सोन्याच्या तस्करीमागील नेमके सूत्रधार कोण?

13 Jul 2020 20:53:03
kerala-gold-smuggling-sca






सोन्याच्या तस्करीमुळे केरळमधील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. त्यावरून आपली गेलेली अब्रू झाकण्यासाठी तेथील डाव्या सरकारकडून विरोधकांवर खोटेनाटे आरोप करण्याचे प्रयत्नही होत आहेत. त्यामुळे केरळ सरकारची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली आहे.


अलीकडील काळामध्ये सोन्याच्या तस्करीच्या बातम्या फारशा चर्चेत नसल्या तरी सोन्याची तस्करी पूर्णपणे थांबली, असा त्याचा अर्थ मुळीच नाही. अजूनही कमी-जास्त प्रमाणात सुवर्ण तस्करी होत असतेच. केरळमध्ये अलीकडेच सोन्याच्या तस्करीचे जे प्रकरण उघडकीस आले, त्यामुळे केरळमधील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. या सोन्याच्या तस्करीवरून केरळमधील डाव्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे कार्यालय गुंतले असल्याचे आरोप त्या राज्यातील विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या सुवर्ण तस्करीचे गांभीर्य ओळखून या सर्व प्रकरणाचा तपास सीमा शुल्क विभागाकडून आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपास दिला जाताच या प्रकरणातील संशयित पी. एस. सरीत, स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांना अटक करण्यात आली आहे.



केरळमध्ये सोन्याच्या तस्करीचे जे प्रकरण उघडकीस आले, ते तसे साधेसुधे नाही. या तस्करीसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या कार्यालयाचा वापर करण्यात आला. राजनैतिक दूतावासांना जे साहित्य पाठविण्यात येते, अशा साहित्यास व्हिएन्ना करारानुसार अभय देण्यात येत असते. साधारणपणे अशा ‘राजनैतिक सामग्री’बद्दल फारशा संशयाने पाहिले जात नाही. त्यातूनही संशय आल्यास संबंधित दूतावासाच्या अधिकार्‍यासमक्ष त्या सामानाची तपासणी केली जाते. याच सवलतीचा फायदा घेऊन ‘राजनैतिक सामग्री’ या नावाखाली तिरुवनंतपुरम येथील संयुक्त अरब अमिरातीच्या कार्यालयातील एका व्यक्तीच्या नावाने ३० किलो सोने पाठविण्यात आले. या सोन्याचे बाजारमूल्य १५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.



संयुक्त अरब अमिरातीच्या कार्यालयातील प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केलेला सरीत कुमार हे सामान घेण्यासाठी विमानतळावर गेला असता, त्याला अटक करण्यात आल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले. या तस्करीशी स्वप्ना सुरेश नावाच्या तरुणीचा जवळचा संबंध असल्याची माहिती उघड झाली. ही स्वप्ना सुरेश तिरुवनंतपुरम येथील संयुक्त अरब अमिरातीच्या कार्यालयाशी संबंधित होती. नंतर ती केरळ सरकारच्या सेवेत गेली असली तरी तिची तेथे ऊठबस असल्याची चर्चा आहे. स्वप्ना सुरेश नावाची तरुणी जरी केरळ सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या अखत्यारित असलेल्या एका उद्योगात व्यवस्थापक पदावर सेवेत असली, तरी तिचे हात खूप वरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती उघड झाली आहे. केरळमधील सत्तारूढ राजकीय नेत्यांसमवेतची स्वप्ना सुरेश हिची छायाचित्रेही प्रकाशित झाली आहेत.


स्वप्ना सुरेश हिचा या सर्व प्रकरणात असलेला हात लक्षात घेता, या प्रकरणामध्ये केरळच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आणि माहिती-तंत्रज्ञान खात्याचे सचिव एम. शिवशंकर यांच्याकडे संशयाची सुई रोखली गेली. त्यांच्या नावाची चर्चा होताच त्यांना पदावरून दूर सारण्यात आले. पण, एवढ्यावरच हे प्रकरण शमले नाही. या सुवर्ण तस्करीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा हात असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. हे प्रकरण लक्षात घेऊन मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, स्वप्ना सुरेश हिला सेवेत घेतल्यासंदर्भात आपणास काहीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र, विरोधकांचा त्यावर विश्वास नाही. स्वप्ना सुरेश या तरुणीस मुख्यमंत्री २०१७ पासून ओळखत होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे, तर काँग्रेसने या प्रकरणात केवळ प्रशासकीय अधिकार्‍यास दूर करून चालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जो ‘सौरऊर्जा घोटाळा’ झाला होता, त्याची पुनरावृत्ती या सुवर्ण तस्करीमुळे झाली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केला आहे. सौरऊर्जा घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी सरिता नायर होती. त्यावेळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांनीही, आपला आणि सरिता नायर हिचा काहीही संबंध नसल्याचे सांगून हात वर केले होते. त्याचीच पुनरावृत्ती याही प्रकरणात झाली आहे, असे भाजपने म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आल्यानंतर त्या यंत्रणेने स्वप्ना सुरेश, संदीप नायर यांना आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यांना बंगळुरू येथून अटक करण्यात आली. हे दोघे केरळमधून बंगळुरू येथे कसे काय गेले, याबद्दलही केरळ सरकारकडे बोट दाखविले जात आहे. ‘कोविड-१९’मुळे केरळमध्ये अत्यंत कडक निर्बंध असताना सरकारचा ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय हे संशयित बंगळुरू येथे जाणे शक्यच नाही, असे आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहेत.



सुवर्ण तस्करीशी आपला काही संबंध नसल्याचे तिरुवनंतपुरम येथील अमिरातीच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी सरकारला सर्व ते सहकार्य करण्याची तयारीही दूतावासाने दर्शविली आहे. या दूतावासात प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केलेला सरीत कुमार, स्वप्ना सुरेश, संदीप नायर आणि शारजा येथील फाजील फरीद या चौघांची नावे या प्रकरणात गोवण्यात आली आहेत. पदावरून दूर करण्यात आलेल्या मुख्य सचिव एम. शिवशंकर यांचे आणि स्वप्ना सुरेश हिचे निकटचे संबंध असल्याची चर्चा आहे. ‘राजनैतिक सामग्री’च्या नावाखाली सोन्याची ही जी तस्करी करण्यात आली, त्या सोन्याच्या विक्रीतून जो पैसा मिळणार होता, तो देशामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरण्यात येणार होता, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे.


दरम्यान, केरळमध्ये जे तस्करीचे सोने सापडले, त्या सोन्याचा रंग ‘लाल’ असल्याचा आणि त्या तस्करीमध्ये मुख्यमंत्री कार्यालय गुंतले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. भारत सरकार या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व पाळेमुळे खणून काढेल, असे आश्वासन भाजप अध्यक्षांनी केरळच्या जनतेला दिले आहे. सोन्याच्या या तस्करीमुळे केरळमधील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. त्यावरून आपली गेलेली अब्रू झाकण्यासाठी तेथील डाव्या सरकारकडून विरोधकांवर खोटेनाटे आरोप करण्याचे प्रयत्नही होत आहेत. पण, ‘राजनैतिक सामग्री’च्या नावाखाली केरळमध्ये जी ३० किलो सोन्याची तस्करी झाली, त्यामुळे केरळ सरकारची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला असल्याने या सर्व प्रकरणामध्ये कोण आणि किती गुंतले आहे, याची माहिती नजीकच्या काळात जनतेपुढे येईलच! पण, या तस्करीच्या निमित्ताने केरळमधील लाल राजवटीचा खरा चेहरा जनतेपुढे आला आहे.





Powered By Sangraha 9.0