चेवांग रिंचेन यांनाही ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले. मात्र, या सैनिकांच्या शौर्याला फारसे महत्त्व देण्यात आले नाही आणि नेहमीप्रमाणे या सैनिकांची शौर्यगाथा काळाच्या पडद्यामागे दडून गेली. लेह विमानतळाच्या सीमेवर लढाईत जीव गमावलेल्या सैनिकांची स्मारके आजही आहेत. तेव्हा, त्यांच्या शौर्याला उजाळा देणारा हा लेख...
‘येथील जमीन नापीक असून खिंडी एवढ्या उंच आहेत की, केवळ उत्तम मित्र किंवा भयंकर शत्रूच येथे येऊ इच्छितील.’ या अर्थाची जी एक लडाखी म्हण आहे, ती खरोखरच या भूप्रदेशाचे वैशिष्ट्य अधोरेखित करते.
लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा यांची सहा महिने लढाई
दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांचे सार्वभौमत्व संपुष्टात आल्याने, हा प्रदेश तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरपणे ३० जून, १९४७ रोजी जम्मू आणि काश्मीरशी जोडला गेला. ब्रिटिश पॉलिटिकल एजंटाने, जम्मू आणि काश्मीरच्या महाराजांनी नियुक्त केलेल्या गिलगिटच्या गव्हर्नरांच्या हाती ३० जून १९४७ रोजी, हा प्रदेश सुपूर्द केला. या अधिकार्यांनी दि. ३१ ऑक्टोबर १९४७ रोजी कट करून, गव्हर्नरांना कैदेत टाकले. मेजर ब्राऊन यांनी या ठिकाणी ३ नोव्हेंबर १९४७ रोजी पाकिस्तानी झेंडा फडकावला आणि प्रशासन पाकिस्तानचे हाती सुपूर्द केले आणि स्थानिक टोळ्यांशी संगनमत करून, राज्यातील इतर भागांवर पाकिस्तानने ताबा मिळवला. पाकिस्तान टोळीवाले सैनिक श्योक आणि सिंधू खोर्यापर्यंत पुढे आले. त्यांचे उद्दिष्ट लेह आणि अंतिमतः संपूर्ण लडाखवर कब्जा करण्याचेच होते. लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा यांच्या नेतृत्वाखालील, राज्याच्या सैन्यातील, स्कार्दूच्या पथकाने सहा महिने किल्ला लढवला. लेहपर्यंतची पाकिस्तानची चाल प्रलंबित करण्यात यामुळे मोलाची मदत झाली.
मेजर पृथ्वीचंद, कॅप्टन खुशालचंद जोझिला मार्गे पायी आले
लेहला सैन्याच्या ३३ माणसांच्या एका प्लॅटूनचे संरक्षण होते. त्यास कुमक देण्याची इतर कोणतीच शक्यता नसल्याने, मेजर पृथ्वीचंद आणि कॅप्टन खुशालचंद ‘२ डोग्रा’ आणि राज्याच्या सैन्याच्या ‘२ प्लॅटून्स’ना घेऊन दि. १६ फेब्रुवारी १९४८ रोजी श्रीनगरहून जोझिला मार्गे पायीच रवाना झाले. हिवाळ्यात ते प्रथमच असे करत होते. ब्रिटिशांकरवी प्रशिक्षित लडाखचे पहिले अभियंत्रज्ञ सोनम नोर्बू हेही त्यांचेसोबत होते. लेह येथे धावपट्टी तयार करण्यासाठी त्यांचेपाशी १३ हजार रुपये देण्यात आले होते. ८ मार्च १९४८ रोजी ते लेहला जाऊन पोहोचले.
कर्नल चेवांग रिंचेन, महावीरचक्र अॅण्ड बार
मेजर पृथ्वीचंद यांनी ‘७ जे.अॅण्ड.के.’ लष्कर उभारण्यास सुरूवात केली. त्यात चेवांग रिंचेन नावाचा एक तरूण होता. पुढे जाऊन तो कर्नल चेवांग रिंचेन, महावीरचक्र अॅण्ड बार, सेना मेडल झाला.
सिंधू खोर्याचा तळ आणि शहर यादरम्यान धावपट्टी बांधण्याचे काम १२ मार्च १९४८ रोजी सुरू झाले. ६ एप्रिल १९४८ रोजी अत्यंत परिश्रमपूर्वक २,३०० यार्डांची धावपट्टी बांधून तयार झालेली होती. कोणत्याही मापाने हे काम अत्यंत महत्त्वाचे होते. नोर्बू यांनी रु.१०,८९१/- खर्चिले होते. उर्वरित रु. २,१०९/- त्यांनी सरकारी खजिन्यात जमा केले. ६ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी ‘विमाने आणि कुमक आता लगेचच पाठवू शकता,’ अशी विनंती करणारा एक बिनतारी संदेश पाठवला.
दि. २२ मे १९४८ पर्यंत सिंधू खोर्यातील लेहच्या बाहेरील भागातील जोझिला, कारगिल, खाल्तसी आणि थारू यावर पाकिस्तानी आक्रमकांनी ताबा मिळवला. श्रीनगरपासूनचा खुष्कीचा मार्ग आता उपलब्ध नव्हता. शत्रू लेहच्या दरवाजावर उभा होता. कुमक पुरवण्याचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. लेह आता केवळ हवाई मार्गानेच वाचवता येणार होते.
पहिल्या विमानासोबत स्वतः जनरल थिमय्या
मेजर जनरल थिमय्या यांनी एअर कमांडर मेहरसिंग, आदेशक, वायूदल, जे.अॅण्ड.के. यांना मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात पाचारण केले. लेहला वाचवण्याकरिता वायूदलाची मदत करण्याची विनंती केली. मेहरसिंग यांनी स्पष्ट केले की, ‘डाकोटा’ मालवाहू विमाने इतक्या उंचीवर चालवण्याकरिता सक्षम नाहीत. या विमानात ‘एअर प्रेशर’ कायम ठेवण्याकरिता प्राणवायू नेण्याची सोयही नाही. विमानाची १८ हजार फूटांहून अधिक उंचीवर उडण्याची क्षमताही मर्यादितच आहे. मार्गावरील हवामानाची माहिती नाही आणि तिचे भाकीतही केले जाऊ शकत नाही. त्यावेळी वायूदलाकडे मालवाहू ‘डाकोटा’ विमानाचे केवळ एकच स्क्वाड्रोन होते. ते काश्मीर आणि पूँछ भागातील इतर मार्गावरही वापरले जातच होते. त्यावर थिमय्या यांनी पहिल्या विमानासोबत स्वतः जाण्याची आणि वायूदलासोबत धोका पत्करण्याची तयारी दर्शवली. त्यावर मेहरसिंग तयार झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वतःच पहिले विमान लेहला नेण्याचा निर्णय घेतला. हा त्या दोघांमधला करार होता. त्यास मुख्यालयाकडून कोणत्याही प्रकारची अनुमती प्राप्त झालेली नव्हती. या दोन्ही सेनापतींचे त्यांनी पत्कलेल्या धोक्यांकरिता कौतुक केले पाहिजे.
वायूमार्गे प्रवासाचा एक इतिहास रचला
लेहची धावपट्टी ११ हजार फुटांवर आहे. तोपर्यंत कुणीही मालवाहू विमान एवढ्या उंचीवर उतरवलेले नव्हते. धावपट्टी एका डोंगराच्या मध्ये तयार केली होती. थोडक्यात काय तर पहिल्याच प्रयत्नात विमान नीट उतरणे गरजेचे होते. प्राणवायूची उपकरणेही नव्हती. नकाशे नव्हते. दिग्दर्शन सुविधांची (navigation) सोय नव्हती. धावपट्टीबाबतचा पूर्वानुभव नव्हता.
मेहरसिंग यांनी दि. २४ मे १९४८ रोजी उड्डाण भरले. विमानात त्यांच्यासोबत फ्लाईट लेफ्टनंट एस. डी. सिंग आणि जनरल थिमय्या होते. प्रथम १८ हजार फूट उंचीवर जाणे आणि नंतर जोझि ला, नामिक ला आणि फोटू ला या खिंडी पार करत ते लेहला उतरले. वायूमार्गे प्रवासाचा एक इतिहासच घडत होता.
नंतर 1 जून रोजी एअर कमांडर मेहरसिंग हे सहा ‘डाकोटा’ विमानांचे एक पथकच घेऊन गेले. त्यात ‘गुरखा रायफल्स’ची एक कंपनी होती. आवश्यक सामान आणि दारुगोळाही होता. धावपट्टीनजीकच हे सर्व सामान खाली टाकूनच, एअर कमांडर मेहरसिंग यांनी धावपट्टीवर पहिले विमान उतरवले. इतर विमानेही मग त्याचप्रमाणे आली. लेहला कुमक मिळाली. उतरल्यावर ताबडतोब गुरखा कंपनीने आक्रमकांना थांबवण्यासाठी पश्चिमेकडे कूच केले. स्थानिक लोकांनी स्वयंचलित मोटारकार यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते, मग विमान पाहणे तर सोडूनच द्या. त्यांनी तत्परतेने ’उडत्या घोड्यांकरिता’ चारा आणला!
जोझि ला, द्रास आणि कारगील शत्रूच्या हाती गेले होते. खुष्कीचा केवळ एकच मार्ग आता आपल्याला उपलब्ध होता. तो म्हणजे हिमाचल प्रदेशच्या रोहतांग खिंडीवाटे मनालीपर्यंतचा. हे अंतर ४७५ किलोमीटरचे होते. मेजर हरिचंद यांच्या नेतृत्वाखालील ‘२/८ गुरखा रायफल्स’ कंपनीस २८ मे १९४८ रोजी पंजाबमधील फिरोझपूरहून मनालीपर्यंत हलवण्यात आले. १५१ सैनिक, ६०० रायफल्स आणि दारुगोळा यांसह ती कंपनी सर्व उपलब्ध हमाल आणि घोडे यांना घेऊन निघाली. १७ हजार फूट उंच चढून; बाराल चा, लाचुलुंग आणि टँगलांग खिंडी पार करत, ५ जुलै १९४८ रोजी लेहला नऊ दिवस चालून पोहोचली.
कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट कर्नल एच. एस. परब यांच्या नेतृत्वाखालील ‘२/८ गुरखा रायफल्स’ कंपनी फिरोझपूरहून श्रीनगरला १७ ऑगस्ट रोजी हलवण्यात आली.
कर्नल परब लडाखचे लष्करी गव्हर्नर नियुक्त
वायूमार्गे नेण्यापूर्वी लेफ्टनंट कर्नल परब यांना लडाखचे लष्करी गव्हर्नर नियुक्त करण्यात आले होते. जनरल थिमय्या यांचा त्यांना हुकूम होता की, “तुम्ही कोणत्याही किमतीत लेहचे संरक्षण करा.”
आणखी कुमक (रि-एन्फोर्समेंट्स) आणि रसद (सप्लाईज) त्यानंतर वायूमार्गे उतरवली गेली किंवा रोहतांग खिंडीमार्गे पायी पोहोचवण्यात आली. लेह वाचवण्यात आले. शत्रू नंतर मागे हटवला गेला. दि. १ नोव्हेंबर १९४८ रोजी जोझि ला ताब्यात आली आणि २३ नोव्हेंबर १९४८ रोजी कारगील. कर्नल परब यांचे सैनिक लेहपासून पुढे सरकतच होते. जोझि लाकडून येणार्यांना ते २४ नोव्हेंबर १९४८ रोजी जाऊन मिळाले. १ जानेवारी १९४९ रोजी युद्धबंदी झाली.
या धाडसी लोकांनी वाचवले लडाख
एअर कमांडर मेहरसिंग यांना ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले. ऑगस्ट १९४८ मध्ये वायूदलातून त्यांनी राजीनामा दिला आणि नंतर ११ मार्च रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
जनरल थिमय्या पुढे चीफ-ऑफ-आर्मी स्टाफ झाले. लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा यांना स्कार्दूच्या बचाव पराक्रमार्थ ‘महावीर चक्र’ , मेजर हरीचंद आणि कॅप्टन खुशालचंद यांनाही शौर्याकरिता ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले.
चेवांग रिंचेन यांनाही ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले. मात्र, या सैनिकांच्या शौर्याला फारसे महत्त्व देण्यात आले नाही आणि नेहमीप्रमाणे या सैनिकांची शौर्यगाथा काळाच्या पडद्यामागे दडून गेली. लेह विमानतळाच्या सीमेवर लढाईत जीव गमावलेल्या सैनिकांची स्मारके आजही आहेत. देशाने या शूर सैनिकांचा सन्मान करण्याकरिता तेथे युद्ध स्मारक बांधणे जरुरी आहे.