‘एक...दों...तीन...’ म्हणत सगळ्या बॉलिवूड कलाकारांना आपल्या तालावर नाचायला लावणार्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर, १९४८ रोजी झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पाकिस्तानचे. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान ते आपल्या व्यवसायासह भारतात स्थायिक झाले. मूळ हिंदू असलेल्या सरोज यांनी इस्लाम स्वीकारला. सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद संधू सिंग नागपाल! लहानपासूनच सरोज यांना नृत्य आणि अभिनयात रस होता. मग काय, वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘नजराना’ चित्रपटात ‘श्यामा’ हे पात्र त्यांनी साकारले.
त्यांनी नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. या विवाहाचीदेखील एक काळी बाजू होती. शाळेत जात असताना एके दिवशी त्यांच्या नृत्य प्रशिक्षक सोहनलाल यांनी सरोज यांच्या गळ्यात एक काळ्या मण्यांनी भरलेला धागा बांधला. या काळ्या धाग्याचा अर्थ लहानग्या सरोज यांना माहीतदेखील नव्हता. त्या घरी आल्यानंतर त्यांच्या घरातल्यांनी गळ्यातील काळा धागा पाहिला आणि त्यांना घरातून बाहेर काढत, त्यांचे आता लग्न झाले असल्याचे सांगितले. तेराव्या वर्षी लग्नाचा अर्थही कळत नसलेल्या सरोज ४३ वर्षीय पती सोहनलाल यांच्यासोबत राहू लागल्या. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना मातृत्व लाभले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. मुलाच्या जन्माबरोबर सोहनलाल आधीच विवाहित असल्याचे सत्य सरोज यांच्या समोर आले. दुःखाच्या डोहात बुडालेल्या सरोज यांच्या मुलाला आपले नाव देण्यास नकार देत सोहनलाल यांनी त्यांना आणखी धक्का दिला.
स्वतःचे दुःख सावरत, मुलाला एकटीने वाढविण्याचा निर्णय घेत त्या स्वतंत्र राहू लागल्या. विभक्त झालेल्या सरोज यांनी त्यावेळेस मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या पतीने त्यांना स्वतःसोबत साहाय्यक म्हणून काम करण्याची विनंती केली. परिस्थिती लक्षात घेऊन, सरोज यांनीही त्यांची मागणी स्वीकारली आणि त्या सोहनलाल यांच्या साहाय्यक म्हणून काम करू लागल्या. १९६२-६३च्या दरम्यान सोहनलाल यांना हृदयविकाराचा झटका आला. त्या काळात सरोजजींनी त्यांची काळजी घेतली आणि त्या पुन्हा त्यांच्या सोबत राहू लागल्या. याच काळात त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र, यावेळेसही त्यांच्या काळ्या भूतकाळाची पुनरावृत्ती झाली. मुलीच्या जन्मानंतर सोहनलाल सरोज यांच्या आयुष्यातून गायब झाले. यानंतर त्यांच्या आयुष्यात सरदार रोशन खान यांची एन्ट्री झाली. रोशन खान आधीच विवाहित होते. इतकेच नव्हे, तर त्यांना दोन अपत्येदेखील होती. मात्र, रोशन सरोज यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पहिल्या पत्नीच्या संमतीने सरोज यांच्याशी लग्न केले. सरोज आणि रोशन खान यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. रोशन आणि त्यांच्या परिवाराने सरोज यांना नुसतेच स्वीकारले नाही, तर त्यांच्या मुलांना स्वतःचे नावदेखील दिले.
दरम्यानच्या काळात सरोज खान चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाल्या. बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात आलेल्या सरोज खान यांनी नृत्यक्षेत्राची पदवी प्राप्त करून नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९७५ मध्ये गुलजार दिग्दर्शित ‘मौसम’ चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्रपणे नृत्य दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. मात्र, १९८३ मध्ये आलेल्या ‘हिरो’ चित्रपटाने त्यांना खर्या अर्थाने ओळख मिळवून दिली. १९८६च्या श्रीदेवी अभिनित ‘नगीना’ या चित्रपटातील ‘मी तेरी दुश्मन’ या गाण्याने ‘सरोज खान’ हे नाव सगळ्यांना परिचित झाले. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांची रांग लागली. ’तेजाब’, ‘खलनायक’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चालबाज’, ‘नगीना’, ‘चांदनी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘गुरु’ या चित्रपटांसह अलीकडच्या काळात आलेल्या ‘कलंक’, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शिकेची भूमिका निभावली. नृत्यदिग्दर्शनासोबतच त्यांनी काही चित्रपटांसाठी लेखनदेखील केले आहे.
४० वर्षांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी तब्बल ३८ चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले. श्रीदेवी, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, काजोल, सलमान खान, ऐश्वर्या राय, सैफ अली खान, अक्षय कुमार, आमीर खान यांसह नव्या दमाच्या कलाकारांनासुद्धा त्यांनी नृत्य शिकवले. ‘देवदास’ (२००२), ‘श्रुंगरम’ (२००६), ‘जब वी मेट’ (२००७) या चित्रपटांच्या नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘गुरु’ (२००८), ‘देवदास’ (२००३), ‘हम दिल दे चुके सनम’ (२०००), ‘खलनायक’ (१९९४), ‘बेटा’ (१९९३), ‘सैलाब’ (१९९१), ‘चालबाज’ (१९९०), ‘तेजाब’ (१९८९) या चित्रपटांसाठी त्यांना ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाले आहेत. ‘वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया’ या चित्रपटासाठी त्यांना ‘अमेरिका कोरियोग्राफी अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. चित्रपटांसह सरोज यांनी अनेक टीव्ही शोमध्ये परीक्षकाची भूमिका निभावली आहे. वयाच्या ७१व्या वर्षीदेखील त्या चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. ३ जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. दै. 'मुंबई तरुण भारत'कडून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!