चला कामाला लागूया!

17 Jun 2020 21:16:02
COVID-19 _1  H
 

सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचे नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचेही तसेच. अर्थव्यवहार, बाजारपेठ, अर्थचक्र म्हटलं की बहुतांश जण नाके मुरडून तसले विषय वाचण्याकडेही दुर्लक्ष करतात. पण, तुमचा-आमचा आणि प्रत्येकाचा संबंध या जगाशी दररोज येत असतो. तेव्हा कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर कोसळलेले हे संकट पेलण्यासाठी चला कामाला लागूया!



आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चीनला कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा जोरदार फटका जरी बसत असला, तरीही स्वतःच्या सामर्थ्यावर पुन्हा उभारी घेण्याची तयारी तेथील यंत्रणांची, जनतेची आहे. त्यामुळे थांबलेल्या अर्थचक्राला पुन्हा गतिमान करण्यासाठी चीनला इतर देशांच्या तुलनेत फारशी कसरत करावी लागणार नाही.
थोडा अमेरिकेतील परिस्थितीचा आढावा घेऊया. तेथील एकूणच अर्थव्यवस्थेचे मोडलेले कंबरडे पाहता, हे सर्व पुन्हा सुरळीत सुरू होण्यास २०३० हे वर्ष उजाडेल, अशी शक्यता तेथील सरकारने व्यक्त केली आहे. लोकांचे बंद पडलेले उद्योग, बेरोजगारी हे प्रश्न अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम करतील, असे भाकीत तिथल्या सरकारने व्यक्त केले. काहींच्या मते जागतिक अर्थव्यवस्था ही ‘V’आकारात पुन्हा उभारी घेईल.
 

 
काहींच्या मते, हा आकार ‘U’ प्रमाणे असू शकतो, तर काहींच्या मते हा आकार ‘W’ असेल तर काहींच्या मते हा आकार ‘√’ या चिन्हाच्या आकारात असू शकतो. अंतिमतः या सर्वांच्या मते सर्वकाळी सुरळीत राहिले आणि पुन्हा कोणतीही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावली नाही, तर अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होईल. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता बहुतांश देशात वाढताना दिसते. पण, कोरोनाचा रुग्ण ज्याप्रमाणे महिनाभराचे औषधोपचार घेऊन बरा होतो, तशी अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी मात्र पुन्हा व्यवस्थित बसवणे हे तितकेसे सोपे नाही. हे सर्वकाही पुन्हा सुरळीत सुरू होणे बर्‍याच घटकांवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या किमतींपासून ते अन्नधान्याच्या उत्पादनापर्यंत, उद्योगधंद्यांपासून ते बेरोजगारांच्या समस्यांपर्यंत, सारं काही या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. अगदी तुम्ही, आम्हीही, अर्थार्जनासाठी सुरू असलेल्या प्रत्येक कामाची विभागणी देशाच्या विकासदरात आपसूक गणली जाते.
 

 
काही देश, काही गावे खेडी कोरोनामुक्त आहेत. परंतु, तेथील जनता बुडित अर्थचक्रापासून अलिप्त राहू शकली, असा दावा कुणीच करणार नाही. कोरोनाशी लढा देणे, संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता घेणे खूप सोपे. मात्र, अर्थव्यवस्थेला कूर्मगतीने पोखरणार्‍या वाळवीला दूर करण्यासाठी प्रत्येकाला या लढाईत ‘सैनिक’ बनून उतरावे लागेल. आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आता पुन्हा आपल्यालाच सज्ज व्हावे लागेल. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. उद्योगांवरही कर्जाचा डोंगर आहे. या सर्व गोष्टी रुळावर येण्यासाठी वेळ तर जाईलच. हे मान्य करून तयारी करण्याची गरज आता जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.


 
प्रत्येक देश आता स्वतःच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जितके शक्य होईल, तितके प्रयत्न करताना दिसतो. गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, इतर देशांना होणारा फायदा-तोटा लक्षात घेत नव्या कायदे योजना लागू करण्याची तयारी सुरू आहे. अर्थात, कोरोनानंतरचे जग कसे असेल, याची कल्पना आता हळूहळू स्पष्ट होऊ लागली असेल. त्यानुसार आर्थिक गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी धावणारी यंत्रणा काहीशी थंडावलेली दिसेल. लोकांना आता काम करण्यासाठी भल्या मोठ्या ऑफिसची गरज राहिली नसून घरातील एका कोपर्‍या अखंडित इंटरनेट आणि एका लॅपटॉपवरही तितकेच काम केले जाते.
 
 

अनेक कंपन्यांची आलिशान कार्यालये कित्येक महिन्यांपासून बंद पडून आहेत. तासन्तास धक्काबुक्की करत असलेला प्रवास असो किंवा आपल्या गावाखेड्यापासून दूरवर जाऊन करावे लागणारे काम आता घरबसल्या सहज शक्य होते. जगण्याची परिभाषा जशी बदलेल तसे जगही बदलेल, यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माणूस धडपडेल, अर्थव्यवस्थाही बदलेल. पण, सध्या गरज आहे ती म्हणजे उठून जोमाने कामाला लागण्याची, मग ते सरकार असो, प्रशासन असो वा सर्वसामान्य माणूस...





Powered By Sangraha 9.0