विजयन : भारतीय फुटबॉलचे ‘अनसंग हिरो’

19 Jun 2020 21:59:51


I M Vijayan_1  


भारतामध्ये फुटबॉलचा पाया भक्कम करणारे आणि नि:स्वार्थपणे फुटबॉलसाठी काम करणारे माजी फुटबॉलपटू आय. एम. विजयन यांच्याबद्दल जाणून घेऊया...
 

क्रिकेटबरोबरच फुटबॉल हा खेळही देशाच्या कानाकोपर्‍यात खेळला जातो. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक फुटबॉल क्षेत्रात भारतीय संघाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचा वाटा आहे. विशेष म्हणजे, भारतीय फुटबॉलपटूंचे जगभरामध्ये असंख्य चाहते आहेत. ‘इंडियन सुपर लीग’ भारतामध्ये चालू झाल्यापासून क्रिकेटसारखेच फुटबॉललाही ‘ग्लॅमर’चे वलय प्राप्त झाले. परंतु, यामागे काही असेही ‘अनसंग हिरो’ आहेत, ज्यांनी देशामध्ये फुटबॉलचा पाया भक्कम करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. ‘इनिवलापिल मणि विजयन’ म्हणजेच ‘आय. एम. विजयन’ हेदेखील त्या ‘अनसंग हिरो’च्या यादीत मोडतात. भारतीय फुटबॉलपटू, प्रशिक्षक ते मार्गदर्शक अशा अनेक रूपांमध्ये त्यांनी या क्षेत्राची सेवा केली आहे. मात्र, प्रकाशझोतापासून ते कायमच दूर राहिले. त्यामुळे भारतीय फुटबॉलच्या इतिहासामध्ये जरी त्यांची ठळक नोंद नसली तरी ते नवोदित तरुणांचे आदर्श आजही आहेत. भारतासाठी त्यांनी अनेक सामने जिंकून दिले, मात्र त्यांच्या कामगिरीचा कधीच दिखावा केला नाही. नुकतीच त्यांच्या नावाची शिफारस ही ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉलच्या इतिहासामध्ये लपलेले हे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
 

इनिवलापिल मणि विजयन यांचा जन्म २५ एप्रिल १९६९ रोजी झाला. केरळमधील त्रिचूर या शहरामध्ये एका गरीब मल्याळी कुटुंबामध्ये जन्मलेल्या विजयन यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यांचे शिक्षण त्रिचूरमधील चर्च मिशन सोसायटी उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहामध्ये मदत करण्यासाठी ते त्रिचूर महानगरपालिका स्टेडिअममध्ये सोडा बॉटल विकत असत. ते एका गरीब वातावरणामध्ये वाढले असले तरी त्यांच्यावर फुटबॉलचा प्रभाव लहान वयातच पडला. त्यांच्यातील फुटबॉलमधील प्रतिभा केरळचे तत्कालीन पोलीस महासंचालक एम. के. जोसेफ यांनी हेरली आणि सतराव्या वर्षी विजयन यांची केरळ पोलीस फुटबॉल क्लबमध्ये निवड करण्यात आली. विजयन आणि फुटबॉल या समीकरणाला इथून खरी कलाटणी मिळाली. या क्लबकडून खेळताना विजयन यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या सफाईदार आणि आक्रमक खेळाकडे राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या काही अधिकार्‍यांचे लक्ष गेले. १९९१ पर्यंत विजयन यांनी केरळ पोलीस संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मोहन बागान क्लबसाठी ते वर्षभर खेळले. पुन्हा १९९२ मध्ये त्यांनी केरळ पोलीस संघामध्ये पुनरागमन केले. याचदरम्यान १९८९ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्येदेखील पदार्पण केले. भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी नेहरू कप, ऑलिम्पिक पूर्व स्पर्धा, फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अशा अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. विजयन आणि भाईच्युंग भुतिया या जोडीमुळे भारतीय संघाला आतापर्यंत कधी तयार न मिळालेली सर्वाधिक आक्रमक जोडी मिळाली होती. या दोघांच्या खेळामुळे भारतीय संघाला महत्त्वपूर्ण विजय प्राप्त करून दिले.
 
 
पुढे १९९४ ते १९९७ मध्ये विजयन यांनी तीन वर्षे जेसीटी क्लबचे प्रतिनिधित्व केले. पुढे १९९८ मध्ये पुन्हा एकदा मोहन बागान क्लबकडून खेळले. १९९९ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन कप स्पर्धेमध्ये एका सामन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वाद जलद गोल करण्याची किमया विजयन यांनी केली. भूतानविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी अवघ्या १२ सेकंदामध्ये गोल करत इतिहास रचला होता. सध्या त्यांचा हा गोल जगातील तिसरा सर्वात जलद गोल मानला जातो. विजयन यांनी १९९३, १९९७ आणि १९९९ मध्ये ‘प्लेअर ऑफ द इयर’ हा पुरस्कारही पटकावला. विशेष म्हणजे, १९९८ मध्ये ‘कालो हिरण’ नावाचा त्यांच्या आयुष्यावर आधारित एक जीवनपटदेखील प्रदर्शित झाला. पुढे २००३ मध्ये आफ्रो-आशियाई गेम्सदरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. निवृत्त होईपर्यंत त्यांनी भारतासाठी अनेक सामने खेळले आणि जिंकलेही. त्यानंतर त्यांनी मलेशिया आणि थायलंडमधील काही क्लबचे मार्गदर्शक म्हणूनही काम केले. २००३ मध्ये त्यांना ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. भारतीय संघासाठी खेळताना त्यांनी ७९ सामने खेळताना ४० महत्त्वपूर्ण निर्णायक गोल केले. आंतरराष्ट्रीय खेळातून जरी त्यांनी निवृत्ती घेतली असली, तरी २००६ मध्ये त्यांनी पूर्व बंगालकडून अखेरचा क्लब सामना खेळला. त्यांच्या क्लब कारकिर्दीमध्ये अंदाजे २४०हून अधिक गोल केले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले. त्यांनी २० हून अधिक मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्ये कामही केले आहे. एका मैदानामध्ये सोडा बॉटल विकणारा ते एक यशस्वी भारतीय फुटबॉलपटू हा त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. एवढे असूनही शांत स्वभाव, उत्तम मार्गदर्शक म्हणून आजही त्यांच्याकडे पहिले जाते. त्यामुळे ‘पद्मश्री पुरस्कारा’ने सन्मान होणे, हे त्यांच्या कार्याला एक मानवंदना असेल, हे नक्की. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा...

 
 
Powered By Sangraha 9.0