळांमधील उत्सुकता पाहता, भुजबळ सरांनी त्याला शिक्षणासोबतच अ‍ॅथॅलेटिक्सचे प्रशिक्षणही देण्यास सुरुवात केली. पुढे घरातील गरिबी दूर करण्यासाठी प्रवीणने धनुष्य हातात घेतले आणि तिथून सुरु झाला, त्याचा धनुर्धारी बनण्याचा प्रवास.
 
तिरंदाजीमध्ये त्याने योग्य प्रशिक्षण घेत अनेक छोट्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. पुण्यातील बालेवाडीमधून एक वर्ष प्रशिक्षण घेतले. भुजबळ गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली प्रवीणने खेळामध्ये जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर क्रीडा प्रबोधिनीतून यश मिळवले. परंतु, यासोबतच त्याने शिक्षणही सुरुच ठेवले. अमरावतीमधील शिक्षण संकुलात त्याने बीएपर्यंतचे शिक्षण घेतले. यादरम्यान त्याने तिरंदाजी प्रशिक्षक प्रफुल्ल दंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. यावेळी त्याला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. ८०० मीटर तिरंदाजी स्पर्धेत त्याने अचूक लक्ष्य भेदली असली तरीही त्याची शरीरयष्टी अत्यंत नाजूक होती. वजन कमी असल्यामुळे रिकव्हर्स धनुष्याचे वजन उचलताना त्याला अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे त्याच्यावर अकादमी सोडण्याची वेळ आली होती. मात्र, भुजबळ यांनी तेथील शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना एक अंतिम संधी देण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पाच शॉट्सचे लक्ष्य त्याला देण्यात आले. मात्र, प्रवीणने 45 हून अधिक शॉट्स टिपत अकादमीमध्ये आपले स्थान कायम ठेवले. ही अग्निपरीक्षा पार केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
 
तिरंदाजीत लाकडाच्या धनुष्याद्वारे वर्षभराच्या सरावानंतर पहिल्याच राष्ट्रीय शालेय रिकव्हर्समध्ये चार सुवर्णपदकांची कमाई करण्याचा पराक्रम प्रवीणने केला. त्यानंतर कसून सराव करून अनेक स्पर्धांमध्ये स्वतःची अशी वेगळी छाप उमटवली. तिरंदाजीत वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. याबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक विद्यापीठस्तरीय स्पर्धा, जागतिक तिरंदाजी स्पर्धांत उज्ज्वल कामगिरी केली आहे. सहा ते सात वर्षे त्याने तिरंदाजीत स्वतःला सिद्ध केले. याचदरम्यान, ‘मेडेलिन विश्वचषक २०१६’ मध्ये सहभागी होणार्‍या भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक कर्नल विक्रम दयाल यांनी प्रवीणमधील प्रतिभा हेरली आणि त्याला भारतीय लष्करामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. तिरंदाजीतील त्याचे कौशल्य आणि स्पोर्ट्स कोटामधून त्याने सैन्यदलामध्ये हवालदार पदावर नेमणूक मिळवली. २०१६ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये त्याने पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘स्टेज-१’ मध्ये त्याने भारतीय संघासाठी पहिले कांस्यपदक जिंकले. २०१६ मध्ये मेडेलिन येथे होणार्‍या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये तो भारतीय ‘ब’ संघाचा भाग होता. २०१८ मध्ये तैपेई आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक कांस्यपदक प्राप्त केले. त्यानंतर २०१९ मध्ये नेदरलँड्स येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये सांघिक रौप्य पदक पटकावले. यामध्ये प्रवीणने चांगली कामगिरी केली होती. याच स्पर्धेमध्ये प्रवीणने सहकारी अतानू दास, तरुणदीप राय यांच्यासह उत्तम कामगिरी करत टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेमधील आपले स्थान निश्चित केले. मोलमजुरी करणार्‍या कुटुंबामध्ये जन्मलेल्या प्रवीणने कठीण प्रसंगांवर मात करत तिरंदाजी प्रकारात प्रावीण्य मिळवले. त्याने महाराष्ट्राचेच नव्हे, तर सातारा जिल्ह्याचेदेखील नाव उज्ज्वल केले आहे. राज्य शासनाच्या सन २०१७-१८च्या ‘शिवछत्रपती पुरस्कारा’ने त्याला गौरविण्यात आले. त्याच्या जिद्दीला वंदन करत पुढील वाटचालीसाठी प्रवीणला दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा...!
 
 

Powered By Sangraha 9.0