‘कोरोना’ अन् शैक्षणिक क्रांती!

14 Jun 2020 21:38:57
study online_1  
 
 
जगात सुरू असलेल्या कोरोना आणि निर्बंधांचा फटका तर सार्‍याच क्षेत्रांना बसला. जगभरातील नामवंत विद्यापीठेही याला अपवाद नाहीत. शिक्षणासाठी परदेशवारी करणार्‍यांना जसा ‘लॉकडाऊन’मुळे शिक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे, त्याहूनही कित्येक पटींनी जास्त चिंता जगभरातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न शिक्षण संस्थांना आहे. शंभरहून अधिक विद्यापीठे ‘लॉकडाऊन’मुळे कर्जाच्या भाराखाली दबली आहेत.


जागेचे भाडे, शिक्षकांचा पगार, रोजचा खर्च, इतकी भल्यामोठ्या संस्थांचे चक्र सुरू ठेवण्यासाठी लागणारे आर्थिक वंगण कमी पडत असल्याने काहींवर टाळेबंदीत दारे बंद करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले, सरकारतर्फे येणारी अनुदाने थकली, इतर मिळकती मागे पडल्या, परिणामी हावर्डसारख्या प्रतिष्ठीत विद्यापीठावरही कर्जबाजारी होण्याची नामुष्की ओढावली.
‘लॉकडाऊन’मुळे शिक्षणही ऑनलाईन मिळू लागले. परंतु, पुन्हा परीक्षांचा प्रश्न उद्भवला. मग विद्यार्थ्यांनी पुन्हा ऑनलाईन वर्गासाठी इतके मोठे भरमसाठ शुल्क का भरावे, मग ती जगातील कुठलीही अद्ययावत शिक्षण संस्था असो, असा प्रश्न व्यावहारिक दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि पालकांना पडणे साहजिकच आहे. भला मोठा कॅम्पस, त्यात रमणारे विद्यार्थी, जिमखाना, सांस्कृतिक कार्यक्रमाने गजबजलेला हॉल, भव्य ग्रंथालये, कॅन्टिन, हे सारं काही काहीकाळ थांबलं आहे.


डिजिटल शिक्षण सुरू झाले तेव्हा क्षणभरासाठी प्रश्नही पडला असेल की, या सर्वांची खरंच गरज होती का? आणि तीही अशावेळी जेव्हा अनेक पालकांचा पगार थांबला, व्यवसाय बुडित गेला, नोकर्‍या गेल्या, दैनंदिन खर्च भागवण्याची चणचण जाणवू लागली. घरातील कुणी तरी कोरोनाशी झुंज देतय, अशावेळी परदेशांतील मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची कोणाची मानसिकता असेल, हा देखील प्रश्नच आहे. विद्यार्थी नाहीत, मिळकत नाही, वर्ग नाहीत, यामुळे कर्जाचे डोंगर आणि सारं काही ठप्प अशा अवस्थेत पुन्हा सर्व सुरळीत कसे सुरू होणार, या विचारात शिक्षण संस्थाचालक आहेत.


मुळाच हे सांगण्याचा उद्देश कुणी परदेशात शिक्षण घेणार्‍यांच्या मानसिक खच्चीकरण करण्याचा मुळीच नाही. ज्या प्रकारे इंटरनेटचा शोध युद्धजन्य परिस्थितीवेळीच लागला आणि त्याच माहिती जंजालात अवघ्या जगाने डिजिटल क्रांती केली, चंद्रावर पाऊल ठेवले, तशीच क्रांती आणि तसाच बदल आता शैक्षणिक क्षेत्रातही अपेक्षित आहे. तसे झाले तर गगनचुंबी विद्यापीठांच्या इमारतींचे काय होणार? वर्षाला उच्चशिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी भरमसाठ शुल्क आकारणार्‍या विद्यापीठांचे काय होणार हा प्रश्न आहे. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या भवितव्याचा, जग याचाच जास्त विचार करेल. विद्यापीठांना आणि शैक्षणिक संस्थांना हे बदल स्वीकारून परिस्थितीपुढे नमते घ्यावेच लागेल.


नवी ज्ञानाची कवाडे खुली होतील. नव्या डिजिटल शैक्षणिक संस्था सुरू होतील. शिक्षण तेच असेल, मात्र ते विद्यार्थ्यांच्या आवाक्यात असेल. तिथेही गुणकौशल्याला वाव असेल, तिथेही गुणांची पारख असेल, तिथेही शिक्षक तेच असतील. परंतु, शिक्षणावर वारेमाप पैसा उधळण्याची मानसिकता कुठेतरी कमी होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्यातली गोष्ट बनेल. परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍यांना उद्भवत असलेल्या प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे स्टुडंट व्हिसा, वर्क व्हिसा, कोरोनाचे दडपण घेऊन परदेश प्रवास, तिथल्या राहण्याचा खर्च, विद्यापीठांचे शुल्क, तिथल्या सरकारतर्फे बदलणारे आणि कठोर नियम. आज या सर्वांच्या गर्तेत अकडून बसलेला विद्यार्थीवर्ग मोठा आहे. नव्याने होऊ घातलेले बदल आता जग कसे स्वीकारते, हे आपण पाहणारच आहोत.

कुशल कामगारांचा प्रश्न ज्या अर्थी जगभरात उभा राहिला असेल, त्या अर्थी तो दिवस दूर नाही. विद्यार्थ्यांना थेट व्यावसायिक प्रशिक्षण, पाठ्यपुस्तकातील सैद्धांतिक गोष्टींसह प्रात्यक्षिक ज्ञान या दृष्टीनेही शिक्षण घेता येईल. डिजिटल ज्ञानाचे भांडारही खुले होईल, घरबसल्या परदेशातील शिक्षण घेणेही शक्य होईल आणि नोकरीच्या संधीही, हे सर्व विद्यापीठांच्या भरमसाठ शुल्काच्या १० टक्के रकमेत उपलब्ध असेल. काही देशांमध्ये या प्रकारच्या अ‍ॅकॅडमीजची सुरुवातही होऊ लागली आहे. कोरोनाच्या पूर्वी शिक्षण हे खर्चिक होते, हे वास्तव आपल्याला आता स्वीकारावेच लागेल. शिक्षण क्षेत्रातील क्रांतीची कित्येक शतकांपासून जी अपेक्षा आहे ती पूर्ण होईल...
 
 
 
Powered By Sangraha 9.0