कट्टरतेचा खेळ

12 Jun 2020 21:16:27


PUBG_1  H x W:

इस्लामच्या बाबतीत विचार करायचा तर ‘पब्जी’ खेळून एखाद्या पूजापद्धतीला प्रोत्साहन कसे मिळत असेल? ऑनलाईन गेम्समधील प्रत्येक गोष्ट त्यांनी इस्लामच्या तत्त्वांवर पडताळून पाहायला हवी. ‘पब्जी’ खेळावा की खेळू नये, याचेही उत्तर शोधण्याचा प्रयत्न अशा कट्टरपंथीयांणी केला पाहिजे.



अ‍ॅण्ड्रॉईड जगतात अनेक नवनवे गेम्स आले आहेत. मात्र, ‘पब्जी’ या खेळाचा चाहता वर्ग गेले अनेक वर्षे कायम आहे. ‘प्लेअरअननोन्स बॅटलग्राऊंड’ असे या खेळाचे नाव. जगभरात ४०० दशलक्ष लोक ‘पब्जी’ खेळत असतात. युद्धजन्य अनुभव देणार्‍या या खेळाला विकत घेऊन खेळणार्‍यांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. ‘ऑनलाईन गेमिंग’ या प्रकारात हा खेळ मोडतो. ‘पब्जी’ या खेळाचे व्यसन लागल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, असा वाद भारतातही झाला होता. प्रचंड लोकप्रियता पावलेला हा गेम अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. खेळाडूंना ‘बॅटलग्राऊंड’ म्हणून नवनवे प्रयोग करणे, ही हा गेम डेव्हलप करणार्‍यांची खासियत आहे. नवे ‘बॅटलग्राऊंड’ म्हणून या खेळात एक नकाशा अ‍ॅप डेव्हलपर्सच्या वतीने तयार करण्यात आला होता. ‘मिस्टरीयस जंगल’ या मोडमध्ये ‘सनौक’ या नकाशावर खेळता येत असे. त्यासंबंधी इस्लामिक कट्टरपंथीयांनी टीकेची झोड उठवली. सनौक नकाशा तातडीने काढून टाकण्यात आला आहे. तसेच गेमच्या डेव्हलपरला त्याबद्दल जाहीर माफी मागावी लागली. या नव्या नकाशात असे काय होते, हे समजून घेतले तर या प्रकरणातून अधोरेखित झालेल्या मानसिकतेचे धोके आपल्या लक्षात येतील.
 

‘मिस्टरीयस जंगल’ या मोडमध्ये ‘पब्जी’चे खेळाडू ‘सनौक’ या नकाशावर खेळू शकत होते. खेळ खेळत असताना खेळाडूची हेल्थ कमी झाल्यास ती वाढविण्याचा उपाय या नकाशात होता. स्वतःची हेल्थ पुन्हा मिळवण्यासाठी खेळाडूंना ‘टोटेम’समोर प्रार्थना करावी लागत असे. ‘टोटेम’ हे एकतेचे प्रतीक समजले जाते. जनजातीच्या समूहात दैवी शक्तीसोबत माणसाच्या संवादाचे एक माध्यम म्हणूनही ‘टोटेम’कडे पाहिले जाते. ‘टोटेम’समोर बसून प्रार्थना केल्याने हेल्थ वाढण्याचे फिचर डेव्हलपर्सनी या नकाशात ठेवले होते. यामुळे मूर्तिपूजेला प्रोत्साहन मिळते, असं इस्लामिक कट्टरपंथी समूहाचे म्हणणे आहे. मूर्तिपूजा इस्लामला मान्य नाही आणि गेमच्या माध्यमातून मूर्तिपूजेचा आग्रह होतो, असाही दावा धर्मांधांचा होता. ‘पब्जी’ खेळणार्‍या मुस्लीम समाजातील लोकांनी यावर टीकेची झोड उठवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पब्जी’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. जगभरातील मुसलमानांनी आपल्या मोबाईलमधून ‘पब्जी’ काढून टाकायला सुरवात केली. ‘ब्लुहोल’ म्हणजेच ‘पब्जी’ खेळ बनवणार्‍या कंपनीने या दबावाला बळी पडून तातडीने याबाबत निर्णय केले. ‘सनौक’ हा मॅप गेममधून काढून टाकण्यात आला. ‘पब्जी’चे डेव्हलपर्स नकाशा काढून थांबले नाहीत, तर त्यांनी माफीदेखील मागितली. एका ऑनलाईन गेमच्या एका फिचरमुळे जर जगभरातील कट्टर मुस्लीम एकत्र येत असतील, तर या मानसिकतेचा विचार वेळीच केला गेला पाहिजे. कारण, जग ऑनलाईन होत असताना डिजिटल व्यासपीठांचे मापदंड निश्चित होण्याचे हेच दिवस आहेत. त्यात असा दबावगट कोणतातरी संप्रदाय धर्मांधतेच्या आधारे तयार करणार असेल तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात. इतरही अनेक डिजिटल माध्यमांतून धर्मांवर टीका सातत्याने होत असतात. भारताच्या बाबतीत हिंदू धर्म कायम ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतो. तेव्हा असे काही होत नाही. इस्लामच्या भावना मात्र लगेच दुखावतात व त्याची काळजीही घेतली जाते. मग इतर धर्मीयांच्या भावनांचे काय? मूर्तिपूजेचे फिचर काढून टाकले जात असेल तर तो मूर्तिपूजकांचादेखील अपमान आहे. त्यांनीही अशाच मोहिमा चालवायला सुरुवात करायची का? तसे झाले तर ऑनलाईन गेमच्या निर्मात्यांना त्यासाठी पुन्हा माफी मागावी लागेल. अद्याप तसे काही झालेले नाही व होण्याची शक्यताही नाही. मात्र, या लांगूलचालनातून ऑनलाईन उद्योगजगतासमोर विचित्र प्रश्न निर्माण होतील. कारण, अशा पवित्र्याने धर्मविशेष दबावगटांना अजून प्रोत्साहन मिळणार आहे.
 
इस्लामच्या बाबतीत विचार करायचा तर ‘पब्जी’ खेळून एखाद्या पूजापद्धतीला प्रोत्साहन कसे मिळत असेल? ऑनलाईन गेम्समधील प्रत्येक गोष्ट त्यांनी इस्लामच्या तत्त्वांवर पडताळून पाहायला हवी. ‘पब्जी’ खेळावा की खेळू नये, याचेही उत्तर शोधण्याचा प्रयत्न अशा कट्टरपंथीयांणी केला पाहिजे. तसेच जागतिकीकरण झालेल्या विश्वात किमान सहिष्णुतेची तयारी सर्वांनीच बाळगली पाहिजे. खेळ हे मनोरंजनाचे एक साधन आहे. त्यात आनंद शोधायचा असतो धर्म नाही, हे सांगण्याची संधी ‘पब्जी’कडे होती. मात्र, त्यांनी ती गमावली आहे.

 
Powered By Sangraha 9.0