एका शोकांत नायकाचं स्मरण...

27 Jun 2020 22:16:07

arun sarnaik_1  



बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेक या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणारे, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांमध्ये कसदार अभिनय करणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणजेच अभिनयसम्राट अरुण सरनाईक.



’सिंहासन’मधले मुख्यमंत्री पत्रकार दिगूला म्हणजे निळू फुलेंना एका प्रसंगी म्हणतात, ’‘अरे, मला जायचं होतं देवाच्या आळंदीला, पण येऊन बसलो चोराच्या आळंदीत.‘’ हे विधान त्या अभिनेत्याच्या अभिनय प्रवासालाही लागू होत नाही का? त्यांचा अभिनय नैसर्गिक आणि सहजपणानं घडणारी कला होती. ’सामना’ आणि ’सिंहासन’ या दोन सिनेमांमुळे जब्बार पटेल हे मोठे दिग्दर्शक आहेत, असा आमचा समज होता. त्यालाही बोलता बोलता या कलाकाराने सुरुंग लावला. ‘त्याला काय कळतंय सिनेमातलं? ’सामना’तला तो बसचा शॉट केवढा लांबडा घेऊन ठेवला होता. कापायला लावला त्याला,’ असे या कलाकारालाच बोलण्याचा अधिकार होता. आपण समजतो तसं सगळंच ‘ग्रेट’ नसतं. मोठ्यांच्या मर्यादा सांगायला तेवढाच मोठा माणूस लागतो, हे ज्ञान आमच्या दृष्टीनं मोठं होतं. तिसरं एक ज्ञान त्यांनी दिलं ते अभिनयाबाबत. ’सिंहासन’ सिनेमातला तुमचा मुख्यमंत्री इतरांपेक्षा वेगळा का वाटतो, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘’सगळे अभिनय करत होते. मी अभिनय करत नव्हतो.” किती सहज पण महत्त्वाचं विधान होतं हे. ‘अभिनय’ ही मुद्दाम करावी अशी गोष्ट नसते. आपण ज्या नैसर्गिकपणाने जगतो, वावरतो तेवढ्या सहजपणानं ती घडली पाहिजे, हेच ते सांगत होते. अभिनयाच्या पाठशाळेतला मूलभूत धडाच ते सांगून गेले. मनासारखे सिनेमे, मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत. जे केलं ते तडजोड म्हणून, पण प्रामाणिकपणे केलं. भेटलेल्या प्रत्येक भूमिकेचे चीज करणारा अस्सल कलावंत म्हणजेच ‘अभिनयसम्राट अरुण सरनाईक.’



अरुण शंकरराव सरनाईक यांच्या घरातच कला होती. अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीततज्ज्ञ होते, तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. अरुण यांना या दोन्ही वडिलधार्‍यांकडूनच संगीताचे धडे मिळाले. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुण यांनी पेटी व तबला या वाद्यांच्या वादनात कौशल्य मिळवले होते. कलाक्षेत्राचे दार उघडण्यास अरुण यांना संगीताची हीच आवड उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी पदवीही मिळवली. तसेच कलाक्षेत्रात थेट उडी न मारता इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ काम पाहिले. परंतु, तेथे त्यांचा जीव काही रमला नाही. याच सुमारास मो. ग. रांगणेकर हे ‘भटाला दिली ओसरी’ हे नाटक बसवित होते. अरुण यांनी या नाटकात काम केले. याच वेळी त्यांच्याकडे एक उत्कृष्ट संधी चालून आली. ‘शाहीर प्रभाकर’ हा चित्रपट करण्याचे विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या मनात घोळत होते. अरुण यांनी यातील शीर्षक व्यक्तिरेखा साकारावी, असे त्यांच्या मनात होते. परंतु, काही कारणांमुळे हा चित्रपट बनला नाही आणि अरुण यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबले. प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांच्या ‘शाहीर परशुराम’ या चित्रपटात अरुण यांना एक दुय्यम भूमिका मिळाली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा ‘वरदक्षिणा’ आणि दत्ता धर्माधिकारी यांचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे चित्रपटही अरुण यांना मिळाले. परंतु, हे तिन्ही चित्रपट फार मोठे यश मिळवू शकले नाहीत. एक देखणा, रुबाबदार नायक चांगल्या संधीविना उपेक्षित राहणार, अशी भीतीही निर्माण झाली. परंतु, त्यानंतर आलेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाने किमया केली आणि ‘अरुणोदय’ झाला. या चित्रपटाने अरुण यांना मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांनी तबलावादन केले होते. प्रत्यक्ष चित्रपटात सरनाईकांची तबल्यावरील सफाई पाहून अल्लारखाँनी त्यांचे कौतुक केले होते.




प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसविणे सहजासहजी शक्य नसते. कारण, त्याच्यापुढे त्या काळातील मोठमोठी आव्हाने उभी असतात. सरनाईकांचा उदय झाला, तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यांसारख्या अभिनेत्यांची कारकिर्द ऐन भरात होती. त्यामुळे सरनाईक यांची डाळ शिजणे थोडे कठीण होते. परंतु, बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेक या जोरावर ते बघताबघता इतरांच्या पुढे गेले. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर त्या काळातला मराठी चित्रपट होता. अरुण सरनाईक यांनी या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले, तर ‘सुभद्राहरण’ या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधन (खलनायक) साकारला. सरनाईक यांची कारकिर्द उंचावण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे ‘एक गाव बारा भानगडी’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’, ‘सिंहासन’ आदी चित्रपट. ‘सवाल माझा ऐका’मधील त्यांचा ‘ढोलकीवाला जयवंत’ आजही रसिकांच्या लक्षात आहे. ‘केला इशारा जाता जाता’ या चित्रपटातही त्यांनी असाच ढोलकीवाला साकारला होता. ‘पाच नाजूक बोटे’ या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीने सादर केली. ‘मुंबईचा जावई’मधील सरनाईकांचा नाटकवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’मधील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकिर्दीमधील कळसाध्याय ठरली. मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते.


सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. त्यांनी ‘डोंगराची मैना’ आणि ‘गणगौळण’ या दोन चित्रपटात सरनाईकांना पार्श्वगायनाची संधी दिली. ‘घरकुल’ या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून ‘पप्पा सांगा कुणाचे’ हे अजरामर गीत गाऊन घेतले. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटामधील ‘एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...’ हे गाणेही त्यांच्यामधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारे ठरले. अभिनयातील व्यस्तता कायम ठेवत, आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेला त्यांनी छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणार्‍या ‘आनंदग्राम’मध्ये ते स्वत:ला झोकून द्यायचे. सरनाईक यांचा अभिनय अधिक नैसर्गिक होता. त्यांच्या अभिनयाची जातकुळी हिंदीमधल्या बलराज सहानी किंवा नसिरुद्दीन शाह यांच्यासारखी होती. अरुण सरनाईकांच्या वाट्याला आव्हानात्मक भूमिका अपवादानेच आल्या. त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात मराठीत तमाशापटांची चलती होती. त्यातून वेगळ्या भूमिकांना फारसा वावच नव्हता.



२५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी सुमारे पाऊणशे सिनेमे आणि २५ नाटकांमध्ये भूमिका केल्या. जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक हे कधीकाळी मराठी निर्माते, दिग्दर्शकांसाठी चलनी नाणं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर नानावटी खटल्यावर आधारित ’अपराध मीच केला’ हे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं नाटक खूप गाजलं. त्यात सरनाईक यांची प्रमुख भूमिका होती. चंद्रलेखा निर्मित ’गुड बाय डॉक्टर’, ’झुंज’, तसंच चिं. त्र्य. खानोलकर यांचं ’रखेली’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं. ’सोळावं वरीस धोक्याचं’, ’भानगडीशिवाय घर नाही’, अशा नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. व्ही. शांताराम यांच्या ’चंदनाची चोळी, अंग अंग जाळी’, तसंच ’घरकुल’ सिनेमातून त्यांची गायन क्षमता दिसून येते. चंद्रकांत आणि सूर्यकांत हे सरनाईकांच्या काळातले कलावंत. आपल्यापेक्षा सरनाईक यांची अभिनयक्षमता मोठी होती, हे ते मान्य करायचे. सरनाईक यांना हिंदी सिनेमांचे दरवाजे खुले झाले होते. नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर ’सितम’ सिनेमात त्यांना भूमिका मिळाली होती. आणखी दोन हिंदी सिनेमांचं चित्रीकरण सुरू होणार होतं. हिंदीतल्या तीन सिनेमांच्या ‘ऑफर्स’ त्यांना आलेल्या होत्या. मात्र, त्यांच्या मृत्यूनं पुढचा सगळा अभिनयाचा प्रवासच थांबवला. गिरीश कर्नाड यांच्या ’तुघलक’ नाटकात अरुण सरनाईक यांची मुख्य भूमिका होती. १९७२ च्या दरम्यान त्याचे मुंबईत सलग प्रयोग झाले. ‘अविष्कार’ निर्मित या प्रयोगाची नाट्यवर्तुळात चर्चा झाली. तापस सेन यांची प्रकाशयोजना, दामू केंकरे यांचं नेपथ्य आणि अरविंद देशपांडे यांचं दिग्दर्शन प्रयोगाला लाभलं होतं. त्यातली सरनाईकांच्या ’तुलघक’च्या भूमिकेने स्वतः कर्नाडही प्रभावित झाले. “मी पाहिलेल्या आतापर्यंतच्या ’तुघलक’मधे सरनाईकांचा तुघलक सर्वात प्रभावी होता,” असं कर्नाड यांनी तेव्हा म्हटलं होतं. त्यांचं हे विधान म्हणजे अरुण सरनाईक यांच्या ’अभिनयक्षमतेला मिळालेलं प्रशस्तिपत्र’ म्हणता येईल.



‘कलावंत’ म्हणून सरनाईक अत्यंत अशांत होते. आपण काय दर्जाचे सिनेमे केले, याची त्यांना जाणीव असावी. त्यावेळी मृत्यूच्या एक महिनाआधी सरनाईकांनी शिवाजी विद्यापीठातल्या अभिनय कार्यशाळेत तरुण पोरांशी संवाद साधला. अखंडपणे सिगारेट ओढत ते तासभर बोलत होते. तेव्हा त्यांची विधानं धक्कादायक, मेंदूला झिणझिण्या आणणारी वाटली. पण, आता त्यामागची वेदना लक्षात येतेय. संध्याकाळची वेळ होती. बोलता बोलता सरनाईकांनी विचारलं, “कुणाकुणाला नट व्हायचंय. हात वर करा. सतरा, अठरा मुलं होती. एकानं दबकत हात वर केला. पहिल्यांदा हक्काची पानपट्टीची का असेना गाडी टाक, मग अभिनयाच्या क्षेत्रात ये.” ते असं का म्हणताहेत, हे कुणालाच कळत नव्हतं. ते पुढं म्हणाले, ’‘तुम्ही गरजू आहात, असं कळलं की लोक तुम्हाला हवं तसं वापरून घेतात. केलेल्या कामाचे पैसेसुद्धा नीट देत नाहीत.” सरनाईक यांच्या विधानामागे अनुभवांचा कडवटपणा होता. ‘अभिनय’ हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय होता. सिनेमा आणि नाटकाच्या प्रयोगातून पुरेसे पैसे मिळत नव्हते. आज टीव्ही मालिकांमुळे कलावंतांची गुणवत्ता घसरली असली तरी आर्थिक प्रश्न कमी झालेत, पण तडजोडी आहेतच. सरनाईक यांना त्या अधिक प्रमाणात कराव्या लागल्या असाव्यात. पैशासाठी म्हणून सरनाईक यांनी कधीच कुणा दिग्दर्शक, निर्मात्याची अडवणूक केली नाही. ते किती पैसे मिळणार हे कधीच विचारायचे नाहीत, असं अनंत माने सांगायचे. मात्र, त्यांच्या स्वभावाचा अवाजवी फायदा घेतला गेला. स्वतःच्या मूलभूत गरजा भागतील असा एखादा व्यवसाय असायला हवं. मग ती पानपट्टी का असेना, तर आपण आपल्या बोलीवर जगू शकतो. हव्या त्या भूमिका करू शकतो किंवा नाकारू शकतो, असं त्यांना सुचवायचं असावं. त्याचा खुलासा त्यांनी पुढच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना केला. ‘तुम्ही तमाशापटातून भूमिका का केल्या,’ असा तो प्रश्न होता. ’‘काय करणार? पैसा लागतो ना; तो कुठून मिळवणार? मुलगा इंजिनिअर, मुलगी मेडिकलला. त्यांचं शिक्षण करायचंय, तर ते करणं भाग होतं.” त्यांच्या या विधानात ‘अभिनेता’ मागे पडून ’कुटुंबवत्सल बाप’ दिसत होता.



सुमारे साडेतीन दशकांच्या कारकिर्दीत सर्व काही मिळाल्यानंतर सरनाईकांना वेध लागले होते ते निवृत्तीचे! शक्यतो कलाकार कधीच निवृत्त होत नसतो. मात्र, इतरांपासून वेगळा असणारा हा कलाकार गावी जाऊन शेती करण्याचे मनसुबे बांधत होता. आयुष्यभर धावपळ, दगदग झाल्यानंतर गावी घर बांधून तिथे विश्रांती घेण्याचाही त्यांचा विचार होता.परंतु, तो नियतीला काही मंजूर नव्हता. २१ जून १९८४ च्या पहाटे ’पंढरीची वारी’ या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपून कोल्हापूर-पुणे असा आपल्या कुटुंबीयांसमवेत प्रवास करीत असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला आणि हा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यावेळी सरनाईकांचं वय पन्नाशीच्या आसपास होतं. वयानं आणखी काही वर्षं साथ दिली असती, तर कदाचित या कलावंतांकडून आणखी काही उत्कृष्ट कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. अशा हरहुन्नरी कलावंताला मानाचा मुजरा...


- आशिष निनगुरकर
Powered By Sangraha 9.0