या राम आणि कृष्णाचं काय बरं करावं?

05 Jun 2020 21:45:36

ram and krishna_1 &n



इस्लामच्या असह्य रेट्यासमोर हिंदू पराभूत झाले, पण संपले नाहीत. काय होती त्यांची नि त्यांच्याबरोबर पाय रोवून उभ्या राहिलेल्या समाजाची प्रेरणा? ती होती रामायण-महाभारताची प्रेरणा!



संध्याकाळ व्हायची. अंधार पडायचा. रात्रीची जेवणं व्हायची. आजी किंवा आजोबांच्या भोवती नातवंडांचा वेढा पडायचा. गोष्ट सांगा, म्हणून तगादा सुरू व्हायचा. मग थोडे आढेवेढे घेत आजी-आजोबा गोष्ट सांगायला सुरुवात करायचे. कधी रामायण-महाभारताची, कधी राजा-राणीची, कधी पंचतंत्रातली, कधी इसापनीतीतली, कधी आटपाट नगराची, तर कधी एक हजार एक रात्रींची. मुलं तर या गोष्टी ऐकत असायचीच, पण मोठी माणसंही कामं उरकता-उरकता ऐकत असायची. आता बदललेल्या काळात हेच कथानक असं घडतं- संध्याकाळ होते. शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय इत्यादी आटपून एकेक जण घरी येतो. साधारणपणे स्वतःच स्वतःचं ताट वाढून घेतो आणि दूरदर्शनसमोर डेरेदाखल होतो. रात्री उशिरापर्यंत मालिका पाहणं सुरू राहतं. यात लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळेच सामील असतात. म्हणजेच कुटुंबातल्या कुणीतरी वडिलधार्‍या व्यक्तीने कथाकथन करण्याऐवजी, मालिकेचे लेखक-दिग्दर्शक एकाच वेळी लाखो कुटुंबांना कथा सांगत असतात, तीदेखील दृश्य स्वरुपात आणि नुसत्या श्रवणापेक्षा दृश्याचा परिणाम जास्त प्रभावी असतो. दुर्दैवाने आपल्याकडच्या बहुसंख्य मालिका या अत्यंत सामान्य दर्जाच्या असतात. परंतु, यातला अधोरेखित करण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की, गोष्ट किंवा कथा ऐकणं अगर पाहणं हे प्रत्येक माणसाला आवडतं, मग तो कोणत्याही वयाचा असो.




याचाच पुढचा भाग असा की, माणूस हा अनुकरणशील असल्यामुळे त्याच्या मनावर प्रभाव पाडलेल्या कथेचं तो नकळत किंवा कळूनदेखील अनुकरण करतो. याचं रोज दिसणारं उदाहरण म्हणजे बहुसंख्य तरुण आणि तरुणी आपल्या आवडत्या हिरो किंवा हिरॉईनचं अनुकरण करताना दिसतात. दूरदर्शनच्या प्रारंभीच्या वर्षांमधल्या बातम्या वाचणार्‍या बायका, माना वेळावत, लाडे-लाडे बोलत बातम्या द्यायच्या. हा प्रकार इतका लोकप्रिय झाला होता की, तशा पद्धतीने बोलण्याची फॅशनच बोकाळली होती. असो. तर कथा किंवा गोष्ट या विषयाचा माणसाच्या मनावर चटकन् पडणारा प्रभाव लक्षात घेऊन, लोकनेत्यांनी वेळोवेळी त्याचा सामाजिक उत्थानासाठी योग्य वापर करून घेतलेला आहे. १९३७साली चिमुकल्या जपानने चीनवर आक्रमण करून, अवाढव्य चीनचा चक्क पराभव केला. चिनी जनमत संतप्त झालं. पण, चीन राजकीयदृष्ट्या असंघटित होता नि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर जपानपेक्षा खूपच मागासलेला होता. अशा वेळी चिनी नेत्यांनी यू आणि वू या प्राचीन गोष्टीला नव्याने उजाळा देऊन चिनी जनतेचं नीतिधैर्य टिकवून धरलं. काय होती ही गोष्ट?




इसवी सन पूर्व पाचव्या शतकात यू आणि वू नावाची राज्यं होती. वूने यूवर आक्रमण करून यूचा राजा गौजियान याचा साफ पराभव केला आणि त्याला हाकलून दिलं. वनवासात पडलेल्या गौजियान राजाने हिंमत सोडली नाही. त्याने अत्यंत परिश्रमाने सैन्य, युद्धसाहित्य, संघटन उभं केलं. यात कित्येक वर्षे गेली. पण, अशा संपूर्ण तयारीनिशी गौजियानने वू विरुद्ध युद्ध पुकारलं. त्यात तो विजयी झाला. वूला आपल्या राज्यातून काढून लावून त्याने यू देश स्वतंत्र केला. चीनच्या प्राचीन इतिहासात ही गोष्ट खरोखरच घडलेली आहे. पण, अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट म्हटल्यावर, तिच्यातले तपशील फारसे उपलब्ध नाहीत. पण, जपानने केलेल्या पराभवाचा सूड घेण्यासाठी या गोष्टीपासून लोकांना प्रेरणा द्यायची म्हटल्यावर, चिनी कथाकथकांनी या गोष्टीत अनेक तपशील भरले. गौजियान राजाचे अनेक गुण, त्याचं संघटन कौशल्य, त्याचं युद्धकौशल्य, त्याचा सततोद्योगीपणा याबद्दल सतत सांगितलं जाऊ लागलं. यातून चिनी समाजाचं नीतिधैर्य उंचावलं. तो प्रगत जपानला टक्कर द्यायला उभा राहिला.




अगदी असाच प्रकार फ्रान्स देशात ‘जोन ऑफ आर्क’ या वीरस्त्रीबद्दल आहे. ‘जोन ऑफ आर्क’ किंवा फ्रेंच उच्चारानुसार ‘ज्याँ डि आर्क’ ही फ्रान्सची स्फूर्तिदेवता आहे. ती पंधराव्या शतकात होऊन गेली. त्यावेळी फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात युद्ध सुरू होतं. इंग्लंडची सरशी होत होती. फ्रान्सचा उत्तर भाग इंग्लंडने जिंकला होता. ऑर्लिन्स या फ्रेंचांच्या महत्त्वाच्या ठाण्याला इंग्रजांचा वेढा पडला होता. अशा वेळी जोन ही एक स्त्री पुढे आली. ती कुण्या सरदार-जहांगीरदार अगर श्रीमंत व्यापार्‍याची मुलगी नव्हती, तर एका गरीब शेतकर्‍याची मुलगी होती. गरीब म्हणजे खरा गरीब, बरं का! कारण, हल्ली महाराष्ट्रातल्या ‘अधिकृत गरीब’ शेतकर्‍यांच्या मुली कायम विमानाने फिरत असतात! ही पंधराव्या शतकातली गोष्ट आहे, तर ही जोन पुढे आली आणि तिने फ्रेंच सैन्याला सांगितलं की, “मला दिव्य दृश्य दिसलं आणि देवदूताचा आवाज ऐकू आला. मला देवाचा आदेश मिळाला की, फ्रान्सच्या पवित्र भूमीवरून इंग्रजांना हाकलून द्या.’



जोनच्या या सांगण्याने फ्रेंच सैन्यात नवी वीरश्री संचारली. शिवाय असा नुसता दैवी आदेश देऊन जोन थांबली नाही. पुरुष वेष चढवून, चिलखत घालून, घोड्यावर स्वार होऊन, तलवार घेऊन ती फ्रेंच सैन्याचं नेतृत्व करीत ऑर्लिन्सच्या वेढ्यावर तुटून पडली. फ्रेंच सैनिक बेभानपणे लढले आणि इंग्रजांचा पराभव झाला. ही घटना १४२७ सालची. गेल्या साडेपाचशे वर्षांत ‘जोन ऑफ आर्क’च्या या घटनेवर असंख्य कथा, कादंबर्‍या, काव्यं, नाटकं, पोवाडे, चित्रपट निघाले आहेत आणि अजूनही निघत असतात. ‘जोन ऑफ आर्क’ची गोष्ट ही फ्रान्सच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे, असं प्रत्येक फ्रेंच नागरिक मानतो. आता १९४०साली कशी गंमत घडली पाहा. हिटलरच्या नाझी सेनांनी एका सपाट्यातच फ्रान्सचा चुराडा उडवला. जर्मनांनी फ्रान्स व्यापला. जर्मनव्याप्त फ्रान्समध्ये हिटलरने जे प्रशासन निर्माण केलं, त्याला म्हणतात ‘व्हिशी सरकार.’ या व्हिशी सरकारचा प्रमुख होता, फ्रेंच सेनापती मार्शल फिलिप पेताँ.



उलट, दुसरा एक फ्रेंच सेनापती चार्ल्स डि गॉल हा ब्रिटनमध्ये पळून गेला. त्याने तिथे स्वतंत्र फ्रेंच सरकार स्थापन केलं. व्याप्त फ्रान्समध्ये भूमिगत सशस्त्र प्रतिकार उभा करून जर्मनांना हुसकावून लावणं, हे अर्थातच त्याचं मुख्य काम होतं. यात त्याला ब्रिटनचं पूर्ण सहकार्य होतं. कारण, युद्धात जर्मनीविरुद्ध ब्रिटन-फ्रान्स अशी युतीच होती. या कार्यात गॉलने ‘जोन ऑफ आर्क’ची स्मृती जागृत करावी, हे अगदी साहजिकच होतं. जोनप्रमाणेच जर्मन शत्रूंविरुद्ध लढा, अशी प्रेरणा तो पराभूत फ्रेंच जनतेत निर्माण करत होता. पण, मार्शल पेताँच्या व्हिशी सरकारने देखील ‘जोन ऑफ आर्क’च्या कथेला उजाळा द्यायला सुरुवात केली. अशा अंगाने, तर ‘या इंग्रजांना आपल्या फ्रान्सच्या पवित्र भूमीतून हाकलून द्या,’ हे जोनचे शब्द अक्षरशः वापरून. अर्थात, फ्रेंच जनता शहाणी असल्यामुळे तिने ‘जोन ऑफ आर्क’पासून योग्य ती प्रेरणा घेऊन जर्मनांना हुसकावून लावलं आणि जनरल आयसेनहॉवरच्या मुक्तिदात्या अँग्लो-अमेरिकन सैन्याचं स्वागत केलं. १९१७साली रशियात साम्यवादी क्रांती झाली. रशियन इतिहासातले सगळे वीरपुरुष, महान राजे, राण्या, वीर स्त्रिया यांना ‘साम्राज्यवादी’ म्हणून बाद करून टाकण्यात आलं. ‘रशियन पितृभूमी’ वगैरे शब्द भावनिक-सेंटिमेंटल ठरवून रद्द करण्यात आले. पण, १९४१ साली हिटलरच्या झंजावाती नाझी सैन्याने सोव्हिएत प्रदेशात खोलवर मुसंडी मारताच चित्र बदललं. हिटलरसमोर गाडून उभं ठाकण्यासाठी साम्यवाद, कामगारांचं राज्य, श्रमिकांची सत्ता, लेनिन, स्टॅलिन इत्यादी शब्द कोणतीही प्रेरणा देऊ शकत नाहीत, हे रणांगणावरच सिद्ध झालं.



ताबडतोब बदल झाला. रशियन पितृभूमीसाठी प्राणपणाने लढण्याचं आवाहन जनतेला करण्यात आलं. पीटर-द-ग्रेट, कॅथरीन-द-ग्रेट इत्यादी महान राजे-राण्या, जनरल कुटुझॉवसारखे महान सेनापती यांच्या उज्ज्वल पराक्रमी इतिहासाला उजाळा देऊन, तो लोकांसमोर मांडण्यात येऊ लागला. ‘श्रमिकांचं राज्य’, ‘लाल क्रांती’ वगैरे पोपटपंचीपेक्षा या प्रेरणा लोकांना पटकन् पोचल्या. रशियन जनता खरोखरच प्राणपणाने लढली आणि हिटलर पराभूत झाला. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातले एक तज्ज्ञ प्रा. पॉल कोहेन हे अशाच विषयांचे अभ्यासक आहेत. विशेषतः एखाद्या देशात, एखाद्या समाजात, आणीबाणीच्या कालखंडात कोणत्या गोष्टी सांगितल्या जातात, कोणत्या प्रेरणा जागवल्या जातात, कोणत्या प्रेरणांमुळे त्या देशातला समाज त्या आणीबाणीवर मात करतो, हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांना असंही आढळलं आहे की, कठीण प्रसंगांवर मात करण्याच्या प्रेरणा जागवताना हे कथाकथन अनेकदा मूळ इतिहासात बरेच गडद रंग भरतात. या रंग भरण्याला इंग्रजीत ‘पॉप्यूलर कल्चर’ असं म्हणतात. त्यावरून प्रा. पॉल कोहेननी नुकतंच ‘हिस्ट्री अ‍ॅण्ड पॉप्युलर मेमरी’ असं पुस्तकच प्रसिद्ध केलं आहे. चीन, रशिया, फ्रान्स, पॅलेस्टाईन इत्यादी अनेक देशांतल्या प्रेरणा देणार्‍या ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास त्यात आहे.



भारताचा उल्लेख त्यात अर्थातच नाही. कारण, अमेरिकन तज्ज्ञ भारताला मुळी मोजतच नाहीत. पण, इस्लामच्या भीषण आक्रमणासमोर रोमन, पर्शियन, इजिप्शियन आदी प्राचीन संस्कृती कायमच्या नष्ट होत असताना हिंदू संस्कृती टिकून राहिली. या गोष्टीची नोंद या पाश्चात्त्य अभ्यासकांना घ्यावीच लागेल. इस्लामच्या असह्य रेट्यासमोर हिंदू पराभूत झाले, पण संपले नाहीत. दक्षिणेत हरिहर-बुक्क, उत्तरेत प्रताप राणा, पश्चिमेला शिवराय, पूर्वेला लाचित बडफूकन असे वीर सतत उभे राहत गेले आणि त्यांनी इस्लामचा पराभव केला. काय होती त्यांची नि त्यांच्याबरोबर पाय रोवून उभ्या राहिलेल्या समाजाची प्रेरणा? ती होती रामायण-महाभारताची प्रेरणा! कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, पुराणिक, चित्रकथी अशा लोकांनी शतकानुशतकं जागी ठेवलेली राम आणि कृष्ण यांची प्रेरणा! प्रा. पॉल कोहेन यांना ही प्रेरणा कधीच समजणार नाही. किंबहुना त्यांना ती समजली असेल, पण तोच त्यांचा चिंतेचा विषय असेल.
Powered By Sangraha 9.0