'कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण' योजनेचा फायदा
मुंबई (अक्षय मांडवकर) - राज्यात 'कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत' सुरू झालेले उपक्रम किनारी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी लाॅकडाऊनच्या आर्थिक संकटात उत्पन्नाचे साधन ठरले आहेत. या योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या जिताडा, खेकडा, कालवे, शिंपले पालन आणि शोभिवंत मत्स्यशेतीअंतर्गत किनारी भागातील लोकांना लाॅकडाऊनमध्ये साडे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजूनही या उपक्रमांमधून उत्पादनाची प्रक्रिया सुरू असून पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात असे उपक्रम मोठ्या संख्येने सुरू करण्यासाठी राज्याच्या 'कांदळवन कक्षा'कडून (मॅंग्रोव्ह सेल) सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात कांदळवन संरक्षणाबरोबरच त्यातून रोजगार निर्माण होण्याच्या अनुषंगाने २०१७ साली 'कांदळवन संरक्षण आणि उपजीविका' निर्माण योजना सुरू करण्यात आली. यामाध्यमातून 'कांदळवन कक्षा'च्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'अंतर्गत राज्यातील किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये गावकऱ्यांच्या 'कांदळवन सह-व्यवस्थापन समित्या' स्थापन करण्यात आल्या आहेत. समित्यांमधील लोकांना जिताडा, खेकडा, कालवे, शिंपले पालन आणि शोभिवंत मत्स्यशेतीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. तसेच या प्रकल्पांसाठी 'कांदळवन कक्षा'कडून ९०% निधी, तर १०% निधी लाभार्थ्यांकडून घेतला जातो. त्याशिवाय या उपक्रमांच्या अंमलबजावणीदरम्यान 'केंद्रीय खारपाणी जलजीव पालन अनुसंधान संस्थे'च्या (सिबा) शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनही लोकांना मिळते. सध्या या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २४२ बचत गट कार्यरत आहेत. लाॅकडाऊन दरम्यानच्या आर्थिक संकटात या बचत गटांमधील लोकांना जिताडा-कालवे-शिंपले-खेकडा पालन आणि शोभिवंत मत्स्यपालानामुळे उत्पन्न मिळाले आहे. या उपक्रमांमधून लोकांना लाॅकडाऊनच्या अडीज महिन्यांमध्ये ९ लाख ४६ हजार १८४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
'कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजने'अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने जिताडा-कालवे-शिंपले-खेकडा पालन आणि शोभिवंत मत्स्यपालनाचे उपक्रम सुरू आहेत. वर्षभरातच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये अशा उपक्रमांना मोठ्या पातळीवर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती टमॅंग्रोव्ह फाऊंडेशनटच्या उपजीविका विभागाचे उप-संचालक डाॅ. सुशांत सनये यांनी दिली. साधारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपर्यत या उपक्रमांअंतर्गत निर्माण झालेल्या उत्पादनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू राहणार आहे. त्यामुळे एकूण उत्पन्नाच्या रक्कमेतही येत्या काळात वाढ होणार असल्याने सनयेंनी सांगितले. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०० लोकांना या उपक्रमांअंतर्गत सुमारे २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सिबाचे शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी दिली. सिंधुदुर्गमध्ये अजूनही यंदाच्या उत्पादनाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याचे, ते म्हणाले. लाॅकडाऊनमध्ये ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीत कांदळवनांवर आधारित अशा प्रकारच्या उपजीविकेच्या उपक्रमांमधून मिळालेल्या उत्पन्नामुळे गावकऱ्यांना कांदळवन रक्षणाचे महत्व पटले आहे. यंदाच्या वर्षात राज्याच्या किनारी भागांमध्ये जिताडा-कालवे-शिंपले-खेकडा पालन आणि शोभिवंत मत्स्यपालनाबरोबरच निसर्ग पर्यटन सुरू करण्यासाठी 'मॅंग्रोव्ह सेल'कडून ३ कोटी २० लाख ८४ हजार ३०४ रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी 'महा MTB'ला दिली.